Family
प्रकरण सहावे
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती।
तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती ॥
त्या शब्दाना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी ।
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी ॥
त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी ।
अश्रूतूनहि प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी ॥
या घरट्यातुन पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती ।
आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती ॥
श्रीमती विमल लिमये यांची ही कविता. प्रस्तुत प्रकरणाच्या विषयप्रवेशाला अनुरुप आहे. (१९ – ७ – १९७५ च्या ‘सकाळ’ मधे लिमयेबाईनी तक्रार केली की लोक माझी कविता उधृत करतात पण मला श्रेय देत नाहीत. मी हा अपराध टाळला आहे.)
आज माणूस रहातो घरात. घर या संकल्पनेचे दोन पॆलू आहेत. एक म्हणजे दगडा माती यांची वास्तु. दुसरा पॆलू म्हणजे कुटुंब. नुसत्या वास्तूला घर म्हणत नाहीत. तुरुंग, धर्मशाळा, वसतिगृह या सुध्दा दगड, वीटा, चुना अशा चीजा वापरुन घडवलेल्या वास्तू असतात. घरपण येते ते भिंती आणि नाती मिळून. सामान्य माणसाच्या आयुष्यातील अर्धा ते पाऊण काळ घरात जातो. त्यामुळे मनुष्य जीवनाचे अवलोकन करताना घर हा महत्वाचा टप्पा होणारच.
“ प्राण्यांची घरे “
प्रथम प्राण्यांच्या घरांचा विचार करुया. कावळा, चिमणी असे पक्षी, कोल्हे, कुत्रे असे प्राणी, मासोळ्या कोणीच प्रॊढपणी घरात वगॆरे रहात नाहीत. पाखरांची घरटी असतात ती फक्त पिलांसाठी. तेथे अंडी घालायची. ती उबवायची. पिलाना भरवायचे, राखायचे वगॆरे. पिल्ले मोठी झाली की भुर्कन उडून जातात. मग त्या घरट्याचे प्रयोजन संपते. दिवसभर पाखरे अन्न शोधत फिरत असतात. रात्री विश्रांती घ्यायची ती एखाद्या ठरलेल्या झाडाच्या फांदीवर बसून. तेथे अक्षरश: शेकडो, हजारो कावळे, साळुंक्या वगॆरे जमून, आपले डोके चढेल इतका कलकलाट करतात. शेवटी शांत होऊन झोपतात. कोल्हे, कुत्रे एखादी गुहा वापरतात ती विणीच्या हंगामात. मासळ्यांची तीच तऱ्हा. घर म्हणावे अशी जागा असते ती मुंग्या, वाळवी, मधमाशा यांची. या घरांमधे शेकडो खोल्यातून हजारो जीव जगत असतात. आपणाला ज्ञात असलेली ही सर्वात मोठी ‘एकत्र कुटुंबे ’. ही घरे अत्यंत सुबक आणि कॊशल्याने बनवलेली असतात. तपमान, आर्द्रता, उजेड वगॆरेबाबत योग्य अवस्था टिकवली जाईल अशा पध्दतीने ती बांधलेली असतात. मात्र त्यांच्या रचनेत, तपशिलात शेकडो – हजारॊ पिढ्या बदल होत नाहीत.
माणसाने सुरुवातीला गुहांसारख्या नॆसर्गिक रचनांचा वापर निवाऱ्यासाठी केला असेल. नंतर कृत्रिम निवारे बनवले असतील. त्यांच्यात हलके हलके सुधारणा होत गेल्या असतील. या घरांमधे अपेक्षित वॆशिष्ट्ये कोणती?
(१) स्थानिक मालाचा वापर. माल कोणता? दगड, माती, लाकूड, गवत इत्यादि. कोकणात तांबड्या जांभा दगडाचे घर तर घाटावर / देशावर काळ्या फत्तराचे.
(२) स्थानिक परिस्थितीला अनुरुप रचना. भरपूर पावसाच्या प्रदेशात उतरते छप्पर तर कडक उन्हाळा / हिवाळा असलेल्या भूभागात जाड भिंती व छत. जास्त पावसाच्या प्रदेशात पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था तर वाळवंटी प्रदेशात पाणी गोळा करण्याची व्यवस्था इत्यादि.
घरात स्वॆपाकाची सोय हवीच. म्हणून कोपऱ्यात चूल आली. तिचा धूर घराबाहेर पडण्याची सोय हवीच. खानदेशी घरात चुलीच्या वर छपराला एक भोक असते. त्यातून धूर बाहेर जातो. घर मोठे असले तर शयनगृह, बॆठक अशा वेगळ्या खोल्या दिसतात. कोठीची खोलीही आवश्यकच. संडासाचे काय?
“ संडास “
कोणत्याही पारंपारिक घराच्या आत संडास नसतो. स्वयंपूर्ण (Self contained) घरकूल (सदनिका) ही कल्पना गेल्या अर्ध शतकातील आहे. अलीकडेच मी जर्मनीमधे स्टुटगार्ट शहराजवळ एक ऎतिहासिक राजवाडा पाहिला. शेकडो खोल्या, मोठमोठे लांबलचक व्हरांडे, दिमाखदार दिवे, तॆलचित्रे, शाही पडदे. सगळा थाट होता. राजाराणींची खाजगी दालने पाहिली. मग मार्गदर्शकाला हळूच कुजबुजत विचारले की बाबा या बड्या मंडळींची ‘त्या ’ गोष्टीची सोय काय? त्याला तो प्रश्न अपेक्षितच होता. ‘नीट ऎका ’. तो म्हणाला. ‘राजा – राणी यांच्या खाजगी दालनात एक बोट, दोन बोटे यांची सोय नाही. त्याना गरज पडल्यावर ते सेवकाना सांगत. मग सेवक एक पातेले बसवलेली खुर्ची आणत. तिच्यात बसून विधी. आमची गुलाबाची बाग किती सुंदर फुलल्ये पाहिलीत का?’
आजही भारताच्या ग्रामीण भागात घराच्या आत संडास असा प्रकार नाहीच.
उत्सर्जन ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर करावीच लागते. पण रीती वेगवेगळ्या. हीच तर संस्कृती.
प्राण्यांमधे मल-मूत्र विसर्जन कसे केले जाते? पक्षी उडता उडताच शिटताना दिसतात. आपण नेमके त्याच वेळी खाली असण्यची शक्यता फार कमी. म्हणून अंगावर असा काही शिंतोडा पडणे हे एका अर्थाने अप्रूपच. रात्री झाडांवर विश्रांतीला जमलेले पक्षी बसल्या जागी शिटतात. म्हणून अशा जागी सर्वत्र पांढरे डाग पडलेले असतात. लक्षावधी पक्षी वर्षानुवर्षे एकाच भूभागात शिटले तर वाळल्या विष्ठेचा डोंगर जमेल. दक्षिण अमेरिकेत पेरु देशाच्या समुद्रकिनाऱ्यावर असे डोंगर आहेत. त्याना ग्वानो असे म्हणतात. तो माल उचलून खत म्हणून वापरतात.
कुत्रा, मांजर यांचे मलमूत्र विसर्जन सहजच आपल्या नजरेला पडते. कुत्रे आपली खूण म्हणून जागोजाग लघवी करुन ठेवतात. मांजरे आपली विष्ठा काळजीपूर्वक मातीने झाकतात. विष्ठा ही रोगराईला आमंत्रण देणारी आहे. म्हणून तिचा निचरा नीट होणे जरुर आहे. म्हणून सजीवांच्या उत्क्रांतीमधे याबाबत काळजी घेण्याचा गुण विकसित होणे अपेक्षित आहे. कुत्री मलविसर्जनानंतर मागील पायानी माती उडवतात. पण त्याने विष्ठा झाकण्याचे काम नीट होत नाही. विष्ठेपासून इजा टाळण्याचा दुसरा मार्ग म्हणजे आपण तिच्यापासून दूर असणे. म्हणूनच, नेहमी वावरतो तेथून जरा दूर जाऊन मलविसर्जन करणे ही सवय आरोग्याला उपकारक ठरते. गोरिला माकडे रात्री झोपतात तेथेच सकाळी विष्ठा टाकतात. पण रोज रात्री नव्या ठिकाणी झोपतात. प्राणी रोज एकाच ठिकाणी झोपत असेल तर ते ठिकाण घाणेरडे होणे प्राण्याला परवडणार नाही. कोल्हे, कुत्रे विणीच्या हंगामात संगोपनाच्या सोयीसाठी पिलाना एकाच जागी वाढवतात. स्वत: तेथून दूर जाऊन विष्ठा टाकतात. पिले अगदी लहान असतात तेव्हां निवासस्थानातच घाण टाकतात. ती विष्ठा आई खाऊन टाकते आणि, पिले व निवास स्वच्छ ठेवते. पिले जरा मोठी झाली की प्रातर्विधीसाठी दूर जातात.
माणसाच्या रीती सुध्दा प्राण्यांप्रमाणेच स्वत:च्या आरोग्य रक्षणाला उपयुक्त असणे अपेक्षित आहे. भटकंतीचे जीवन जगणारा आदिमानव मुक्कामाच्या जागेपासून जरा दूर जात असेल. तेवढी सवय स्वच्छतेसाठी पुरेशी होते. मुळात मलमूत्रांचा गंध माणसाला न आवडणारा आहे. आवडी निवडी या मेंदूच्या उत्क्रांतीतून निर्माण होतात. वरील नावड ही आरोग्य रक्षणाला उपकारकच आहे. इतर प्राण्यांच्या मलमूत्राचे गंध माणसाला कसे वाटतात? डॉ. मिलिंद वाटवे यानी तर्क केला की ज्या प्रण्याची विष्ठा माणसाला जास्त अपायकारक (त्यातील कृमी, जंतू वगॆरे मुळे) त्या विष्ठेचा गंध अधिक त्रासदायक व्हावा. त्यानी हे सप्रयोग दाखवून दिले. असो.
तर माणूस स्वाभाविकपणेच आपले मलमूत्र दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. भटकंती सोडून एका जागी झोपडीत, गुहेत रहाणारा मानव बहिर्दिशेला वस्तीपासून दूर जातो. छोट्याश्या खेड्यातील माणसे सर्व दिशाना विखरुन गेली तर पडलेला मॆला सुकून मातीत मिसळून निरुपद्रवी होतो आणि मातीचा कस वाढवतो. वस्ती वाढते तेव्हां आणखी एक पॆलू दिसू लागतो. संकोच. विशेषत: स्त्रियाना प्रातर्विधी करताना आजूबाजूला कोणी पुरुष येण्याची शक्यतासुध्दा बेचॆन करते. हे टाळण्यासाठी म्हणून असेल, पण गावातल्या बायकानी सकाळी एका विशिष्ट दिशेला जावे असा संकेत रुढ होतो. पुरुषानी त्याच्या उलट दिशेला जावे हे ओघाने आलेच. या जागाना हागनदरी असा शब्द काही खेड्यात प्रचलित आहे. या व्यवस्थेत वस्ती मर्यादित असणे महत्वाचे. वस्ती वाढते तसे प्रातर्विधीसाठी चालून जाण्याचे अंतर वाढते. या अंतराने मर्यादा ओलांडल्यास माणसे अन्य वाट शोधू लागतात. आज महानगरांमधे लक्षावधी झोपडपट्टी वासियाना ही फार मोठी अडचण आहे. अखेर सर्व स्वाभाविक संकोच, लाजलज्जा टाकून माणसे रेल्वेरुळांच्या कडेला वा तत्सम जागी हे व्यवहार करताना दिसतात. शहरीकरणामधे माणसाच्या आत्मसन्मानावरच गदा येते ती अशी.
वस्ती मोठी झाली आणि शेताकडे जाणे अव्यवहार्य झाले तेव्हांच संडास ही चीज अस्तित्वात आली. घराभोवती पुरेसे मोठे मोकळे आवार, परसदार असेल तर त्याच्या कोपऱ्यात विधी करणे सोयीचे असते. घरापासून तो कोपरा पुरेसा दूर असला आणि विष्ठा मातीने झाकली तर काम होते. (प्रातर्विधीला जाणे याला पर्यायी मराठी शब्द ‘ परसाकडे ’ जाणे असा आहे तो यामुळेच असावा). हेहि शक्य नसते तेव्हां दूर कोपऱ्यात संडास बांधला जातो. याला शेतखाना हा पर्यायी शब्द आहे. तो समर्पक वाटतो. पण संडास बांधला की मॆल्याच्या व्यवस्थेचा प्रश्न तयार होतो. त्याची वाहतुक करण्याचे घाणेरडे काम कोणाच्या तरी माथी मारावे लागते. अमेरिकेत १९ व्या शतकात घरामागे संडास बांधत. त्याना outhouse असे म्हणत. मॆला निचऱ्यासाठी तेथे septic tank बांधत.
मल विसर्जानानंतर शरिराची स्वच्छता कशी करायची हा पुढचा प्रश्न. त्यासाठी पाणी वापरणे हे आपल्याकडे सार्वत्रिक आहे. म्हणून सकाळी हातात लोटा, टमरेल असे काही घेऊन निघालेल्यांची लोटा परेड गावोगाव नजरेला पडते. विरळ वस्तीने व जंगलात रहाणाऱ्या आदिवासीना दुसरा पर्याय असतो तो जंगलच्या झाडांची पाने वापरणे. पाणी वापरणाऱ्याना आपल्या रीतीबद्दल अभिमान असतो व पाने वापरणे कमीपणाचे आहे असे त्याना वाटते. गडाचिरोली जिल्ह्यात डॉ. अभय बंग यांच्या तोंडून ऎकलेली एक हकीगत विचार करायला लावणारी आहे.
एका खेड्यात सगळे जंगलात झाड्याला जात व पानाने ढुंगण पुसून परत येत. ही तेथील जुनी रीत होती. पुढे तेथे शाळा निघाली व मोठ्या गावातून एक शिक्षक तेथे रहावयास व चाकरी करावयास आले. हे गृहस्थ ग्रामस्थांच्या रीतीची हेटाळणी करीत आणि त्याना ‘पानपुशे’ म्हणत. यामुळे विद्यार्थ्याना व तरुणाना आपण जुनी रीत टाकून पाण्याचा वापर करावा असे वाटू लागले. डॉ. बंग यांच्यामते हा बदल धोकादायक होय. का बरे? पाने वापरणाऱ्या माणसाना जंगलात सर्व दिशा सोयीच्या असतात. म्हणून विष्ठा आपोआप सर्वदूर विखुरते. सहज निचरा होतो. पाणी वपरणारा माणूस पाण्याच्या साठ्याच्या / स्त्रोताच्या जवळपासच प्रातर्विधी करतो. यातून थोड्या जागेचा वारंवार उपयोग होऊन अडचणी जन्माला येतात. मॆल्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते. रोगराईचा धोका वाढतो. काही वेळा लोक चक्क नाल्यात, ओढ्यात उतरुन स्वत:ची सफाई करतात. मग ते पाणी नक्कीच धोकादायक होते.
जेम्स क्लॅव्हेल या लेखकाने १९९३ साली ‘गाई – जिन’ नामक कादंबरीत १९व्या शतकातील जपानी रिवाजांचे वर्णन केले आहे.
‘तो बादल्यांच्या रांगेकडे गेला. एका मोकळ्या बादलीवर बसून त्याने शरीरधर्म सुरु केले. आजूबाजूला इतर लोक तेच करीत होते. पण कोणी कोणाकडे लक्ष देत नव्हते. त्याच्या मनात तो एकटा होता. कान, डोळे, नाकपुड्या सगळी ज्ञानेंद्रीये त्याने घट्त मिटून घेतली होती. जो – तो तसेच करी. हे लहानपणापासूनचे वळण होते. हे जमले पाहिजे. मग त्यासाठी किती का कष्ट पडेनात. हे जमले नाही तर आयुष्य फारच खडतर होते. खाजगीपणा हा मनातच ठेवावा आणि मनापुरताच शक्य असतो. तो सांभाळणे म्हणजे इतराना सॊजन्य दाखविण्यासारखे आहे.
लहानपणी एकदा तोंडावर बसू पाहणाऱ्या दोनतीन माशानी त्याला कातावून टाकले. तो एक एक माशी मारण्यासाठी धडपडू लागला. उलट आईची चापट त्याला खावी लागली. आई म्हणाली – या माशा तर टळत नाहीत. त्यांची अगदी जिकीर होते – पण करुन घेतली तरच. त्या हातावर, तोंडावर चालत फिरल्या तरी काही वाटू देऊ नको. तेवढा मनावर ताबा मिळव. मग तुझा शांतपणा टिकेल, आणि इतरांच्या शांतपणाला धक्का बसणार नाही.’
किळस वाटेल अशा पण अपरिहार्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अशीच काहीशी मानसिकता आपण प्राप्त करुन घेतो. असो.
आज आपण आधुनिक सदनिका बांधली की तिच्यात संडास बांधतो. त्याशिवाय त्या जागेचा वापर करण्यास नगरपालिका परवानगी देत नाही. पण हे सार्वत्रिक चित्र नव्हे. ग्रामीण भागात संडासाच्या अशा सोयीला तितके महत्व, प्राधान्य दिले जात नाही. माझा एक विद्यार्थी ग्रामीण भागातील होता. त्याचा संशोधन प्रबंध पूर्ण झाल्यावर मी सपत्निक त्याच्या खेड्यातील घरी पाहुणा म्हणून गेलो. घर तसे सुखवस्तू. थोडी उसाची शेती. एक भाऊ गावात डॉक्टरी करणारा. त्याची हीरो होंडा फटफटी. सिमेंट काँक्रीट चे नवे घर. पण अहो आश्चर्यम. त्यात संडास नव्हता. सकाळी त्याने मला एका दिशेला तर त्याच्या भावजयीने माझ्या पत्नीला दुसऱ्या दिशेला नेऊन आणले. या कुटुंबाला संडास व सेप्टिक टँक बांधण्याचा खर्च डोईजड नव्हता. पण त्याला प्राधान्य नव्हते. त्याची तीव्र गरज भासली नव्हती. हे काही अपवादात्मक उदाहरण नव्हे.
प्रसिध्द समाजसेवक डॉ. रजनीकांत आरोळे यानी काही वर्षापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, अकोला व श्रीरामपूर या तीन तालुक्यांमधील खेड्यांची पहाणी केली. प्रत्येक तालुक्यात सुमारे २००० कुटुंबांची माहिती गोळा झाली. फक्त २% कुटुंबाना स्वत:चे खाजगी संडास आहेत. ५-१०% कुटुंबाना आपला वेगळा संडास हवा असे वाटते. ८०% कुटुंबाना संडासाची जरुर वाटत नाही. पाथर्डी हा दुष्काळी व गरीब तालुका तर श्रीरामपूर हा सधन. पण संडासाबाबत दोन्हीकडे स्थिती एकच.
गरिबाना संडास बांधणे परवडत नाही. समाईक संडास घाणेरडा वाटत असावा. पाण्याच्या टंचाईमुळे संडासाची स्वच्छता राखणे अवघड जाते. मग दुर्गंधी सुटते. छोट्याश्या जागेत दार बंद केल्यावर लोकाना भीती वाटते. विशेषत: रात्री अशा ठिकाणी साप, विंचू यांचा धोका वाटतो.
तशी एकूणच आरोग्याबद्दल जाणीव जागृती फार कमी आहे. ४० ते ८०% लोक कॉलरा, क्षय वगॆरे रोगांच्या विरोधी लशीसुध्दा टोचून घेत नाहीत. बालकाना ट्रिपलचे इंजेक्शन देत नाहीत. का? त्याने आपण ताप – जाळ ओढवून घेतो. (तुलनेने पोलिओबद्दल जाणीव जास्त आहे. अपंगत्व अगदी उठून दिसते. लस पोटात घ्यायची असते. तिने ताप येत नाही). मॆल्याचा नीट निचरा न झाल्यास रोगप्रसार होतो याची कल्पना नसते. माशा वाढणे हे रोगट परिसराचे लक्षण आहे असे त्याना उमगत नाही.
आरोग्य ही बाब तितकी महत्वाची मानली जात नाही. ग्रामस्थाना कशाचे महत्व आहे? सर्वात महत्वाची बाब पुरेसे पाणी मिळणे. त्यानंतर रोजगार. त्या खालोखाल अडचणीत कर्ज मिळणे. आरोग्य त्यानंतर. त्यातही गावकऱ्याना दवाखाना, इस्पितळ यांचे जास्त महत्व वाटते. रोगप्रतिबंधक प्रयत्न हे दुय्यम वाटतात.
ग्रामस्थाना संडासाची गरज वाटात नाही. पण कोणी आग्रहाने संडास बांधून दिला तर काय होते? या गोष्टी एकूण संस्कृतीचा एक भाग होऊ शकत नाहीत. जबरदस्तीने लावलेली ठिगळे टिकत नाहीत. लोकाना अशा संडासाच्या वापराची कल्पना नसते, सवय नसते. दोन प्रकार होतात. घसरगुंडी किंवा उचलबांगडी. घसरगुंडी म्हणजे संडासाची अवस्था बांधकामानंतर रोज बिघडतच जाते. संडास तुंबतो. निरुपयोगी होतो. अखेर दगड विटासुध्दा चोरापोरी जातात. उलट प्रकार म्हणजे संडास ही गावातील आधुनिक बांधकामाची एकमेव उत्तम इमारत ठरते. ती असल्या घाणकामाला का वापरायची? मग ती धान्य साठवणीसाठी वगॆरे उपयोगात येते.
दीर्घकाळच्या सवयी बदलणे, मोडणे हे मोठे खडतर काम आहे. मुलाना रस्त्याच्या कडेला प्रातर्विधीला बसवून गटारे घाण करुन तुंबवून सार्वजनिक आरोग्याला धोका उत्पन्न करणे हे कसे थांबवायचे? शॊचविधी हा गुन्हा नव्हे. मग कायद्याचा बडगा कसा दाखवणार? यावर फलटणच्या वनविहारी निंबकर याना उपाय सापडला. रस्त्यावर विष्ठा टाकणे हा गुन्हा असेल वा नसेल, पण डुकराना विष्ठा खाऊ घालणे हा कागदोपत्री गुन्हा आहे. त्याखाली खटले भरुन जनजागृती करावी. अर्थात निंबकरांच्या कायदेबाजीचा समाजमनावर ढिम्मसुध्दा परिणाम झालेला नाही.
घरात सोय नसणे आणि सकाळी बायकानी एका दिशेला जाणे या व्यवस्थेचा एक फायदा म्हणजे सासुरवाशिणीना एक्मेकीशी मोकळेपणाने बोलता येते. थोडा तरी खाजगीपणा मिळतो. काही घरांमधे सुनेने गर्भनिरोधक गोळ्या घेण्याला विरोध असतो. मग सरकारी दवाखान्यातून ‘माला’ चे पाकिट फुकट मिळाले तरी ते गुपचुप ठेवणार कसे? यावर डॉ. आरोळे याचा खास उपाय म्हणजे बहिर्दिशेच्या वाटेवर नर्सबाईने उभे रहावे. जिला हवी तिला ‘माला’ गोळी द्यावी. डॉ. हेमलता दांडेकर या विदुषी अभ्यासाकरिता गुळूत्र, ता. वाई, जि. सातारा येथे राहिल्या. त्यानी प्रत्येक ग्रामस्थाची मुलाखत घेतली. सुना म्हणत, मोकळेपणाने बोलायचे असेल तर सकाळी आमच्यावरोबर चल. तेथे जरा जास्त रेंगाळू. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विकास कार्यक्रमां संदर्भातही मी एक कथा ऎकली आहे. एका गावात रांगेने संडास बांधले. त्याना बायोगॅस संयंत्र जोडले. प्रथम बायका संडास वापरु लागल्या. मग थांबल्या. एका चतुर अधिकाऱ्याने मधल्या भिंतीना भोके पाडली, एकमेकींचा चेहरा दिसेल अशी. मग बायका पुन्हा संडास वापरु लागल्या. सह्याद्रीमधे अनेक बॊध्द लेणी आहेत. हे वर्षावास होते. पावसाळ्यात भिक्षू येथे रहात. त्यांच्या बहिर्दिशेची काय सोय होती? फारशी सोय नसावी. म्हणजे ज्याने त्याने आपली वाट शोधावी. पाणी आणि उतार यातून निचरा. क्वचित असे वाटते की जपानी मंडळींसारखी रीत असावी.
नागर समाजात असे दिसते की आपण रस्ते, गटारे वगॆरे सार्वजनिक जागा नि:संकोचपणे घाण करतो. तीच रीत संडास वापराची. शहरातील बहुतेक सर्व सार्वजनिक संडास अस्वच्छ, गलिच्छ व निरुपयोगी असतात. एस. टी बस स्थानकांवरील संडास असेच बिनकामाचे होतात. त्याला आणखी एक कारण म्हणजे प्रवाशांबरोबरच आसपासच्या झोपडपट्टीतील रहिवासी यांचा वापर करतात पण त्यांची काळजी घेत नाहीत. काही वर्षांपूर्वी एस. टी अधिकाऱ्यांनी यावर उपाय म्हणून स्थानकांवरील संडासांच्या वापरासाठी शुल्क लावले. त्यावर विधानसभेत गरिबांच्या कॆवाऱ्यानी ओरडा करुन निषेध व्यक्त केला. तुमच्या राज्यात गरिबाना रोजी मिळत नाही, रोटी मिळत नाही आणि आता नुसते संडासला जाणे सुध्दा नशिबी नाही. इत्यादि. हा तर अगदी भंपक आणि सवंग लोकानुनय झाला. भरपूर पॆसा खर्च करुन संडास बांधायचे आणि वापरणारात शिस्त नाही म्हणून ते तुंबू द्यायचे? यावर काही उपाय सांगण्याऎवजी गरिबांच्या नावाने गळा काढायचा? अगदी हद्द झाली. सुदॆवाने आता सुलभ इंटरनॅशनल या संस्थेमुळे सशुल्क संडास हे तत्व मान्य झाले आहे. त्यामुळे काही सार्वजनिक ठिकाणी किमान स्वच्छता असलेली सोय मिळणे शक्य झाले आहे.
ही संस्था बिंदेश्वर पाठक नामक गृहस्थानी चालवली आहे. त्याना मिळालेल्या पाठिंब्याचे एक चिन्ह म्हणजे सिनेअभिनेत्री शबाना आझमी हिची शिफारस. ती म्हणाली की मी माझे मूळ गाव आझमगढ येथे येण्यासाठी सुलभ संस्थेला आमंत्रण दिले आहे. राज्यसभा सदस्य म्हणून विकास खर्च करण्यास जे पॆसे मिळतात ते कसे वापरावे अशी विचारणा तिने मुंबईच्या झोपडपट्टीवासीयाना केली. बहुतेकानी संडास बांधून द्या अशी मागणी केली.
आपल्याकडे सार्वजनिक सोयींकडे कमाल दुर्लक्ष तर अमेरिकेत यावर बारकाईने लक्ष. प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वच्छ संडास असला पाहिजे हा नियम आणि तो पाळला जातो. आपल्याकडे पंपावर फुकट हवा भरण्याची सोय देण्याबद्दल सुध्दा खळखळ असते. ते संडास कसले देणार?
अमेरिकेत सँड्रा रॉल्स या विदुषीने “सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभ्यास “ हा विषय चक्क डॉक्टरेट साठी घेतला. या बाईंचे निरीक्षण होते की बायकांसाठी राखीव संडासांबाहेर नेहमी जास्त मोठी रांग असते. असे का? यानी वेगवेगळ्या सार्वजनिक स्थानांवर दोनशेहून अधिक पुरुष आणि तितक्याच स्त्रीया यांचे व्यवहार स्टॉपवॉच वापरुन मोजले. पुरुषाना बायकांच्या निम्मा वेळ लागतो. बायकांना सरासरी तीन मिनिटे लागतात. जास्त वेळ का लागतो? बायकांच्या कपड्यात सुटसुटीतपणा कमी असतो. बरेचदा लहान मुले बरोबर असतात. म्हणून वेळ लागतो. याचा अर्थ असा की बायकांसाठी पुरुषांच्या दुप्पट सोय असली पाहिजे. या प्रबंधाला बक्षिस मिळाले आणि कायद्यात बायकांसाठी दुप्पट सोय करण्याबद्दल दुरुस्ती झाली. प्रगल्भपणा म्हणतात तो हा.
आपण घराच्या एका भागावर बरेच रेंगाळलो. मोठ्या हराला परंपरेने ओसरी, ओटी, माजघर, देवघर, स्वॆपाक घर, मोरी वगॆरे भाग असतात. त्याशिवाय माळा, माडी असे मजले निराळे. जुन्या कोल्हापुरात घरातल्या खोल्या रेल्वेच्या डव्यांसारख्या एकापुढे एक जोडलेल्या असत. त्यांची दारे एकासमोर एक. शेवटच्या खोलीतून म्हणजे स्वॆपाकघरातून बाईने डोकावले तर निला थेट उंबऱ्याबाहेरुन चॊकशी करणारा माणूस दिसे आणि त्याला ‘मालक भाइर गेल्यात ’ असे सांगून वाटेला लावता येत असे.
सामान्यपणे परंपरेने ठरते तशीच गृहरचना माणूस करतो. अलीकडे मात्र वास्तुशास्त्र नामक प्रकरण आपल्याकडे वाढत आहे. त्या अन्वये घराची रचना तपासून जरुर तर बदलून घेतल्याचे कानावर येते. वास्तुशास्त्रानुसार घर नसेल तर ते लाभत नाही अशी काहींची श्रध्दा असते. या प्रकरणात पुढे आपण एकूणच श्रध्दा या विषयाकडे बघण्याचा प्रयत्न करु तेव्हांच वास्तुशास्त्राचा थोडक्यात विचार करु.
“ कुटुंब “
आजूवाजूची बहुसंख्य माणसे कुटुंबात रहाताना आपण बघतो. मुलगा, मुलगी, आई, बाप, आजी, आजोबा हा गट म्हणजे कुटुंब. ज्यांचे जेवण एकत्र शिजते ते एका कुटुंबाचे सदस्य. यांचे देव समाइक असतात. धार्मिक कृत्ये एकत्र होतात, स्थावर मालमत्ता एकत्र असते. कसे रहावे/जगावे हे आपण कुटुंबात शिकतो. प्रसंगोपात्त माणसे कुटुंबाबाहेरही रहातात. कामानिमित्त चार दिवस गावाला जाणे वगॆरे बाबी आपण सोडून देऊ. पण विद्यार्थी वर्षानुवर्षे वसतिगृहात रहातात. सॆनिक लष्करी तळांवर तर खलाशी जहाजांवर असतात. जागे अभावी कोकणी चाकरमाने कुटुंबकबिला गावाकडे सोडून आपण मुंबईत नोकरी करतात. गढवाली पुरुष असे दिल्लीत असतात. नेपाळी गुरखे तर सर्वत्र असतात. हे अपवाद. माणसाचे सामान्य जीवन कुटुंबातच असते. असे का? प्रत्येक जीव कुटुंबातच रहातो काय? माणसाच्या कुटुंबात कालॊघात बदल घडला काय? हे व असे प्रश्न सहाजिकपणे मनात येतात.
निसर्गात कुटुंबसंस्था सार्वत्रिक नाही. अनेक प्राण्यात आई व मुले एकत्र असतात पण बाप परागंदा असतो. काहींमधे आईसुध्दा पोराना वाऱ्यावर सोडून देते.
सागरी महाकाय कासवे कुटुंबात रहात नाहीत. विणीच्या हंगामात मादी किनाऱ्यावर येऊन वाळूत खड्डा करते व त्यात अंडी घालून पुरुन निघून जाते. तिला पिल्लांचे दर्शनही होत नाही. अंडी फुटून त्यातून पिल्ले बाहेर येतात. ती ख्ड्ड्यातून वर चढून पाण्याकडे धावत सुटतात. वाटेत त्या भावंडांपॆकी बरीच भक्षकांच्या नोंडी जातात. उरलेली पाण्यात पोचतात. तेथे ती आपापलीच वाढतात. ही एक तर्हा. हरणे, गायी, म्हशी यांच्यात पिल्लू आईला धरुन असते. आईच्या दुधावर वाढते. पण मोठे झाल्यावर आईला सोडून जाते. कोंबडी, बदक यांच्यातही पिल्ले आईच्या सावलीत वाढतात. बापाचा पत्ता नसतो. उलट धनेश व गरुड हे पक्षी खरे कुटुंबवत्सल म्हणायचे. धनेश किंवा शिंगचोच्या या पक्षाची मादी झाडाच्या ढोलीत अंडी घालते व तेथेच बसते. नर चिखलाने ढोलीचे तोंड लिंपून बंद करतो. मादीला चोच बाहेर काढता येईल येवढी फट ठेवलेली असते. पिले वाढत असताना नर सर्वाना पोटभर खाऊ घालतो. अन्न शोधण्यासाठी त्याची फ़ारच धावपळ होते. गरुडांमधे जोडयातील एकजण घरट्यावर संरक्षणासाठी थांबतो तर जोडीदार शिकार करुन अन्न मिळवतो अशी व्यवस्था असते.
हत्तींच्या कळपात माद्या आणि पिल्ले असतात. नर वयात आल्यावर कळप सोडून जातात. संगोपनात नरांचा वाटा नसतो. माद्या आपसात सहकार्य करतात. कोणी मादी माजावर आली की दूर भटकणारा एखादा बडा नर कळपाजवळ येतो आणि तिच्याशी समागम करुन निघून जातो.
रानकुत्रे कळपाने रहातात. सर्वजण मिळून शिकार करतात. मुक्कामावर येऊन तेथे बछड्याना खाऊ घालतात. कसे? तर आपण गिळलेले मांस ते ओकून काढतात आणि पिलाना देतात.
मधमाशांच्या पोळ्यावरील हजारो माशा एकाच राणीमाशीच्या पोटी जन्म घेतात. मोठ्या बहिणी धाकट्यांच्या संगोपनाचे कष्ट उपसतात.
निसर्गात दिसणारी कुटुंबसंस्थेची ही विविध रुपे आहेत. एखाद्या प्राणीजातीला कोणती पध्दत लागू होणार हे उत्क्रांतीमधे ठरते. संगोपनाचे कष्ट घ्यायचे नसतील तर पिलांची संख्या मोठी हवी. मग एक एक पिलू फार छोटे झाले तरी बेहत्तर! मासोळ्या, बेडुक हे जीव एक वेळी शेकडो / हजारो अंडी घालतात. त्यातील अल्प-स्वल्पच जगतात. उलट हत्तींसारखे प्राणी फार कमी पिले जन्माला घालतात. मग त्या पिलांचा कष्टाने सांभाळ करणे जरुर होते. त्यांचे प्राणपणाने रक्षण केले तरच वंश टिकतो. ज्यानी असे केले नाही त्यांचे वंश खुंटले. आज दिसणारे ‘अल्प प्रजनन ’ जीव हे पिलाना अनुकूल वर्तणुकीचेच आहेत. माणूस हा अशा ‘अल्प प्रजनन – दीर्घ संगोपन ’ गटातील जीव आहे. तेव्हां मानवाने मुलांचे संगोपन, संरक्षण यावर प्रचंड कष्ट करणे जीवशास्त्रदृष्ट्या अपेक्षितच आहे.
माणसाचे मूल जन्माला येते तेव्हां त्याची क्षमता फारच कमी असते. त्याला ना चालता येत, ना बोलता. त्याला चोविस तास सांभाळावे लागते. या कामात एक माणूस अडकून पडते. मुलाला कडेवर घेऊन अन्न गोळा करणे दमछाक करणारे आहे. या सर्वासाठी मादी एकटी पुरी पडू शकत नाही. नराची सतत मदत आवश्यक असते. तेव्हां माणसाच्या उत्क्रांतीमधे अगदी प्राचीनकाळापासून दांपत्याचा संसार हेच चित्र असणार. स्त्री आणि मुले असे कुटुंब अपवाद म्हणून असू शकेल. पण नियम म्हणायचा तर स्त्री – पुरुष व त्यांची प्रजा असेच कुटुंब असणे उत्क्रांतीच्या तत्वानुसार अपेक्षित आहे.
आधुनिक जिवशास्त्रातून आलेली ही दृष्टी पूर्वी नसावी. इतिहासाचार्य राजवाडे यांच्यामते प्राचीन मानवसमूहात सरमिसळ लॆंगिक संबंध होते. माणसामाणसात मुळी नातीच नव्हती. नंतरच्या मातृप्रधान पध्दतीत फक्त भाऊ, बहीण, आई, आणि माता (matriarch) ही चारच नाती होती. कारण बाप कोण हे निश्चितपणे सांगता येत नव्हते. मानवी विकासक्रमातील या दोनही टप्प्यांवर, म्हणजे सरमिसळ लॆंगिक संबंधांच्या आणि मातृप्रधान पध्दतीच्या विकासाच्या टप्प्यावर एखाद्या कुळाची वंशवेल रेखाटता येणे शक्यच नव्हते.
इथे शंका अशी येते की या टप्प्यांच्या अस्तित्वाला पुरावा कय? नातीच नसलेला मानवी समाज कोठे आणि कधी होता? बाप कोण याचा पत्ता नसलेला मातृप्रधान समाज सापडत नाही. (मातृसत्ताक / वारसाहक्क आईकडून मुलीकडे जाण्याची रीत असते. पण तेथे बापाचा पत्ता असतो.) हे निव्वळ अंदाज असावेत. याना वास्तवात स्थान नाही. राहुल सांकृत्यायन यानी ‘व्होल्गा से गंगा ’ या ग्रंथातही संस्कृतीच्या विकासाचे चित्रण करताना असे टप्पे मानले आहेत. तेही निराधार वाटतात.
डावे विचारवंत शरद पाटील म्हणतात (नवभारत डिसेंबर १९९७) की आदिम समाजापासून मालकी व वारसा – मग ते सामाजिक असोत की व्यक्तिगत – यासाठीच्या वाढत्या संघर्षातून विवाह संस्था उदयाला आली व परिणत होत गेली.
म्हणजे आधी विवाहसंस्था नव्हती. मग संघर्ष वाढत गेला. त्यावर उपाय म्हणून विवाहसंस्था आली. हे सगळे कशावरून? हा कल्पनाविलास वाटतो.
आधुनिक जीवशास्त्राशी सुसंगत अशी मांडणी मिलिंद वाटवे यानी ‘मिळून साऱ्या जणी ’ या मासिकाच्या दिवाळी ९४ ते दिवाळी ९५ या अंकांमधील लेखमालेत केली आहे. मालेचे शीर्षक ‘नर – मादी ते स्त्री – पुरुष ’.
निसर्गात नर आणि मादी यांच्यातील नात्यांचे विविध प्रकार दिसतात. म्हणून नॆसर्गिक म्हणण्याजोगे विशिष्ट नाते नाही. सगळीच नॆसर्गिक. एक बरचदा आढळणारी गोष्ट म्हणजे माद्या मिळवण्यासाठी नरांमधे स्पर्धा तर नराला आपला म्हणण्याबाबत मादीचा चोखंदळपणा. मादीला नर मिळाला नाही असे सहसा होत नाही. पण काही नर मात्र कुंवार रहातात. कारण? इतर नर माद्यांची साठेबाजी करतात. उदा. काळवीट, हुप्प्या माकड (हनुमान लंगूर), मोर. यांच्यात यशस्वी नर अनेक माद्यांचा दादला असतो. संख्येत साधारण निम्मे नर आणि निम्म्या माद्या. म्हणून काहीना जनानखाना याचा अर्थ इतराना सक्तीचे ब्रह्मचर्य. या फरकाचा परिणाम म्हणून नर-मादी यांच्या वागणुकीत फरक दिसतात.
भारतातील हत्तीना सध्या जंगलजमीन अपुरी पडते. कडेच्या शेतातील पिके खुणावतात. पण तेथे जाण्यात धोका असतो. हा धोका कोण पत्करतो? जास्त करून नर. माद्या फार धाडसीपणा दाखवत नाहीत. असे का? नरांची स्पर्धा अधिक तीव्र असते. नर उत्तम प्रकृतीचा असेल, बलदंड असेल तरच त्याला समागमसंधी मिळते. धाडस टाळाल तर मृत्यू टळेल पण जीवन सफळ संपूर्ण होणार नाही. म्हणून नर हत्ती घुसखोर होतात.
सिंह कुटुंबामधे दोन तीन नर असतात. माद्या कष्ट करतात तर नर ऎतखाऊपणा करतात. सिंहाचा वाटा म्हणजे माद्याना लुटा. कोणी परके नर आले तर त्यांच्यापासून कुटुंबाचे संरक्षण करणे हे काम या ऎतखाऊंवर पडते. त्यात अपयश आल्यास परागंदा व्हावे लागते आणि हल्लेखोर नर नवे कुटुंबप्रमुख बनतात.
गव्यांच्या कळपातील थोर नर इतर नराना माद्यांपासून दूर ठेवतो. लॆंगिक संबंधात त्याचा एकाधिकार असतो. विणीच्या हंगामात त्याला चरायला फुरसत नसते. शतावधानी व्हावे लागते. यातून त्याची ताकद घटू लागते. मग तो एकटा रहातो. ताकद कमावतो. कामवासना पुन्हा जागी होते. तो कळपाकडे परततो. आसक्ती – विरक्ती यांचे असे वार्षिक चक्र असते. आसक्तीच्या काळात तो सतत उत्तेजित असतो. लॆंगिक सुखाचा पूर पण खाण्याची आबाळ. विरक्तीचा काळ शांततेचा आणि मस्तीत चरण्याचा असतो. माद्यांच्या जीवनात इतकी टोकाची आंदोलने नसतात. चढउतार कमी. सावधपणा खूप. धोका टाळण्याकडे वृत्ती. नर आणि मादी यांच्या मानसिकतेत असा फरक असतो.
प्राण्यांच्या अभ्यासातून माणसांबद्दल अंदाज बांधता येतील का? प्राणी सहज प्रेरणेने जगतात. माणूस विचार करतो. माणूस वेगळा असेल. पण सर्व बाबतीत नव्हे आणि सर्वथा नव्हे. सहज प्रेरणा माणसाला सुध्दा प्रभावित करते. विचार, परंपरा, रिवाज यामुळे त्या प्रभावावर मर्यादा पडतात.
काळवीट वा हनुमान लंगूर माकड यांच्यात प्रत्येक यशस्वी नराचा मोठा जनानखाना असतो. तसे माणसात दिसत नाही. क्रॊंच पक्षांची जोडी भावनिक बंधनानी इतकी घट्ट बांधलेली असते की त्यांच्यात आयुष्यभरात फूट पडत नाही. जोडीतील एक जीव मेला, तर दुसरा खंगून मरतो. मानवाची अशी हि रीत दिसत नाही. बहुपत्निकत्वाची चाल अनेक समाजात आहे. पण सरसकट नव्हे. धनवान, सत्ताधीश, यशस्वी पुरूष या वाटेने जाताना दिसतात. श्री रामचंद्राचे त्याच्या एक पत्नीव्रताबद्दल कॊतुक का वाटते तर राजे महाराजे बरेचदा बहुपत्निक असत म्हणून. रामायणात दशरथ, महाभारतात कृष्ण व अर्जुन येथपासून शिवछत्रपतींपर्यंत सगळ्या बड्या मंडळींच्या अनेक बायका होत्या. बहुपत्निकत्वाची इच्छा सार्वत्रिक. पण स्पर्धकांच्या विरोधाला व कपटाला तोंड देण्याची शक्ती मर्यादित. मुले वाढवण्यासाठीची साधन संपत्ती सुध्दा मर्यादित. म्हणून छोटे कुटुंब. पण सत्ता संपत्ती वाढली की राण्या, दास्या, उपपत्नी, अंगवस्त्र या गोष्टी आल्याच. या तुलनेने अनेक नवरे असलेली स्त्री क्वचितच आढळते. द्रॊपदी हे असे खास उदाहरण. बहुपत्निकत्व म्हणजे किती बायका? जॅरड डायमंड या अभ्यासकाने Last Chimpanzee या पुस्तकात वेगवेगळ्या प्राण्यांच्या बाबतीत नराच्या वृषणग्रंथींचा आकार आणि एका नराबरोबर संसार करणाऱ्या माद्यांची संख्या असा तक्ता दिला आहे. त्यानुसार माणसात माद्यांची संख्या १.२५ अशी येते. याचा अर्थ असा घ्यायचा की चार चार – आठ आठ बायका असण्याची उदाहरणे विरळाच असणार. पण लग्नाच्या बायको व्यतिरिक्त थोडाबहुत अन्यत्र संबंध ठेवणे हे बऱ्याच प्रमाणात असणार. Mildly polygeneous असे पुरुषाचे वर्णन करता येईल. प्रत्यक्षात हे कसे घडते? स्वातंत्र्यापूर्वी भारतात दुसरे – तिसरे लग्न शक्य होते. स्वातंत्र्यानंतर हिंदू कायद्यान्वये द्विभार्याबंदी आली. तरी अजून अनेक गटात असा व्यवहार चालतो. लग्नबाह्य संबंध साधारणपणे अनॆतिक समजले जातात. तसे संबंध असतात. त्याबद्दल थोदी कुजबूज होते. पण बव्हंशी ते गोशात रहातात. स्त्रिया काही अंशी एकनिष्ठता विसरतात म्हणूनच हे शक्य होते. लंगूर माकडांच्या टोळीत, दादला हा सगळ्या माद्यांवर नजर आणि वचक ठेवून असतो. पण त्याला चुकवून माद्या इतर नरांशी संधी मिळेल तेव्हां संग करतात. जोडीने पिले वाढवणाऱ्या प्राण्यांमधे सुध्दा माद्या गुपचूप दुसरे संबंध ठेवतात. उदा. पॅरडाइज फ्लायकॅचर किंवा नंदन पक्षी. पहिला दादला सोडून / पळून / मरून गेला तर या दुसऱ्याचा उपयोग होतो.
शक्यतो जास्त गुणवान पुरूष संसाराला मिळवावा ही स्त्रीची सहज प्रेरणा. अशा पुरूषावर इतरही स्त्रिया अनुरक्त होतात. त्याला मोह पडतात. तसे झाल्यास त्याची संसारात पुरेशी मदत मिळत नाही. इमानाने मदत करणारा पुरुष शोधला तर कदाचित तो फार गुणवान असणार नाही. यावर उपाय म्हणजे एक पुरुष संसाराला मदत करेल असा गाठणे आणि संधी मिळाल्यास गुणवान पुरुषाशी संबंध. वाट्याला आलेल्या पुरुषाला संसारात गुंतवून ठेवण्याला उपयुक्त असे गुणधर्म स्त्रीमधे उत्क्रांत झालेले दिसतात. बहुतेक प्राण्यांमधे मादी अधून मधून माजावर येते. तेव्हांच समागम असतो. स्त्रीचा असा काळ नाही. समागम सर्वकाळ शक्य असतो. गर्भारपणीदेखील सुरुवातीचा काही काळ तसा असतो.
प्राण्यांमधे मादी माजावर असताना नर तिची सतत पाठराखण करतो. इतर नराना दूर ठेवतो. पितृत्वात वाटेकरी नकोत म्हणून. स्त्रीवर सर्वतोपरी निर्बंध घालणाऱ्या रीतीचा उगम येथेच असावा.
“ आपल्या बछड्यांच्या पोटी चार घास जावेत यासाठी तिला दिवसातले १६ तास कष्ट उपसावे लागतात. थकून परतावे तर घरी पोरांची आपसातील भांडणे. ती मिटवून पोराना खाऊ घालून झोपवल्यानंतर ही स्वत:ची भूक, सफाई याकडे लक्ष देणार. अखेरीला काही तासांची झोप. उगवतीला पुन्हा वेठबिगारी सुरु. “
ही कहाणी घर व दार दोन्ही सांभाळणाऱ्या स्त्रीची नव्हे तर आफ्रिकेतील बबून माकडिणीची आहे. पण दोन्हीत साम्य विलक्षण आहे. संगोपन कालातील अडचणीतून माद्या कसा मार्ग काढतात? हत्तिणी किंवा सिंहिणी बालसंगोपनात बहिणी आया, मावश्या यांची मदत घेतात. ब्राझीलमधील ‘तिती ’ नामक माकडात आईबाप दोघे पिलाना सांभाळतात आणि पाळीपाळीने अन्न मिळवून आणतात.
अवेळी झालेली, नको झालेली पिले कशी सांभाळायची? अनेक माद्या यांचा त्याग करतात. सॅरा हार्डी या विदूषीने आपल्याकडील हनुमान लंगूर माकडांचा अभ्यास केला. त्यात टोळीचा दादला बदलल्यानंतर पिलांच्या जिवावर कसे बेतते याची तपशीलवार कहाणी आहे. तिचा आधार घेऊन व्यंकटेश माडगुळकरानी ‘सत्तांत्तर ’ नामक विलक्षण सुंदर पुस्तक लिहिले. (त्यावर माझ्या मते जरा अस्थानी टीका झाली.) सॅरा हार्डीच्या Mother Nature या नव्या पुस्तकात मातृत्वाच्या पॆलूंचा अभ्यास केला आहे. बहुतेक माता पिलाला दीर्घकाळ स्तनपान करतात. पहिल्या पिलाची गरज संपेपर्यंत पुन्हा गर्भवती होत नाहीत. पिलू रोगट अशक्त असले, ते जगण्याची शक्यता कमी असली, दुष्काळात पिलू जन्माला आले, तर माद्या त्याला वाऱ्यावर सोडून देतात किंवा मारून टाकतात. अमेरिकेत अस्वलाना सामान्यपणे २-३ पिले होतात. एकच पिलू झाले तर त्याच्यासाठी वर्षानुवर्षे कष्ट उपसणे परवडत नाही. मग आई पिलाचा त्याग करते. पुढच्या वेळी २-३ पिले होतील तीच सांभाळावीत या विचाराने. काही उंदीर माद्या रोगट – अशक्त पिलाना खाऊन टाकतात. वेडीवाकडी झालेली पोळी मोडून पुन्हा मळावी तसा हा प्रकार. म्हणजे निदान कणिक फुकट जात नाही. एकदा लाटण्याचे कष्ट तेवढे वाया जातात.
भारत, चीन व अन्य गरीब देशांमधे आजही काही प्रमाणात मुलांची हत्या होते. हे नको असेल तर अशा मुलाबाळाना दत्तक पालक मिळवून दिले पाहिजेत. भारतात गर्भपात कायदेशीर आहे. अपंग मूल जन्माला येणार असे कळल्यावर गर्भ पाडून प्रश्न सोडवता येतो. पण एकदा ते जन्माला आले की त्याचे असह्य ओझे आईबापाना जन्मभर वागवावे लागते. हा तिढा आपल्याला अजून सोडवता आलेला नाही.
अपंग मुलांचा प्रश्न अपवादात्मक असतो. बव्हंशी सामान्य सुदृढ बालके जन्माला येतात. स्तनपानाच्या मार्गे दोन पाळण्यातील अंतर वाढवून संगोपनाचे कष्ट आटोक्यात ठेवता येतात. तसे ते शिकारी मानवाने आटोक्यात ठेवले. पण शेतीची सुरुवात झाल्यानंतर (नवाश्म युग, सुमारे १०,००० वर्षांपूर्वी) हे चित्र बदलले. सरसकट मोठी पिलावळ जन्माला घातली जाऊ लागली. भटकंती नसल्यामुळे मूल पाठीवर वागवण्याची गरज सरली. मुलांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपे झाले. पाच – सात वर्षांची मुलगी धाकट्या भावंडाना सांभाळू लागली. आठ – दहा वर्षांची मुले आईबापाना कामात मदत करु लागली. एका अर्थाने कमावती झाली. वाढती संख्या ही ओझे होण्याऎवजी फायद्याची बाब झाली. इथे संतुलन घसरले. बाई पुनरूत्पादक यंत्र झाली. आधुनिक काळात ही चक्रे उलट फिरत आहेत. एका अर्थाने पुराश्म युगातील स्त्रीजीवन पुन्हा अवतीर्ण होत आहे. त्यातून अन्पेक्षित समस्या निर्माण होऊ शकतात. उदा. पूर्वीच्या स्त्रीपेक्षा आधुनिक स्त्रीला मासिक पाळीचा जास्त त्रास सहन करावा लागतो.
माझ्या आजीची १३ बाळंतपणे झाली. म्हणजे ती सुमारे १३ वर्षे गरोदर होती आणि निदान १३ वर्षे अंगावर पाजत होती. म्हणजे सुमारे २५ वर्षे तिला पाळी सोसावी लागली नाही. आजच्या तरुणीला तिच्यापेक्षा ३०० ते ४०० जास्त वेळा पाळीचा भोग येतो. हे ऒषध प्रयोगाने थांबवावे असे काहीना वाटते. त्यावर संशोधन चालू आहे. इतरांच्या मते या नॆसर्गिक प्रक्रियेला बांध घालू नये. इत्यादि.
संगोपनाव्यतिरिक्त इतर सांसरिक जबाबदाऱ्या आणि कामांबाबत स्त्री – पुरुषात वाटणी कशी असते? दर तीन – चार तासानी मुलाला अंगावर पाजायचे असेल तर आई व मूल यांची ताटातूट अशक्य. म्हणून मूल आसपास असताना करता येतील ती कामे आईने करायची तो परिसर निर्धोक हवा. तेव्हां परिचित प्रदेशात कंद मुळे फळे गोळा करणे, पाणी व जळण मिळवणे ही कामे स्त्रीच्या वाट्याला येणार. शिकारीमागे दिवसचे दिवस घालवावे लागत असतील, लांब अंतर प्रवास घडत असेल तर ती जबाबदारी पुरुषालाच योग्य. मोठ्या प्राण्याला भाला, दगड यांचा वर्मी घाव लागला, विषारी बाण लागला तरी प्राणी लगेच मरत नाही. त्याचा शक्तिपात होऊन तो पडेपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लगतो. संधी मिळेल तेव्हां आणखी एक घाव घालणे, एरवी सुरक्षित अंतरावरुन नजर ठेवणे अशा पध्दतीने शिकार होते. तिच्यात स्त्रीचा सहभाग अवघड आहे.
शिकारीच्या या उपक्रमांमधे पुरुष एकत्र प्रवास करणार, धोका पत्करणार, एकमेकाला संकटात मदत करणार, एकत्र यशापयश अनुभवणार. यातून परस्परांशी खास दोस्ती, एक्मेकांवर विश्वास अशी नाती निर्माण होतात. उलट स्त्री ही साठवण, पुरले, उरवले यांची काळजी घेणार. एका मुक्कामावरच्या सगळ्या स्त्रिया एकमेकीच्या आसपासच अन्न, पाणी, जळण गोळा करणार. म्हणजे त्यांच्यात सहकाराऎवजी स्पर्धा येणार. यातून स्त्रियांमधील संबंध कुरबूर, तणाव अशा प्रकारचे होणार.
मूल हे अपरिहार्यपणे स्त्रीकडे असते. आणि चूल? आदिम भटक्या समाजात स्वॆपाक फारसा नसतो. वस्तू कच्च्या, उकडून, होरपळवून खायच्या. शेतकरी समाजात हे बदलते. धान्य खायला स्वॆपाक लागतो. पण तो स्त्रीने का करावा? कदाचित पुरुषाला दिवसातून दोन – तीन वेळा घराकडे येण्याची गरज पडावी, निदान जेवण्यासाठी वेळ वेगळा काढला जावा हा स्वेपाकामागचा उद्देश असेल. बाजीराव पेशव्याचे सॆन्य घोड्यावरुन प्रवास करता करता भाजकी कणसे चोळून खात असे अशी वर्णने येतात. देनंदिन जीवनात हीच पध्दत आली तर कॊटुंबिक नातेसंबंधातील एक बंध गळून जाईल.
पारंपारिक समाजात गरीब कुटुंबातील स्त्री नेहमीच मोलमजुरी करुन अर्थार्जन करीत असे व आहे. सधन वर्गात स्थिती वेगळी असते. भटक्या आदिम समाजात मुळात धन नावाची चीजच फारशी नसते. साधनसंपत्तीवर मालकी हक्क फारसा नसतो. म्हणून विषमता नसते. सर्वांचे जीवनानुभव साधारण समान पातळीचे असतात. कोणी फार ज्ञानी आणि कोणी अगदी अडाणी असे नसते. स्त्री व पुरुष यांची सामान्य जाण सारखीच.
स्थिर शेती ही मालमत्ता असते. स्थॆर्यामुळे संपत्तिसंचय होऊ शकतो. संपत्ती असल्यावर तिच्यासाठी लूट आणी लढाया आल्याच. त्यात पुरुषांचे महत्व जास्त. म्हणून मुलींपेक्षा मुलगे हवेत. मुली काय, पळवूनही आणता येतील. अशा समाजात स्त्रियाना जपणे अधिक गरजेचे होते. त्याना चार भिंतीआड सुरक्षित ठेवले जाते. त्यामुळे त्यांचे अनुभविश्व मर्यादित होते. यातूनच ‘बायकाना काय कळणार?’ असा सूर वाढतो. उच्चभ्रू वर्गात बायकाना घराण्याची प्रतिष्ठा वगॆरे बाबींसाठी जणू जबाबदार धरण्याते येते. त्याना शिक्षण वा साक्षरतेची गरज नाही. त्यानी कुटुंबातील निर्णय घेऊ नयेत. त्याना कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती असण्याचे कारण नाही. त्यानी कुटुंबाअंतर्गत आहार, संगोपन, पुरुषांचे शरीरसुख इत्यादींचे व्यवस्थापन करावे. अशा प्रकारची एकूण धारणा स्त्रीबद्दल झालेली दिसते.
पिता रक्षति कॊमार्ये, भर्ता रक्षति यॊवने ।
रक्षानी स्थविरे पुत्रा:
न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति ।।३॥ (मनुस्मृति अध्याय ९)
हे मनुवचन याच दृष्टिकोनाचे प्रतिनिधी आहे. भारताच्या इतिहासात पांडित्य, राजकारण, व्यवस्थापन अशा क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रिया अधुन मधुन समाजक्षितिजावर तळपून गेल्या. गार्गी, मॆत्रेयी अशी प्राचीन सुरुवात करुन अहिल्याबाई होळकर, चांदबिबी, चेन्नम्मा अशा मध्ययुगीन तर झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई अशा ब्रिटिश काळातील स्त्रियांची नावे डोळ्यासमोर येतात. पण सामान्यत: स्त्रीची स्थिति पारतंत्र्याचीच असावी.
गेल्या दीडशे वर्षात या बाबतीत बरेच स्वागतार्ह बदल झाले. इंग्रजी अमलाखाली स्त्रीशिक्षणाची ज्योत महात्मा फुल्यानी पेटविली. धोंडो केशव कर्वे यानी ती जोपासली आणि वाढविली. आज आपल्याकडे सर्व आधुनिक शिक्षण स्त्रियाना खुले आहे. कला, विज्ञान, व्यापार, कायदा, वॆद्यक, अभियांत्रिकी अशा विविध ज्ञानशाखांमधे स्त्रिया मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. पदव्युत्तर शिक्षण, अगदी डॉक्टरेट पर्यंत, स्त्रियांच्या वाट्याला येत आहे. पूर्वी सनातनी मंडळींच्या विरोधामुळे मुलांचे आणि मुलींचे शिक्षण वेगवेगळ्या संस्थांमधे योजले जाई. कर्वे यानी तर मुलींसाठी वेगळे विद्यापीठच काढले.
आज भारतात स्त्रियांसाठी वेगळी पाच विद्यापीठे आणि एक हजार महाविद्यालये आहेत. (महाराष्ट्रात एक विद्यापीठ आणि पन्नास महाविद्यालये). यांच्यात वीस लक्ष विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या अर्थाने महिलांच्या शिक्षणाची समस्या इतिहासजमा झाली आहे. भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाने सुचवले आहे की यापुढे वेगळी महिला महाविद्यालये काढण्यास प्रोत्साहन देऊ नये. कदाचित उद्या महिलांसाठी राखीव असलेल्या शिक्षणसंस्था पुरुषानासुध्दा प्रवेश देण्यास तयार होतील.
शिक्षणाचा परिणाम म्हणून आज शहरी शिक्षित कुटुंबातील स्त्रिया नोकरी करु लागल्या आहेत. त्यांचे अनुभवविश्व रुंदावते आहे. पण दोघे नोकरी करीत असले तरी घरकामात पुरुष आपला वाटा उचलेल अशी शाश्वति नाही. हे गॆर आहे. जोडप्यापॆकी एकजणच अर्थार्जन करीत असेल तर बहुतेक तो पुरुषच असतो. स्त्री कमावणार आणि पुरुष घर सांभाळणार असे दिसत नाही. घरकामाला कमी लेखले जाते. स्त्रियासुध्दा घरकाम करणाऱ्या पुरुषाला हसतात. हे बदलायला हवे. असो.
हरतऱ्हेचे आधुनिक शिक्षण पदरात पडल्यावर प्रॊढ आयुष्यात स्त्रिया ते उत्तम प्रकारे कारणी लावत आहेत ही समाधानाची गोष्ट होय. जीवनाच्या प्रत्येक अंगोपांगात आपल्या उच्च ज्ञानाच्या आधारे त्या कृतिशील आहेत. विविध पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात स्त्रियानी नोकरी वा व्यवसाय करणे ही आज नेहमीची बाब झाली आहे. त्यामुळे समाजाचा फायदाच होत आहे. हे फुललेले कर्तृत्व एरवी झाकलेलेच राहिले असते. भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश या चारही देशात पंतप्रधान / राष्ट्राध्यक्षपदावर महिला दीर्घकाळ राहिल्या आहेत. त्यानी आपले राजकीय कर्तृत्व निर्विवाद सिध्द केले आहे. शिक्षण, रुग्णोपचार अशी काही क्षेत्रे स्त्रियांच्या पारंपारिक प्रतिमेच्या जवळची समजली जातात. म्हणून त्या क्षेत्रात स्त्रिया पुढे येणे कदाचित स्वाभाविक वाटेल. पण लष्कर, पोलिस, वास्तुशिल्प, विमानवाहतुक, शेअर बाजार अशा परंपरेने पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातहि आता स्त्रिया कर्तृत्व दाखवत आहेत.
खरे म्हणजे याबद्दल आश्चर्य वाटावे असे नाही. अशा अर्थाने की जीवशास्त्रदृष्ट्या स्त्रियांमधे पुरुषांपेक्षा काही कमीपणा न्यून वगॆरे मुळीच नाही. पुरुषाचे शरीर १०-१५% मोठे असते आणि ताकद जास्त असते. तेव्हां हमाली काम, लोहारकाम, ट्रक चालवणे अशा काही कामाना स्त्रिया कमी पडतील. बलदंड शरीराची अन्य ठिकाणी जरुर पडात नाही. स्त्रिया विमानचालक (पायलट) असण्याचे आश्चर्य वाटते ते नाविन्यामुळे. पण आता नव्या परंपरा आपण घडवीत आहोत.
कम्युनिस्ट व अन्य साम्यवादी राजवटीनी नेहमी स्त्री स्वातंत्र्य, स्त्री – पुरुष समता, स्त्रियाना पूर्ण संधी याचा पुरस्कार केला आहे. काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमधे डाव्या गटानी उठाव करुन सत्ता मिळवली. त्यांच्याविरुध्द बंडखोर टोळीवाल्यानी चढाई केली. रशियन सॆन्याची मदत घेऊनसुध्दा डाव्या नजीबुल्ला सरकारला टोळीवाल्यांची आगेकूच रोखणे अवघड झाले. याकाळात काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलाखती मी पाहिल्या. त्यात एक स्त्री अधिकारी होती. लष्करी हिरवी पँट, शर्ट, केसाचा बॉबकट, ओठाला रंग अशी पाश्चात्त्य समाजात शोभण्यायोग्य छबी. ती म्हणाली, आम्ही स्त्रिया या प्रतिगामी टोळीवाल्यांविरुध्द प्राणपणाने लढत आहोत. कारण ते जिंकले तर आमची पूर्ण वाट लागेल. स्त्रियाना कोणतेहि स्वातंत्र्य, कोणतीहि विकासाची वाट उरणार नाही. आम्ही सर्वस्व गमावून बसू.
यथाकाळ रशियन फॊजा आणि नजीबुल्ला यांचा पराभव झाला. मग आपसात सुंदोपसुंदी करीत तालिबाँ नामक गटाचे राज्य अफगाणिस्थानात स्थिरावले. अपेक्षेप्रमाणे त्यानी इस्लामी आणि शरिया कायद्यानुसार राज्य चालवणाचे धोरण जाहीर केले. त्यानुसार स्त्रियाना बुरखा सक्तीचा आहे. कुटुंबाबाहेर जवळपास कोणत्याच कार्यक्रमात भाग घेण्यास परवानगी नाही. स्त्रीमुक्तीचे वारे अफगाणिस्थानात पुरते कोंडले गेले आहेत.
शेजारच्या पाकिस्तानात परिस्थिती फारशी वेगळी नाही. सिंध व पंजाब प्रांतातील शहरी भागात कर्तृत्ववान स्त्रिया पुष्कळ आढळतात. प्रसार माध्यमे, ललित कला, राजकारण इत्यादि क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग बराच आहे. श्रीमती बेनझीर भुट्टो कित्येक वर्षे राजकारणात अग्रभागी राहिल्या आहेत. पण बलुचिस्तान व सरहद प्रांतात तसेच एकूण ग्रामीण भागात स्त्रिय़ांची स्थिती केविलवाणी आहे. परदा सक्तीचा. शिक्षण नाही. असलेच तर कुराण पठण. बायकांची बुध्दी बेताची. त्याना कोणताहि निर्णय घेता येणे शक्य नाही, असे पुरुषाना मनोमन वाटते. बायकाना मोकळीक दिली की त्या गॆर वागतातच असे ठाम मत असते. कोणाच्या प्रेमात पडण्याची परवानगी नाही. घरचे म्हणतील त्याच माणसाबरोबर लग्न. बंड करुन मुलगी कोणाबरोबर पळून गेली तर? पालक बिनदिक्कत तिचा खून करतात. बंदुकीने गोळी मारणे, ओढणीने गळा दाबून मारणे हे नित्याचे आहे. इज्जतीच्या नवाने केलेल्या अशा खुनांकडे समाज डोळेझाक करतो. अशी प्रेते गुपचुप पुरुन टाकतात. खुनी माणसाला तुरुंगात टाकले तरी लाच वगॆरे देऊन तो वर्ष दोन वर्षात घरी येतो. बायकोच्या वा सुनेच्या चारित्र्याबद्दल नुसता संशय जरी आला तरी तिला मारून टाकले जाते. तिचा ज्या पुरुषाशी अनॆतिक संबंध असेल तोही मारला जातो. पण सहज सापडला तर. तो निसटून गेला तर कोणी त्याचा निग्रहाने पाठलाग करत नाही. एका घटनेत नवऱ्याने बायकोचा जीव घेतला. तो तुरुंगात गेला. वर्षाने एक म्हॆस लाच देऊन सुटला. बायकोच्या प्रेमिकाने आपली बहीण नवी बायको म्हणून दिली. तह झाला.
लग्न बाह्य संबंध हा पाकिस्तानात गुन्हा आहे. त्यासाठी बायकाना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होते. बायका बरेचदा अशिक्षित असतात आणि कोर्टात आपला बचाव नीट करु शकत नाहीत.
अलीकडे कुटुंबा अंतर्गत मतभेद झाल्यास बाईला पेटवून देणे, तिच्यावर एसिड फेकणे असले प्रकार वाढत आहेत. बायकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत पुरुषाना अपराधीपणाची भावना नाही. हे योग्यच आहे. असेच व्हायला हवे. यात काय चुकले? असा सूर असतो. हे गुन्हे लपविण्याचा फारसा प्रयत्न होत नाही. बाईने स्वसंरक्षणासाठी नवऱ्याला मारले तर न्यायालये जबर शिक्षा देतात. इतर देशात जी कृती न्याय्य ठरेल तिच्याबद्दल पाकिस्तानात बायकाना फाशीची शिक्षा होते. एकूण चित्र भेसूर आहे.
तथाकथित इस्लामी कायद्यानी स्त्रीला पुरुषाच्या तुलनेने फार कमी प्रतिष्ठा दिली आहे. १९८४ साली झिया – उल – हक यांच्या कारकिर्दीत झालेल्या कायद्यानुसार स्त्रीला बँकेत खाते उघडता येत नाही. फॊजदारी खटल्यात साक्ष देता येत नाही. या संदर्भात साफियाबिबी या स्त्रीची कहाणी विलक्षण वाटते.कोण्या बड्या घरात ही तरुण आणि अधू दृष्टीची स्त्री घरकामाची नोकरी करीत असे. मालक आणि मालकाचा मुलगा दोघानी हिच्यावर बलात्कार केला. हिच्या वडिलानी मालकावर खटला भरला. पण चमत्कारिक कायद्यामुळे साफियाबिबीला साक्ष देताच आली नाही. लग्न झाले नसून तिला दिवस गेले होते. इस्लामी कायद्यानुसार हा गुन्हा आहे. कोर्टाने तिला दहा वर्षे सक्तमजुरीची कॆद आणि शभंर फटके अशी शिक्षा दिली. या ‘न्याया’ विरुध्द जगभर प्रतिसाद उमटले.
पजांबमधे अलीकडे एका तरुणीने शेजारच्या कुटुंबातील तरुणाशी पळून जाऊन प्रेमलग्न केले. तिचे सगळे नातेवाइक या जोडप्याच्या जिवावर उठले. त्यानी या दोघांचा शोध घेऊन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यावर त्या जोडप्याविरुध्द लग्नबाह्य संबंध ठेवल्याच्या आरोपावरुन खटला भरला. आपण या तरुणीशी लग्न केले आहे अशी साक्ष देण्यास नवरा कोर्टात गेला. त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तो नशिबाने वाचला पण अपंग झाला. आता हे जोडपे परदेशात निर्वासित म्हणून जाण्याच्या प्रयत्नात आहे.
काहीवेळा ज्याच्याशी प्रेमलग्न केले तो नवराच मुळावर ऊठतो. बायकोला घराबाहेर काढतो किंवा स्वत: निघून जातो. कोर्टाकडे दाद मागावी तर ते म्हणतात आधी आपण लग्नाची बायको आहोत हे सिध्द करा. अडाणी बायकाना ते सुध्दा अवघड जाते. चार चार मुलांच्या आया अशा वेळी लग्नबाह्य संबंधाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात जातात.
एजाज अहमद या तरुणाने सबीना या प्रेमिकेशी लग्न केले. तिच्या पालकांचा याला विरोध होता. लाहोर हायकोर्टाने हे लग्न रद्द ठरवले. ही १९९६ सालची गोष्ट आहे. पालकांच्या संमतीविना मुस्लिम स्त्री लग्न करु शकत नाही असा निर्वाळा कोर्टाने दिला. साधारण समज असा की इस्लामच्या दृष्टीने लग्न हा पुरुष आणी स्त्री यांच्यातील करार आहे. पण लाहोर हायकोर्टाने वेगळी भूमिका घेतली. तिच्याविरुध्द एजाज अहमदला सर्वोच्चन्यायालयात अपील करावे लागले.
कोर्टांविरुध्द आणी कायद्याविरुध्द काही करायचे तर कायदेमंडळात आरडाओरड करायला हवी. तसा प्रयत्न होतो. श्रीमती आसमा जहांगीर या सिनेटर आहेत. (राज्यसभा सदस्य). त्यानी Honour killings किंवा इज्जतीच्या नावाखाली स्त्रीचा खून करण्याबद्दल प्रस्ताव मांडला. त्याला कारणहि तसेच धक्कादायक होते. सामिया सरवार ही पेशावरची एक विवाहित स्त्री. तिने आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट मागितला. तिचे नातेवाइक संतापले. त्यानी तिच्यावर मारेकरी घातले. ती पळाली. मदत मागण्यासाठी लाहोरला आसमा जहांगीर यांच्या कचेरीत आली. मारेकऱ्यानी तेथे तिला गाठले आणि ठार मारले. ही गोष्ट इप्रिल १९९९ ची. बाईने घटस्फोट मागितला या अपराधाबद्दल तिचा खून करण्याच्या निषेधार्थ प्रस्ताव आसमा बाईनी सेनेटमधे मांडला. त्यावर वायव्य सरहद्द प्रांतातील सर्व खासदार आसमा बाईंच्या विरोधात ओरडू लागले. या जीन्स घालणाऱ्य बायकांच्या मानवाधिकाराबद्दल जगावेगळ्या कल्पना आहेत असे सर्वानी एकमुखाने सांगितले. हे पाकिस्तान आहे. येथे इस्लामी कायदाच चालणार. उदारमतवाल्यांचा नव्हे असे सर्वानी ठणकावून सांगितले. कायदेमंडळात बाई हरल्या.
सामाजिक कार्य म्हणून त्या लाहोरमधे एक स्त्री – आधार – केंद्र चालवतात. खुनाची भीती असलेल्या बायकाना तेथे आसरा मिळतो. खरे तर असे सरकारी अभय निवास आहेत. पण ते बेभरवशाचे दिसतात. कारण नवरा येऊन बायकोला ताब्यात घेऊ शकतो. आसमा बाईंचे केंद्र कर्मठ इस्लामी नेत्यांच्या डोळ्यात खुपते. ते बंद करा अशी मागणी हे नेते सरकारकडॆ करत आहेत.
स्त्रीयांच्या इज्जती खुनांचा प्रश्न अनेक देशात आहे. १९९७ सालच्या UNICEF च्या अहवालानुसार एका वर्षातील अशा खुनंची संख्या अंदाजे पुढील प्रमाणे : पाकिस्तान १०००, येमेन ४००, इजिप्त ५०, लेबॅनॉन १०.
इजिप्तमधे नोरा अहमद हिने पित्याच्या विरोधाला न जुमानता लग्न केले. पित्याने तिचा शिरच्छेद करुन डोके कॆरो शहराच्या रस्त्यात मिरवले. येमेनमधे एका बापाने मुलीला गोळी घालून मारले. का? लग्नानंतर जावयाने तक्रार केली की मुलगी कुमारिका नाही. मुलीच्या आईने प्रेताची वॆद्यकीय तपासणी करवली. डॉक्टर म्हणाले मुलगी कुमरिका होती. जावयाने आपले नपुंसकत्व लपवण्यासाठी खोटा आरोप केला होता.
अशा खुनाना इस्लामची संमति नाही असे दिसते. इस्लाम पवित्र वर्तणुकीची अपेक्षा करतो. नियम मोडणाराना फटक्यांची शिक्षा सांगतो. पण इज्जतीच्या नावे जिवे मारण्याला परवानगी देत नाही. पण याचा अर्थ इस्लाम स्त्रीला न्याय देतो असे नव्हे. कुराणाने स्त्रीला दुय्यम दर्जा दिला आहे. तिच्या साक्षीला पुरुषाच्या साक्षी पुराव्याच्या निम्मी किंमत दिली आहे. स्त्रीचा वारसाहक्क पुरुषाच्या अर्धा. लग्नात वराची संमति आवश्यक पण वधूची संमति विचारण्याची गरज नाही. पुरुषाला बिगर मुल्सिम स्त्रीशी लग्न करण्याला परवानगी आहे. पण स्त्रीला बिगरमुस्लिम पुरुषाला वरमाला घालण्यास बंदी. इस्लाम पक्षपाती दिसतो. पण त्याचे आचरण करणारा समाज नियमात स्थलकालानुरुप बदल करु शकतो. युर्कस्तान व टुनीशिया या मुस्लिम देशांमधे दुसरी बायको करण्यास बंदी आहे. सीरिया आणि इजिप्त या देशांमधे बंदी नाही. पण दुसरे लग्न करण्यात नाना अडचणी घातल्या आहेत. भारताने या देशांचे अनुकरण करायला हवे. असो.
बहुपत्निकत्व आणि सहज दिला जाणारा घटस्फोट या समस्या भारतीय मुस्लिम स्त्रियानासुध्दा आहेतच. सुधारणावादी मुस्लिम विचारवंत अस्गर अलि इंजीनियर यानी सुचवले आहे की सरकारने या विषयावर एक चॊकशी आयोग नेमावा. त्यावर न्यायाधीश, वकील, मुस्लिम स्त्रिया व मुस्लिम धर्मगुरु नेमावेत. यानी सर्वसामान्य मुस्लिम जनतेची मते आजमावून पहावीत व बहुपत्निकत्व तसेच तीन वेळा तलाक असे म्हणून मिळणारा घटस्फोट या दोन्हीवर बंदी आणावी.
यावर जावेद आनंद या वृत्तपंडिताने मतभेद व्यक्त केला आहे. त्यांच्या मते असुरक्षिततेच्या भावनेपोटी मुस्लिम समाज मुल्ला मॊलवींचा आधार घेतो. हे धर्मगुरु अशा आयोगावर बहिष्कार टाकतील. मुल्सिम जनमानसात त्या आयोगाविरुध्द द्वेष रुजवतील व वाढवतील. मशीद आणि मद्रसा यांच्या माध्यमातून धर्मगुरु सतत जनसंपर्कात असतात. आयोगाला काम पुरे करता आलेच आणि त्यानी सुधारणेला अनुकूल अहवाल दिला तर मॊलवी म्हणतील की ही सर्व बनवाबनवी आहे. अशा बदनाम आयोगाच्या आधारावर कायद्यात बदल करण्यास राजकीय पक्ष तयार होणार नाहीत.
त्याऎवजी स्त्रियाना न्याय मिळवून देण्यासाठी घटना आणि न्यायपालिका यांचा उपयोग करावा. घटनेनुसार कोणावरहि लिंग, धर्म, भाषा अशा कारणांसाठी विषमतापूर्ण कायदा वा कार्यक्रम लादता येत नाही. द्विभार्या आणि सहज घटस्फोट या दोन्ही रीती मुस्लिम स्त्रियांवर (मुस्लिम म्हणून व स्त्री म्हणून) अन्याय करतात. हिंदू स्त्रियाना हा अन्याय सहन करावा लागत नाही. हा धर्मभेदी आणि लिंगभेदी व्यवहार घटनाविरोधी आहे. हे न्यायालयानी मान्य केले तर मॊलवी खरे अडचणीत येतील.
या आघाडीवर राजकीय सोयीसाठी आपण अक्षम्य हेळसांड केली आहे. पण भारतात मुस्लिम समाज हा अल्पसंख्य गट आहे. एकूण समाजाचे म्हणजे प्रामुख्याने हिंदूंचे या बाबतीत वागणे कसे आहे?
हिंदू स्त्रियाना शिक्षणाच्या बाबतीत विकासाची बरीच संधी मिळाली असे आपण पाहिले. पण अनेक अन्य कॊटुंबिक बाबतीत स्त्रीच्या खांद्यावर अवाजवी ओझे टाकले जात असे व आहे.
भगवान बुध्दाने स्त्रीजन्माची खास पाच दु:खे म्हणून सांगितली आहेत. मासिक पाळी, गर्भारपणा, प्रसूति, घर सोडून सासरी जाणे, सासुरवास. यापॆकी पहिली तीन शरीरधर्मापासून येतात. ती अपरिहार्य आहेत. रीती रिवाज हे या अडचणी थोड्या हलक्या व्हाव्यात म्हणून उपयोगी पडू शकतात. पुढच्या दोन अडचणी मानवनिर्मित आहेत.
माहेर सोडणे – लग्नानंतरच्या निवासाबद्दल जोडप्याला तीन पर्याय असू शकतात. पहिला पर्याय मुलीच्या घरी रहाणे (वर घरजावई). दुसरा पर्याय मुलाच्या घरी रहाणे (वधू सासुरवाशीण). तिसरा पर्याय म्हणजे दोघानी अलग संसार मांडणे. तिसऱ्या पर्यायाला आपण विभक्त कुटुंब म्हणतो. भटक्या शिकारी समाजात बव्हंशी विभक्त कुटुंबे असतात. आई बाप आणि मुले येवढेच कुटुंब असेल तर हल्ली आपण त्याला चॊकोनी असे विशेषण वापरतो. त्यात आधीची पिढी (आजी – आजोबा) रहात असतील तर ते एकत्र कुटुंब. त्यात इतर कर्ते भाऊ, त्यांची बायका-मुले यांचाही समावेश असतो. क्वचित आजोबांचे भाऊ आणि त्यांचा वंश हे सुध्दा बरोबर असतात. आज आदिम समाजात दिसते ती विभक्त कुटुंब पध्दत. सुरुवातीला तीच सार्वत्रिक असावी. मग एकत्र का बनले असेल?
संख्येत सुरक्षा असते. मोठ्या गटाने मोठी शिकार साधता येते. पण त्याचा अर्थ एकत्र स्वॆपाक करायला हवा असे नाही. एका वस्तीमधील पुरुष शिकारीपुरते एकत्र येऊ शकतात. येतात. शेतीवर आधारित समाज घडला तेव्हां शेतमालकीचे प्रश्न निर्माण झाले. कसायला जमीन असल्याशिवाय वेगळे रहायचे कसे? ऒद्योगिक समाजात तरुण माणसाला नोकरी – चाकरी काम – धंदा मिळाला की संसार थाटता येतो. शेतकरी समाजात एकत्र कुटुंब हा नियम तर विभक्त कुटुंब हा अपवाद असतो. शहरी समाजात याच्या उलट स्थिती होते. मग हळू हळू एकत्र कुटुंबाचे फायदे लक्षात येऊ लागतात. घरात कोणी अपंग, अधू, आजारी, अडाणी माणूस असेल तर त्याला संरक्षण मिळते. मोठ्या पसाऱ्यात माणसाला सांभाळून घेता येते. त्याला मोजक्या चारच गोष्टी करता येत असतील तरी तेवढ्या कामात गुंतवून ठेवता येते. त्याचे ओझे होत नाही. घरच्या मुली विधवा, परित्यक्ता वगॆरे होऊन परत आल्या तरी त्याना आधार मिळतो. लहान मुलाना तर एकत्र कुटुंब फारच सुखदायी होते. अनेकांचे वात्सल्य मिळू शकते. आईबापांच्या करड्या नजरेतून सुटता येते. सवंगडी घरातच मिळतात. दहाजणांबरोबर वागण्याची सवय होते. व्यक्तिमत्वाचे कंगोरे घासून साफ होतात. एकट्याने आंघोळ, जेवण, अभ्यास, व्यायाम करण्यास खळखळ करणारे मूल दहा जणात जास्त सरळ वागते. घरात म्हातारी माणसे असतील तर मुलाना फायदा होतो. जुनी पिढी स्वभावाने मृदु झालेली असते. ती मंडळी नातवंडांचे कॊतुक आणि लाड करतात. त्यांच्याबरोबर वेळ घालवतात. नातवंडांच्या कलाने वागतात. तरुण व कर्त्या मंडाळीना यासाठी वेळहि नसतो आणि त्याना लगेच कंटाळा येतो. तीन पिढ्या एकत्रित असल्या की पहिली आणि तिसरी पिढी खुषीत असतात. मार्गारेट मीड या जगप्रसिध्द विदुषीने आवर्जून सांगितले की तीन पिढ्यानी एकत्र राहण्यातच मानवी जीवनाचे साफल्य आहे. अंगाखांद्यावर खेळणाऱ्या नातवंडानी ज्या आजी – आजोबांचे कपडे ओले केले त्यांचे आयुष्य संपूर्ण झाले.
एकत्र कुटुंबात अडचण होते ती मधल्या पिढीची. त्याना हवे असते स्वातंत्र्य. हवा असतो कर्तृत्वाला अवसर. पण एकत्र कुटुंबात अधिकार मोजक्या ज्येष्ठ व्यक्तीच्या हाती रहातात. त्यांचे निर्णय इतराना मान्य करावे लागतात. सगळ्यांपेक्षा वेगळे, अनवट काही करणे अवघड जाते. गृहप्रमुखाचा पाठिंबा असेल तर ठीक. एरवी रुळलेली मळलेली वाट सोडणे जमत नाही. घरच्याच तरुण पुरुषाना बंधने पडतात तर सुनाना पडणारच. उमेदीचा, हॊसे-मॊजेचा काळ जोखडात जातो आहे असे वाटते. तरीसुध्दा पारंपारिक भारतीय कुटुंब याचा अर्थ मुलानी आईबापांजवळ राहणे असाच होतो. बाप मरेपर्यंत ही व्यवस्था टिकते. मग वाटण्या होतात.
कॅथलीन गो यानी अर्धशतकापूर्वी तंजावूर भागातल्या खेड्यांचा अभ्यास केला. तेथे ‘आदि – द्रविड ’ नामक ‘ खालच्या ’ जातीमधे मुले लहान वयात मजुरी करु लागत. बापापासून स्वतंत्र होत. लग्नानंतर लवकरच वेगळे बिऱ्हाड मांडत. सुना देखील मोलाची कामे करीत. ‘वरच्या’ जातीतील बायकंपेक्षा त्या जास्त स्वतंत्र होत्या. जास्त सहजपणे घटस्फोट घेत. माहेराशी त्यांची जवळीक जास्त असे. ब्राह्मण कुटुंबे जमीनदार होती. जमिनीची मालकी एकत्र असे. म्हणून ब्राह्मण तरुणाला लग्नानंतर वेगळे होणे परवडणारे नव्हते. हाच प्रकार सर्वत्र दिसून येणे अपेक्षित आहे. आर्थिक सोय व परस्परावलंबन जितके अधिक तितके एकत्र कुटुंब जास्त टिकाऊ. आर्थिक स्वातंत्र्यामुळे बंध सॆल होतात. फार गरिबी असेल तर माणसाना झपकन वाटा फुटतात. माझ्या तुटपुंज्या उत्पन्नात वाटेकरी नकोत. भावाच्या लेंढाराला मी का पोसावे? गरिबीपोटी अशा भावना बळावून कुटूंब फुटू शकते.
कोहन यानी उत्तर प्रदेशातील चांभार जातीची कुटुंबे अशी विभक्त होताना टिपली आहेत. उलट जमीनदार ठाकुर जातीत लोक कुटुंबाला चिकटून रहात. चांभारांमधे गरिबीमुळे आयुर्मानही कमी होते. पन्नाशीला आलेले चांभार पुरुष फार थोडे असत. म्हणूनहि तीन पिढ्या एकत्र नांदताना सापडणे विरळा होते. चांभाराची सून कमावती असते. सासरच्या लोकांशी पटले नाही तर ती वेगळे रहाण्याचा आग्रह धरते. नवऱ्याने मानले नाही तर ती माहेरी जाते. तिचे कोणाला ओझे होत नाही. ठाकुर सुनाना असल्या आगाऊपणाची चॆन मुळीच परवडत नाही. ठाकुर जातीत ८०% कुटुंबे एकत्र तर चांभारात ४०%.
बंगालमधील एका पहाणीत खेड्यात व्यवसाय आणि कुटुंबप्रकार यांचे नाते पुढीलप्रमाणे आढळले.
व्यवसाय एकत्र कुटुंब विभक्त एकूण
जमीनदार/शेत कसणार ७२ ३९ १११
शेतमजूर ३१ ९५ १२६ व्यापारी व कारागीर जातींमधे एकत्र कुटुंबे जास्त प्रमाणात आढळतात. त्याना एकत्र असण्यात व्यावसायिक फायदा असतो. शेतकऱ्यांपॆकी ज्याचे उत्पन्न बागायती व्यापारी पिकांचे असते त्यांच्याकडे कुटुंब फुटण्याचे प्रमाण जास्त असते असे ओरेन्स्टाइन या अभ्यासकाला पुणे जिल्ह्यात आढळले, अर्ध शतकापूर्वी वि. म. दांडेकर, कुमुदिनी दांडेकर आणि सोवनी याना पुणे शहराच्या अभ्यासात आढळले की
भारतीय कुटुंबपध्दती साधारणपणे पितृसत्ताक अहे. मुली सासरी जातात. घरजावई क्वचित. मालमत्तेची मालकी पित्याकडे असते आणि नंतर पुत्राकडे येते. केरळमधे मात्र मातृसत्ताक पध्दतीच्या खुणा दिसतात. नायर आणि अन्य काही जातींमधे मुली लग्नानंतर माहेरीच रहात. नवरे आपल्या घरीच असत. अधूनमधून सासुरवाडीला बायको आणि मुलांसमवेत काही काळ घालवीत. आई, तिच्या मुली, त्यांची मुले हेच एकत्र कुटुंब. आईची मालमत्ता पुढे मुलींच्या ताब्यात जाई. त्या मुलींचे भाऊ हेच घरातले पुरुष. कारण नवरे रहायला नसतच. काही वेळा नायर स्त्रीचे नंबुद्री ब्राह्मण पुरुषाबरोबर लग्नसंबंध असत. नंबुद्री कुटुंबात फक्त थोरल्या मुलाला लग्नाची परवानगी असे. इतर मुलानी नायर मुलींशी नाते जुळवावे. याला मान्यता होती. पण हे नाते मुलीच्या घरीच ठेवायचे. मुलीला अपत्य झाले तर ते तिनेच सांभाळायचे. ही अपत्ये आपल्या पित्याशी फार जवळीक करु शकत नसत. त्यांची जात खालची. त्यांच्या स्पर्शाने पित्याला विटाळ होई. म्हणून त्याने सकाळी स्नान केले की दिवसभर त्याच्यापासून दूर रहायचे. रात्रीची धार्मिक कृत्ये आटोपली की मग स्पर्श चालेल. एरवी स्पर्श झाल्यास नंबुद्री ब्राह्मणाने पुन्हा स्नान करावे असा नियम. अलीकडच्या काळात या वेगळ्या रीती मावळतीला लागल्या आहेत. एकंदर पाहता वेगळे बिऱ्हाड मांडायचे नसेल तर नवपरिणित दांपत्याने मुलाच्या घरी राहणे हेच सार्वत्रिक आहे.
असे का? लढाईत आपल्या पक्षातील पुरुषांची संख्या महत्वाची असे. तीच खरी ताकद. आपले पुत्र दुसऱ्या घरी जाणे हा मोठाच तोटा. इतर पुरुषांचा तेवढा भरवसा वाटत नाही. उत्क्रांतीमधे रक्ताच्या नात्याचे महत्व सर्वात जास्त. सख्ख्या भावंडात ५०% जीन्स समायिक (सारख्या) असतात. म्हणून आपला जीव आणि दोन सख्ख्या भावंडांचे जीव हे सारख्या मोलाचे. अशा रीतीने विचार केल्यास प्राणी-व्यवहाराची बरीच गणिते सुटतात. रक्ताच्या नात्याची माणसे एकमेकाकरता जीव टाकतात. ‘सारे भारतवासी माझे बांधव आहेत ’ असे आपण शालेय प्रतिज्ञेत म्हणतो तेव्हां आपण स्वत:ला इतर देशवासीयांसाठी त्याग करण्यास प्रवृत्त करतो. तीच गोष्ट ‘मातृभूमी ’ ची. मुलाने आई वडिलांच्या आज्ञांचे पालन करावे. त्यांची सेवा करावी हा आपला आदर्श. श्रावण बाळ अंध मातापित्यांची तीर्थ यात्रेची इच्छा पुरी करण्यासाठी त्याना कावडीत बसवून कावड खांद्यावरुन नेतो ही कथा याच आदर्शाचे चित्रण करते.
आपल्या पित्याच्या मृत्यूसमयी आपण आपल्या पत्नीसमवेत रत होतो, पित्याचे डोके मांडीवर घेऊन त्याच्या तोंडात गंगाजल घालत बसलेलो नव्हतो ही गोष्ट महात्मा गांधी यांच्या मनाला कायमची लागून राहिली. इंद्रीयांवर विजय मिळण्यासाठीची त्यांची धडपड या अपरधी भावनेतून निर्माण झाली.
थोराना आदर दाखवण्याचा एक भाग म्हणजे मुलगा व सून यानी एकमेकाशी संपर्क टाळणे. मोठ्यांच्या देखत शक्यतो समोरासमोरही न येणे. आल्यास न बोलणे. इत्यादि. येवढे करुनहि सुनेच्या वागण्यावर पसंतीचे शिक्कामोर्तब होईल अशी खात्री मुळीच नाही. सासू-सून, नणंद-भावजय यांच्यातील तणाव ही पिढ्यानुपिढ्यांची कथा. कारण काय? ती रक्ताच्या नात्याची नाही. तिचे मूल नात्याचे. उत्तम सासूसासरे कोणते तर सुनेला मुलीसारखे वागवणारे. म्हणजेच मुलीच्या बाजूला पक्षपात हीच सामान्य गोष्ट असेच की नाही? हे बरोबर असेल तर घरजावयाला सुध्दा थोडेबहुत असेच ताण सहन करावे लागत असतील.
तणावाची दृश्य कारणे नेहमीचीच आणि खरी असतात. सासूला आपली शिस्त, आपले वळण, आपली रीत यात बदल नको असतात. स्वॆपाक असाच करा. डबे तसेच ठेवा. एक ना दोन. बाहेर नोकरी / व्यवसाय करणाऱ्या सुनेला घरगुती गोष्टींमधे फार रसही नसतो. काम झाले ना? मग बास. असा विचार असतो. बाहेर कामाला न जाणाऱ्या बायकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही सासवा म्हणतात की मुलाने घरात काम करायचे नाही. मग नोकरी करणाऱ्या सुनेला घरात दुप्पट काम पडते. आणि या पक्षपाताचा राग येतो. काही सासवा प्रांजळपणे मतभेद सांगत नाहीत. चुका दाखवत नाहीत. आडून टोमणे मारतात. त्याचा त्रास होतो. शिकलेल्या कर्त्या सुना सासवांची मते डोळे झाकून मान्य करत नाहीत. काही बाबतीत त्याना सासूपेक्षा खरेच जास्त ज्ञात असते. पण सासू ते लक्षात घेत नाही वा मान्य करीत नाही. सुनानी वाद घातल्यास सासवाना तो अपमान वाटतो. तर्ककठोर पणाची त्याना सवय नसते. अनेकदा सासूने फार गरिबीचे दिवस पाहिलेले असतात. म्हणून ती अवाजवी खर्च टाळू पाहते. सुनेला गरिबीचा संस्कार, तशी सवय नसते. तिला तो सगळा चिक्कूपणा वाटतो. सासूला मुलगा दुरावल्याचे दु:ख असते. ती ठसठस सांगता येत नाही. संसारात अपेक्षा कमी करणे, हळूहळू अलिप्त होणे हे जमत नाही.
सासूला बोचते की सून बरोबरीने काम करीत नाही. घरच्यांच्या वेळा सांभाळत नाही. बाजारचे खायला घालते. माहेरच्यांचे जास्त करते. आपापल्या ट्रिपा करते. होस्टेल सारखी रहाते. कधी येणार, जाणार वगॆरे सांगत नाही. अवेळी परत येते. काळजी केली, तर हसते. येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रेमाने करीत नाही. नोकराना सांभाळून घेत नाही. दोन सुनांच्या सासूवर सारखा पक्षपाताचा आरोप असतो. कोणाच्या मुलाला किती वेळ सांभाळले, कोणाच्या माहेरच्यांचा किती सत्कार केला इत्यादि. सुना सासूकडून मूल सांभाळण्याबाबत फार अपेक्षा धरतात. सासू थकत असते. तिची स्वत:ची हॊस मॊज नेहमीच मागे पडते.
वॆजयंती खानविलकर यानी मे १९९९ मधे ‘सकाळ’ मधील लेखमालेत या विषयावर उत्तम विवेचन केलेल आहे.
शेतीवर आधारित ग्रामीण समाजाच्या गरजाना उपयुक्त म्हणून एकत्र कुटुंबपध्दती टिकली. आधुनिक जीवनात शहरीकरण ऒद्योगीकरण वगॆरे प्रक्रिया वेगाने घडू लागल्या तेव्हां शेती शिवाय अन्य प्रकारची संधी निर्माण झाली. चाकरमानी मंडळी पोटासाठी गाव सोडून शहरात गेली. तरीसुध्दा सुरुवातीला एकत्र कुटुंब टिकले. ममईला चाकरीला जाणाऱ्यांची बायका मुले गावाकडे कुटुंबात रहात. सुट्टी व सणाना चाकरमान्या गावचा रस्ता धरे. आजही शिमगा आणि गणपतीला मुंबईहून हजारो लोक कोकणातल्या आपल्या गावाला जातात. पण चाकरीत स्थिरावल्यावर तेथे कुटुंबकबिला आणणे, पुढच्या पिढीचे गावाकडचे ऋणानुबंध हलके हलके नकळत शिथील होत जाणे हे अपरिहार्यपणे घडते. पुढच्या पिढीतील मुले गावाकडे जाऊन शेतीत सहभागी झाली असे सहसा घडत नाही. एकतर गावात रहाणाऱ्यांचे पक्के हितसंबंध तयार होतात. पुढच्या पिढीत संख्या बाढून शेतजमिनीवरचा भार पूर्ववत झालेला असतो. इकडे शहरात वाढलेल्या मुलाबाळाना गावच्या जीवनपध्दती अडचणीच्या आणि अडाणी वाटू लागतात. नळ उघडून पाणी घेणारा रहाटाने शेंदणार कसा? चाळीत चार पावलावर संडास असण्याची सवय झाल्यावर शेतात उघड्यावर झाड्याला जाणे म्हणजे ई ऽ ऽ वाटतेच. लहर आली की कोपऱ्यातील हॉटेलात काही चमचमीत खाणे शक्य असते ते शहरातच. मोठ्या घरात एक घाणा भजी तळणे सुध्दा अशक्यच. शहरात शिक्षणाच्या व व्यक्तिविकासाच्या कितीतरी वाटा खुल्या असतात. गावात त्याबाबत पंचाइत असते. म्हणून प्रवाह उलटा फिरत नाही. ‘ पुढचं पाऊल ’ या पु. ल. देशपांडे कृत चित्रपटात ग. दि. माडगुळकर थोरल्या भावाच्या भूमिकेत म्हणतात की ‘ ममई म्हनजे मानसं खानारा दर्व्या हाय ’. धाकटा भाऊ चाकरीला गेला तो कायमचा अंतरलाच याबद्दलची खिन्नता त्यांच्या बोलण्यात दिसते. म्हणून शहरीकरण – ऒद्योगीकरण यातून विभक्त कुटुंब पध्दतीकडे वाटचाल अपरिहार्य दिसते.
वृध्दावस्थेत जीवन कसे कंठावे याचे काहीतरी उत्तर प्रत्येक समाजाला द्यावे लागते. एकत्र कुटुंबात वृध्दांची व्यवस्था आपोआप होते. त्यांच्या शारीरिक व भावनिक गरजा पुऱ्या होऊ शकतात. विभक्त कुटुंबव्यवस्थेत मात्र याला समाधानकारक उत्तर नाही. आजही भारतात बव्हंश वृध्द स्त्री पुरुष आपापल्या मुलाबाळांच्या संसारातच रहातात. ते तसेच व्हायला हवे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या ओढीपायी पाश्च्यात्त्य मंडळीनी हा पर्याय गमावला आहे. आपण तसे करता कामा नये. वृध्दांच्या गरजांचे तीन पॆलू असतात. प्रथम पॆसा. उत्पन्न थांबते पण खर्च थांबत नाहीत. उलट आजारपण, शस्त्रक्रिया वगॆरेमुळे खर्च वाढतात. त्यासाठी आर्थिक तरतूद हवी. ती भविष्य निर्वाह निधी सारख्या योजनांमधून केली पाहिजे. दुसरा पॆलू सेवा. पॆसे असले तरी कोणीतरी त्यातून हव्या त्या वस्तू विकत आणून दिल्या पाहिजेत. त्यासाठी स्वयंसेवी संघटना उत्तम काम करू शकतात. विद्यार्थ्याना शिक्षणकाळात चार पॆसे मिळवण्यासाठी अशी सेवा देणे सहज शक्य आहे. तिसरा पॆलू भावना. आपलेपणा. कोणाला तरी आपण हवे आहोत ही भावना वृध्दांचे जीवन सुखावह करते. एकत्र कुटुंबात ते फार सोपे होते. अमेरिकेत अनेक वृध्द व्यक्ति खुशीने स्वयंसेवी संस्थांमधे काम करतात. त्यातून निखळ आनंद मिळतो. आपल्याकडे ही रीत आढळत नाही. उलट वृध्दाश्रमांच्या बाबतीत आपण पाश्चात्त्यांचे अनुकरण करु लागलो आहोत. ही संस्था कृत्रिम आणि क्लेशदायक आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी माणसाला भोवती दिसायला हवे ते उभारी असलेले वर्धीष्णु जीवन. वरचे बोलावणे कधी येते याची वाट पाहणाऱ्या मंडळीनी चोविस तास एकमेकांकडे बघत बसणे हे सुखाचे होत नाही. म्हणून मुलाबाळांच्या सहवासात रहाण्याची काही तोड काढली पाहिजे. त्यासाठी कर्त्या पिढीने पुढाकार घेतला पाहिजे.
आई – बाप हे कर्ते. त्यानी मुलाना सांभाळायचे आणि वृध्दांची काळजी घ्यायची हे स्वाभाविकच. पण कर्तेपणाने आई – बाप याना कुटुंबात खास स्थान असणारच. मोठ्या एकत्र कुटुंबात कोणी कोणाचा मान कसा राखायचा याबद्दल संकेत असतात. लहानानी मोठ्यांच्या पाया पडावे. मोठ्यानी आशीर्वाद द्यावा. बरोबरीच्यानी उराउरी भेटावे ही रीत महाभारत काळापासून आहे. कृष्ण हा कुंती, धर्म यांच्या पाया पडायचा. नकुल, सहदेव हे कृष्णाच्या पाया पडायचे. कृष्ण आणि अर्जुन एकमेकाना आलिंगन देत. पण महाभारतात वेगवेगळ्या नात्यांबद्दल वेगवेगळे शब्द फार नाहीत. असे इरावती कर्वे यानी युगान्त या पुस्तकात म्हटले आहे. आई, सावत्र आई, काकू या सर्वाना शब्द माता किंवा अंबा. धर्म तात, अंब असे कोणाला म्हणतो? धृतराष्ट्र व गांधारी याना. धृतराष्ट्रही पुतण्याना पुत्रच म्हणतो. पांडवांबद्दल तो म्हणतो, ‘असंशयं तेऽपि ममॆव पुत्रां, दुर्योधनस्तु मम देहात प्रसूत: ’ पांडवही पुत्रच. पण दुर्योधन पोटचा गोळा. पुरुषाने अनेक लग्ने करणे मान्यच होते. अनेक लग्ने करणारी स्त्री फक्त द्रॊपदीच. दक्षिण भारतातील तोडा आदिवासींमधे अशी रीत अजूनही अल्पप्रमाणात का होईना पण शिल्लक आहे असे म्हणतात. पंजाबमधे सिंकदराला असे नाते संबंध आढळले होते. अर्जुनाला द्रॊपदी या समायिक पत्नीशिवाय सुभद्रा, उलूपि या अन्य बायका होत्याच. भीमाने वनकन्या हिडिंबा हिच्याशी काही काळ संसार केला. तिच्या पदरात घटोत्कच हा पुत्र टाकून भीम निघून गेला. याबद्दल ती आई आणि तिचा मुलगा कोणाचीच तक्रार नसावी. कारण समरप्रसंगी घटोत्कच आपल्या बेजबाबदार पित्याच्या बाजूने उभा ठाकला. तो प्राणपणाने लढला. थोरामोठ्याचे पितृत्व लाभावे. संगोपनात त्याने टाळाटाळ केली तरी चालेल अशी दृष्टी असावी. लॆंगिक संबंधांबद्दलचे विधी आणि निषेध त्याकाळी अगदी वेगळे होते. आज जोडप्याला मूल झाले नाही तर सरसकटपणे बाईला दोषी धरले जाते. ती वांझ. पुरुषामधे काही न्यून असू शकेल असे कोणाच्या मनातच येत नाही. महाभारतकाळात ही शक्यता माहीत होती. येवढेच नव्हे तर तिच्यावर ठरलेला उपायहि होता. त्याचे नाव “ नियोग “. म्हणजे परक्या पुरुषापासून गर्भधारणा मिळवायची. कोणत्या पुरुषापासून? तर पति सांगेल त्या. अपत्यावर अधिकार कोणाचा? तर बीजक्षेत्र न्याय लागू करायचा. स्त्री ही क्षेत्र (शेत). त्यात आलेले पीक शेताच्या मालकाचे म्हणजे नवऱ्याचे. ‘पाणिग्रहस्य तनय: ’ परपुरुषाने बीज द्यावे आणि विसरून जावे.
महाभारतानंतर वऱ्याच काळाने मनुस्मृति रचली गेली. तिच्यात नियोगाला आपदधर्म म्हणून मान्यता दिली आहे. संतान नसणे ही स्त्रीची आपत्ती. नवरा जिवंत असून मूल नसेल तर मनुच्या मते ‘ यथेष्ट ’ प्रजा घ्यावी. म्हणजेच हवी तेवढी मुले. तितक्या वेळा नियोगाचा अवलंब करावा. नि:संतान विधवेला सुध्दा मनुने नियोगाची परवानगी दिली. फक्त एका संतानाची मर्यादा घालून. पुढे समाज लॆंगिक संबंधांबाबत संकुचित व हट्टी झाला. नियोग व्यवहार शिष्टसंमत राहिला नाही. मग मनुस्मृतीमधे नियोगविरोधी कडवी घुसडण्यात आली. आधीचे नियोगानुकूल श्लोक तसेच ठेवले गेले. फक्त मखलाशी केली की ही अनुकूलता “ इतर “ वर्णांसाठी आहे.
नान्यास्मिन विधवा नारी नियोक्तव्या द्विजानिभि: ॥
हा उत्तर काळचा प्रक्षिप्त मजकूर आहे असे मत डॉ. म. अ. मेहेंदळे यानी ‘ नवभारत ’ (मे १९९८) मधील लेखात व्यक्त केले आहे.
याच्या पुढची पायरी म्हणजे पावित्र्याचा एकमेव अर्थ हाच की स्त्रीने अन्य कोणाशी संबंध टाळणे. समजा स्त्रीच्या मर्जीविरुध्द तो आला तर? थोडक्यात बलात्कार झाला तर? तरीसुध्दा त्या स्त्रीलाच अपवित्र, पतित मानण्याचा पराकोटीचा अडाणीपणा आपल्या समाजात आला.
बलात्कार अर्थात जबरी समागम हा निसर्गात बरेचदा आढळतो. अनेक प्राण्यात नर बलप्रयोग करून मादीवर समागम लादतात. चिंपांझी, ओरांगउटान या मानवसदृश माकडांमधे सुध्दा ही वर्तणुक आढळते. ताकदवान नरच बलात्कार करु शकतो. अशा नरापासून अपत्यप्राप्ती करून घेण्यात मादीचा काहीच ‘ तोटा ’ नसतो. बलात्कारित माद्या कोणत्याही प्रकारे वेगळ्या वागत नाहीत. यात ‘ तोटा ’ होतो तो फसणाऱ्या नराचा. आपली समजून दुसऱ्याची पिले वाढवताना त्याचे कष्ट ‘ फुकट ’ जातात. त्याने शक्य तर बलात्कारापासून मादीचे संरक्षण केले पाहिजे. जबरदस्ती करणाऱ्या नरावर हल्ला केला पाहिजे.
बलात्कारित स्त्री ही एका जबरी गुन्ह्याची बळी असते. अपघात, दरोडा यामधे ज्यांच्यावर घाला पडतो त्याना आपण कसे वागवतो? आपली सहनुभूती देतो. शक्य तर मदत करतो. गुन्हा करणाऱ्या लोकाना शिक्षा व्हावी यासाठी शासनयंत्रणा प्रयत्न करते. बलात्कारात तसाच प्रतिसाद हवा. उलट आज बेरचदा अशा स्त्रीचे जीवन बरबाद होते. तिचा तिरस्कार होतो. तिच्या वर्तणुकीबद्दल संशय घेतला जातो. तिला सहनुभूति, मदत आणि न्याय देण्याऎवजी तिची चविष्ट कहाणी चघळण्यात अनेकाना जास्त रस असतो. हा पुरुषानी स्त्रीवर केलेला खास अन्याय आहे.
या इतकाच दुसरा घोर अन्याय होतो तो विधवांवर. जोडप्यातील बायको गेली तर एकटा उरतो तो विधुर. नवरा मेला तर एकटी उरते ती विधवा. पत्निवियोगानंतर यथाकाळ विधुर पुन्हा सामान्यजीवन जगतो. जरुर / योग्य वाटल्यास पुन्हा लग्न करतो. बिजवर म्हणजे बायको गेल्यावर पुन्हा बोहल्यावर आलेला पुरुष याला काही न्यून असलेली बायको मिळून जाते. उलट विधवेला सामान्य जीवन जगण्यास परवानगी नाही. चांगले खाणे, झुळझुळीत वस्त्र वापरणे याला बंदी. विधवा ही अशुभ. तिने सणा – समारंभात सहभागी होऊ नये. चार घास अन्न आणि दिवसभराचे कष्ट हेच तिचे आयुष्य. असले सक्तमजुरी सजा वाटावे असे जीवन विधवेच्या वाट्याला काय म्हणून? तिला नवा संसार मांडण्याला बंदी का? खरे तर महाभारतकाळात विघवेचे धाकट्या दीराशी लग्न होई. त्याचप्रमाणे विधुराने मेव्हणीशी लग्न करण्यालाही संमति असे. अशा लग्नांमधे मुलांची चांगली काळजी घेतली जाते. दोन घराण्य़ांचे आधीच्या लग्नामधून घडलेले संबंध टिकतात. अंत्येष्टि सूक्तांमधे दीर विधवेला पतीच्या मृत शरीरापासून उठवतो आणि सांगतो की हे मृता, ही स्त्री तू मरेपर्यंत तुझ्याबरोबर होती. आता तुमची सोबत संपली. तिचे नवे जीवन सुरु झाले. अथर्ववेदात विधवाविवाहाला तर संमति होतीच. पण कारणास्तव नवरा बदलण्याला सुध्दा मान्यता होती. काही प्रायश्चित केले म्हणजे पुरत असे. पती नपुंसक असला, समाजाने वाळीत टाकला, वेडा झाला, गुन्हेगार असला, कुटुंबचे पोषण करण्यास असमर्थ असला वा मृत झाला तर स्त्री दुसरी सोयरीक करु शकत असे. कॊटिल्याने अर्थशास्त्रात सांगितले की स्त्री गर्भवती असताना पती परागंदा झाला तर वर्षभर वाट पाहून स्त्रीने दीर वा अन्य योग्य पुरुष स्वीकारावा. हा उदारमतवाद मनुस्मृतीमधे घटला. नियोगा प्रमाणेच पुनर्विवाहाबद्दलहि नापसंतीच दिसते.
आदिशंकराचार्यांच्या काळामधे (इ. स. ८००) बालविधवेचे नवे लग्न करून देण्याची रीत होती. पतिसुख मिळालेल्या स्त्रीने मात्र पुनर्लग्न करु नये असा संकेत होता. हा श्लेषसुध्दा पुढे विसरला. सर्व वयाच्या विधुराना सामान्य जीवन जगता येते, पुनर्विवाह करता येतो, मग विधवानी काय घोडे मारले आहे? हा विचार प्रभावी झाला नाही. अहिल्याबाई होळकर , झाशीची राणी इथपासून अलीकडे कोरवाडच्या ताराबाई मोडक अशा विधवानी प्रचंड कर्तृत्व दाखवले. विधवाना जखडून टाकण्यात समाजाचा तोटा नाही काय असे कोणाच्या मनात आले नाही.
१८६९ मार्च मधे पुण्यात शंकरचार्यांच्या अध्यक्षतेखाली सुधारक व सनातनी यांच्यात विधवा विवाहावर वाद झाला. तो नऊ दिवस चालला. सुधारक गटाचे नेते होते न्यायमूर्ती माधव गोविंद रानडे तर सनानन्यांचे तेतृत्व होते नारायणाचार्य गजेंद्रगडकर यांच्याकडे. निदान अप्राप्त मॆथुना विधवाना तरी सूट द्या असा तडजोड प्रस्ताव येता तर कदाचित सनातनी वळले असते. प्रत्यक्षात कोणताच बदल मान्य झाला नाही.
आज विधवांचा प्रश्न फारसा उग्र राहिलेला नाही. पुनर्विवाहाला पूर्ण कायदेशीर पाठिंबा आहे. विधवांच्या सर्व अधिकाराना संरक्षण आहे. केशवपन गेले. महाराष्ट्रात धोंडो केशव कर्वे आणि अन्य सुधारकांच्या प्रयत्नाना यश आले. त्यांच्या कष्टांकरता आज स्त्रियानी कृतज्ञ रहायला हवे. एक तळटीप अशी की हा प्रश्न खासकरून “ उच्च “ जातींमधे होता. इतर अनेक जातींमधे विधवाविवाह रूढ होताच.
विधवांच्या प्रश्नांची चर्चा करताना आणखी तीन प्रश्नांबद्दल लिहिणे अपरिहार्य आहे. बालविवाह, जरठकुमारी विवाह आणि सति प्रथा.
१९७८ साली SNDT विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या ‘ विधवा विवाह चळवळ : १८०० ते १९०० ’ या स.गं. मालशे आणि नंदा आपटे लिखित पुस्तकात महाराष्ट्रातील विधवांच्या संख्येचा तक्ता दिला आहे. गणना तारीख १८९१. चार वर्षे वा कमी वयाच्या विधवा १३८७८, पाच ते नऊ वर्षे वयाच्या विधवांची संख्या ६४०४०, दहा ते बारा वर्षे वयाच्या विधवा ८७२६६. यावरून उघड दिसते की बालविवाहांची संख्या प्रचंड होती. १९०६ साली चिं. वि. वॆद्य यानी या प्रथेचे मूळ शोधले. इ. स. ८०० च्या सुमारास आदिशंकराचार्यांच्या प्रेरणेने हिंदू धर्माचा प्रसार वाढला आणि बॊध्द धर्माच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. या काळात हिंदूंच्या प्रथांमधे जे फेरफार झाले त्यापॆकी एक म्हणजे बालविवाहाची सुरुवात. अल बरूनी (इ.स. १०००) या अरब इतिहासकाराने म्हटले आहे की भारतात मुसलमान अंमल सुरु होण्याच्या आधीपासून बालविवाह होते. वेद, उपनिषदे यांच्या काळात तसेच युआंग च्वांग या चिनी प्रवाशाने वर्णिलेल्या काळात ते नसावेत. आर्य व बॊध्द परंपरांमधे लग्ने प्रॊढपणीच होत. मनुस्मृति म्हणते
त्रीणि वर्षाप्युदीक्षेत कुमार्तृमती सती ।
ऊर्ध्व तु कालादेतस्माद्विं देत सदृशं पतिम ॥
न्हाण आल्यावर तीन वर्षात मुलीचे लग्न लावावे. तिने स्वत:च पति निवडणे सुध्दा मान्य होते. हे सर्व जाऊन बालविवाह कसा आला? यावर वॆद्य यांचा तर्क असा की मुली बॊध्द बिक्षुणी बनू नयेत म्हणून हा उपाय होता.
कारणे काहीहि असोत. बालविवाहातून हजारो बालविधवा निर्माण झाल्या. ज्या विधवा झाल्या नाहीत त्यासुध्दा मातापित्यांच्या प्रेमळ छत्राखाली सुखाने वाढण्याची व विकासाची संधी गमावून बसल्या.
जरठकुमारी विवाह म्हणजे म्हाताऱ्या वराचा अल्लड मुलीशी विवाह. सामान्यपणे वर-वधू एकमेकाला अनुरुप निवडले जातात. इथे बाप व आजोबा शोभावा अशा पुरुषाबरोबर लग्नाचा विपरित प्रसंग उभा रहातो. सामान्यपणे यात मुलीच्या आईबापाना काही खास लालूच दाखविली असा प्रकार असतो. कुंकू या सिनेमात किंवा संगीत शारदा या नाटकात अशा रुढीवर प्रभावी हल्ला चढवला आहे. नरहर कुरुंदकर यांच्या मते शारदा नाटकातील नाट्य वास्तविक नसून बेगडी आहे. अशा घटना अपवादात्मक असतील. पण तो सामाजिक प्रश्न नव्हता. ज्याची पत्नी बाळंतपणात वा अन्य कारणाने अकाली वारली आणि अर्धा संसार राहिला अशा विधुराला मुलांची काळजी घेणारी पत्नी हवी असे. पण बालविवाह रीतीमुळे अशा वयाची मुलगी विवाहितच असे. एकटी असली तर वॆधव्यामुळे. पण तीसुध्दा निरुपयोगी कारण पुनर्विवाहाला बंदी. अशा कात्रीत सापडून काही वेळा माणसे अनुरुप नसलेल्या कमी वयाच्या वधूशी विवाह करत.
सगळ्यात भीषण प्रकार म्हझजे सती. सती म्हणजे पति निधना नंतर पत्नीने स्वत:ला पतीच्या चितेवरच जाळून घेणे. ही भयानक पध्दत भारतात कधी / कशी सुरु झाली? अन्यत्र आहे का?
वेदांमधे सतीचा उल्लेख नाही. उलट गतभर्तृकेला तिच्या दीराने त्या दु:खातून बाहेर काढण्याचा उल्लेख आहे. ब्राह्मण ग्रंथ, सूत्र ग्रंथ, बॊध्द ग्रंथ यातही सती प्रथा आढळत नाही. मनुस्मृति आणि याज्ञवल्क्य स्मृति अशा ग्रंथातहि ही प्रथा वर्णिलेली नाही. असे दिसते की इ. स. ४०० च्या पूर्वी सती प्रथा भारतात नसावी. महाभारतात पांडूची दुसरी राणी माद्री ही सती गेल्याचा उल्लेख आहे. हा कदाचित नंतर घुसडलेला भाग असेल. कारण इतर कोणी सती गेल्याचे वर्णन सापडत नाही. कॊरवांच्या विधवा का सती गेल्या नाहीत? कुंती सुध्दा मागे राहिली. माद्रीकडे आकर्षित होऊन पांडूला शरीरसंबंधाचा मोह झाला व त्यातच त्याचे निधन झाले. हा आपला गुन्हा आहे या भावनेने माद्रीने प्रायश्चित्त घेतले, स्वत:ला दहनाची सजा दिली असा पर्यायी अन्वय लावता येतो.
कालिदास, भास, शूद्रक, बाण वगॆरेंच्या लिखाणामधे मात्र सतीचे उल्लेख येतात. इ. स. १००० पूर्वी एक – दोन शतके या काळात उत्तर भारतातील राज घराण्यांमधे सतिप्रथा रुढ झाली असे दिसते. यानंतर हलके हलके पुरोहित वर्ग व अन्य वर्गांमधे तिचा प्रवेश झाला. भारतात इंग्रजांचे आगमन होण्याच्या काळापर्यंत सतिप्रथा सर्व भारतभर पसरली होती. व्हाइसरॉय लॉर्ड वेंटिंक याने एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ती बंद केली.
भारताबहेर कोठे असा विपरित रिवाज आढळत नाही. तो भारतात कसा निर्माण झाला? काहींच्या मते सतिप्रथेचे मूळ शक – हूण आदि मध्य आशियाई टोळीवाल्यांच्या अन्य एका विपरीत रिवाजामधे असावे. यांच्यामधे राजा मेला की त्याच्या प्रेताबरोबर त्याची मालमत्ता, प्राणी, दास – दासी, रखेल्या, बायका या सर्वांना मारुन पुरुन टाकत. अशा कबरी संशोधकाना सापडल्या आहेत. युरोपमधे गॉल, स्लाव्ह अशा जमातींमधे सुध्दा ही पध्दत होती. नव्या राजाच्या विरोधी कारवाया करु इच्छिणाराना मृत राजाच्या संबंधितांकडून नेतृत्व मिळण्याची शक्यता संपवणे हा यामागचा हेतू असू शकेल. चीनमधे राजाबरोबर त्याचे शिपाई किंवा त्यांचे पुतळे समाधिस्थ केल्याचे आढळले आहे. इजिप्तमधे तुतनखामेन व अन्य राजांच्या संपत्तीने ओसंडणाऱ्या कबरी सापडल्या आहेत.
शक – हूण वगॆरे गटानी भारतात राज्य स्थापन केल्यावर त्यांच्या प्रथा इथे रुजल्या. म्हणून त्या प्रथम उत्तर भारतातील क्षत्रियांमधे आल्या. कोठेतरी दफनाचे रुपांतर दहनात झाले.
भास आणि कालिदासाच्या लिखाणात सती जाते असे म्हणणाऱ्या स्त्रीला परावृत्त करण्याचे प्रयत्न दाखविले आहेत. सातव्या शतकात हर्षवर्धनाच्या पित्याच्या मृत्यूनंतर पत्नी, मंत्री, वॆद्य यानी आत्मदहन केलेले वर्णन बाणभट्टाच्या लिखाणात आहे. पण बाणाने या प्रथेबद्दल तिरस्कार व्यक्त केला. बाराव्या शतकातील राजतरंगिणी या ग्रंथात काश्मीरच्या एका राजाची कथा आहे. तो मेल्यावर त्याची दासी, पत्नी, आई, बहीण, गुलाम, मंत्री येवढेच काय पण त्याचे मांजरसुध्दा चितेवर गेले. विराटस्मृति, मेधातिति स्मृति, देवलभट्टस्मृति इत्यादीनी सतिप्रथेला विरोध केला आहे. ती वेदविरोधी आहे. आत्महत्या पाप आहे. असे विचार मांडले आहेत. असा विरोध झाला असूनही ही प्रथा रुजली कशी हे एक कोडेच आहे. अगदी अल्प प्रमाणात अशा विधवा असतीलही की ज्याना शोकाच्या पराकोटीमुळे जीव द्यावा असे वाटते. पण हा काही सरसकट मानवी स्वभाव नव्हे. पारंपारिक हिंदू समाजात विधवेला फारसे हक्क नव्हते. पण सातव्या व आठव्या शतकात बंगाली स्मृतिकारानी विधवेला कुटुंबाच्या संपत्तीत वाटेकरी बनवले. याचा उलटा परिणाम असा झाला की लोभी नातेवाईक विधवेचा काटा काढण्याची कारस्थाने करु लागले. तिला सती जाण्यास उद्युक्त करण्यात आले. काही वेळा जबरदस्ती झाली. जनमानसात कर्मविपाकाचा सिध्दान्त ठसला होता. या जन्मीचे वॆधव्य ही पूर्वजन्मीच्या कर्माची फळे आहेत. ही शिक्षा भोगलीच पाहिजे. अशीसुध्दा दृष्टी होती. याच वेळी विधवानी सन्यस्त जीवन जगावे असा विचार पुढे आला. बॊध्द व जॆन संघांमधील भिक्षुणींची जीवनरीत आदर्श म्हणून भगवी/लाल वस्त्रे, केशवपन, उपास – तापास, व्रते – वॆकल्ये असा प्रकार आला. नटणे, मुरडणे, दागिने या सर्वाना फाटा. तिला कोणतेहि स्वास्थ्य नको. चवदार जेवण नाही, मुलायम शय्या नाही, निवांत विश्रांती नाही. खडतर दिवस काढायचे. हे सगळे नको आहे? मग जा सति.
मुस्लिम राजवटींमधे स्त्रीयांच्या संदर्भात असुरक्षिततेची भावना वाढली असावी. त्याचा परणाम म्हणून विधवेची विल्हेवाट लावण्याकडे कल वाढला असावा.
सध्या आपल्याकडे सतिप्रथा नाही. अपवाद म्हणून कोथेतरी काही घटना घडतात. पण रिवाज इतिहासजमा झाला. त्याऎवजी सध्या सुनेला जाळून मारण्याच्या घटना कानावर येतात. बरेचदा या गोष्टीचा संबंध असतो हुंडा मिळण्याशी. हुंडा पुरेसा मिळाला नाही. माहेराहून अजून डबोले आण इत्यादि.
हुंडा म्हणजे वधुपित्याने वरपित्याला रोख रक्कम देणे. खरे तर लग्न हे दोघाना हवे असते. मग वधुपित्याचीच बाजू पडती का म्हणून? वरपित्याने वधुपित्याला हुंडा का देऊ नये? खरे तर प्राचीन परंपरा तशीच आहे. घरची धडधाकट तरुण मुलगी निघून जाणार ही गोष्ट पालकाना भावनिक व व्यवहारिक दोन्ही दृष्टीने नको वाटणारी असते. पोटचा गोळा दूर धाडायचा म्हणून आईच्या डोळ्यात गंगायमुना अवतरतात. कष्ट करु शकणारे एक माणूस अंतरले म्हणून कर्त्या पुरुषाला अडचण होते. देज किंवा वधुदक्षिणा देण्याची रीत यामुळेच निर्माण झाली व टिकली असावी. आजही महाराष्ट्रात आदिवासी व काही भटक्या जातींमधे देजची रीत आढळते. देज हा वेगवेगळ्या रुपात देता येतो. रोख रक्कम वा सोने – नाणे. धान्य, गुरे वा अन्य संपत्ती. तिसरी रीत म्हणजे वराने वधुपित्याकडे चाकरी करणे (बिनपगारी). वर आणि वरपिता दोघांकडे काहीच अन्य साधन नसल्यास ही रीत सोईची असते. अशा चाकर वराला गोंड समाजात लम्हाडा असा शब्द आहे. वर अजीजी करतो आहे. वधुपित्याची मनधरणी करतो आहे म्हटल्यावर काही वेळा वधुपित्याला अवाजवी मोह होतो. देजच्या मागण्या वाढतात. पुण्याजवळ मुळशी भागात गवळी धनगर जमातीमधे गेल्या दहा वीस वर्षात अनेकदा बॆठका होऊन ही रीत थांबवण्याचे प्रयत्न झाले आहेत. ज्या घरात आपल्या मुलीने रहायचे त्या घराने देज देण्याकरता कर्जबाजारी व्हावे का? आपणच आपल्या मुलीच्या कुटुंबाला असे अडाचणीत टाकावे का? असे प्रश्न ज्येष्ठ गवळी – घनगर मंडळी आपल्या समाजातील वधुपित्याना विचारीत आहेत.
राजस्थानात सासरहून परत आलेल्या (टाकलेल्या) मुलीचे कोणा विधुराशी संबंध जोडून देण्याची रीत आहे. याला लग्न नव्हे तर ‘ नाता ’ असे म्हणतात. त्याबद्दल पॆसे घ्यायचे. असे पॆसे लग्नातहि मिळतात. मुलीने स्वत:च सासर टाकले तर ‘नाता ’ जोडणारा पुरुष मूळ नवऱ्यास त्याचा ‘ देज ’ परत देतो. ‘ नाता ’ जोडण्यामधे मध्यस्थी करणारे दलाल असतात. त्याना थोडा वाटा मिळतो. त्यामुळे विकृती येऊ शकते. काही वेळा मुलगी पळवून आणण्यापर्यंत पाळी येते. लग्न मोडणे ही गोष्ट दलालांच्या फायद्याची ठरते. देवली जिल्ह्यात अलीकडे स्त्री अत्याचार विरोधी समिती नामक एका गटाने ५०० कुटुंबांची पहणी केली. तिच्यात आढळले की जवळ पास निम्मी लग्ने मोडतात.
उत्तर प्रदेशातील गुज्जर हे पशुपालक लोक अजून देज पध्दत अवलंबतात. ते मुस्लिम आहेत. पण त्यांच्या बऱ्याच रीती हिंदुंशी जुळणाऱ्या आहेत. आज तरुणाला लग्नासाठी २०-२५ हजार रुपये देज द्यावा लागतो. लग्न लांबले तर देज वाढतो. यावर तोड म्हणून साटेलोटे करतात. तुझी बहीण मला दे, माझी तुला. अर्थात घरात मुलगीच नसेल तर अडचण. शिवाय नात्यात लग्न ही वाट सर्वच जातीत पसंत पडेल असे नव्हे. हुंडा किंवा वरदक्षिणा ही रीत देजच्या उलटी. अनेक जातींमधे आज हुंडा पध्दत रुढ दिसते. वर जितका गुणी, धनी, यशस्वी तितका हुंडा जास्त. तो देणे परवडत नसेल तर त्या घरी आपली मुलगी जाईल ही स्वप्ने विसरावीत. हुंडा देण्याला वधुपक्ष तयार असेल, वाटाघाटी होऊन रक्कम नक्की झाली असेल तरी एकतर्फी मागणी वाढवली जाऊ शकते. नवरा मुलगा रुसला आहे, लग्नाला उभा रहात नाही, त्याला आणखी अमुक हवे आहे असे सांगितले जाऊ शकते. लग्न शेवटच्या टप्प्यावर असतानाहि मोडू शकते. यातून वधुपक्षाला प्रचंड मनस्ताप होतो. सॊभाग्यकांक्षिणी वधू खचून जाते. क्वचित आत्महत्या सुध्दा करते. म्हणून मुलगी जन्माला आल्याबरोबर आईबापाना पुढची दु:स्वप्ने पडू लागतात. समजा लग्नाची वेळ निभावली तरी मुलगी सासरी सुखाने नांदायला हवी ना. सासर लोभी असेल तर लग्नानंतरही मुली मागे माहेरहून अमुक आण असा लकडा सुरु होऊ शकतो. याचा कडेलोट म्हणजे सुनेचा मृत्यू. कधी स्टोव्ह भडकतो, कधी गॅसवर साडी पेटते, कधी अन्य काही. प्रत्यक्षात असे घडते ही आपल्या समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी वस्तुस्थिती आहे. ही काही घरोघरची मातीची चूल नव्हे. टक्केवारी फार कमी आहे. पण ती शून्यावर जायला हवी.
आज हुंडा पध्दतीवर कायद्याने बंदी आहे. आधुनिक दृष्टिकोन असलेल्या कुटुंबांमधे हुंडा मागणे वा देणे ही बाब प्रशस्त मानली जात नाही. स्वत:च्या पायावर उभी असलेली स्वाभिमानी तरुणी हुंडा मागणाऱ्या वराशी संसार करण्यास तयार होत नाही. पण हे सर्व टक्केवारीने मर्यादित असावे. अजून मोठ्या प्रमाणावर हुंडा रुढीचेच आचरण होत असावे.
आदिम समाजात असलेली देज किंवा वधुदक्षिणा पध्दत जाऊन तिच्या उलटी हुंडा पध्दत नागर समाजात कशी आली? एक तर्क असा की एक पत्नीपध्दत आणि संपत्ती संचय दोघांचा मिळून हा परिपाक असावा. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहता सर्व व्यवहार हे स्वार्थापोटीच असतात. रिचर्ड डॉकिन्स लिखित Selfish Gene हे पुस्तक या दृष्टीने अत्यंत वाचनीय आहे. निसर्गात माद्यांमधे चांगला नर मिळवण्यासाठी चढाओढ असते. नरांमधे फारसा फरक नसेल तर ही स्पर्धा जीवघेणी होत नाही. आदिम जमातीमधे संपत्ती संचय नव्हता. जमीन मालकी नव्हती. जमीन अमर्याद असेल तर मालकीला अर्थच काय? व्यक्तिगत हत्यारे, चार गाडगी मडकी येवढीच संपत्ती. बाकी असंग्रह. कारण संग्रहाचे तंत्रज्ञान नव्हते आणि समाज रचना नव्हती. शेतीवर आधारित समाजात लोकसंख्या वाढते. माणशी उपलब्ध जमीन घटते. मालकी येते. सत्ता आणी संपत्तीमुळे.विषमता येते. जमीनदार पुरुष आणी शेतमजूर पुरुष यांच्यात कशी बरोबरी होणार? अशा वेळी बड्या घरचा नवरा मिळावा म्हणून स्पर्धा अपरिहार्य. एक पत्नी पध्दतीमुळे अडचण वाढते. तो श्रीमंत नवरा एकीच्याच वाट्याला येतो. एरवी गरीब पुरुष बिनलग्नाचे आणि श्रीमंत पुरुषाना अनेक बायका असे करता आले असते. म्हणून श्रीमंत पुरुष कोणत्या एक स्त्रीला निवडतो याला अनन्यसाधारण महत्व आले. येथेच हुंडा पध्दत सुरु होण्याला अनुकूल वातावरण निर्माण झाले. दुसरी शक्यता म्हणजे अनुलोम – प्रतिलोम नियमाचा नवा अवतार. लग्न करायचे तर जाती (पोटजाती) तच. पण पुरुषाने कमी प्रतिष्ठित कुटुंबातील वधू स्वीकारली तर चालेल. मग कमी प्रतिष्ठेच्या वधुपित्यानी भरघोस दक्षिणा देऊन अधिक प्रतिष्ठेचा जावई मिळवणे आलेच. असो.
कोणत्याहि करणाने सुरु झाली असली तरी आज हुंडा पध्दत बंद होणे जरुर आहे. त्यासाठी प्रतिबंधक कायदा अपुरा ठरत आहे. म्हणून जाणीव जागृति आणि अन्य मार्गानी समाजमन वळवण्याची गरज आहे.
हुंड्याप्रमाणेच सुनेवरील इतर अन्यायांची देखील दखल घ्यायला हवी. त्याबाबतीत १९८५ साली कायदा झाला. इंडियन पीनल कोड अनुच्छेद ४९८ अ अन्वये स्त्रीचा कुटुंब अंतर्गत छळ हा गुन्हा आहे. स्त्रीवर निराधार खोटे आरोप करणे, तुला झाले ते मूल कोणापासून? असा संशय व्यक्त करणे, जेवण नाकारणे, सासरी मोकळेपणी ये – जा करण्यास प्रतिबंध, मुलांपासून दूर ठेवणे, वांझपणावरुन किंवा मुली जन्माला घालण्यावरुन टोमणे मारणे अशा विविध गोष्टी छळणुकीच्या गुन्ह्यात अंतर्भूत कराव्यात असे निर्णय मुंबई / अहमदाबाद वगॆरे उच्च न्यायालयानी दिले आहेत. स्त्रीहक्क संरक्षणाच्या दृष्टीने हे मोठेच पाऊल होय. अर्थात प्रत्यक्षात असे व्यवहार थांबणे ही आपोआप होणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी सामाजिक आघाडीवर झगडावे लागतेच. पुण्यात नारी समता मंच, स्त्री आधार केंद्र, ‘ बोलत्या व्हा ’ गट अशा संघटना यासाठी धडपडतात. यांच्यासमोर येणारे प्रश्न ही आपल्या समाजाची एक हिणकस बाजू आहे. या व्यक्ति त्यांची परवड यावर प्रचारकी, वृत्तपत्रीय, वॆचारिक, ललित लिखाण खूप जास्त प्रमाणावर व्हायला हवे आणि ते शक्य आहे. वास्तवच फार दाहक आहे. एक छोटीशी घटना इथे सांगावीशी वाटते.
बरेचदा स्त्रीला आपली दु:खे दुसऱ्या कोणाजवळ बोलून हलकी करणे सुध्दा शक्य होत नाही. ‘बोलत्या व्हा ’ या गटाने अशा बायकाना एक संधी दिली. आम्ही ऎकतो. आमच्याशी बोला. शक्यतर सल्ला देऊ. शक्य तर मदत करु. पण निदान बोलून तुम्हाला जरा हलकेपणा वाटेल. अशी ही साधी सोपी सरळ भूमिका. अनेक जणी येऊन त्या संधीचा उपयोग करुन गेल्या. एक दिवस दारात एक महागडी मोटार थांबली. सुस्वरुप, प्रॊढ, हिऱ्यांचे दागिने घातलेली एक स्त्री उतरली. संस्थेच्या कार्यकर्त्यांची तिने विचारपूस केली. वाटले, आपणहून देणगी देणारी व्यक्ति भेटलेली दिसते. अखेर तिने गॊप्यस्फोट केला. मी बोलती व्हायला आले आहे. काय होते या पुरंध्रीचे दु:ख? पॆसा – आडका भरपूर. यशस्वी नवरा, गुणी मुले. काहीच कमी नाही. पण नवरा अनेक वर्षे बायकोशी बोलत नसे. म्हणजे कामापुरता बोले. प्रेमाचा टिपुस नाही. सर्व कर्तव्य करुने टाके. पण जिव्हाळा शून्य. त्याच्या मते बायको अडाणी, कमकुवत, त्याला अनुरुप नसलेली होती. कोठे शोधावा या दु:खावर उपाय? कोठे मागावी दाद? कोठे करावी फिर्याद?
अर्थात सर्व स्त्रिया उपेक्षित, पीडित असतील असे मुळीच नाही. भांडखोर, लबाड, स्वार्थी बायका असतातच की. आणि स्त्रियांच्या बाजूने अवाजवी पक्षपात करणारा कायदा म्हणजे यांच्या हाती कोलितच होईल. त्या एखाद्या सालस पुरुषाविरुध्द कुभांड रचू शकतील. हे शक्य आहे. त्याबद्दल काळजी घेतली पाहिजे. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत आहे काय? बायका नवऱ्यांविरुध्द वा सासरच्या इतर माणसांविरुध्द खोटे खटले भरत आहेत काय?
दिल्लीमधे १९९६ साली नोंद झालेल्या स्त्रियांविरुध्दच्या गुन्हयांची संख्या १९९५ पेक्षा अधिक होती. बलात्कार नोंदीत १६% वाढ झाली. छेडछाड नोंदीत ७०% वाढ झाली. (Eve Teasing) विनयभंग नोंदीत ८०% वाढ झाली. अशा नोंदी २९० वरुन ४८० वर गेल्या.
ही वाढ कशामुळे झाली असावी. तीन शक्यता दिसतात. (१) गुन्ह्यांचे प्रमाण वाढणे. एका वर्षात ७०, ८०% वाढ होणे जरा चमत्कारिक वाटते. (२) लोकसंख्या वाढणे. ती ७०-८०% इतकी एका वर्षात वाढणे असंभव. (३) गुन्ह्यांचे प्रमाण तेच, पण स्त्रिया अधिक निर्भय, धीट बनून पोलिसात फिर्याद करु लागल्या असतील. हे तिसरे कारण जास्त संभाव्य वाटते.
नवऱ्याने बायकोला मारहाण करण्याच्या तक्रारी घटल्या आहेत. सामाजिक वातावरण थोडे बदलले असावे. पोलीस लगेच गजाआड ठेवतात याची थोडी जरब वाटत असावी.
टाइम्स ऑफ इंडिया (७.३.९९) या वृत्तपत्रात मुंबईच्या ७३ पोलिस ठाण्यांवरील नोंदींचा वर्षवार तक्ता आला आहे.
वर्षवार गुन्हे संख्या
गुन्हा प्रकार १९८६ ८७ ८८ ८९ ९० ९१
४९८ अ ७३ १४२ १९४ २१९ १८७ १७४
पत्नीचा खून ५७ ६५ ७४ १०५ ११४ १०७
वा आत्महत्येस मदत
१९९२ ९३ ९४ ९५
२१४ २३७ २८९ २५४
१०८ १०५ १३१ १२९
दर पोलिस ठाण्यावर सरासरी १ ते २ मृत्यू व १ ते ३ अन्य गुन्हे नोंदले जातात. मृत्यू खोटे नोंदवणे अवघड आहे. या तुलनेने अन्य गुन्ह्यांची संख्या जास्त वाटत नाही. स्त्रियांचे तथाकथित ‘ अपघाती मृत्यू ’ इथे मोजलेले नाहीत. यावरुन वाटते की ४९८ अ खालील नोंदींची संख्या अवास्तव नाही.
हे झाले पोलिस्सत नोंद करण्याइतक्या गंभीर गोष्टींबद्दल. इतर गोष्टींबद्दलहि थोडाबहुत जाच असतो. स्त्रियाना पेहरावाबद्दल कितपत जाच होतो? अर्धशतकापूर्वीपर्यंत महाराष्ट्रात नऊवारी साडी हाच स्त्रियांचा सार्वत्रिक पेहराव होता. यानंतर हळूहळू पाचवारी साडीचे आक्रमण सुरु झाले. त्यावेळी शहरी पांढरपेशा वर्गात या बदलासंबंधी बरीच साधक बाधक चर्चा झाली. तिचा नमुना म्हणून १९४५ साली दॆनिक सकाळ मधे आलेल्या वाचकांच्या पत्रांपॆकी काही पुढे देत आहे.
२-९-१९४५ मुंबईच्या कृ. श्री. म्हॆसकर यानी लिहिले ‘ क्रीडांगणावर येताना मुलीनी सुटसुटीत कपडे वापरणेच श्रेयस्कर आहे. कासोट्याचा पोशाख हा सर्वच व्यवहारोपयोगी व यथायोग्य शरीराच्छादित करणारा आहे. पायघोळ गोल साडी नेसून कोणताच खेळ सफाईदारपणे खेळता येणार नाही. या गोल साडीचे स्त्रियांचे आकर्षण कमी होईल तो दिवस भाग्याचाच समजला पाहिजे. … जुन्या चालीरीतीना सनातनी म्हणून नाके मुरडणारानी त्यांची शास्त्रीय छाननी करणे आवश्यक आहे. ”
याविरुध्द कु. कल्पना हजारे, सोलापूर यानी लिहिले, ‘पाचवारी साडी हीच स्त्री वर्गासाठी उपयुक्त व आकर्षक आहे. आजची युवति कासोट्याच्या बोंगळ लुगड्याची घडी उलगडायला कदापि जाणार नाही. ’
शाम्सुंदर आगरवाल, पुणे यांचे पत पहा. ‘ नऊवारी साडीपेक्षा पाचवारीला कमी खर्च हा तर साधा हिशोब. गोल साडीतील विविधता नऊवारीत नाही. बंगाल, गुजराथ, यू. पी., पंजाब, सिंध येथेहि गोल साडीचीच प्रथा आहे. ’
सॊ. प्रमिला पटवर्धन, रामदुर्ग यांचे सांगणे असे: सकच्छ नेसणे हे महाराष्ट्राचे वॆशिष्ट्य असून ते टिकवले पाहिजे. सॊंदर्य प्रसाधनाच्या दृष्टीने सकच्छच सरस. विकल्प म्य्हणून गोल साडीस हरकत नाही. सर्रास उपयोग नको. ’
सोलापूरच्या डॉ. पाडावे याना वेगळेच वाटे. ‘ कासोट्याच्या साडीतच अधिक उत्तानता आहे. सनातन्यांच्या नाके मुरडण्याकडे स्त्रियानी लक्ष देऊ नये. ’
पुण्याच्या एका शिक्षकानी वेगळाच सूर लावला.
‘ खेळ खेळताना सकच्छ किंवा विकच्छ साड्या वापरणे अनिष्टच. क्रीडांगणावर मुलीनी अर्धी विजार व आखुड शर्ट घालणेच हितावह.
अखेर पाचवारी साडीने चांगला जम बसविला. पुढचे आक्रमण हे सलवार खमिस या पंजावी पोशाखाचे. आज तोहि स्वीकारला गेला आहे. काही प्रमाणात नव्याची चेष्टा / कुचेष्टा, नव्याला विरोध हे समजू शकते. तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत वॆद्यकीय परिचारिकांचा (नर्स) पोशाख बदलत होता. त्यावरुन बराच आरडाओरडा झाला. पारंपारिक पोशाख म्हणजे ड्रेस किंवा फ्रॉक, पण काही जणी पँट व टॉप असा पोशाख वापरु लागल्या. सनातन्यानी लगेच गहजव केला. जुनाच पोशाख जास्त चांगला असे प्रतिपादन केले. पण बदलाचे वारे जोरदार होते. हळूहळू नवा पेहरावहि रुळून गेला.
अर्थात दर वेळी नवे वारे स्त्री हिताला अनुकूलच असतात असे मुळीच नाही. महाराष्ट्रात दारुबंदी हटल्यापासून मद्यपानगृहे (बार) आली. मुंबई सारख्या महानगरात या गृहांमधे स्त्री सेविका (वेट्रेसेस) असतात. त्याना विनयभंग वा अन्य अत्याचाराचा धोका असतो. बेकायदा कुंटणखाने चालण्याची शक्यता असते. म्हणून तेथे निदान रात्री उशिरा तरी मुलीनी कामे करु नयेत (८-३० नंतर) असा नियम आहे. दुसऱ्या नियमान्वये गिऱ्हाइकांच्या मनोरंजनासाठी गायन नृत्यादि कार्यक्रम रात्री ८-३० नंतरहि चालू ठेवता येतात. त्यात स्त्री कलाकार (बारबाला) भाग घेऊ शकतात. या पळवाटेचा उपयोग करुन घेतला जातो. पोलिस तपासाला आले की वेट्रेस मुली एकदम नाचू लागतात. आपण नर्तिका आहोत असा जबाब देऊन पोलिस कचाट्यातून सुटका करुन घेतात. मुंबईत सुमारे १५०० बार आहेत. त्यात सुमारे ५०,००० मुली वेट्रेस म्हणून काम करतात. याना उत्पन्न चांगले मिळते म्हणून कुटुंबीयांची इच्छा असते की ही नोकरी चालू रहावी. रंगेल गिऱ्हाइके याना बक्षिशी देतात. ते पाहून मालक यांचे पगार बंद करतात. येवढेच नव्हे तर बक्षिशीत वाटा मागतात. रात्री उशिरा काम करु नये या नियमाविरुध्द यानी मालकांच्या पाठिंब्याने मोर्चा काढला. युक्तिवाद असा की नर्स, हवाई सुंदरी याना असा नियम कोठे आहे? गिऱ्हाइक चाळे करत असेल तर त्याला शिक्षा द्या. आमचा रोजगार बुडवू नका. मालक याना उशिरापर्यंत काम करण्यास भाग पाडतात. पोलिसानी पकडून नेले तर जामीन देऊन सोडवून आणतात. बारच्या भोवती अनॆतिक धंदे सुरु होतात. पोलिसांचा काच वाढतो. हप्ते द्यावे लागतात. गुंड पोसले जातात. अशी दुष्ट साखळी निर्माण होते. बारची नोकरी वय वाढल्यावर जायची ती जातेच.
आधुनिक समाज स्त्रीचे असे शोषण करतो. पारंपारिक रीती थोड्या वेगळ्या. एक रीत म्हणजे देवदासी प्रथा. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील ही जुनी वहिवाट. सॊंदत्तीच्या यल्लम्मा देवीच्या भक्तांमधे प्रचलित. या प्रथेत लहान मुलीला देवीची दासी म्हणून निवडतात. तिने देवीच्या नावाने जोगवा (भीक) मागून जगायचे. देवीची सेवा करायची. कायम कुंवार रहायचे. प्रत्यक्षात कोणी धनिक याना आश्रय देतो. त्याची रखेल म्हणून जिणे नशिबी येते. लग्न तर करायचे नाही. मग झुलवा नावाचा तत्सम विधी करुन काहीतरी अधिकार, मान्यता मिळवण्याचा, केविलवाणा वाटणारा प्रयत्न केला जातो.
११-८-१९९६ च्या सकाळ मधे आनंदी शिवाजी कांबळे या पन्नास वर्षीय देवदासी स्त्रीने आपली कहाणी सांगितली आहे. ती मूळची निपाणीची. लहानपणी तिला देवदासी करण्यात आले. वयात आल्यावर पुरुषांशी संबंध आले. कोणी झुलवा लावून घेतला नाही. एक मालक म्हणाले तशीच रहा. दहा वर्षानी त्यानी तिला वाऱ्यावर सोडले. दुसरा संबंध सात वर्षे टिकला. आता किरकोळ व्यापार करुन जगते. ती म्हणते, आमचं आयुष्य म्हणजे तांदळातल्या खड्यासारखं. माणसात राहूनहि सगळ्यांपेक्षा निराळं. देवाचं माणूस म्हणून देवाधर्माच्या कार्यात तोंडदेखला मान. सार आयुष्य दुसऱ्याच्या वळचणीला गेले.
उत्तम बंडू तुपे लिखित ‘ झुलवा ’ हे नाटक या प्रश्नावर झगझगीत प्रकाश टाकते. देवदासी प्रथेमधे बदल व्हायलाच हवा. स्वत:च्या कुटुंबात राहून स्त्रील देवीची सेवा करता आली पाहिजे.
एकूण असे दिसते की कुटुंबाअंतर्गत तसेच बाहेरही स्त्रीचे शोषण होऊ शकते. तिच्यावर अन्याय होऊ शकतो. त्याविरुध्द सतत जागरुक राहिले पाहिजे.
सुदॆवाने आपल्या देशातील कायद्याची चॊकट ही स्त्रीला न्याय मिळण्यासाठी अनुकूल आहे. पहिली अनुकूल तरतूद म्हणजे सर्व प्रॊढाना मताधिकार. जगात इतर कोणत्याहि देशात दलित, मागास, स्त्रिया अशा वर्गाना इतक्या सहजपणे, एका फटक्यात असा अधिकार मिळाला नाही. लोकशाहीची जन्मभूमी ब्रिटन येथे प्रथम फक्त पुरुषाना व तोसुध्दा ज्यांच्याकडे जमीन जुमला स्थावर मालमत्ता आहे अशानाच मताधिकार होता. स्त्रियाना तो अधिकार मिळण्यासाठी काही शतक वर्षे वाट पहावी लागली. विसाव्या शतकात मताधिकार मिळाला पण सफ्रेजेट चळवळ झाल्यानंतरच. अमेरिकेत निग्रोना गुलामगिरीतून सुटल्यावरहि नागरिकत्वाचे हक्क सुखासुखी मिळाले नाहीत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातहि त्यासाठी झगडा करावा लागला. स्वित्झर्लंडमधे बायकाना मताधिकार अगदी अलीकडे १९७१ साली मिळाला.
सार्वत्रिक मताधिकार आणि गुप्त मतदान या दोन तरतुदींमुळे भारतीय महिलांच्या मनोभूमिकेला फार महत्व प्राप्त झाले आहे. त्या प्रभावामुळे स्त्रीमुक्तीला अनुकूल आमदार खासदार निवडले जाणे निदान तत्वत: शक्य आहे. प्रत्यक्षात त्यासाठी अधिक जागृती लागेल हे खरे. पण चॊकट तयार आहे. आज ग्रामपंचायत नगरपालिका, विधानसभा, लोकसभा अशा सर्व पातळ्यांवर निवडणुकांमधे महिलांसाठी ३३% आरक्षण झाले आहे. यामुळे अक्षरश: हजारो महिला ग्रामपंचायतीत सदस्य झाल्या आहेत. शेकडो महिला सरपंचपदी येत आहेत. आपण याबाबत अमेरिकेच्या पुढे आहोत असे वाटते. पण आमदार – खासदार या निवडणुकांमधे विजती महिला कमी. विधानसभा, लोकसभा सदस्यांपॆकी महिला किती? १०% पेक्षा कमी. तेथेहि ३३% आरक्षण व्हायला हवे.
आपल्याकडे आज मतदानाव्यतिरिक्त अन्यहि अनेक बाबतीत कायद्याने स्त्री – पुरुष – समानता आहे. एक काम एक दाम. प्रसूतीसाठी रजा. पाळणाघरे. अनेक गोष्टी झाल्या आहेत. वडिलोपार्जित मालमत्तेमधे स्त्रियाना पुरुषांच्या बरोबरीने वाटा आहे. स्त्रीचे आपल्या माहेरी हक्क कोणते यापेक्षा सासरचे हक्क अधिक महत्वाचे आहेत. सासरच्या घरी रहाणे, जेवणे, खाणे, सामान्य शरीर व्यवहार करणे, मुलांचे संगोपन करणे हे सर्व स्त्रीच्या अधिकारात येते. त्यापॆकी काही काडीमोड – घटस्फोट झाल्यास रद्द होतात. पण काही टिकतात. उदा. पोटच्या मुलाना सांभाळणे हा मातेचा अधिकार आहे असे आपला कायदा सांगतो. मातेजवळ संगोपनास जरुर ते आर्थिक बळ नसेल तर माजी नवऱ्याने ते पोटगीच्या रुपात दिले पाहिजे. जर वेडेपणा वा अन्य काही कारणांमुळे बालसंगोपनाची शारीरिक व मानसिक क्षमता नसेल तर मात्र मातेऎवजी पिता संगोपनाचे काम करु शकतो. मुळात नवरा बायकोला सहजासहजी घटस्फोट देऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालये भक्कम पुरावा आणि सबळ कारणे मागतात. पण हे सर्व हिंदू कायद्याप्रमाणे झाले.
आपल्याकडे या बाबतीत धर्म निहाय वेगवेगळे कायदे आहेत. हिंदू कायद्यात बहुपत्निकत्वाला बंदी, तर मुस्लिम कायद्यात परवानगी. हिंदू दंपतीला गुंतागुंतीच्या प्रक्रियेनंतरच घटस्फोट मिळतो तर मुस्लिमाना सहज. त्यातून मुस्लिम स्त्रिया अधिक प्रमाणात अन्यायाच्या बळी होत असाव्यात. याऎवजी समान नागरी कायदा झाला पाहिजे असे अनेकांचे म्हणणे आहे. घटनेच्या ४४ व्या कलमाने ही जबाबदारी शासनावर टाकली आहे. ती पुरी करावी अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली आहे. १९८५ साली न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली एका घटनापीठाने शहाबानो खटल्यावरील निर्णयात सरकारी नाकर्तेपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ४४व्या कलमाला सरकारने जणू मूठमातीच दिली आहे असे त्याना वाटले. कोठेतरी सुरुवात करावीच लागते. नाइलाजाने न्यायालयाना समाजसुधारकांची भूमिका घ्यावी लागते. राष्ट्रीय एकात्मता येण्यासाठी समान नागरी कायद्याचा खचितच उपयोग होईल. कारण वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या कायद्याना बांधिलकी हे चित्र पुसले जाईल.
राजकीय नेते म्हणतात की घटना कलम ४४ ची अंमलबाजावणी अल्पसंख्य समाजाच्या सहमतीने झाली पाहिजे. पण ती सहमती मिळवण्यासाठी ठोस प्रयत्न झाल्याचा पुरावा दिसत नाही.
घटनासमितीमधे मुस्लिम सदस्यानी समान नागरी कायद्याला विरोध केला. आपापल्या धर्म / संस्कृतीनुसार व्यक्तिगत कायदा पाळण्याची मुभा हवी. घटनेच्या १९ व्या कलमानुसार प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे. त्याला समान नागरी कायद्याने बाधा येते.
डॉ. बाबासहेब आंबेडकर यानी प्रतिवाद केला की मुस्लिम व्यक्तिगत कायदा नावाची गोष्ट स्थलकालाबाधित नाही. १९३५ सालापर्यंत वायव्य सरहद्द प्रांतात शरियत कायदा नव्हता. वारसा हक्काबाबत ते हिंदू कायदा वापरत होते. नंतर शरियत कायदा आला. १९३७ पर्यंत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, मुंबई इलाखा यातील मुस्लिमाना बव्हंशी हिंदू वारसा हक्क कायदा लागू होता. उत्तर मलबार मधे हिंदू आणि मुस्लिमाना एकच कायदा लागू आहे. मरुमक्कथयम या नावाने ओळखला जाणारा हा कायदा मातृसत्ताक आहे. पितृसत्ताक नव्हे. समान नागरी कायदा बनवावा आणि टप्प्याटप्प्याने लागू करावा. उदा. दोन्ही पर्याय उपलब्ध ठेवावे. १९३७ मधे वायव्य सरहद्द प्रांतात शरियत कायद्याचे असेच होते. ज्याना हवा त्यानाच तो लागू होता.
काही असो. गेल्या अर्धशतकात समान नागरी कायदा होण्याच्या दृष्टीने प्रगति झाली नाही येवेढे खरे. काहीजण म्हणतात घटनेत इतरही बाबी आहेत. सक्तीचे प्राथमिक शिक्षण असण्याची तरतूद अहे. ती अमलात आलेली नाही. त्याबद्दल का आग्रह नाही? समान नागरी कायद्याबद्दलच का ओरड? हा फसवा युक्तिवाद आहे. दोन्ही बाबतीत प्रयत्न हवे. भारतात पन्नास वर्षात साक्षरता बरीच वाढली. उलट मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नात प्रगती ऎवजी पुच्छगती झाली.
या पार्श्वभूमीवर कोणाला खरे वाटणार नाही की भारताच्या एका राज्यात समान नागरी कायदा आहे. त्याचा अंमल गेले सव्वाशे वर्षे आहे. हे कोणते राज्य? तेथे अशी स्थिती कशी आली? राज्य गोवा. येथे ६४% हिंदू, ३१% कॅथॉलिक, ४% मुस्लिम अशी लोकसंख्या आहे. पोर्तुगीज शासकानी १८७० साली येथे ‘कोडिगो सिविल पोर्तुगीज ’ नामक कायदा सर्वाना लागू केला. तेथे जन्म, मृत्यू, लग्न यांची नोंद सक्तीची आहे. तलाक – तलाक म्हणून घटस्फोट घेता येत नाही. दुसरे लग्न करता येत नाही. १९१० पासून परस्पर संमतीने घटस्फोट मिळतो. १९४६ साली पोर्तुगालमधील पुराण मतवादी सालाझार सरकारने कॅथॉलिकाना घटस्फोट रद्द केला. १९७४ साली न्यायालयानी हा बदल घटनाबाह्य ठरविला. पुरुषाने कर्ज घेतले तर त्याच्या वसुलीपोटी इस्टेटीतील पत्नीचा हिस्सा जप्त करता येत नाही. म्हणून बँका बायकोची सही आणल्याशिवाय कर्ज मंजूर करत नाहीत.
गोव्यातील मुस्लिम स्त्रिया गोव्याबाहेरील मुस्लिम पुरुषाशी लग्न लावत नाहीत. कारण त्याची पहिली बायको कोठेतरी असेल हा धोका असतो.
अशी व्यवस्था सर्व देशात व्हायला हवी.
अर्थात हे सर्व लागू कोणाला तर स्त्री पुरुष समानता मानणाराना. प्रत्यक्षात अनेकांचे विविध प्रकारचे पूर्वग्रह असतात. ते उदारमतांच्या आड येतात. यात सर्व आर्थिक व सामाजिक वर्गातील पुरुष आले. अगदी अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय सुध्दा पूर्वग्रह विरहित नसतात. त्यांच्या अडचणींचे प्रकार वेगळे होतात. पण प्रतिसाद जुन्या वळणाचा असतो. एक भीती असते ती मुलाना अरेंज्ड मॅरेज पटणार नाही. मुलगा गोरी सून आणेल अणि ते जोडपे दुरावेल. मुलीने गोरा नवरा मिळवला तर तक्रार नसते. पण निग्रो मुलगा निवडला तर? पोटात वंशभेदी पूर्वग्रह असतो. आणखी अवघड जागी दुखणे म्हणजे मुलामुलींपॆकी कोणी समलिंगी संबंध ठेवले तर? गुपचूप व्यवहार चालेल पण उघड एकत्र राहिले तर? तर आपली इज्जत जाणार. मुलीना वाटते की आपण देशी नवरा निवडावा ही आईबापांची इच्छा जाचक आहे.. त्याच्यात चांगला वर मिळत नाही. चांगला म्हणजे बरोबरीने वागवणारा, नवरेगिरी न करणारा, बायकोच्या करीअरला सांभाळणारा, स्वतंत्र वृत्ती, महत्वाकांक्षा याना समजून घेणारा. स्त्रीमुक्ती चळवळीत कोणी तरुणी कृतिशील झाली तर इतराना तिची धास्ती वाटते. आपल्या बायकानी तिच्याशी घसट टाळावी असे नवऱ्याना वाटते. जास्त समजुतदार असतात ते हळवेपणाने चॊकशी करतात की ही मुलगी अशी का होत आहे? लहानपणी हिचा छळ वगॆरे तर झाला नाही ना? धर्म, भाषा, वस्त्रेप्रावरणे, जेवणखाण, संगोपन सगळ्याच बाबतीत भारतीयत्व टिकवून धरण्याची मुख्य जबाबदारी बायकांवर टाकली जाते.
अमेरिकेतील स्थानिक समाजात कुटुंबसंस्थेचे रूप वेगळे आणि बदलते आहे. लग्न न करणारांची संख्या वाढत आहे. टाइम साप्ताहिकाच्या अभ्यासानुसार (जानेवारी २०, २०००) १९८८ साली ९४% अमेरिकन लोक विवाहित होते. १९९९ साली हा आकडा ८८% इतका घसरला. बरीच जोडपी रीतसर लग्नाविना एकत्र रहातात. १६% लोकांची तीने वेळा लग्ने झाली आहेत. घटस्फोट आता सहज मिळतो. यावर उपाय म्हणून “ कोव्हेनंटामॅरेज ” नामक पर्याय पुढे येत आहे. व्यभिचार, गुन्हेगारी, मारहाण असल्या कारणांव्यतिरिक्त या कराराअन्वये घटस्फोट मिळत नाही. अध्यक्ष क्लिंटन यांचे तरुण नोकर स्त्रियांशी लग्नबाह्य संबंध होते. त्याचे आणि एकूण लग्नबाह्य संबंधांचे कोणाला फारसे काही वाटत नाही. पण लग्नाचे नवनवीन प्रकार वाढतील असे दिसते. उदा. दर ५-७ वर्षानी आढावा घेऊन लग्नाचा फेरविचार करण्याची पध्दत . लग्न करार चालू ठेवावा, बदलावा किंवा मोडावा. समलिंगी लग्ने. अनेक कंपन्या व व्हरमाँट सारखे राज्यसरकार अशा लग्नाला मान्यता देत आहेत. मुले आणि वृध्द यांच्या देखभालीबद्दलही करार करावेत. एकेका जोडप्याचे वेगळे कुटुंब असे ठेवण्याची तरी काय गरज? अनेक जोडप्यानी एकत्र येवून छोटी वस्ती उभारावी.
निग्रो मंडळीमध्ये कुटुंबसंस्था अधिकच क्षीण झाली आहे. एक निग्रो नेते जेसीजॅक्सन यांच्या अंदाजानुसार ७०% निग्रो बालके लग्नबाह्य संबंधातून जन्माला येतात. संगोपनासाठी पित्याचा आधार नसतो. आबाळ होते.
आज अमेरिकेत नोकरी करणाऱ्या स्त्रियांपॆकी ३३% स्त्रिया नवऱ्यापेक्षा जास्त पॆसे कमावतात. अशा सुमारे एक कोटी बायका आहेत. पतिपत्नीच्या नात्याचे रूप यामुळे पालटले आहे. आता घर सांभाळणारे नवरेसुध्दा आढळतात. पण काही बायकाना खोल कोठेतरी असे वाटते की नवऱ्याने खरे तर जास्त कमवायला हवे. एकंदर उत्पन्नाबरोबर बायकांकडचे निर्णयाचे अधिकारहि वाढले. घरकामात पुरुषांचा सहभाग वाढला. तरी बरोबरी नाही. दोघेही नोकऱ्या करणारे आणि घरात मूलबाळ नाही अशा घरात बायका पुरुषापेक्षा पाच तास अधिक घरकाम करतात. मुलेबाळे असली तर हा आकडा वाढतो.
बाईचा पगार वाडतो तसा कामाच्या तासांमधील फरक घटतो. पण जादा कमवणारे नवरे घरात जेवढा अधिकार गाजवतात तेवढा जादा कमावणाऱ्या बायका गाजवत नाहीत. जादा कमावणाऱ्या पुरुषाची नोकरी बायकोच्या नोकरीपेक्षा ‘अधिक ’ महत्वाची असते. पण जादा कमावणाऱ्या बाईची नोकरी पुरुषाच्या नोकरी इतकीच महत्वाची असते. म्हणजेच जुनी मानसिकता बदलण्याला अजून जागा आहे. आणि तोच तर सुखी संसाराचा पाया.
ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या लग्नविधी पुस्तिकेत पुढील श्लोक आहे.
संसार रुप शकटा प्रति वाहणारी ।
चक्रेच दोन असति नर आणि नारी ॥
देण्यास की सहचरत्व तया द्वयास ।
आहे विवाह विधि हा जणु एक आस ॥
हा श्लोक भारताइतकाच अमेरिकेलाही लागू आहे. ही भावना असेल तर विवाहाला महत्व येते. विवाह टिकतात. अमेरिकेत संशोधकाना आढळून आले आहे की ज्या दंपतीला वाटते की लग्न ही पवित्र गोष्ट आहे, आयुष्यभराची साथ आहे, जी जोडपी धार्मिक आहेत त्यांची लग्ने टिकतात. ती जास्त सुखी असतात. त्यांच्यात वाद कमी आणि सहकार्य जास्त असते. मतभेद झाले तर ते मोकळेपणाने एकमेकाला सांगतात, एकमेकाचे ऎकून घेतात. तुलनेने पाहता कामाच्या जागी भेटले आणि लग्न जुळले यांच्यात सुखी संसारांचे प्रमाण कमी. कामावरच्या कटकटींचा घरापर्यंत त्रास होतो. मूल नसेल तर बंध आणखी सॆल असतात. २००० साली टिकाऊ लग्नांचे प्रमाण ५०% इतके खाली आले आहे. तज्ञांच्या मते प्रेमात पडून लग्न करण्याने सुखी संसार साधत नाही. एकमेकाबद्दल तपशीलवार माहिती असण्याने माणूस योग्य निर्णय घेण्यास मदत होते. मुले किती हवीत, केव्हां हवीत, पोटची का दत्तक, त्याना वळण कोण लावणार, धाक कोणाचा, कोण किती कमावतो, वाचवतो, उधळतो, लग्नानंतर आर्थिक व्यवस्थापन कोणी कसे करावे, पूर्वीच्या प्रियकर / प्रेयसी बद्दल दृष्टिकोन कोणता, धर्म, राजकारण यात ठाम मते कोणती एत्यादि. प्रेम आंधळे असते तर लग्न फार व्यवहारी असते. ज्यांची प्रेमलग्ग्ने जुळली नाहीत, टिकली नाहीत त्याना ही बाजू लक्षात येते.
इजिप्त हा मुस्लिम देश. येथे कर्मठ बहुजन समाज आणि उदारमतवादी सरकार अशी स्थिति आहे. नवऱ्याने बायकोला लहरीनुसार काडीमोड द्यावी ही जुनी रीत. उलट बायकोला घटस्फोट हवा असेल तर नवरा छळ करतो हे सिध्द करावे लागे. फेब्रुआरी २००० मधे सरकारने नवा कायदा करुन ही विषमता थोडी घटविली. नव्या कायद्यानुसार, बाईने घटस्फोट अर्ज केला की न्यायाधीश एक फेरविचार मुदत देतात. या काळात तडजोड, समझोता करण्याची संधी असते. त्यानंतर बाईची मागणी कायम राहिली तर तिला घटस्फोट मिळतो. या बदलावर अर्थातच पुरुषानी टीकेची झोड उठवली आहे. कायदा लागू झाल्याच्या पहिल्या दिवशी (१-३-२०००) वीस बायकानी घटस्फोटाचे अर्ज दाखल केले. असो.
निरोगी कुटुंबसंस्था ही समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने फार मोलाची, मूलभूत महत्वाची आहे. ती टिकावी, फुलावी म्हणून योग्य चॊकट हवी. कायदे, नियम, चालीरीती या पोषक हव्या. त्याचबरोबर व्यक्तीना तिच्याबद्दल बांधिलकी वाटायला हवी. काहीवेळा त्या व्यवस्थेचा जाच होतो. पण दूरचा विचार करता ती फायद्याची आहे. कुटुंबात रहाणे यातच साफल्य आहे असे मनोमन वाटायला हवे. श्रध्दा हवी.
श्रध्दा म्हणजे काय? विश्वास, भक्ति हे शब्द श्रध्देशी थोडे समकक्ष आहेत. अनुभवसिध्द वा तर्कसिध्द खात्री असते तेव्हां श्रध्दा हा शब्द अप्रस्तुत आहे. उद्या सूर्य उगवेल ही श्रध्दा नव्हे. उलट व्रतवॆकल्ये केल्यामुळे इष्टफलप्राप्ती होईल ही श्रध्दा म्हटली जाते. वर आपण कुटुंबसंस्थेवर श्रध्दा हवी असे म्हटले ते कोणत्या अर्थाने? कुटुंबाचा घटक म्हणून जगण्यात, आपली कर्तव्ये करण्यात प्रत्येक क्षणी आनंद लाभेल असे नव्हे. कधी त्रास होईल, जाचही वाटेल. पण तेवढ्याने निराश न होता, वर्षानुवर्षे ते व्रत करावे.
श्रध्दा या शब्दापाठोपाठ अंधश्रध्दा स्मरते. या दोन्हीत फरक काय? कोणी गमतीने म्हटले आहे की आपली ती श्रध्दा, दुसऱ्याची ती अंधश्रध्दा. आपल्याला आवडते ती परंपरा, नावडते ती रूढी. अंधश्रध्दा असू नये. डोळस श्रध्दा असावी असे ढोबळ मानाने समजले जाते.
महाराष्ट्रात अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्य सर्वश्रुत आहे. डॉ.नरेद्र दाभोळकर आणि त्यांचे सहकारी कित्येक वर्षे या विषयावर गावोगाव व्याख्याने प्रात्यक्षिके आदि कार्यक्रम आयोजित करतात. भाबड्या सामान्यजनाना साधू, बॆरागी, बुवा वगॆरे मंडळी फसवतात, आपल्या भजनी लावतात, गॆरफायदा घेतात असे बरेचदा दिसते. या मंडळींवर इतरांचा विश्वास बसण्याचे कारण त्यानी केलेले चमत्कार हेच बरेचदा असते. कोणी निखाऱ्यांवरुन चालतो, कोणी पाण्यावरुन चालतो, कोणी हवेतून भस्म काढून दाखवतो तर कोणी असाध्य रोग बरा करतो. अशा अलॊकिक वाटणाऱ्या कृतींचा अनुभव घेतल्यावर लोक त्या माणसाचा प्रत्येक शब्द जणू आकाशवाणी समजू लागतात. यातून बदमाष मंडळींचे फावते. या समाजघातक बुवाबाजी विरुध्द अंधश्रध्दा निर्मूलन समिती (अनिस) विविध उपाय करते.
(१) तथाकथित चमत्कारांच्या मागील वॆज्ञानिक मीमांसा उघड करणे. उदा. निखाऱ्यांवरुन चालत जाताना राख पायाना चिकटणार नाही, पायांचा निखाऱ्यांशी स्पर्श एका वेळेला अगदी क्षणभरच टिकेल अशी व्यवस्था केल्यास कोणालाहि निखाऱ्यांवरुन चालता येते. त्यासाठी साधू संत असण्याची जरुर नाही. ही मीमांसा समजली की निखारे वारा घालून बिनराखेचे ठेवता येतात आणि एखादा अनिस कार्यकर्ता त्यावरुन पटकन चालून दाखवू शकतो. मग इतरांची भीड चेपते. हळूहळू ही लाट पसरते. अखेर कोणीहि सोम्यागोम्या हा ‘चमत्कार’ करुन दाखवतो. या साध्या गोष्टीबाबत आपण त्या बुवाला वंदनीय मानत होतो याचे लोकानाच हसू येते. अनिसचा हा कार्यक्रम अफाट लोकप्रिय झाला.
(२) काही चमत्कारांच्या मागील हातचलाखी उघड करणे. व्यावसायिक जादूगाराकडून ती कोणालाहि शिकता येते. तिचा वापर मनोरंजनासाठी केला तर ती उपयुक्त ठरते. त्या पलीकडे जाऊन हातचलाखी ही लोकांवर भूल टाकण्यासाठी वापरली तर तो सामाजिक गुन्हाच ठरावा. या बाबतीत अनिस चमत्कारामागील चलाखी उघड करुन दाखविते. आमच्या तज्ञांसमोर तुमचा चमत्कार करुन दाखवा असे जाहीर आव्हान बुवाना देते. असे आव्हान स्वीकारणे बरेचदा जड जाते.
(३) काही अशास्त्रीय, अतार्किक व अहितकारक संकल्पना समाजात मूळ धरत असतील तर त्यांच्याबाबत तज्ञांकडून सत्यदर्शन व मार्गदर्शन मिळवून त्याचा प्रचार अनिस करते.
अनिसच्या पुस्तिकेत पुढील ‘चमत्कार’ कसे करावेते याचे वर्णन दिले आहे. (अ) तांदुळात उभी उदबत्ती नजरेते फिरविणे, (आ) उकळत्या तेलात बोट बुडवूनही न भाजणे (ए) अंगावर भस्म लावताच बिब्ब्याच्या फुल्या उठणे (ऎ) समोरच्या व्यक्तीचा हात हाती धरुन वर पाणी ओतताच गुलाबी धार पडणे, (उ) हव्या त्या गोड पदार्थाची चव मंतरलेल्या कागदाला येणे (ऊ) नारळातून हळद, कुंकू, चुडा, खण, टाचण्या, केस इ. काढणे. (ए) हातात कुंकू देणे, मूठ उघडताच कुंकू काळे पडणे, (ऎ) चुलीविना भात शिजवणे (ओ) मंत्राने कपडा पेटवणे (ऒ) साल न सोललेल्या केळ्याचे आत काप झालेले असणे (अं) कोऱ्या कागदावर मंत्राने भुताची आकृति काढणे (अ:) पेटता काकडा हातावरुन (न भाजता) फिरविणे.
१९९९ हे वर्ष म्हणजे डॉ. अब्राहम कोवूर याची जन्मशताब्दि. भोंदूबुवांच्या बनवाबनवीचे बिंग फोडणे यासाठी कोवूर यानी अफाट परिश्रम केले. केरळच्या एका सीरिअन ख्रिस्ती धर्मोपदेशकाचा हा पुत्र जीवशास्त्र शिकून श्रीलंकेत नोकरी करु लागला. तेथेच तिशीमधे त्यानी आपले जीवित कार्य सुरु केले. अतिमानवी शक्ती हे थोतांड आहे व ते पुराणकथा आणि सनसनाटी वृत्तपत्रे यातच आढळते असे ते म्हणत. अशी शक्ती असल्याचा दावा करणाअरे लोक वेडे तरी असतात किंवा लफंगे तरी. कोवूर यानी चमत्कार करणाराना जाहीर आव्हान दिले. ‘सीलबंद पाकिटात ठेवलेल्या नोटेचा नंबर सांगा. एका नोटेची हुबेहुब प्रतिकृति बनवा. हवेतून मी सांगेत ती वस्तू काढा. लाल निखाऱ्यांवर अर्ध्या मिनिटापेक्षा जास्त काळ स्थिर उभे रहा. पायाला फोड येता कामा नयेत. पाच मिनिटे ह्र्दयाचे ठोके थांबवून दाखवा.’ यापॆकी कोणतीहि एक गोष्ट तज्ञांसमोर करुन दाखविणारास एक लक्ष रुपयांचे रोख बक्षिस त्यानी देऊ केले. ते कोणीच मिळवू शकला नाही. हस्तसामुद्रिक तज्ञानासुध्दा त्यानी आव्हान दिले. दहा व्यक्तींच्या हाताचे ठसे पाहून सांगावे – व्यक्ति स्त्री की पुरुष, जिवंत की मृत, जन्मस्थान व काळ कोणते. कोणीहि हे आव्हान स्वीकारले नाही. आपल्य़ा भांडाफोड मोहिमेत कोवूर यानी व्यावसायिक जादूगाराना सहभागी करुन घेतले. हे जादूगार ‘चमत्कारांचे’ प्रात्यक्षिक करुन दाखवीत. हवेतून ‘विभूति’, ‘अंगारा’ वा ‘भस्म’ काढून दाखवीत. कोवूर लोकाना विचारत, सत्यसाईबाबा नेहमीच मुठीत लपण्याजोग्या वस्तूच हवेतून का काढून दाखवितात? त्यानी मोठा भोपळा काढून दाखवावा. भाबड्या भक्तानासुध्दा ते दोष देत. चमत्काराची कठोर तपासणी झाल्याशिवाय त्या बुवावंर श्रध्दा ठेवणारे तद्दन मूर्ख आहेत असे ते म्हणत. अशा तपासणीसाठी त्यानी Committee for the Scientific Inverstigation of the Claims of the paranormal ही संस्था स्थापन केली. १९८२ मधे डॉ. कोवूर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात प्रेमानंद या अनुयायी गृहस्थानी The Indian Sceptic हे मासिक चालवले आहे. त्यानी Guru Busters नावाची चित्रफीतही बनवली आहे. ती BBC व अन्य परदेशी दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवली गेली आहे. तथाकथित दॆवी शक्तीवाल्या लोकांच्या लांड्या लबाड्या उघड्या करणारा हा कार्यक्रम सरकारी दूरदर्शन खात्याने मात्र खड्यासारखा बाजूला ठेवला आहे..
डॉ. कोवूर यांच्या अनेक कल्पना अनिसच्या कार्यात प्रतिबिंबित दिसतात. अनिस ने तज्ञांसमोर चमत्कार करुन दाखविणाऱ्यास पाच लक्ष रुपये रोख बक्षिस जाहीर केले आहे.
भंपक बुवाबाजी विरुध्द जागृती करण्याचे काम महाराष्ट्रात यापूर्वीसुध्दा झाले आहे. (पण ते पुन्हा पुन्हा करीत रहावे लागते असे दिसते.)
१९३५ साली किर्लोस्कर मासिकाच्या संपादकीयांमधून शं. वा. किर्लोस्कर यानी बुवाबाजीविरुध्द तोफ डागली. त्यानी लिहिले “ कोणत्याहि बुवाच्य अंगी आपली नरकात करण्याची शक्ती असणे शक्य नाही. कारण स्वर्ग आणि नरक या जागाच काल्पनिक होत. …. ज्याच्या त्याच्या पापपुण्याची ज्याच्या त्याच्यावर. त्याबाबतीत कोणतीहि दलाली उपयोगी पडणार नाही. जो अशी दलाली करतो तो अत्यंत मूर्ख किंवा अट्टल डांबिस असला पाहिजे. ” किर्लोस्कर मासिकाने उपासनी महाराज आणि नारायण महाराज अशा बड्या बुवांची बिंगे फोडली. फसलेल्या भक्तांचे अनुभव प्रसिध्द केले आणि खळबळ उडवून दिली. “बुवाबाजी विध्वंसक संघ ” उभा केला. यात पुढाकार घेणारे मिरजेचे महादेवशास्त्री दिवेकर हे गावोगावच्या आमंत्रणानुसार बुवांचा भंडाफोड कसा करावा याबद्दल मार्गदर्शक तत्वे सांगत. ‘बुवाशी अगर त्याच्या शिष्याशी अतिप्रसंग (मारामारी वगॆरे) टाळावा. कारण बुवाबाजीला जितके बुवा तितकेच लोकही कारण असतात, …. येवढ्याचसाठी बुवा ज्या युक्त्या प्रयुक्त्या लढवीत असतात त्या उजेडात आणून लोकाना सुशिक्षित करणे हा सर्वात उत्तम मार्ग.’
चमत्कारांचा फोलपणा स्पष्ट करताना वि. दा. सावरकरानी लिहिले, ‘ परम योगी ज्ञानेश्वर महाराजानी ज्ञानेश्वरी लिहून लेखणी खाली ठेवली नाही तोच अल्लाउद्दीन खिलजी अवघ्या पंधरा हजार सॆन्यानिशी, बकऱ्यांच्या कळपात वाघ घुसावा, तसा दक्षिणेत घुसला. …. रेड्याच्या मुखातून (ज्ञानेश्वर) वेद वदवू शकले पण (परचक्राची) सूचना रामदेवराजपर्यंत पोचवू शकले नाहीत. निर्जीव भिंती चालवू शकले पण सजीव माणसांची भिंत विंध्याद्रीच्या खिंडीत अल्लाउद्दीनचा मार्ग रोखण्यासाठी उभी करू शकले नाहीत.
जेथे सामान्य माणसाची फसवणूक होते तेथे सुधारकानी हस्तक्षेप करुन बदमाषी बंद करणे ही गोष्ट अत्यंत स्वागतार्ह आहे. म्हणून अनिसच्या प्रयत्नाना सर्वानी पाठबळ दिले पाहिजे.
असे म्हणत असतानाच श्रध्दा, मग ती अंध असो वा डोळस, हा मनोव्यवहार काय आहे, माणसे पुन्हा पुन्हा बुवाबाजीला बळी का पडतात, श्रध्देला माणसाच्या जीवनात कोणते स्थान आहे/ असावे अशा बाबींचा विचार करणे जरुर आहे. अशा विचारातून सर्वच उत्तरे अनिसच्या प्रत्येक कृतीला अनुकूल येतील असे नव्हे. पण एका तरल पातळीवर या प्रश्नांची जास्त स्वच्छ समज येण्याकडे पावले पडतील. आपण येथे तीन मुद्दे विचारात घेऊ. बुवाबाजीच्या मार्गाला जाणारी माणसे खरोखर कितपत तर्क विरोधी अडाणी पणे वागत असतात? अतींद्रीय, मिस्टिकल वाटणाऱ्या अनुभवाना जीवनात काही स्थान आहे का? तिसरा मुद्दा म्हणजे श्रध्देचा एकूणच धिक्कार कितपत योग्य आहे.
या पुस्तकात अन्यत्रहि म्हटले आहे की एकंदर सर्वच प्राण्यांचे व्यवहार हे प्राप्त परिस्थितीत मार्ग काढणारे, त्यातल्या त्यात उपयोगी पडणारे प्रयत्न असतात. निदान तशा गृहीताने वागणुकीकडे बघण्यामुळे ती समजणे सुकर होते. या गृहीतानुसार हाती येणारी भाकिते नेहमीच खरी ठरतील असे नव्हे. पण ती खोटी ठरल्यास तसे का झाले याचा शोध फायद्याचा, प्रगतीला पोषक होतो.
समाजशास्त्राच्या अभ्यासाची एक पध्दत म्हणजे सर्वेक्ष / पहाणी / मुलाखती. माणसांची वागणुक निरखून नोंदी ठेवणे. त्या वागणुकीमागील व्यक्तिगत प्रेरणा मुलाखतीत शोधणे. शिवाय त्या वागणुकीचे व्यक्तिनिरपेक्ष मूल्यांकन करणे.
पुणे विद्यापीठात काही वर्षांपूर्वी नरेंद्र बोश्वारी या अभ्यासकाने साधू / महाराज / जादू / टोणा अशा वाटेने जाणाऱ्या अनेक व्यक्तींचा अभ्यास केला. असे दिसले की या मंडळीना काही ना काही अडचणीनी सतावलेले असते. नोकरी न मिळणे, मित्र / मॆत्रीण वश न होणे, वांझपणा, घरात फार आजारपण असणे अशा हरतऱ्हेच्या समस्या. त्या सोडवण्याच्या धडपडीत थकवा आलेला असतो. नेहमीचे सर्व उपाय विफल झालेले असतात. उदा. नोकरीसाठी नाव नोंदवणे, अर्ज देणे, वशिला लावणे, लाच देणे इ. आजारासाठी वॆद्य वा डॉक्टरकडे जाणे, गुण नाही म्हणून स्पेशालिस्टकडे जाणे, हरतऱ्हेच्या तपासण्या, चाचण्या करणे, कडक शिस्तीने पथ्य, उत्तम शुश्रुषा करणे, इ. कोणताच उपाय कामी येत नाही तेव्हां कोणीतरी हितचिंतक सुचवतो की भगत, देवॠषी, महाराज, माता, दर्गा, पीर, जागृत देवस्थान अशा कोणाला तरी शरण जावे. यासाठी कारण किंवा सबब दोन प्रकारची असू शकते. एक म्हणजे आपल्या हाती काही राहिले नाही म्हणून त्या सर्वश्रेष्ठ जगन्नियत्याची करुणा भाकणे. दुसरे कारण म्हणजे आपल्या समस्येचे मूळ पारलॊकिक असावे ही भावना. कोणी भूत, प्रेत, समंध आपल्या वाइटावर आहे. त्याची शांती करावी. किंवा त्याचा काटा काढावा.
मुख्य निष्कर्ष असा की एवीतेवी नेहमीच्या वाटेने जाऊन प्रश्न सुटत नाहीत असे ठरल्यावर मग अनवट मार्गे जाऊन पहावे असा कल वाढू लागतो. याला भोळसटपणा / भाबडेपणा वगॆरे लेबल चिकटवणे योग्य वाटत नाही. आपापले ज्ञानाचे, अनुभवाचे, कुवतीचे, गोतावळ्याचे विश्व जसे बदलते तसे ‘नेहमीचे’ उपाय यांची व्याख्या बदलते येवढेच.
परमेश्वराची करुणा भाकणे हा उपाय करण्यासाठी मुद्दलात माणसाला परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल काहीतरी विश्वास वाटायला हवा. नेहमीच्या वॆज्ञानिक पध्दतीने येथे सिध्दता जमत नाही. तो विश्वास नसेल तर मग मागणेसुध्दा अर्धवटच होईल.
Oh God, if you are
Help me, if you can!
किंवा
देवा कुठे असशील तर ।
जमेल तेवढी मदत कर॥
अशी गमतीची प्रार्थना करावी लागते. तात्पर्य हा उपाय श्रध्दाळू माणसालाच शक्य आहे.
अडचणींवर उपाय आणि धर्मसंस्कार यांच्यातील सरमिसळ फार पुरातन आहे. आदिवासींमधे भगत, पुजारी हाच वॆद्य असतो. अथर्ववेदात ताप, जाळ वगॆरे शरीरव्याधींपासून ते भुताने पछाडले वगॆरे अडचणींपर्यंत विविध बाबींसाठी मंत्रतंत्रादि उपाय दिले आहेत. त्याचा उपयोग होतो का? याचे उत्तर होकारार्थी आहे. नेमका काय उपयोग होतो? या उपायांवर श्रध्दा असेल तर ‘आता अडचण हटणार बरे का! अशी आशावादी भूमिका निर्माण होते. नव्याने प्रयत्न करण्याला हुरुप येतो. मंत्रामुळे आजारी बाळाच्या अंगातील रोगजंतु मरतील काय? कोण जाणे. पण हातपाय गाळलेले आई-बाप उठतात व नव्याने खटपट करु लागतात हा उपयोग होतो.
मुंबईचे प्रसिध्द मनोरुग्ण उपचारतज्ञ डॉ. राजेद्र बर्वे म्हणतात की मध्यमवर्गीय मनोरुग्णावर उपचार करणे अवघड जाते. गोरगरीब अडाणी वर्गात मानसिक आजार हा एक आजार म्हणून सहज स्वीकारला जातो. ‘त्याच्या मानेवर मुंजा बसला आहे’ अशी काहीतरी सोपी उपपत्ती दिली जाते. मग आजारावर उपाय करणे स्वाभाविक वाटते. रोग्याना वा त्यांच्या नातेवाइकाना याबाबतीत मनोगंड नसतात. निदान कमी असतात. हेच त्यांचे बळ ठरते. सुशिक्षितांमधे मानसिक आजाराबद्दल गोंधळ असतो. आजार झाल्याचा कमीपणा वाटतो. डॉक्टरच्या उपाय योजनेबद्दल खात्री वाटत नाही. रोगाचा प्रतिकार करण्यासाठी मग मनोबल कमी पडू लागते. रोगाची मीमांसा आणि तदनुसार उपाययोजना यावर श्रध्दा हे मोठेच बळ आहे.
पण मग भगताने सांगितलेले उपाय सरसकट करायचे का? प्राणी बळी द्या. चालेल? नरबळी द्या. चालेल? भुताला हाकलून देण्यासाठी रुग्णाला प्रचंड मारहाण करा. चालेल? ही खरी अडचणीची बाब आहे. प्रस्थापित व्यवस्थेनुसार अमुक उपाय निषिध्द आहे असे आपण म्हटलेच पाहिजे. यातून बेकायदेशीर गोष्टी टळतील. त्या टळण्याला अग्रक्रम हवा. त्यानंतर रोग्याला कायमचा जायवंदी करुन ठेवेल असा उपाय थांबवला पाहिजे. म्हणजेच मूळ अडचण निवारण न होता नवे प्रश्न निर्माण होण्याचा अव्यपारेषु व्यापार टळेल. पण मर्यादित प्रमाणात फटके मारण्याचा काही अनुकूल परिणाम होणे शक्य आहे. प्रत्यक्षात असा फायदा मिळतो आहे का यावर बारिक लक्ष मात्र ठेवायला हवे.
अमेरिकेतील आदिवासींच्या काही टोळ्यांमधे पुरुष शिकारीला निघताना योग्य दिशा ठरवण्यासाठी भगताला आवाहन करीत. मग भगत आगीमधे शिकार करण्याच्या प्राण्याची (उदा. हरीण) काही हाडे टाकून देई. थोड्या वेळाने ती बाहेर काढून त्यांच्यावरील जळके डाग तपासून योग्य दिशेची शिफारस करी. दिशेबद्दलच्या या सल्ल्यावर लोकांची श्रध्दा असे. त्या सल्ल्यानुसार पुरुष शिकारीला जात. ही रीत कशी टिकली? एक अंदाज असा की शिकार सगळ्याच दिशाना विखरून असते. किंवा काही दिशा उघडच निरुपयोगी असतात. त्या वगळून उरलेल्यांपॆकी कोणतीहि दिशा घरणे सारख्याच फायद्याचे असते. भगत एक यादृच्छिक (रँडम) दिशा सांगतो. गावकऱ्याना श्रध्देमुळे मानसिक शांति, समाधान मिळणे व आशा / उत्साह टिकून राहणे हा फायदा मिळतो.
श्रध्दा या शब्दाच्या विरोधी अर्थाचे शब्द म्हणजे संदेह / संशय / शंका. एखाद्या बाबतीत स्पष्ट, स्वच्छ, भक्कम पुरावा असतो. तेव्हां श्रध्देला स्थान नसते. पुरावा धूसर / अर्धवट असतो तेव्हां अडचण असते. पण तरी वितर्काने (intuition) एखादी कल्पना (hypothesis) मांडली जाते. तिची कठोर तपासणी व त्यासाठी जरुर त्या पुराव्याचे संकलन विज्ञानात अपेक्षित असते. तेथे सतर्क संदेह हीच मनोभूमिका अपेक्षित आहे. पण विज्ञानातही काही बाबी श्रध्देच्याच असतात. पायाभूत गृहीतके (axioms) या प्रकारची आहेत. ती सिध्द करता येत नाहीत. ती स्वयंसिध्द आहेत. असे मानले जाते. निसर्गाच्या घडामोडींमधे काही थोडी सूत्रे (नियम) असतात. हे नियम सर्वत्र लागू पडतात, ते जाणणे शक्य आहे ही श्रध्दाच आहे.
ॠत संस्कृत शब्द असाच प्रकारची श्रध्दा दाखवतो. ॠत पासून आर्त आणि त्यापासून आटा हे शब्द घडले असे दिसते. स्क्रू आणि नट या वस्तूना आटे असतात. त्यामुळे ती एकमेकाशी घट्ट गुंफली जातात. निसर्गाची विविध दालने अशीच गुंफलेली आहेत. ॠत याचा अर्थ ही गुंफण. पाणी वाहणे, सूर्य – चंद्र – नक्षत्रे घट्ट बसणे अशा सगळ्या नियमबध्द गोष्टी म्हणजे ॠत. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ असे ज्ञानदेवानी म्हटले तेव्हां निसर्गव्यवहाराचे यम – नियम प्रतीत झाले असे अभिप्रेत असावे. असे नियम मुळात आहेत हे आपण मानतो. त्याविना आपल्याला अनंत माहिती, संवेदना यांचा अन्वयच लावता येणार नाही. नियमांचे अस्तित्व मानल्यामुळेच त्यांचा शोध घेणे अर्थपूर्ण ठरते. म्हणून ही श्रध्दा आपल्याला बळ देते. कार्यप्रवण करते. श्रध्देचे अंध आणि डोळस असे वर्गीकरण फारसे तर्कसंगत नव्हे. उलट राजीव साने यानी केलेला बंधक आणि मोचक श्रध्दा हा फरक अधिक उदबोधक आहे.
माझी सून बाळंतपणात निर्वेध, सुखरुप मोकळी होवो म्हणून सासू नवस करते. नवसाचा उपयोग होईल ही श्रध्दाच होय. पण देवपूजा केली आता सुनेला इस्पितळ, डॉक्टर, ऒषधे यांची गरज नाही. देवावर हवाला ठेवूया. अशी भावना झाली तर ती श्रध्दा बंधक होते. उलट शक्य ते सर्व करणार आणि उर्वरित गोष्टींसाठी देवाला साकडे घालणार हे धोरण बळ वाढवणारे ठरते. जी श्रध्दा ज्ञानाची पूर्वावस्था आहे तिला डोळस म्हणणे शक्य आहे. उलट विचार सोडून देण्याला उद्युक्त करते तिला आंधळी म्हणता येईल. म्हणून श्रध्दा या मनोव्यवहाराबद्दल सरधोपट तुच्छता वा धि:कार या भावना योग्य नव्हेत.
परमार्थ क्षेत्रामधे स्वर्ग, नरक, मोक्ष अशा बाबी येतात. हा श्रध्देचाच प्रांत. स्वर्ग कोठे आहे? कसा आहे? भगवान बुध्दाने सांगितले की प्रत्येक माणसाला स्वर्गद्वाराची चावी मिळालेली आहे. पण नरकद्वाराला सुध्दा तीच चालते. किंबहुना ही दोन्ही दारे वेगळी नाहीतच. स्वर्ग आणि नरक ही दोन भिन्न क्षेत्रे नव्हेतच. दोन्ही आपल्याच अवस्था आहेत. विश्वाचे सम्यक ज्ञान ज्याला झाले तो स्वर्गात पोचला. अज्ञान, गोंधळ आणि तदजन्य दु:ख भोगणारा नरकयातना अनुभवतो. पुत्रशोकाने वेडीपिशी झालेली एक स्त्री भगवान बुध्दाकडे याचक म्हणून आली. मला मझ्या पुत्राचा जीव परत मिळवून द्या. येवढा चमत्कार माझ्या पदरात टाका. भगवान बुध्दाने सांगितले की मृत्यूची गाठभेट न झालेल्या कुटुंबातून चिमुटभर तीळ मागून आणशील तर हा चमत्कार होऊ शकेल. ती स्त्री दारोदार तीळ मागू लागली. प्रत्येक घरी लोक तिला तीळ देऊ करीत. पण मृत्यूची गाठभेट न होण्याची अट ऎकल्यावर माघार घेत. अखेर स्त्रीच्या डोक्यात प्रकाश पडला. मृत्यूची अपरिहार्यता तिने जाणली.
मोक्षस्य न हि वासो॓ऽस्ति ।
न ग्रामान्तरमेव वा ।
अज्ञान ह्र्दयग्रन्थिनाशो मोक्ष इति रित: ॥
मोक्ष नामक काही वस्ती नाही. परगावही नाही. ह्र्दयातील अज्ञानाच्या गाठी फुटून जाणे यालाच मोक्ष म्हणतात.
चमत्कार खरोखरच घडतात का? धार्मिक वाङमयातील बुध्दीला यातना देणारा भाग म्हणजे चमत्कार. कोणताहि धर्म त्यांच्यापासून मुक्त नसावा. येशू ख्रिस्ताने एक नवा संदेश दिला आणि त्यातून स्फूर्ती घेऊन रंजले गांजले गट एकत्र आले आणि अत्याचारी शासनाविरुध्द निर्भयपणे उभे ठाकले. ही खरी क्रांतिकारी घटना. पण ती जणू पुरेशी नाही म्हणून येशूला चमत्कार चिकटवले गेले. आंधळ्याला त्याने दृष्टी दिली. महारोग्याला क्षणात रोगमुक्त केले. इत्यादि. याच सुमारास लिहिल्या गेलेल्या बॊध्द ग्रंथांमधे सुध्दा चमत्कारांची रेलचेल आहे.
मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम ॥
यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं ।
हा सुध्दा चमत्कारच म्हणायचा. पुराणकथा याचा जवळपास अर्थच चमत्कारांची लयलूट असा होतो. अगदी अलीकडचा शिख धर्म सुध्दा चमत्कारांच्या संसर्गातून सुटला नाही. या धर्माचे अनुयायी आपल्या गुरुंच्या अतिमानवी शक्तीची वर्णने करताना आढळतात. अमुक तमुक गुरुचे मस्तक धडावेगळे झाले तरी धड मुस्लिम फॊज विरुध्द तरवारबाजी करीतच राहिले वगॆरे.
चमत्कार वर्णनांचा वाच्यार्थ न घेता ध्वन्यार्थ घेतला तर ती सह्य होऊ शकतात. किंवा बोधक होतात.
I sought my God,
My God I could not see.
I sought my soul,
My soul eluded me.
I sought my brother
And I found all the three.
हे ख्रिस्ती पारंपारिक वचन एका चमत्काराचेच वर्णन करते.
एकदा डॉ. रजनीकांत आरोळे यानी मला त्यांचा महारोग्यांच्या पुनर्वसन कामातील अनुभव सांगितला. एका खेड्यातील शेतकरी कुटुंबामधे वृध्द पित्याला महारोग झल्याची लक्षणे दिसली. त्याला कुटुंबीयानी घरातून शेतावर हलवले. एका झोपडीत त्याची रहाण्याची व्यवस्था केली. त्याला खाणे व पाणी तेथेच पोचवायचे. कधी विसर पडायचा. तो जवळपास माणसातून उठला. डॉ. आरोळे यानी त्याला ऒषधोपचार सुरु केले. धीर दिला. त्याच्या बरोबर बसून त्याच्याच ताटांतून भाकर खाल्ली. हे ऎकून / पाहून कुटुंबीय वरमले. त्यानी वृध्द पित्याला परत घरात घेतले. कुटुंबीयाना सह्र्दयतेची नवी दृष्टी आली. वृध्द पित्याने एक चमत्कार अनुभवला.
या संदर्भामधे समाजप्रबोधन पत्रिकेच्या ऑक्टोबर – डिसेंबर १९९२ च्या अंकामधील प्र. अशोक केळकर यांचा ‘ भेदविलोपन – एक आकलन ’ हा लेख आवर्जून वाचण्य़ा सारखा आहे. विशेषत: अति मानवी अलॊकिक अनुभवांबद्दल सरधोपटपणे कर्कश विरोधी भूमिका घेणारानी तर त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अत्यंत आधुनिक वृत्तीच्या एका थोर पंडिताने कोणताही अभिनिवेश न बाळगता केलेले हे प्रतिपादन विलक्षण प्रभावी आणि विचारप्रवर्तक आहे.
प्रा. केळकरांचा पहिला मुद्दा असा की इतिहासात विविध संस्कृतींमधे विविध कालखंडात शेकडो हजारो व्यक्तीनी आपल्याला आलेल्या अलॊकिक अनुभवांचे वर्णन केले आहे. ही सर्वच माणसे मूर्ख अथवा खोटारडी होती असे मानणे तर्कविरोधी वाटते. त्याऎवजी अशा अनुभवांचा अन्वय लावण्याचा विज्ञाननिष्ठ प्रयत्न केला पाहिजे. वरील लेख हे केळकरांच्या तश्या प्रयत्नाचे फलित होय.
यानंतरचा टप्पा म्हणजे त्या अनुभवांचे वर्णन, वर्गीकरण व नामकरण. केळकरानी भेदविलोपी असे विशेषण वापरले आहे. आपण आणि बाहेरचे जग यातील भेद संपतो. याचे दोन स्वाभाविक प्रकार. बाहेरच्या जगाचे अस्तित्व विसरुन सर्व अस्तित्व म्हणजे आपणच असे जाणवणे किंवा जगदविलोपी अनुभव. (असा अंशिक अनुभव रतिक्रीडेची परिसीमा, नशा, महत्कार्य संपल्यावेळची कृतकृत्यता इ.) आपले अस्तित्व विसरणे हा आत्मविलोपी अनुभव. (असा अंशत: अनुभव येतो तो संगीत ऎकताना भान हरपून जाते तेव्हां). प्राचीन भारतीय मांडणीमधे जाग, झोप आणि स्वप्न पाहणे यांच्याबरोबर एक चॊथी अवस्था मानलेली आहे. ती भेदविलीपी वाटते. कोणी या अनुभवाला साक्षात्कार मानतात. कोणी समाधी तर कोणी म्हणतात की हा वास्तवापलीकडच्या आदिम तत्वाचा स्पर्श होय. या अनुभवात मी आणि इतर हा फरक संपतो. प्रत्यक्ष आणि परोक्ष हे अंतर जाते. वर्तमान व स्मृत ही सारखीच होतात. संवेदना तीव्र होतात. एका इंद्रीयाला दुसऱ्याचे संवेदन जाणवते. स्वरांना रंग आहे, रंगाना वास आहे असे वाटते. नजरेला कापडाचा पोतसुध्दा कळतो. (आल्डस इक्सले यानी Doors of perception (Between Heaven and Hale) या पुस्तकात तपशीलाने असे अनुभव दिले आहेत.)
काही परंपरांमधे असे अनुभव येण्यासाठी सतत प्रयत्न करतात. उलट काहीजण मानतात की ही जाताजाता आपोआप घडणारी गोष्ट आहे. पण सर्वानाच हे अनुभव हवेहवेसे वाटतात. त्यांची कल्पना सुध्दा हुरहूर, थरार व समाधान देते.
ॠग्वेदाच्या दहाव्या मंडलात सोम पिणारा इंद्र म्हणतो की सर्व जग माझ्या दृष्टीक्षेपात आहे कारण मी सोम प्यालो आहे. हा एक प्रकारच्या दिव्यदृष्टीचा अनुभव आहे.
दोस्तोव्हस्कीच्या The Idiot या कादंबरीत असेच वर्णन येते ‘ अपस्माराचा झटका जागेपणी आला तर त्यापूर्वी एक मिनिट मिळायचे. एक उत्तुंग शांती, एक प्रसन्नता, आनंद यांचा अनुभव यायचा. त्या विलक्षण वाक्याचा (बायबलमधील जॉनच्या साक्षात्कारासंबंधी) अर्थ कळायचा - काळ असा काही रहाणारच नाही.
विल्यम ब्लेकच्या पुढील कवितेत असेच अनुभव परावर्तित दिसतात.
To see a world in a grain of sand
And Heaven in a wild flower
Hold infinity in the palm of your hand
And eternity in an hour.
दीपावली मासिकाच्या १९९३ च्या दिवाळी अंकात ‘बासरीचा नाद ’ या लेखात अनिल अवचट यानी संगीताच्या क्षेत्रातील आपले अनुभव सांगितले आहेत. त्यात आत्मविलोपी आणि जगदविलोपी म्हणता येतील अशी वर्णने आहेत. संवेदनांमधे मोठा बदल झाल्याचे दाखवणारी वर्णने सुध्दा आहेत. त्यातील एक पुढे दिले आहे.
“ गिंड्यानी बासरीच्या भोकावरचं बोट उचललं की त्या भोकातून सूर कारंजासारखा उसळून वर येत होता. मला ती भोकं म्हणजे कधी न संपणारे सुरांचे झरेच वाटू लागले. …. ही उसळती कारंजी थेट माझ्या चेहऱ्यावरच उडत होती. ‘ सुरात न्हाऊन निघाले ’ असं लिहिलं बोललं जातं. पण आज मात्र त्याची प्रचीती आली होती. सुरांचा ओलेपणा काय असतो ते माझ्या त्वचेला कळलं होतं. ”
आणि हे पहा एक जगदविलोपी वर्णन :
“ मी बासरी पिशवीतून काढून हातात घेतली तो बासरीतून अचानक सूर आला … मला मीच डोंगर, मीच प्रकाश, मीच बासरी आणि मीच सूर असं क्षणभर वाटून गेलं. एक वेगळाच गारवा अंगातून वाहून गेला. येताना मी स्कूटर चालवत नव्हतोच. कोणीतरी रस्ता माझ्याखालून ओढून काढून घेत होतं. ”
७०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेला एक चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वर लिखित वाङमय. त्या सागरातील एक मोती पुढीलप्रमाणे आहे :
अवचित परिमळू
झुळकला अळुमाळू ।
मी म्हणे गोपाळू ।
आला गे माय ॥
अनेकाना ईश्वराची अनुभूती अनेक तऱ्हानी आल्याचे उल्लेख दिसतात. पण ईश्वराचा सुगंध घेणारा हा अपवादच दिसतो. असो.
श्रध्दा हा विषय संपविण्यापूर्वी आणखी तीन उदाहरणे बघायची आहेत. पहिले उदाहरण अग्निहोत्र, दुसरे वास्तुशास्त्र आणि तिसरे फलज्योतिष.
अग्निहोत्र
हा आपल्या वॆदिक रिवाजांपॆकी एक. होतृ किंवा होता म्हणजे यज्ञात पुढाकार घेणारा पुरोहित. अग्निहोत्र म्हणजे एखाद्या पुरोहिताने विशिष्ट अग्नि सतत टिकवून ठेवणे.
अग्नी या चीजेला मानवी संस्कृतीमधे फार उच्च स्थान आहे. ग्रीक पुराणातील प्रॉमिथिअसच्या कथेत देव प्रॉमिथिअसवर रागावतात कारण तो माणसाना अग्नी देऊन टाकतो. निसर्गात प्राण्यांच्या दृष्टीने पाहता, आग ही जंगलातील एक क्वचितच घडणारी गोष्ट आहे. तिच्या पासून धोका असतो आणि तिची भीती वाटते. माणसाला कधीतरी जाण आली की या मुळात भितीदायक असलेल्या आगीचा उपयोग करुन घेता येतो. तंत्रज्ञानातील ही एक मोठी झेप. वणवा पेटून संपल्यानंतर आगीत होरपळून मेलेले पण पार कोळसा न झालेले जीव, अन्न गोळा करणाऱ्या माणसाला सापडले असणार. त्यांचे मांस तोडून खाणे सोपे आणि त्याची चव वेगळी व झकास. आंबा, फणस यासारख्या फळांच्या बिया एरवी कठीण म्हणून निरुपयोगी. पण होरपळल्या नंतर फोडण्याला सोप्या आणि रुचकर. यामुळे आग लागलेली दिसल्यानंतर तिचा उपयोग करुन घेणे सुरु झाले असणार. आग अवाक्यात ठेवणे हा पुढचा टप्पा. हवी तेव्हां वाढवा, काम संपल्यावर घटवा. पण जवळ धोडी आग हवी. निखारे राखेखाली झाकले तर खूप वेळ टिकतात. ते वापरुन सुका पाला पाचोळा, काटक्या पेटवायच्या आणि मग मोठ्या फांद्या आत सरकवायच्या. रात्री शेकोटी पेटवून ठेवली तर हिंस्त्र प्राण्यांचा धोका कमी होतो. पण कोणीतरी त्या अग्नीला सतत जळण खाऊ घातले पाहिजे. ती जबाबदारी घेणाराला झोप लागली तर अग्नी अंतर्धान पावू शकतो.
यापुढचा टप्पा म्हणजे अग्नी निर्माण करण्याचे तंत्र. गारेचे दगड एकमेकावर आपटले तर ठिणगी पडते. ती कापसात पकडली तर अग्नी अवतीर्ण होतो. लाकडावर लाकूड घासूनहि त्याला आवाहन करता येते. पण या गोष्टी थोड्या जिकीरीच्या आहेत. अग्नी जतन करणे सर्वात सोयीचे.
अग्निहोत्राची परंपरा रुजण्यामागे हा तर्काने मांडलेला इतिहास असावा. ॠग्वेदाची सुरुवातच ‘ ओम अग्निमीळे पुरोहितम … ’ अशी आहे. आज या सर्वाचे व्यावहारिक महत्व संपले आहे. (सांस्कृतिक महत्व जरुर आहे). कारण आपण अग्नीला काड्यापेटीत छान पकडून ठेवले आहे. तरीपण काही लोकाना अग्निहोत्राचे महत्व वाटते. अग्निहोत्रावर त्यांची श्रध्दा असते. अमुक घर अग्निहोत्राने पवित्र केले आहे अशी भाषा असते. लोहाराच्या भट्टीला, हॉटेलच्या भटारखान्यातील चुलीला वा तंदूरला अशी पवित्रता कोणी चिकटवीत नाही. यज्ञयागादि कर्मकांडात वापरलेल्या अग्नीमधे काहीतरी ‘ खास ’ असणार अशी भावना असावी. अग्निहोत्रामुळे रोग जातात, हवा शुध्द होते असेहि बोलले जाते. सामान्यपणे हे सर्व बोलणे काल्पनिक असते. प्रत्यक्ष प्रयोग किंवा मापन झालेले नसते.
आधुनिक जीवशास्त्राच्या इतिहासात Vitalist विरुध्द Mechanist असा मोठा वाद दोन शतकांपूर्वी झाला. Vitalist म्हणत की सजीवांमधे काहीतरी खास शक्ती असते. ती निर्जीवांमधे नसते. म्हणून निर्जीव सृष्टीतील रसायनशास्त्राचे नियम सजीवांना लागू होणार नाहीत. साखरेपासून ऊर्जा हवी असेल तर साखर जाळावी लागते. त्यासाठी तपमान फार उच्च हवे. ही क्रिया सजीवांच्या शरीरात फार कमी तपमानाला होते. कारण काय? सजीवांची खास शक्ती. Mechanist म्हणत की सर्व सृष्टीला तेच नियम लागू व्हावेत. पुढे हे म्हणणे खरे ठरले. सजीवांच्या शरीरात hormones सारखी खास रसायने असतात. त्यांच्या प्रभावामुळे प्रक्रिया कमी तपमानाला होतात. ही रसायने सजीव शरीराबाहेर प्रयोगशाळेमधे परीक्षा नळीत ही तेच काम करुन दाखवितात.
अग्निहोत्रातील अग्नी आणि बल्लवाच्या चुलीतील अग्नी एकच आहेत हे विधान mechanist वळणाचे होईल तर अग्निहोत्रात खास शक्ती आहे हे विधान vitalist परंपरेचे होईल. प्रत्यक्ष प्रयोगात mechanist वळणच सिध्द होते. असे भाकित करता येईल की अग्निहोत्रावरील श्रध्दा ही मुख्यत: धार्मिक कर्मकांड करणाऱ्या गटामधे आणि त्यांच्याशी जवळीक असणारांमधेच शिल्लक असावी.
वास्तुशास्त्र
गेल्या काही वर्षात आपल्याकडे वास्तुशास्त्रावर आधारित गृह आणि वास्तुरचना करण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. वास्तुशिल्पी (आर्किटेक्ट) मंडळी हेच करत असतात. म्हणजेच वापराची उपयुक्तता, सॊंदर्य, प्रचलित कायदे व नियम इत्यादींचा विचार करुन मर्यादित खर्चात वास्तुरचना कशी करावी हे सांगतात. त्यामागचा विचार, वापरलेले निकष हे सर्वज्ञात असतात. घराला पुरेशा खिडक्या हव्यात पण फार नको. पूर्वेला ऊन / उजेड आत येण्यास अवसर हवा तर पश्चिमेच्या वाऱ्याला वाट हवी इत्यादि. वास्तुशास्त्रातहि शिफारशी असतात. अष्टदिशांच्या आठ देवता कल्पिल्या आहेत. त्यांचा या शिफारशींबरोबर संबंध असतो. अग्नेय दिशेला चूल हवी, वगॆरे. पण त्यामागची कारणमीमांसा गूढ असते. ती फक्त तज्ञानाच समजते. घर बांधू इच्छिणाऱ्या सामान्य माणसाला असे सांगितले जाते की अमुक दिशेला तमुक असल्यास ते ‘ लाभते ’. असे का याला स्वच्छ उत्तर नसते. एखादी भिंत, एखादा दरवाजा, एखादी सबंद इमारत सुध्दा ‘न लाभणारी ’ होऊ शकतात. म्हणजे ती मोडून टाकून वास्तुशास्त्र तज्ञाच्या शिफारशीनुसार अन्य काही प्रकारचे बांधकाम केले पाहिजे. त्यामुळे मालकाची एकंदर गृहस्थिती सुधारेल.
या तज्ञाना मोठ्या रकमा देऊन बोलावणी केली जातात. त्यानी सांगितले म्हणून भक्कम बांधकामे तोडल्याचे प्रकार मी पाहिले आहेत. आमच्या सोसायटीत एका गृहस्थानी बंगला बांधताना वास्तुशास्त्राच्या शिफारशीनुसार फाटक पूर्वेला करण्याचे योजले. सोयी गॆरसोयीच्या मुद्यावरून शेजाऱ्यानी व सोसायटीने याला हरकत घेतली व दक्षिणेला प्रशस्त रस्ता आहे तेथे फाटक घेण्यास सांगितले. या गृहस्थानी हट्टाने आपलेच म्हणणे खरे केले. आता प्रकरण न्यायालयात गेले आहे.
तथाकथित वास्तुशास्त्रातील शिफारशीना विज्ञान वा अन्य विद्येतील आधार नाही. ही अंधश्रध्दा आहे. किंवा बंधक श्रध्दा आहे. सारासार विचार, सॊजन्य, सहकार्य यांच्यावर वास्तुशास्त्र शिफारशीना कुरघोडी करु देणे हे घातक आहे. वास्तुशास्त्राच्या प्रसाराला अडवण्याच्या प्रयत्नंची अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून सुरुवात झाली आहे असे समजते.
फलज्योतिष
याचे विविध प्रकार आहेत. त्यापॆकी जन्मकुंडली वरुन भविष्य वाचन आणि हस्तरेषांवरुन भविष्य वाचन हे दोन प्रकार जास्त लोकप्रिय आहेत. पहिल्या प्रकारात प्रथम जन्मवेळेवरुन कुंडली मांडावी लागते. त्यासाठी विविध ग्रहांची स्थाने ठरवावी लागतात. हा तर ज्योतिर्विद्या (astronomy) चा भाग झाला. नंतर कुंडलीवरुन भविष्य सांगायचे. ग्रहताऱ्यांची स्थाने आणि माणसांच्या जीवनातील घटना यांचा अन्योन्य संबंध आहे. इतकेच नव्हे तर ग्रहांचा घटनांवर प्रभाव पडतो असे येथे गृहीत असते. इथे कल्पना अशी की पृथ्वी केंद्रभागी असून सप्तग्रह तिच्याभोवती फेर धरतात. हे चूक आहे असे सिध्द झाल्याला शेकडो वर्षे लोटली. कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन यानी या कल्पनेची केव्हांच वासलात लावली. पण आम्हाला त्याचा पत्ता नाही. सूर्यमंडलाच्या पलीकडले विश्व तर आम्हाला पूर्ण अज्ञात. त्याचे अस्तित्वच ठाऊक नाही. आमच्या संकल्पनेत मनुष्य हे केंद्र. सूर्य, चंद्र महत्वाचे का तर दिवसा आणि रात्री त्यांचे प्रभुत्व म्हणून. मंगळ लाल दिसतो म्हणून भांडखोर. लढाईबहाद्दर. शनि हा गूढ कारण त्याच्या भोवती आणि पलीकडे काय आहे हे कळत नाही. धूमकेतू अशुभ कारण त्याचे अनियमित वाटावे असे येणे जाणे. आमच्या पंचांगात दक्षिणायन, उत्तरायण, नवरात्र असे सूर्य कर्क, मकर वा विषुववृत्ताला स्पर्श करतो तेव्हांचे पुण्यकाळ दिलेले असतात. ते सुमारे २१ दिवसानी चुकलेले असतात असे खगोल शास्त्रज्ञ राजेश कोचर यानी ६-७-१९९६ च्या टाइम्स ऑफ इंडियामधील लेखात म्हटले आहे. पारंपारिक पंचांगातील हिशोब थोडे चुकलेले असतात आणि शेकडो वर्षे या चुका साचत आज २१ दिवसांचे अंतर पडले आहे. मग भविष्य बरोबर कसे येणार? असो.
कुंडलीवरून असो वा हस्तरेषेवरुन, भविष्य सांगण्याचे तंत्र विज्ञानाला धरून नाही. याच्या ठोकताळ्यामागे पुरेसा ठोस पुरावा नाही. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता पुरावा दोन टप्प्यात असतो. पहिला टप्पा सहवास किंवा एकत्र येणे. उदा. जे लोक धूम्रपान करतात त्यांच्यात फुप्फुसांच्या कर्क रोगाचे प्रमाण जास्त आहे (धूम्रपान न करणारांच्या तुलनेने). हा पुरावा गोळा झाला की धोक्याचा इशारा देता येतो. दुसरा आणि निर्णायक टप्पा म्हणजे तंबाखू कर्करोग होण्याला कशी मदत करते याचे विवरण.
याचे अनुकरण करायचे तर प्रथम ज्यांच्या हातावरील तथाकथित आयुष्यरेषा जास्त लांब असते ते अधिक वर्षे जगतात असा पुरावा गोळा व्हायला हवा. नंतर हस्तरेषेचा आयुर्मानाशी संबंध का असावा याचे विवरण द्यायला हवे. मंगळ असलेली मुलगी आणि मंगळ नसलेला मुलगा यांचे लग्न झाल्यास एर्वीपेक्षा जास्त खडतर संसार होतो असे दिसायला हवे. त्यानंतर प्रश्न येतो की असे का होते. आज असे पुरावे उपलब्ध नाहीत वा ते गोळा करण्याचा प्रयत्नहि दिसत नाही.
असा प्रयत्न ज्योतिषावर विश्वास न ठेवणाऱ्या कॆ. वि. म. दांडेकर या अर्थतज्ञानी केला. त्यानी अनेक कुंडल्या गोळा केल्या. त्या त्या व्य्क्तींची माहिती गोळा केली. या दोन्हीचा सहसंबंध शोधण्याची थोडीबहुत खटपट केली. हे सर्व संशोधन साहित्य त्यांच्या वारसांकडे कदाचित अजूनही असेल. पण या प्रयत्नाना ज्योतिषी मंडळींचे पाठबळ मुळीच मिळाले नाही.
ज्योतिष हे विज्ञान आहे का? विज्ञानात प्रयोगप्रमाण्य आणि विशिष्ट तर्क पध्दती ही केंद्रस्थानी असतात. अनुमान हे त्यांच्या पोटी जन्माला येते. ही विचारपध्दती सतत घासून पुसून लख्ख ठेवायची आणि ती वापरुन निसर्गातील विविध विभ्रमांचे आपापसातील संबंध शोधायचे, सूत्ररुपाने निसर्गव्यवहार नियम ओळखायचे असा खेळ असतो. कोणी एक सिध्दान्त मांडला बाकी सर्वजण त्याची कठोर तपासणी आरंभतात. सिध्दान्ताचे आयुष्य किती? त्याच्या विरुध्द एखादे उदाहरण सापडेपर्यंत. सिध्दान्ताच्या बाबतीत खंडनाची स्वच्छ शक्यता असली पाहिजे (falsifiability) अशी कार्ल पॉपर या तत्वज्ञाची शिकवण आज सर्वमान्य आहे. खंडन हे पक्के, मंडन किंवा पुष्टी ही तात्पुरती. ज्योतिषात हे दिसत नाही. एक अंदाज चुकला तर त्याला दुसरी सबब द्यायची असा प्रकार चालू रहातो. तेव्हां ज्योतिष हे विज्ञान नसून करमणूक आहे. फलज्योतिषाच्या नादामुळे पूर्वी लोकानी खगोल विद्येचा अभ्यास केला हा एक फायदा आणि आज निदान काहीजणाना भविष्य ऎकून मानसिक समाधान मिळत असावे. पण भगत व मांत्रिकाच्या बाबतीत ज्या मर्यादा वर सांगितल्या त्या इथेसुध्दा लागू आहेत.
श्रध्देच्या नावाखाली तद्दन चुकीच्या गोष्टी समाजात टिकून कशा राहू शकतात याची दोन ऎतिहासिक उदाहरणे पाहू. पहिले गॅलिलिओचे. गॅलिलिओ, केप्लर, कोपर्निकस अशा विद्वानांच्या अभ्यासातून पृथ्वी, सूर्य, ग्रहमंडल यांचे वास्तव ज्ञान युरोपीय समाजाला मध्ययुगात उपलब्ध झाले. पण त्यातून चर्च आणि पोप या सत्ताकेंद्राना धोका वाटू लागला. त्यातून बायबलविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरुन शास्त्रज्ञांचा छळ सुरु झाला. या शास्त्रज्ञाना सरळ मारुन टाकले तर त्यांची मते अधिकच लोकप्रिय होतील असे सत्ताधीशाना वाटले असावे. म्हणून शास्त्रज्ञानी आपली ‘ चूक ’ कबूल करावी अशी मागणी येत राहिली. अखेर गॅलिलिओला पोपसमोर ‘ कबुली ’ द्यावी लागली.
‘ मी, गॅलिलिओ, वयाच्या सत्तराव्या वर्षी, तुरुंगवासात, गुडघे टेकून, आपणा सर्व महान धर्मगुरुंसमोर, बायबलला साक्षी ठेवून, त्याच्यावर हात ठेवून ‘पृथ्वी फिरते’ या चुकीच्या आणि पाखंडी समजुतीचा त्याग करतो. ’
असे म्हणतात की या कबुली जबाबानंतर गॅलिलिओला पोपच्या दरबारातून बाहेर नेले जात असताना तो पुटपुटत होता की मी कितीहि कबुली दिली तरी जे वास्तव आहे ते बदलेल काय?
दुसरे उदाहरण मध्ययुगीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्ताचे. आकराव्या शतकात अलबरुनी या अरब प्रवाशाने भारताबद्दल एक विलक्षण नोंद लिहून ठेवली. तो म्हणतो ‘ भारतीय तज्ञाना हे ठाऊक आहे की चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीची चंद्रावर छाया आणि सूर्यग्रहण म्हणजे चंद्र सूर्याच्या आड येणे. असे सर्व पांडित्य असूनहि ग्रहणकाळामधे स्नान,संध्या, पूजा, अर्चा करणे हा प्रकार बोकाळलेला होता. ते तसे निरर्थक आहे. त्यातून खास पुण्य मिळण्याचा प्रश्नच नाही. हे ठामपणे सांगण्याचा ब्रह्मगुप्तासारख्या विद्वानाना सुध्दा धीर होत नसे. असे का व्हावे? अल्बरुनीची अटकळ अशी की रुढीची पकड जनमनावर जबरदस्त असल्यामुळे रुढीच्या विरोधात जाणे सर्वानाच धोक्याचे वाटत असावे.
पशूबळी
नवस बोलणे आणि नवस फेडणे ही अनेकांच्या कॊटुंबिक जीवनातील एक नित्याची बाब असते. आपल्या स्वार्थासाठी ऊठसूट परमेश्वराला साकडे घालण्याच्या वृत्तीबद्दल संतानी नापसंती दाखवली आहे. एकनाथानी लोकांच्या क्षुद्र आणि क्षुल्लक नवसांची टवाळी करण्यासाठी एक भारुडच लिहिले.
सत्वर पाव ग मल्ल भवानी आई, रोडगा वाहिन तुला ।
नणदेचं कारटं किरकिर करत खरुज होऊ दे त्याला ।
सासरा माझा गावी गेला संपव तिकडच त्याला ॥
तुकाराम महाराजानी सांगितले,
देवाचिया चाडे देव आळवावा ।
व्यावहारिक लाभासाठी नव्हे तर आत्मानंद, आत्मोन्नती यासाठी भक्ती करावी.
ज्ञानदेवानी कोणता नवस केला?
नवसी ये नवसी ये माझे नवसी ये वो ।
पंढरीचे दॆवते विठ्ठले नवसी ये वो ।
बापरखुमादेवीवरु विठ्ठले वो ।
चित्त चॆतन्य चोरुनी नेले वो ॥
ज्ञानदेवांचा नवस हा की विठ्ठलाच्या प्रेमात व रुपात मन रंगून जावे.
हे सर्व ठीक आहे. पण सामान्य माणसाला घरगुती अडचणींच्या वेळी देव आठवतो आणि त्याच्या कृपेची मागणी करावी असे वाटते. त्यातून मनाला आधार मिळतो.
नवसाचा एक भीषण प्रकार म्हणजे पशूबळी. अनेक मागासजातींमधे हि प्रथा आहे. “ ऎसा कॆसा देव, घेतो बकऱ्याचा जीव ” असे संतानी कळवळून सांगितले. संत गाडगेबाबा मरेपर्यंत पशूबळीविरुध्द प्रचार करीत राहिले. तरीसुध्दा ही प्रथा अजून जोरात आहे.
धार्मिक यात्रांमधे मोठ्या संख्येने पशूहत्या होते. गरीब बहुजनसमाज तेथे मोठ्या संख्येने असतो. रक्ताचे पाट वाहतात. ते रक्त मातीत मिसळून चिखल होतो. पुरेसे पाणी नसते. अस्वच्छतेचा कळस असतो. देवळे बरेचदा उघड्या माळावर असतात. सावलीचा पत्ता नसतो. धूळ उडत असते. सर्वत्र दुर्गंधी पसरते. असल्या ठिकाणच्या प्रसादामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका खूपच असतो. मग पुन्हा देवाला नवस.
या रिवाजामुळे गरीब माणूस अधिक गरीब होतो. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे ५ हजार जत्रा भरतात. जत्रेत सरासरी १०० बोकड मारले जातात. म्हणजे संख्या ५ लाख. बोकडाची किंमत, ने-आण व अन्य खर्च धरुन बोकडबळीचा खर्च सुमरे २००० रुपये होतो. हे अंदाज योग्य असतील तर प्रतिवर्षी खर्च होते. गरीब माणसासाठी रु. २०००/- ही रक्कम म्हणजे महिन्या-दीड महिन्याची कमाई असते. या खर्चासाठी कर्ज काढले जाते. त्यावरचे व्याज पठाणी असते. कर्ज फिटेपर्यंत पुढच्या नवसाची वेळ येते हीच रक्कम भांडवल म्हणून वापरुन धंदा झाला. घरच्यांसाठी जेवण, कपडा, आरोग्य, शिक्षण यावर खर्च झाली तर जास्त उपयुक्त ठरेल. तेव्हां पुरणपोळीचा पारंपारिक नॆवेद्य दाखव्णे हा बदल सर्वांच्या हिताचा आहे. कर्नाटक, आंध्र, गुजराथ, या राज्यांमधे सार्वजनिक ठिकाणी देवाच्या नावाने पशूहत्या करण्यास बंदी आहे. असा कायदा महाराष्ट्रात व्हायला हवा. त्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समिती कॊतुकास्पद प्रयत्न करीत आहे. याची काही उदाहरणे पाहू.
चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा, उस्मानाबाद येथे, माघ पॊर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी महालक्ष्मीची जत्रा भरते. एका अंदाजानुसार या जत्रेत २५ हजार प्राणी बळी दिले जातात. १९९१ साली अनिस कार्यकर्ते आणि इतर समविचारी मंडळी यानी गावोगाव मिरवणुका काढल्या, सभा घेतल्या. ठराविक जागा वगळता अन्यत्र पशू हत्येस मनाई असा फलक पोलिसानी लावला. कार्यकर्त्यानी वाटेवरच प्राणी अडवले. बळी दिलेल्या प्राण्याना खायला रात्री भुते येतात अशी समजूत आहे. कार्यकर्त्यानी रात्र जागून काढली. भुते आली नाहीत. अनिस विरोधकानी कार्यकर्त्याना मारहाण केली. वाहनांच्या काचा फोडल्या इत्यादि. पण पुढच्या वर्षी बळी देणे थांबले. सोबत दारु वगॆरे बेकायदा धंदे कमी झाले. त्याबद्दल महिलानी समाधान व्यक्त केले. पण धंदा बुडालेलेल व्यावसायिक व बळी दिलेच पाहिजेत अशा मताचे सनातनी हे नाराज झाले.
बादोले बुद्रुक, तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर तेथे वर्षाआड एप्रिल महिन्यात नागनाथ सिदोबाची यात्रा असते. येथे नवसाचे सुमारे ५०० बकरे कापले जात. साप चावला तर देवळाजवळच्या निंबाचा पाला आणि देवाचे तीर्थ यांचा उपाय करणे प्रचलित होते. विषाचा प्रभाव उतरला तर १ ते ५ बकरे कापून नवसफेड
होत असे. याविरुध्द अनिसने प्रचार केला. पोलिसानी बंदी घातली. पशूबळी थांबले. गावच्या सरपंचाच्या मुलास सर्पदंश झाला होता. त्याची नवसफेड करायची भोती. सरपंचानी जुनी रीत सोडली आणि सिदोबाच्या फरशीसाठी दोन हजार एक रुपयांची देणगी जाहीर केली.
मॊजे पाचुंदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील बाबीर बाबा यात्रेत पशूबळी दिले जात. तेथील काशीनाथ भगत प्रसिध्द होता. १९९३ साली समितीने पोलिस, स्थानिक मंडळी वगॆरेंच्या मदतीने बळी बंद केले. नोव्हेंबर १९९३ मधे काशीनाथ भगत याने नेवासा दिवाणी न्यायालयात अनिस विरुध्द मनाई हुकूम मागणारा दावा दाखल केला. अनिसने २२ मुद्यांचे उत्तर दिले. त्यापॆकी काही पुढील प्रमाणे : (१) अंधश्रध्देच्या प्रभावाखाली चाललेल्या पशूबळी प्रथेमुळे देशातील पशूधन घटत आहे. (२) पशूबळीला धर्माचा आधार नसून अनेक पंथानी त्या प्रथेचा निषेधच केला आहे. (३) पाय तोडून कातडी सोलून क्रूरपणे पशू मारले जातात. प्राणीक्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये हा दखलपात्र गुन्हा आहे. (४) देवाचा कॊल सांगणे ही फसवणूक आहे. ती थांबवण्यासाठी अनिस प्रबोधन कार्य करते. असे प्रबोधन कार्य करण्याचा समितीला हक्क आहे.
समितीची वकिली तयारी पाहून भगताने पाऊल मागे घेतले.
अर्थात नेहमीच यश येते असे नव्हे.
या प्रकरणात अभिप्रेत नियम :
१. घर हे उपलब्ध साधने वापरुन आपापल्या गरजा भागण्यासाठी बांधले जाते.
२. शरीरधर्म ही गरज आहे. ती भागवण्याचे विविध मार्ग शक्य आहेत. त्यापॆकी आरोग्याला धोकादायक मार्ग टाळले पाहिजेत. पारंपारिक पध्दती या पारंपारिक अडचणींवर मात करण्यास पुरेशा असतात.
३. समाजाला आवश्यक न वाटलेल्या बाबी, बाहेरुन मदत मिळाली तरी, रुजत नाहीत.
४. (अ) एकत्र कुटुंब पध्दतीत काही अडचणी आहेत. परंतु सर्व वयाच्या स्त्रीपुरुषांच्या शारिरिक व भावनिक गरजा त्या पध्दतीत चांगल्या भागवल्या जातात.
(ब) आर्थिक / व्यावसायिक सोय असेल तेव्हां एकत्र कुटुंब टिकते. एरवी भंगते. शेतकरी समाजात एकत्र कुटुंबापासून जास्त फायदा होतो.
५. अशा व्यवस्थेत बरेचदा स्त्रीवर अन्याय होतो. तो टाळण्यासाठी समाजजागृतीचे सततचे प्रयत्न आवश्यक आहेत.
६. श्रध्दा ही कॊटुंबिक जीवनातील एक प्रभावशाली शक्ती आहे. ती सुखसंवर्धन करु शकते तशीच दु:खाला कारणीभूत होऊ शकते. श्रध्देचे अनेक पदर समजावून घेणे गरजेचे आहे. अंधश्रध्देमुळे होणारी इजा टाळण्यसाठी स्वयंसेवी संस्था उपयुक्त कार्य करु शकतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment