प्रस्तावना
माणूस हा कळपाने रहाणारा प्राणी आहे. माणसांच्या कळपाला समाज म्हणतात. या कळपातील माणसे तह्रेतह्रेच्या धाग्यांनी एकमेकांशी जोडलेली, बांधलेली, जखडलेली असतात. कळपाने, सामुहिक जीवन जगताना माणसे कशी वागतात हे निरखून बघणे म्हणजेच माणसाचा सांस्कृतिक, सामाजिक अभ्यास. आपण त्या संदर्भातील नियमांचा शोध घेऊ लागलो की अभ्यासाचे होते शास्त्र. समाज रचनेचे, मानव संस्कृतीच्या विकासाचे असे काही नियम असतात का? असले तर ते स्थलकाल सापेक्ष असतात की निरपवाद आणि सार्वत्रिक? मुळात समाज घडला कधी, कसा आणि का? या आणि अशा काही प्रश्नांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. माझा अपेक्षित वाचक कोण? तर गमतीचे, मॊजमजेचे, हलके फ़ुलके वाचन पुरेसे झाल्यावर किंचित जास्त वजनदार वाचाण्याची हॊस उरलेला प्रॊढ मराठी माणूस. एखाद्या विद्यापीठीय अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक कोणाला उपयुक्त वाटले तर तो एक योगायोगच म्हणावा लागेल.
हे पुस्तक गंभीर विषयावर आहे. पण त्याचे लिखाण सोपे व सुलभ ठेवण्याचा प्रयत्न मी केला आहे. यात समाजशास्त्रीय परिभाषा अशी नाही. रोजच्या व्यवहारातील शब्दच बहुतेक ठिकाणी वापरले आहेत. समाजशास्त्राचा रुढ चाकोरीतून अभ्यास केलेला नसल्यामुळे मला मुद्दलात अशी Jargon फ़ारशी माहीतच नाही. म्हणून ती टाळण्यासाठी फार प्रयत्न करावा लागला नाही.
सुरुवातीला जरी मी साऱ्या जगाला गवसणी घालण्याचा आव आणला असला तरी हे पुस्तक मुख्यत: मराठी माणसाबद्दल आहे. याचे कारण म्हणजे माझा मुळात थोडका असलेला अनुभव हा बराचसा मराठी समाजाच्या संदर्भात आहे. जागोजागी मी इतर प्रांत वा देश यांची उदाहरणे वापरली आहेत. पण मुख्य रोख मराठमोळा आहे.
माझ्यासारखा संख्याशास्त्राचा शिक्षक या भलत्याच विषयाकडे वळतो तरी कशाला? एकतर सुजाण माणसाला आपण ज्या समाजाचा भाग आहोत याचे अंतरंग समजावून घेण्याची उत्सुकता असतेच. शिवाय कॉलेजमधे शिकत असताना मी युक्रांद अर्थात युवक क्रांती दल या संघटनेत होतो. त्यावेळी कुमार सप्तर्षी, अनिल अवचट यांच्यासारखे विद्यार्थी मित्र, पु. ग. सहस्त्रबुध्दे, श्रीराम चिंचलीकर, राम बापट यांच्या सारखे ज्येष्ट मार्गदर्शक अशांच्या सहवासातून वेगवेगळे संस्कार झाले. आजूबाजूला सामाजिक समस्यांची तर कमतरता नव्हतीच. ही जरा वेगळी पूर्वपीठिका. तिसरी आणि शेवटची बाब म्हणजे प्रसिध्द निसर्गशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्या सहवासात मी जीवशास्त्राच्या आणि विशेषत: परिसर अभ्यासाच्या माध्यमातून समाजाकडे बघायला शिकलो. माझ्या असे लक्षात आले की हा पॆलू अनेकाना नवीन असतो. म्हणून केलेले वाचन + ऎकलेल्या गप्पा + घेतलेले अनुभव अशी खिचडी पकवण्याचा घाट घातला. बिरबलाच्या खिचडीप्रमाणे या प्रकल्पाला मूर्त रूप येण्याला चांगली १०-१२ वर्षे लागली. अर्थात या लिखाणाची वाट पहात कोणीच अवघडलेले नव्हते.
जीवशास्त्रीय दृष्टिकोन समजावून घेताना मी दोन पुस्तके लिहिली. माझ्या पॊढ शिक्षणातले हे टप्पे. पहिले पुस्तक ‘ नराचा नारायण’. जीवशास्त्राचा जो पायाभूत सिध्दांत उत्क्रांतिवाद त्याची ओळख या पुस्तकात आहे. दुसरे पुस्तक ‘ माकडचेष्टा’. यात प्राण्यांचे स्वभाव कसे असतात व का या प्रश्नाचे उत्क्रांतिवादाच्या आधाराने वर्णन केले आहे. तिसरी आणि अखेरची पायरी म्हणजे मानवी समाज आणि संस्कृती यांचे रूप समजावून घेणे ही प्रस्तुत पुस्तकात आकारली आहे.
थांबा. निराश होऊ नका. हे तिसरे पुस्तक वाचण्यासाठी आधीची दोन पुस्तके वाचलेली असण्याची गरज नाही. माझा प्रवास कसा झाला हे कळण्यासाठी किंवा जास्त वाचन करु इच्छिणारांसाठी हे उल्लेख आहेत. हे, तुमच्या हातातील, पुस्तक देखील सरळ रेषेत सुरवातीपासून शेवटापर्यंत वाचण्याची गरज नाही. ज्याच्या शीर्षकाबद्दल कुतुहल वाटेल ते प्रकरण तडक वाचावे. तरी चालू शकेल.
पुस्तकाच्या नावाबद्दलही सांगितले पाहिजे. हल्ली ‘अमुक तमुक for dummies’ अशा शीर्षकाची फॅशन आहे. ‘अडाण्यांसाठी संगणकविद्या ’ असे नाव शोभून जाते कारण थोड्या वर्षांपूर्वी हा विषयच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे बव्हंश लोक या संदर्भात अडाणी असतीलही. उलट या पुस्तकातील विषय कोणालाच नवीन नाहीत. किंबुहना ‘यावद्दल लेखक आणखी वेगळे काय सांगणार बुवा?’ असेच अनेकाना वाटेल. वाचक लेखकाइतकाच जाणकार असल्यावर नवलाई कशाची असणार तर काही तपशील, मांडणीची रीत, संकल्यनेची चॊकट इत्यादि. यापलीकडे काही विशेष, संशोधकानासुध्दा नवे असे सांगितल्याचा माझा दावा नाही. नावाचे दुसरे प्रयोजन म्हणजे अर्धशतकापूर्वी कॆ. न. वि. गाडगीळ यानी लिहिलेल्या ‘ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या पुस्तकाच्या शीर्षकाचे अनुकरण, ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा महाराष्ट्रातील एक चमत्कार आहे. तत्वज्ञासारख्या अवजड विषयावर लिहिलेला हा ग्रंथ गेली सातशे वर्षे पिढ्यानुपिढ्या जनसामान्यांच्या व्यक्तिगत व सामुदायिक वाचनात आहे. आणि या ब्राह्मण तरूण पंडिताचे नाव बहुजन समाजात मायेने आणि प्रेमाने अपभ्रंशरुपात मुलाना ठेवले जाते. रुढार्थाने एखाद्या विषयात शिक्षित असो वा नसो, ग्यानबा हा शहाणा माणूस आहे. त्याच्यासाठी मॆत्रभावाने आणि आदराने ही रचना केली आहे.
माझे लिखाण वाचून ते सुधारण्यासाठी अनेकानी सूचना केल्या. त्यात अनिल खर्शीकर, राजेद्र व्होरा आणि नंदा खरे यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. उर्वरित चुकाना मीच जबाबदार आहे.
कॆ. न. वि. गाडगीळ यांची अर्पण पत्रिका पुढील प्रमाणे आहे. ‘शतकांपासून अज्ञानात, दारिद्र्यात व निराशेत असलेल्या बहुजन समाजचा प्रतिनिधी ‘ग्यानबा’ यास हे लिखाण अर्पण केले आहे.
आपली लेखनविषयक भूमिका सांगताना ते म्हणतात की ही सर्वसामान्य वाचकांना, विशेषत: ज्याना इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी सोप्या भाषेत, सोप्या पध्दतीने केलेली अर्थशास्त्राची सुलभता खास आहे. कल्पना व विचार समजावून घेणे हेच या लिखाणाचे ध्येय आहे. ही धुळाक्षरे आहेत व तीहि एका सामान्य व्यक्तीने काढलेली आहेत.
१९४१ साली घेतलेली ही भूमिका जवळपास पूर्णपणे माझ्या लिखाणालाहि लागू आहे. गेल्या साठ वर्षात सामाजिक संदर्भ काहीसे बदलेले आहेत. अज्ञान घटले आहे. साक्षरता वाढली आहे. संथगतीने का होईना पण गरिबी घटत आहे. कर्तृत्वाला अनेक दिशा मोकळ्या झाल्या आहेत. म्हणून आणि तेवढ्या मर्यादित अर्थाने निराशेची काळोखी कमी झाली आहे. पण ग्यानबासाठीच्या लिखाणाची गरज आजही तितकीच आहे.
या पुस्तकात जागोजागी पूर्वसूरींचे विचार उधृत केले आहेत. तसेच नाना तऱ्हेच्या माहितीची आणि तपशिलाची उसनवारी लेलेली आहे. वॆज्ञानिक संशोधनपर लिखाणात याबाबत कमालीचा काटेकोरपणा असतो. सर्व संदर्भ शिस्तीने व अचुकपणे दिलेले असतात. माझ्या लिखाणात वाचकाला धोडा साळढाळपणा आढळेल. याला काही अंशी आळस जबाबदार आहे. पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या वाचकाला संदर्भ, पुरावे या गोष्टी पूरक व पोषक म्हणून हव्या असतील, भातातला खडा दाताखाली यवा असा संदर्भ नकॊ. म्हणून मी इतर लिखाणाचे केलेले उल्लेख शिफारसवजा आहेत. वाचकांपॆकी अल्पस्वल्प टक्के मंडळीना उत्साह वाटलाच तर ‘पुढे काय वाचू?’ हा प्रश्न अनुत्तरित राहू नये. येवढे त्यातून साधायचे आहे.
माझ्यापुरते विचाराल तर ते संदर्भ वाचणे हा मला फार मोठ्या आनंदाचा अनुभव ठरला. गुंतागुंतीच्या विषयाचा एखादा पॆलू आपल्याला समजला ही भावना खूप समाधान देते. असे अधिकाधिक समाधान मिळेल अशी अपेक्षा हेच या लिखाणाचे मूळ प्रयोजन होते. पुस्तक छापून आल. वाचकांना आवडले तर तो बोनस म्हणावा.
शेवटी थोडक्यात विविध प्रकरणांबद्दल सांगतो. आमच्यात असं असतं’ हे पहिले प्रकरण विषयप्रवेशाचे किंवा उपोदघाताचे. मी अनेकदा बघतो की एखाद्या विषयात संशोधन करतात म्हणजे नेमके काय करतात याबद्दल लोकाना कुतुहल असते. ईयत्ता पहिलीत मराठी विषय असतो. तसा एम. ए. ला सुध्दा असतो. वरच्या पातळीवर नेमके काय वेगळे करतात? एका ऎवजी अनेक पुस्तके असतील. आणखी काय? या कुतुहलाची पूर्तता करण्याचा इथे प्रयत्न आहे. दुसरे प्रकरण आहाराबद्दल. आहार ही जीवांची मूलभूत क्रिया. अन्नपदार्थांचा इतिहास, स्वॆपाकाचे प्रकार अशी या प्रकरणाची ‘रेसिपी., पाकशास्त्र या विषयावरची पुस्तके मराठी माणसे सुध्दा आवर्जून विकत घेतात. म्हणून हे प्रकरण अनेकाना वाचावेसे वाटेल अशी आशा. तिसरे प्रकरण भाषेबद्दल. हा तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. शिक्षणाचे माध्यम, भाषावार प्रांत, साहित्य संमेलने अशा विषयांवरचे गदारोळ आठवा. इथे अर्थात कल भाषाशास्त्र या विषयाकडे आहे. संस्कृती हा शब्द ऎकला की बहुतेकाना सुचतात ते सण आणि संस्कार. त्यांचा अर्थ आणि अन्वय लावण्याचा प्रयत्न चॊथ्या प्रकरणात आहे. लोकसंख्या, स्त्रियांचे प्रमाण, वृध्दांचे प्रमाण असे प्रश्न पाचव्या प्रकरणात येतात. कुटुंबसंस्था हा विषय सहाव्या प्रकरणाचा आहे. त्यातच घर आणि त्याची रचना हा भागही आला आहे. भारताची सांस्कृतिक खासियत म्हणावी अशी चीज म्हणजे जात. जातिसंस्थेची चर्चा सातव्या प्रकरणात येते. खेडी आणि शहरे यांची उत्पत्ती व विकास याबद्दल आठवे प्रकरण माहिती देते. भारतीय संकृतीचा आधुनिक अभ्यास करणारात इंग्रज शासक आघाडीवर होते. त्याशिवाय अलीकडेच देशी शासनयंत्रणेने भारतीय समाजाची एक महापहाणी केली. हिला जगात तोड नाही. यांची ओळख नवव्या प्रकरणात आहे. शेवटचे प्रकरण संस्कृतीचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते उलगडून दाखविते.
आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्रकरण स्वतंत्ररीत्या वाचता यावे अशी कल्पना आहे. म्हणून काही ठिकाणी असलेली पुनरुक्ती तशीच राखली आहे. शिवाय महत्वाचा मुद्दा पुन्हा आला तरी बिघडत नाही.
वाचकानी माझ्या चुका जरुर दाखवाव्यात. मी त्यांचा आभारी होईन.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment