Thursday, April 29, 2010

Chapter 6: Human settlements

Human Settlements
प्रकरण ८

मोहेंजोदारो ते मुंबई

या प्रकरणात आपण माणसांच्या वस्त्यांचा विचार करणार आहोत. आदिकालापासून मानव हा एक कुटुंबवत्सल प्राणी आहे. कुटुंबेसुध्दा एकमेकांच्या आधाराने, सोबतीने जगत. अनेक कुटुंबांची मिळून होते टोळी किंवा तांडा. आदिमानवाच्या टोळ्या भटक्या असत. एके ठिकाणी रहावे. तेथे पाणी, चारा वैरण, शिकार अशा कशाची चणचण वाटू लागली की मुक्काम हालवावा अशी जीवनरीत होती. या टोळीतील माणसांची संख्या मर्यादित हवी. नाहीतर पडाव फार लवकर हालवावा लागतो. कारण आसपासच्या वस्तू लवकर संपतात. माणसे मर्यादित अंतरातच जा-ये करु शकतात. टोळीमधील संख्या दहा-वीस पासून दीड-दोनशे पर्यंत असावी. कारण अशा पध्दतीने जगणाऱ्या आजच्या आदिवासींमधे टोळीतील संख्या साधारण याच मर्यादांमधे आढळते. माकडांच्या टोळ्या सुध्दा इतपतच मोठ्या दिसतात. टोळी फार मोठी झाली तर फुटते. माणसांची आणि माकडांची सुध्दा.

स्थलांतर ही काही सुखाची गोष्ट नव्हे. शक्य असेल तर टोळी एकाच जागी राहून कालक्रमणा करेल. दुसरीकडे जाण्याचे कष्ट, तेथील परिस्थितीची नीट ओळख करुन घेण्याचा खटाटोप, सगळेच टळेल. पण एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी शिकार, पाणी अशा सगळ्या सोयींची रेलचेल हवी. फार उत्तम मासेमारी चालल्यामुळे तेवढ्या भरवशावर लोक त्याच ठिकाणी स्थिर राहू लागले अशा घटना ज्ञात आहेत. पण सर्वसाधारणपणे शिकारी समाजाला स्थिर जीवन शक्य नसते.
स्थैर्य येते ते शेतीतून
नांदेड जिल्हातील मुखेडच्या आसपास बंजारा जमातीचे मूळचे भटके लोक स्थिरावले आहेत. त्यांच्या वस्त्यांना अजूनही तांडे असेच म्हणतात. ग्राम या संस्कृत शब्दाचा मूळ अर्थ टोळी. ही बहुदा नात्यातील कुटुंबे असावीत. यांच्या प्रमुखाला म्हणत ग्रामाणी. आपली खिल्लारे सांभाळून भटकत ही टोळी काल व्यतीत करे. उन्हाळ्यात पाण्याजवळपास, चारा मिळेल अशा जागी मुक्काम तर पावसाळ्यात पूर, ओल यांपासून दूर जरा कोरड्या भागात जायचे. प्रवास करणाऱ्या दोन टोळ्या (ग्राम) समोरासमोर आल्या तर काय होणार? त्याला समग्राम किंवा संग्राम असा शब्द. अर्थात समाईक शत्रू किंवा संकट परतवण्यासाठी सुध्दा टोळ्या एकत्र येत असतील.
(पुण्याजवळ कार्ले येथील लेण्यात तेराव्या खांबावरील कोरीव लेखात व्यापाऱ्यांच्या संघटना या अर्थाने वणीयगाम असा शब्द वापरला आहे. यावरुन दिसते की बुध्दकाळात गाम/ ग्राम म्हणजे गट/ टोळी असाच अर्थ होता.)
शेतीचा पहिल टप्पा म्हणजे झूम, पेंदा किंवा Shifting cultivation या नावाने ओळखली जाणारी अस्थिर शेती. एका जागी झाडोरा तोडून जाळणे, त्या जमिनीवर पेरणी. दोन तीन वर्षात जमिनीचा कस घटतो आणि पीक घेणे फायद्याचे रहात नाही. मग दुसरी जागा धुंडावी. या पध्दतीत एका जागी काही वर्षे रहाणे जमते. पण कायम स्थिर वस्ती शक्य नसते.
अखेर स्थिर शेती सुरु होते. तीच जमीन वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या कसायची. म्हणून तेथे कायम रहायचे. पण शब्द जुनाच. ग्राम. यथाकाल ग्राम या शब्दाला जरा वेगळा आणि नेमका अर्थ आला.
तथाशूद्रजनप्रायाः सुसमृध्द् कृषीवलाः।
क्षेत्रोपभोगभूमध्ये वमतिर्ग्रामसंज्ञिता॥
मात्तबर शेतकरी आणि बरेच कामकरी, वहिताला योग्य जमीन अशा वस्तीला ग्राम म्हणतात.
स्थिर शेतीमुळे टोळ्यांचे रुपांतर कायमची स्थिर वस्ती/ ग्राम/ खेडे य अवस्थेमधे होते. शेती हा खेडुतांच्या उपजीविकेचा मार्ग आणि शेती हाच राजसत्तेच्या भरभराटीचा स्त्रोत. प्रजाजनांची संख्या वाढली. त्यांची शेती वाढली की कराचे उत्पन्न वाढणार. मनुस्मृति म्हणते ‘धान्यानामष्टमो भागः, षष्टो, द्वादश एव वा आददीत’. उत्पन्नाचा सहावा/आठवा/बारावा भाग राजाचा कर.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रामधे एका भक्कम शासनयंत्रणेचे वर्णन येते. ही यंत्रणा वाढत्या लोकसंख्येला नवी जमीन शेतीखाली आणण्यास मदत करे. अशा जमिनीला ‘सीता’ जमिनी असे म्हणत. या जमिनी कसणाऱ्यांसाठी नवी खेडी वसवली जात. सरकरी मदत अर्थातच फुकट नव्हती. या जमिनींवर कष्टाळूपणे आणि हुशारीने शेती करुन राज्याच्या खजिन्यात भरपूर कर भरणा करणे अपेक्षित असे. अल्पसंतुष्ट मंडळींना शासनयंत्रणेचा रोष पत्करावा लागे. कोणी हरी हरी करीत बसतो म्हणेल, कोणी सन्यास घेण्याची इच्छा धरेल तर त्याला मान्यता नव्हती. येवढेच नव्हे तर या ग्रामस्थांना कोणी निवृत्ती / परमार्थ यांची शिकवण देईल, गाण्या बजावण्यात गुंग करेल तर शेतीकडे दुर्लक्ष होईल म्हणून अशा मंडळींना या गावांकडे जाण्यास बंदी होती.
खजिन्यात भरपूर भरणा व्हायचा असेल तर प्रजेवर बारीक नजर हवी. ते काम गावातील गोप नामक अधिकाऱ्याकडे असे. त्याने करदात्यांच्या घरांना वेगळे क्रमांक द्यावेत. शेतकरी, गुराखी, व्यापारी, कारागीर, मजूर, गुलाम, जनावरे इत्यादींच्य संख्यांची नोंद ठेवावी.
प्रत्येक कुटुंबाकडून सोने, नाणे, कर, दंड, वेठबिगार वगैरे रुपात खजिन्यासाठी काय मिळू शकेल याचा अंदाज बांधावा. ती माहिती ‘स्थानिक’ नामक वरिष्ठाकडे पोचवावी. गुप्तचराने तिची फेरचाचपणी करावी. अशी यंत्रणा होती. असो.
गेल्या हजारो वर्षात, इतिहासाच्या अनेक पर्वातून ग्रामे किंवा खेडी वसत, घडत, बदलत गेली. आजचे त्यांचे रुप हे या सर्व स्थित्यंतरांचे प्रतिबिंब आहे. आपण गावरचनेची ओळख करुन घेण्यासाठी गावांसंबंधात येणारे विविध शब्द समजावून घेऊ. एखादा शब्द आजच्या संदर्भात गैरलागू वा असभ्य वाटला तरी बिचकता कामा नये. ते त्या त्या काळातील वास्तव होते. त्याची जाण हवी. आपल्या पसंती / नापसंतीचा येथे अडसर होता कामा नये.
खंडणे म्हणजे जमीन कसणे. शेती करणे. खेडुत म्हणजे शेती करणारा. खेडुतांची वस्ती म्हणजे खेडे.
कस्बा म्हणजे जरा मोठे गाव. हा शब्द मोगल राजवटीत आला. कसब म्हणजे कला किंवा हुन्नर. कसबी काम, व्यापार वगैरे करणारी माणसे कस्ब्यात जास्त. मौजे म्हणजे छोटे खेडे आणि बुद्रुक म्हणजे त्याची आणखी छोटी आवृत्ती किंवा धाकटी पाती. पांढरी म्हणजे गावठाण / ग्रामस्थान. गावठाणात काय धरायचे घरे, रस्ते, देऊळ इत्यादि. गावठाणात रहायचे आणि शेतावर खपायचे. गावठाणापासून शेत फार लांब असेल तर येरझारा वेळखाऊ आणि त्रासदायक होतो. तो टाळण्यासाठी वा अन्य कारणाने माणसे शेतावरच मुक्काम करु लागतात. हळूहळू ५ – १० घरांचे छोटे गावठाण तयार होते. हिला म्हणायचे वाडी. पर + आलय म्हणजे दुसरे घर (किंवा शेतावरचे घर). त्याचे एक रुप पडाळ. त्यावरुन पाडा हा शब्द वाडीला पर्यायी म्हणून आला असावा. या उपवस्त्या. मूळ गाव ही मुख्य वस्ती. तिला पांढरी का म्हणतात? हा शब्द येण्याची कारणे दोन. एक तर गावाचे दोन मुख्य भाग म्हणजे वस्ती आणि शेती. देशावर शेतीची माती काळी. म्हणून ती काळी आई. त्याउलट वस्ती म्हणून ती पांढरी. दुसरे कारण म्हणजे वस्तीच्या व्यवहारांमुळे जमिनीवर ज्या नाना चीजा टाकल्या जातात त्यांच्यामुळे मातीचा काळा रंग निवळतो. उठून गेलेल्या गावठाणाकडे आभाळातून पाहिले तर मातीचा रंग डोळ्याला जाणवण्याइतका बदललेला आढळतो. यावरुन आलेला शब्द म्हणजे पांढरपेशा. ज्यांचा पेशा पांढरीत राहून करता येतो ते पांढरपेशे.
वस्ती वगळून अन्य सर्व जमिनीला शब्द शिवार. त्यात शेते, चराऊ राने, नद्या, नाले, स्मशान, माळ सर्व आले. शेते, घरे यांची मालकी वैयक्तिक वा कुटुंबाची. चराऊ राने / गायराने ही समाइक मालकीची. मालकीला जुना शब्द मिरास. मालकाकडून जमीन उसनी घेऊन कसणारे ते कूळ. कुळाला जुना शब्द उपरी. मिरासादारांचा गावातील दर्जा वरचा. गावसभेत मिरासदारांना महत्व. उपऱ्यांनी फक्त ऎकायचे.
पाटील आणि कुलकर्णी हे गावचे अधिकारी. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात अक्षपटल असा शब्द आहे. गावातील करवसुलीची नोंद ठेवण्याची जागा असा त्याचा अर्थ. अक्षपटलिक हा तेथील अधिकारी. पाटील हा शब्द त्यावरुन आला असावा. जोतिबा फुले यांनी या शब्दाची अन्य व्युत्पत्ती दिली आहे. ‘शेतकऱ्यांचा आसूड’ य पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात ते म्हणतात ‘(गावातील) वादविवाद मिटेनात तेव्हां …….. सालस गृहस्थांनी आपापले सामानसुमान व तान्ही मुले पाट्यात घालून ………दूर गावे वसवल. …….त्या त्या ……गृहस्थास लोक पाटील …..म्हणून त्यांच्या आज्ञेत वागू लागले.’ हा तर्क बरोबर वाटत नाही.
कुलकर्णी या शब्दाचे मूळ रुप ‘कुलकरणिक’ हे होते. हा शब्द हजार वर्षापूर्वीच्या शीलालेखातही येतो. याचा अर्थ गावाच्या नोंदी ठेवणारा चाकर. बहुतेक वेळा कुलकर्णी हे शिक्षित जातीचे असत. म्हणजे ब्राम्हण, प्रभू वगैरे.
पेशवाईतील एक बडे अधिकारी अंताजी माणकेश्वर यांनी राशीन ता. कर्जत जि. नगर येथे देवीच्या देवळाभोवती ओवऱ्या बांधल्या (ओवऱ्या म्हणजे प्रदक्षिणेसाठी बांधलेली वाट). तेथील शीलालेखात अंताजीच्या सरदारकीचा उल्लेख न करता, कामेरगावचे कुलकर्णी अशी उपाधी लिहिली आहे. या पदाचा खास अभिमान असल्याचे ते चिन्ह आहे.
कुणबी म्हणजे शेतकरी. (कोणी बी, कोणी हि) गावातील माणूस शेती करणार हे गृहित. वेगळा व्यवसाय असेल तर मुद्दाम सांगायला हवे. अडाणी म्हणजे बिगर शेतकरी. कुणबी हा स्वतःला व इतरांना पोसणारा. तो पुढे आल्याशिवाय खेडे वसविता येत नाही. बिगरशेती व्यवसायिकांमधे येतात कारु आणि नारु. शेतीला ज्यांची गरज पडते असे धंदे करणारे ते कारु .अशी साधारण कल्पना. हेच बलुतेदार. चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव, कोळी हे कारु. कारु हा शब्द यादव काळापासून आढळतो.
ज्यांच्याविना कुणब्याचे नडत नाही किंवा क्वचित नडते ते नारु किंवा आलुतेदार. तेली, तांबोळी, साळी, धनगर, शिंपी, माळी, गोंधळी, डवरी, भाट,ढाकर गोसावी, जंगम, मुलाणी, वाजंत्री, घडशी, तराळ वगैरे १८ नारु. बारा बलुते आणि आठरा आलुते असे म्हणण्याची पध्दत आहे. पण एकूणच या गोष्टी फार शब्दशः घ्यायच्या नाहीत.
सुताराला लाकूड द्यायचे. त्याने दुरुस्त्या करायच्या. लोहाराला लोखंड, कोळसा द्यायचा. त्याने विळे, कोयते बनवून द्यायचे. गुरांना नाल मारायचे. हत्यारांच्या दुरुस्त्या करायच्या. भैरोबा खंडोबाच्या जत्रेत नवसपूजेला बगाड बांधायचे (म्हणजे नवसकऱ्याच्या पाठीला लोखंडी आकडा (हुक) लावायचा). न्हाव्याने पंधरवड्याला हजामत, नखे काढणे ही सेवा द्यायची. पाटील, कुलकर्णी यांचे अंग रगडून द्यायचे (सणासुदीला तेल, उटणे लावून). गावातील नवरी न्यायला वरात (वर आणि त्याचे कुटुंबीय) आली की न्हावी त्यांना वेशीवरुन घेऊन येणार आणि एक पटका पटकावणार.
गाडगी, मडकी, पोळ्याला मातीचे बैल, गौरी, गणपती सगळे घ्यायचे कुंभाराकडून. चांभार सगळ्यांची पायताणे दुरुस्त करणार (पण बुरुडांची वगळून). मांग अंबाडीच्या धाग्यांचे दोर करुन देणार. केरसुण्या, सणाला दाराचे तोरण हे मांगाकडूनच. लग्नात मांग डफडे वाजवणार. त्याबद्दल शेला आणि जेवण हा त्याचा हक्क. तिरडी बांधायची दोरी तोच देणार.
महार हा गावाचा हरकाम्या. तो ओरडून दवंडी देई. प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी. हा बहुदा महार जातीचा. गावराखण करणाऱ्या महाराला चारी सीमा बारकाईने माहित. म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादात त्याची साक्ष महत्वाची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करुन सकाळी उघडायचे.
कुसू म्हणजे गावाभोवतीची संरक्षक भिंत. वेस म्हणजे त्या भिंतीमधला प्रवेश दरवाजा. स्पृश्यांची घरे गावकुसाच्या आत. अस्पृश्य, भटक्या जमाती, नव्याने वस्तीला आलेल्या जंगली जाती याची घरे, पाले, झोपड्या गावकुसाबाहेर. चांभार, भंगी गोमांस न खाणारी मंडळी गावकुसाला चिकटून तर महारवाडा, मांगवाडा दूर. या जाती ‘पड’ म्हणजे मेलेली गुरे खातात म्हणून त्यांच्याशी दुरावा. गावाला पश्चिमेचा वारा शुध्द मिळावा म्हणून महार व मांगवाडे पूर्वेला. चाभारगोंदे ऊर्फ श्रीगोंदे येथे मात्र परंपरेने चांभारवाडा मध्यवस्तीत असे. स्पृश्य आणि अस्पृश्य दोन्ही वस्त्यांमधे घरे जातवार गटाने असत. त्यांना जातवार नावे. सुतार आळी, माळी आळी, रामोशीवाडी, भिलाटी इत्यादि. असो.
प्रवाशांचे सामान उचलणारा महार तो तराळ. करवसुलीसाठी शेतकऱ्यांना बोलावून आणणारा तो महारच. होळी पेटवायची ती महाराने. देवीची शांत करण्यासाठी रेडा बळी द्यायचा तो महाराने. रस्ते सफाई, मेलेली गुरे ओढून नेणे ही सुध्दा महाराची कामे. त्या गुरांची चामडी महारानेच घ्यायची. महारांची कामे लोकांनी पाळीपाळीने करायची असत. कामांबद्दल महारांना कसायला थोडी जमीन मिळे. तिला नाव हाडकी. घरपट्टी, गुरेपट्टी महारांना माफ. महारांची लग्न सराई आषाढात. का तर त्या महिन्यात सवर्णांची लग्ने होत नाहीत म्हणून महारांना जरा सवड असते. महार हा पाटलाचा “प्यून” . पण पाटलाची गादी गावचावडी आणि महाराला चावडीची पायरी चढता येत नाही म्हणून तेथे पाटलाची सेवा करण्यासाठी चौगुला हा पाटलाच्या जातीचा माणूसः
चावडीत दिवा बत्ती, पाणी भरणे ही कामे भोयांची. देवळाची झाडलोट, पूजा, तेलवात ही कामे गुरवांची. दसरा, शमीपूजन, तुळशीचे लग्न या दिवशी पाने, फुले, फळे थोरामोठ्यांच्या घरी नेऊन देणे, लग्नाची आमंत्रणे वाटणे, गावजेवणाच्या पत्रावळी लावणे ही कामे सुध्दा गुरवाने करायची. लग्नात शेला, जेवण हे त्यांच्या हक्काचे. गावात देवाची कामे करणारे वेगवेगळे लोक असू शकतात. गुरव हा गावदेवीचा पुजारी. भगत हा भूत काढून टाकणारा. खंडोबाचा पुजारी वाघ्या तर लिंगायतांचा पुजारी जंगम.
बलुतेदार हे गावाचे वतनदार. वतन म्हणजे पदाचे पिढीजात हक्क. बलुतेदारांना मजुरी नाही. पिकात हिस्सा, समारंभात मानपान, थोडीबहुत बिनखंडाने जमीन, घराला जागा. म्हणजेच जगण्याची व्यवस्था. पण मजुरी नाही.
गावाचा राज्यकर्त्यांशी संबंध बेताचाच असे. कर दिला म्हणजे झाले. सरकारने गावासाठी काही करावे अशी अपेक्षा नसे. अत्याचार केले नाहीत म्हणजे झाले. पाटील कर गोळा करे. महार सगळ्या शेतकऱ्यांना बोलावून आणे. ते धान्य देत. त्याची मोजमाप पोतेदाराने करावी.
सरकारी खजिन्यात भरण्याचा कराचा पैसा याला पोता किंवा इरसाल असे जुने शब्द आहेत. पूर्वी टांकसाळी नव्हत्या. नाणे खरे की खोटे हे सांगणे अवघड जाई. नाणे खोटे म्हणून सरकारकडून परत आले तर ते कोणाकडून वसूल करायचे ही पाटलाची पंचाइत. ती जवाबदारी कोणीतरी घ्यायला हवी असे. ती घेणार पोतदार. तो नाणे पारखी असे. त्याने घेतले की नाणे पोचले. मग सरकार दरबारी ते खोटे ठरले तर पोतदाराच्या गळ्यात.
शेतकऱ्यांनी दिलेल्या कराची पावती करण्याचे काम कुलकर्ण्याचे. दिवस वाईट आले तर करात सवलत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे काम पाटलाचे. दुष्काळ व अन्य कारणाने कोणी गाव सोडून गेला तर दुसऱ्या कुटुंबाला आणून वसवण्याचे काम पाटलाचे. किरकोळ तंटे बखेडे त्याने सोडवावेत. त्यात पाटलाची भूमिका न्यायाधिशाची नसून लवादाची, मध्यस्थाची असे. पाटलाने चोरट्यापासून गावाचे रक्षण करावे. त्यासाठी लागल्यास महाराच्या मदतीला भिल्ल, रामोशी, बेरड माणसे घ्यावीत.
पाटलाला वतनाचा एक भाग म्हणून करमुक्त जमिनीचा एक तुकडा मिळे. त्याला म्हणत पाटील – पासोडी. पाटलिणीला जमीन मिळाली तर म्हणायचे चोळी – बांगडी. पुणे जिल्हात जुन्नर जवळील भानगावच्या पाटलाकडील वतनपत्रान्वये त्याला प्रत्येक कणगीतून दीड मण धान्य, पंचवीस भारे कडबा, दर शेतातून पाच शेर कापूस, एक भारा हुरडा, दोन जोड्या पायताणे, तेल्याकडून रोज नवटाक ( शेराचा / किलोचा ३२ वा भाग) तेल, तांबोळ्याकडून रोज खायची १३ पाने, प्रत्येक ऊसकऱ्याकडून एक भारा ऊस, एक चरवी रस, एक खडा गूळ, दसऱ्याला प्रत्येक कळपाकडून एक मेंढरु, कोष्ट्याकडून प्रत्येक मागावरचा एक कपडा, माळ्याकडून भाजी, वाण्याकडून दर पोत्यातून पावशेर माल या सर्व गोष्टी मिळाव्यात.
सामान्यपणे गावात ज्या जातीचा भरणा अधिक त्या जातीचाच पाटील. म्हणून बव्हंशी पाटील हे कुणबी – मराठा जातीचेच असणार.
पाटील हा शब्द आणखी एका संदर्भात येतो. तो म्हणजे जात पाटील आणि तोंड पाटील. स्थिर समाजापेक्षा भटक्या समाजांमधे ही उपाधी जेष्ठांसाठी वापरली जाते. या आठरापगड भटक्या जातींच्या जातपंचायत बैठका तोरणदारी (उत्सवाचे वेळी) अथवा मरणादारी होतात. एक नेहमीची जागा म्हणजे नगर जिल्हात मढी येथे वार्षिक कान्होबाच्या यात्रेमधे. अशा बैठकीत तंटे बखेडे, तक्रार अर्ज वगैरेंवर विचार होतो. यात साक्षर फारसे कोणीच नसते.व्यवहार तोंडी होणार म्हणून तोंडपाटीलकी. पंचायतीने कोणाला दंड करुन पैसा वसूल केला तर त्याची विल्हेवाट जातीतच होते. कशासाठी? जातीचे देऊळ, धर्मशाळा यांच्यावर, जात कामगारांना देण्यासाठी, धान्य विकत घेऊन जातीत वाटून टाकण्यासाठी. बखेडे कसले असतात? व्यभिचार (जळी पळीची भांडणे), बायको न नांदवणे, जातीचे नियम/ संकेत झुगारणे (ठरल्यापेक्षा जास्त देज देणे/घेणे, वडारणीने चोळी घालणे, कोल्हाटणीने कुंकू लावणे इत्यादि).
पाऊस संपला, सुगीचा हंगाम आला की भटके, फिरस्ते लोक गावात येतात. माल विकून, काम करुन, भीक मागून पोट भरतात. यांच्यातील काही गट पुढीलप्रमाणे. घिसाडी – पाच दहा कुटुंबांचा तांडा असतो. गाढवे, तट्टे, बकऱ्या, कोंबड्या, कुत्रे, म्हैस अशी प्रत्येकाची मालमत्ता असते. नांगराचे फाळ, कुऱ्हाडी, खुरपी, कुदळी, बैलगाडीच्या चाकांच्या धावा, पळ्या, विळे वगैरे बनवणे हा धंदा. बेलदार – घरे, विहिरी, झाडांचे पार यांचे दगडकाम करतात. बायका जाती, पाटे यांना टाकी लावतात (गुळगुळीत पृष्टभाग खडबडीत करतात). कैकाडी – हे तरवड वगैरे वनस्पतींचे फोक काढून त्यांच्या टोपल्या, कणग्या वगैरे विणतात. भराडी, गोंधळी, वाघ्या – मुरळी ही मंडळी देवाची गाणी म्हणून पैसे मागतात.
शेतकऱ्यांचे वर्षचक्र पिकावर आधारित असते. ते मृगनक्षत्रावर सुरु होते. आखाडाच्या महिन्यात कुणबी अडचणीत असतो. साठवलेले धान्य सरते. खावटीसाठी उधारी करावी लागते. उसने धान्य दिडी/दुपटीने परत द्यावे लागते. काही अडचणी सहकाराने निभून जातात. उदा. इरजिक. कडक जमीन नांगरण्यासाठी कित्येक बैल नांगराला जोडावे लागतात. आपल्या गोठ्यात तितके बैल नसले तर मोलाने बोलवायचे. ते हि शक्य नसेल तर गावकऱ्यांची मदत मागायची. लोक जेवणापोटी शेत नांगरुन देतात. याला म्हणायचे इरजिक. कुणबी शेतकऱ्यांचा बहुतेक सगळा वेळ शेतकामात जातो. म्हणून गावातील कामे घरधनीण/ कुणबीण करते. बाजारहाट करणारी तीच. म्हणून अनुभवातून ती व्यवहारचतुर होते. मच्छीमार कोळ्यांच्या बायकांची हीच तऱ्हा. (बड्या घरातल्या बायकांना दारचे वारे सुध्दा माहित नसते. त्या पंगू बनतात.)
मौर्य काळात (म्हणजे ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात वर्णिलेल्या समाजात) पध्दतशीरपणे सुरु झालेली नवी खेडी वसवण्याची प्रक्रिया शेकडो वर्षे चालू होती. लोकसंख्या हलके हलके वाढत होती. तिला जमीन अपुरी पडू लागली की जंगलाचा आणखी एक तुकडा साफ करुन तेथे शेती सुरु होई. गाव फार वाढले , शेते लांब पडू लागली की नवी वस्ती, नवे गाव निर्माण होई. या वाढीमधे जंगलवासीयांशी झगडा होणे अपरिहार्य. इसवी सनाच्या चौथ्या शतकात समुद्रगुप्ताच्या विजयकथा लिहिण्यात आल्या. त्याने अनेक नाग राज्ये जिंकून त्या शासकांना मांडलिक बनवले. तेथील जंगलांचे निर्वेधपणे लचके तोडले गेले. पण एक मोठा फरक म्हणजे शासनव्यवस्थेची मौर्यकालातील घट्ट पकड ढिली झाली. नव्या खेड्यांच्या गरजा शहरातून भागवता येईनात. व्यापार व व्यवहार यासाठी चांदीची नाणी सुध्दा कमी पडत. प्रवास वेळखाऊ आणि कष्टाचा होता. म्हणून गावाने स्वयंपूर्ण होण्याकडे कल वाढला. बौध्द काळात समाज श्रेणींमधे विभागला होता. एक एक व्यवहार करणारांची एक एक श्रेणी किंवा संघटना असे. त्याऎवजी आता कारागीर गावोगाव अलग स्थिरावले. त्यांना उपजीविकेसाठी थोडी जमीन, थोडा शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाटा असे देण्यात आले. जंगल जमीन मुबलक होती. गुप्तकालीन लिखाणात कारागीरांना जमीन दिल्याचे उल्लेख येतात. श्रेणी फुटल्या. घट्ट विणीची खेडी उदयाला आली. जमिनीची खरेदी-विक्री अपवादानेच होई. नाशिकच्या पांडवलेण्यात शकक्षत्रप नहपान (दुसरे शतक) याच्या कारकिर्दीतील शिलालेख आहे. त्यात उषवदाताने चार हजार चांदीची नाणी देऊन जमीन विकत घेतली व बौध्द संघाला अर्पण केली असा उल्लेख आहे. पण हे क्वचितच. मालकी ही पिढ्यानुपिढ्यांची असे. मुळात गाव वसे ते एखाद्या कुळातील कुटुंबे एकत्र येऊन. आजही बऱ्याच छोट्या खेड्यांमधे शेतकरी एक दोन आडनावाचेच असतात.
ढोबळ मानाने खेड्यांची वरील रचना यादव, काकतीय, चालुक्य या मध्ययुगीन सत्तांमधे आणि नंतर मुस्लिम व मराठा अमलांमध्ये देखील टिकून होती. वतन, रयत, मिरास, कस्बा असे शब्द मुस्लिम काळात आले. पण एकूण बदल हा जुजबीच. बहुतेक शासकांना फक्त महसूल वसुलीमधे रस असे.
ब्रिटिश गव्हर्नर माउंट स्टुअर्ट याने नोंदवून ठेवले की महाराष्ट्रातील खेडी ` though probably not compatible with a very good form of government, they are an excellent remedy for the imperfections of a bad one. They prevent the bad effects of its negligence and weakness and even present some barrier against its tyranny and rapacity’
उत्तम राज्यव्यवस्था हवी असेल तर मराठा खेड्यांची आहे ही रचना चालणार नाही पण वाईट शासनयंत्रणेचे चटके टाळण्यासाठी ती खूप उपयोगाची आहे. सरकार निष्काळजी असले वा मोडकळीस आले तरी या रचनेमुळे गावावर फारसे दुष्परिणाम होत नाहीत. येवढेच नव्हे तर सरकारी दडपशाही आणि लुटारुपणा यापासून गावाचे काही प्रमाणात संरक्षण ही होते.
या संबंधात अधिक विवेचन वाचायचे असेल तर सुधा देसाई यांच्या ‘Social life in Maharashtra under Peshwas’ (पॉप्युलर प्रकाशन १९८०) या पुस्तकात पहावे. शंभर वर्षांपूर्वीच्या खेडुत जीवनाचे अनेक तपशील त्रिंबक नारायण अत्रे लिखित गावगाडा (प्रकाशन १९१५) या पुस्तकात सापडतात.
खेड्यांची एकूण व्यवस्था कशी तर म्हटल्यास स्थैर्य आणि म्हटल्यास कुचंबणा किंवा कुंठीत गति. प्रत्येकाला निश्चित स्थान. त्याचा म्हणून मानपानाचा क्षण. काम मिळण्याची खात्री. आपल्याजागी दुसरा कुणी उपटसुंभ नेमला जाणार नाही याचा भरवसा. पण काम बदलण्याला मोकळीक नाही. सुधारणेला उत्तेजन नाही. आधुनिकीकरण नाही. परिस्थिती बदलली नाही, संदर्भ तेच राहिले तर स्थिर रचना पुरेशी असते. एरवी गोंधळ उडतो. ग्रामव्यवस्था ही वस्तु विनिमय, सेवा-विनिमय व्यवस्था आहे. नाण्यांची गरज कमी. परगावांशी संबंध कमी म्हणून वाहतुकीची गरज कमी. गाव लहान म्ह्णून खाजगीपणा नाही. गुपचुप काहीच करता येत नाही. अर्थात इतर गावकऱ्यांबद्दल जवळीक आणि आपुलकीसुध्दा असते.
आधुनिक भारतातील गावाची रचना, त्यातील घटकांचे परस्पर संबंध, त्यांच्यातील बदल वगैरे पैलू समजावून घेण्यासाठी एखाद्या गावाची सविस्तर ओळख करुन घेणे उपयुक्त ठरते. आपण अशी ओळख करुन घेणार आहोत. सुगाव बरोबर.
गुळून अर्थात सुगाव ता. वाई जि. सातारा या गावाचा तपशीलवार आभ्यास हेमलता दांडेकर कृत “Men to Bombay, Women at Home : Urban Influences on Sugao Village, Deccan, Maharashtra, India (1942-82)” प्रकाशक – Center for South and South – East Asian Studies – University of Michigan USA) या पुस्तकात सापडतो. त्याचा थोडक्यात आढावा घेऊ.
सुगाव मधे दोन मुख्य मराठा आडनावे आहेत. यादव आणि जाधव. बरीचशी जमीन यांच्या मालकीची. असे म्हणतात की यादव मूळ देवगिरीचे तर जाधव वेरुळचे. म्हणजे दोघेहि औरंगाबादचेच. अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या राजाचा पराभव केल्यावर तेथून काही प्रमाणात पांगापांग झाली. त्यावेळी हे गट पश्चिम महाराष्ट्रात आले असावेत. तथापि अशी लिखित नोंद सापडलेली नाही. सर्वात जुनी ज्ञात नोंद आहे. ही सातारच्या इनामदप्तरातील १९६० सालच्या कागदांमधे. त्यावेळी सुगाव मधे कर देणारी ४३ कुटुंबे होती. ५ घरे लोकरीच्या घोंगड्या विणत. ६ जण सुती कपडा विणत. असो. जाधव आणि यादव एकमेकांना एकाच गोतावळ्याचे मानतात आणि आपसात लग्ने करीत नाहीत. पूर्वी ते सगळे शेतावरच राहायचे. आता गावठाणावर घरे करुन आहेत. या स्थलांतराचे फायदे दोन. घराखाली अडकलेली शेतजमीन मोकळी होते शिवाय पाऊस पडल्यावर शेतजमिनीत वावरणे अवघड होते. रहाण्याची जागा जरा कोरडी हवी.
शिवशाहीमधे कोचळे नामक कुटुंब सुगावात आसरा मागत आले. जावळीच्या चंद्रराव मोरे यांचे ते नातेवाईक. शिवरायांकडून चंद्रराव मोरे यांचा पराभव झाला आणि सगळा गोतावळा इकडे तिकडे पांगला. यादवांनी कोचळ्यांना आसरा दिला, जमीन दिली. पण कोचळे आज ही पाहुणे मानले जातात. मूळ गावकरी नव्हे.
सुगावची लोकसंख्या सुमारे ३०००. ७०% लोक मराठा, ७% धनगर, ११% कारागीर, ६% नवबौध्द आणि ६% इतर.
सुगावचे धनगर हे मेंढके धनगर आहेत. या जातीत २२ वेगवेगळी कुळे असल्याचे अभ्यासकांना आढळले आहे. सुगावकर मंडळींचे कुळ ‘खुटेकर’. धनगर वस्ती यादव आणि जाधव वस्त्यांच्या मधोमध आहे. धनगर मंडळी ही मराठा शेतकरी गावात येण्याआधीपासून तळ ठोकून असावीत. तेच इथले मूळ रहिवासी. शेतकऱ्यांची वस्ती वाढल्यानंतर त्यांची कामे करणारी इतर मंडळी आली आणि स्थिरावली. कोळी (पाणके), रामोशी (राखणदार), गुरव, गोंधळी, चांभार, कलावंतीण अशा अनेकांना गावाची कामे करण्यापोटी जमिनी मिळालेल्या आहेत. बलुतेदारांपैकी सुतार, लोहार, न्हावी, परीट, मांग, चांभार अजूनहि गावात वस्तीला आहेत व गावची कामे करतात. बलुतेदारांची १०% जमिन आहे. गावात मुसलमानांची छोटी वस्ती आहे आणि छोटी मशीद आहेत. गाव वस्ती जातवार आहे. (नकाशा पहा).
गावात ५०% एकत्र कुटुंबे आहेत, ४०% विभक्त तर उरलेली विधुर विधवा वगैरे आहेत.
गावातील सुमारे ५०० लोक मुंबईत काम करतात. त्यापैकी ४०% सूतगिरण्यांमधे, १०% इतर कारखान्यात, १०% पोलिस, लष्कर इत्यादि नोकऱ्यात, १०% पांढरपेशा नोकऱ्यांमधे, ८% रामागडी / हॉटेल नोकर अशा रोजगारात तर उरलेले २% अन्य व्यवसायात आहेत. सूतगिरण्यांमधील कामगारांची आता दैना उडाली आहे. पूर्वी जवळपास २५% कुटुंबांकडे मुंबईहून पैसा येत असे. आता ते प्रमाण घटले असावे.
इतके लोक मुंबईत जाऊनही गावची लोकसंख्या वाढतेच आहे. दरडोई जमीन उपलब्धता घटतेच आहे. १९४० साली दरडोई ५०-५५ गुंठे जमीन होती, ती ८० साली ३० गुंठे राहिली. जमिनीवरचे माणसांचे ओझे वाढतच आहे.
पिकांमधे ७५% हिस्सा धान्य पिकांचा आहे. कडधान्ये ३% तर नगदी पिके (ऊस, हळद, भुइमूग इ.) १५% आहेत. शेती ही प्रथम गावची गरज भागवण्यासाठी केली जाते मग बाजार. जो तो आपापल्या शेतावर राबतो. अडचणीला शेजाऱ्याची मदत घेतो. सुगीला व खास नडीला मोलाने माणसे नेमतो. घरात पुरुष माणूस नसेल तर बाईला जमीन कसण्यात अडचणी येतात. बैल हाताळणे बाईचे काम नव्हे. घरधनी परगावी गेला तर बायका बैलांना गोठ्यातून बाहेरही काढत नाहीत. जागीच चारा पाणी देतात. रात्रीची राखण, आपल्या पाळीचे पाणी वेळी अवेळी जागून वळवून घेणे, त्यासाठी शेतावर झोपणे हे बाईला जमत नाही. शेतकरी आपापसात सहकार्याने वागत नाहीत. दुसरा जागेवर नसला तर त्याचे हित राखत नाहीत. म्हणूनहि बायकांची अडचण होते. पुरुषांना अनेक गोष्टी चावडीवर, पारावर, पंचायतीत बसून गप्पा ऎकताना कळतात. बायका अशा ठिकाणी जात नाहीत. तशी रीत नाही. म्हणून अनेक बाबी बायकांच्या कानावर येतच नाहीत. या सगळ्यामुळे बाईला चांगली शेती करणे अवघड जाते.
घरोघर मुले बाळे शेतात काम करतात. पण शाळा सांभाळून. बहुतेक सगळी बाळगोपाळ सेना शाळेत जाते. गरज पडेल तेव्हां प्रथम मुलींची शाळा बुडवून त्यांना शेतावर कामाला धाडतात. मुलगे शाळेत पळतात. हा विषम न्याय प्रौढांनासुध्दा लागू होतो. बायकांना पुरुषांच्या ६०% मजुरीदर मिळतो. पण मजुरीची संधीच फार नाही. भूमिहीन शेतमजुराला फार तर वर्षातले सहा महिने काम मिळते.
दुसऱ्या महायुध्दापूर्वीपर्यंत सुमारे ७% धान्य बलुतेदारांना वाटले जाई. आता ती रीत जवळपास संपली आहे. चाकरीचे मोल रुपयात दिले जाते.
सुगावात सुतारांचे स्थान अजून पक्के आहे. बैलगाड्या, नांगर वगैरेची कामे त्यांना मिळतात. वीजपंप आल्यामुळे मोटेचे कोणी पाणी काढत नाही म्हणून चांभारांचा धंदा गेला. प्लास्टिकची पायताणे आली. स्वस्त आणि मस्त. चांभारांचा फायदा फस्त. प्लॅस्टिक व अल्युमिनियम यांची भांडी आली आणि कुंभारांची गाडगी मागे पडली. शहराजवळच्या कुंभारांना विटा/कौले करण्याची संधी मिळते. सुगावात तेहि नाही. आणि डोंगराळ मुलखात मातीची सुध्दा चणचणच. बोळकी / पणत्या इतपतच धंदा उरला आहे.
दगडू हा सुगावचा मुलाणी. बोकड कापण्याचे काम त्याच्याकडे. या कामासाठी रोख मजुरी मिळते. सुगावचा सोनार हा फार कुशल समजला जातो. बऱ्याच गावांमधून लोक त्याच्याकडे दागिन्यांची कामे घेऊन येतात. बायका आपले काम पहात बसतात आणि गप्पा मारतात. गावचा गुरव भैरोबा आणि लक्ष्मी यांची देवळे सांभाळतो. त्याला अजून लोक धान्य देतात. पण कुरकुरत. धान्य देणाऱ्या कुटुंबांना विशेष सेवा म्हणून तो पत्रावळी आणि द्रोण करुन देतो. पण पानांसाठी आता फार दूर जावे लागते. गावची तेलघाणी आणि ऊसाचा चरक दोन्ही बंद झाली. ऊस साखरकारखान्यात घालावा लागतो. गूळ करता येत नाही. त्यामुळे रोजगार जातो. वाईच्या यांत्रिक तेलघाणीत तेल चांगले निघते. पण पेंड ठेवून घेतली जाते.
गावात किरकोळ व्यापार फारसा नाही. गावात धंदा करायचा म्हणजे उधारीला नाही म्हणणे जड जाते. बुडीत खाते मोठे. त्यापेक्षा वाई बरे. व्यवहार सगळा परक्यांशी. मग भीड पडत नाही.
१८८५ सालच्या सातारा जिल्हा गॅझेटियर मधे नोंद आहे की जिल्हातील १० ते १५% पुरुष चाकरीकरिता मुंबईस जातात. तेव्हां नोकऱ्या सहज मिळत. खरिपाचे पिक काढून झाले की सहा महिन्याची मोकळीक. रेल्वे, बंदर येथे हमाली करता येई. मग सूतगिरण्या आल्या. तेथे काम मिळू लागले. दुसऱ्या महायुध्दाच्या काळापर्यंत गोष्टी जरा अवघड झाल्या. लोकांना बारमाही नोकरांची जरुर वाटू लागली. सुगीच्या दिवसांनंतर येणारे कामगार अडचणीचे वाटू लागले. म्हणून वर्षात फक्त रजा व सुट्टी या काळात गावाकडे येणे, एरवी वर्षभर मुंबईतच राहणे ही रीत आली. लोक सेवानिवृत्तीनंतर गावाकडे परतू लागले. बाप मुलाला आपल्या आसपास चिटकवून घेऊ लागला, शक्यतर कारकून वा मुकादम म्हणून. नाहीतर कामगार म्हणून. मुलगा स्थिरावला की बाप रिटायर होण्यास मोकळा. नवरा मुंबईला काम करत असेल तर बायको मुलांना घेऊन सुगावातच राहणार आणि शेती सांभाळणार. सगळे कुटुंब गाव सोडून मुंबईला गेले ही गोष्ट विरळाच. (लग्न मोडले तर मात्र परगावाहून आणलेल्या सुना गाव सोडून माहेराल जातात).
मुंबईत काम मिळवायचे ते ओळखीपाळखीने. आधी जेथे चार सुगावकर कामावर आहेत तेथेच नवीन लोक जाणार. अनोळखी जागी चटकन कोणी जात नाही. एका आड घरातील पुरुष मुंबईला जातोच. धीट, बोलका मुलगा दिसला की लोक म्हणतात की हा मुंबईला जाणार. मुंबईकरांना कमी मजुरीत तरुण कामगार मिळतात. त्या पैशात बायकोला मुंबईत आणून ठेवणे शक्यच नसते. कोणा दूरदृष्टीच्या सुगावकराने मुंबईत आर्थर रोडवर किरमानी बिल्डिंग मधे ‘तालीम’ म्हणून छोटीशी जागा मिळवली. आता ती व्यायामशाळा राहिली नाही. लोक म्हणतात, खाणे कसदार नाही, मग व्यायाम काय करणार? आता ही जागा सुगावकरांना रहाण्यासाठी उपयोगी पडते. १४ फूट X २० फूट खोली. तिच्यात निम्मी जागा आखाडा. म्हणजे लाल मातीचा कुस्ती हौद उरलेल्या जागेत २० रहिवासी. प्रत्येकाची फक्त एक ट्रंक. गर्दी इतकी की खोलीत चहासुध्दा करता येत नाही. कायम डब्याचे बेचव अन्न खावे लागते.
सुगावचे हमाल घाऊक कापडबाजारात काम करतात. त्यापैकी बरेच जण मालकाच्या गोदामातच रहातात. ज्यांना बरे पैसे मिळतात तेहि बायकोला सुगावहून आणत नाहीत. का? इथे नळाला पाणी, बटन दाबले की दिवा. बायकांना सवयी लागतात. सिनेमात झुळझुळीत साड्या दिसतात. त्या घ्याव्या असे वाटते. मुंबईत राहिलेल्या बाईला गावाकडली रहाणी, तेथील कष्ट झेपत नाहीत. मुंबईत बाई माणसाला खाणावळ चालवणे हा एकच व्यवसाय करता येतो. एक थोडा वेगळा प्रकार म्हणजे भाऊ भाऊ किंवा नात्यातले लोक एकत्र बिऱ्हाड मांडतात. एकाची बायको सगळ्यांच्या बायका पाळीपाळीने मुंबईत रहातात.
मुंबईत आल्यावरहि सुगावकरांना आसपास वागताना जात विसरुन चालत नाही. इथे आपण सुधारकपणे महाराबरोबर जेवावे आणि त्याने गावी जाऊन चुगली करावी. आपल्या कुटुंबाची लाज निघेल. याच काय इतरही बाबतीत फारसे सैल वागता येत नाही. कारण सगळेच एकत्र राहतात. एकंदर पाहता मुंबईतील सगळे वास्तव्य गावाच्या प्रभावातच जाते. सगळे भाऊ मुंबईत असले तर एकत्र कुटुंब पध्दत चालू राहू शकते. एका जागी रहात असणे मात्र जरुर. अशा कुटुंबात अजूनही धाकटे भाऊ थोरल्याला पगार देऊन टाकतात. तो खर्चासाठी काही पैसे धाकट्याला देतो. तोच गावाकडे पैसे किती पाठवायचे वगैरे निर्णय घेतो. गावाकडे असतात त्याहूनही मुंबईत सुगावकर एकमेकांना जास्त धरुन असतात. पण त्यांचे गावातील स्थान ह्ळूहळू डळमळीत होते. गावातील कर्ते वेगळेच असतात. ते मुंबईकरांना फारसा हस्तक्षेप करु देत नाहीत. मुंबईच्या प्रभावाचे हे चित्र प्रातिनिधिक असावे.
ली श्लेशिंजर या अमेरिकन अभ्यासकाने अपशिंगे ता. कोरेगाव जि. सातारा या गावाचा अभ्यास केला. गावात दोन मुख्य मराठा अडनावे भोसले आणि कदम. कदम वरच्या आळीत रहाणारे तर भोसले खालच्या आळीचे. गावातील बरेच पुरुष चाकरीला मुंबईला जातात. पाचपन्नास जण दोन खोल्यात रहातात. एक खोली वरच्या आळीची आणि दुसरी खालच्या आळीची. गावातली विभागणी मुंबईतही टिकून रहाते. असो.
एकूण आजच्या मराठी खेड्याचे चित्र असे आहे. सामाजिक प्रगतीची चिन्हे आहेत पण समृध्दीची चाहूल लागलेली नाही.
शहरे

आपण व्याख्या केली की जेथील बहुतेक सर्व रहिवाशांचा व्यवसाय जमीन कसणे हा असतो अशी वस्ती म्हणजे खेडे. हे लागू नसलेली खेड्यापेक्षा मोठी वस्ती म्हणजे शहर अशी सोपी व्याख्या करता येईल. शहर म्हणजे मोठे खेडे नव्हे. खेडे फार मोठे असू शकत नाही, कारण घर व शेत यामधील अंतर फार असू शकत नाही. शहर म्हणजे बिगर शेती व्यवसायांचे प्राबल्य असलेली वस्ती.
शेती केली नाही तर खायचे काय?
अन्नपुरवठ्यासाठी शहरे आजूबाजूच्य खेड्यांवर अवलंबून असतात. या खेड्यांमधे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन होत असेल तर असा वाढावा शहराला विकला जाऊ शकतो. तसे नसेल तर खेडुतांच्या तोंडचा घास काढल्याशिवाय शहरांची गरज पुरी होणार नाही. म्हणजेच शहरांजवळ दमन शक्ती हवी. याचाच अर्थ शहर हे सत्ताकेंद्र असणार. करांच्या रुपाने संपत्तीचा ओघ शहराकडे येणार. नाहीतर शहर हे व्यापार / उद्योग केंद्र असणार. खेड्यांशी मोठ्या प्रमाणात (देवाण) घेवाण हवी तर दळणवळण सुलभ हवे. मोठ्या संख्येने माणसे एकत्र राहिली तर स्वच्छता, पाणी, व्यवस्थापन असे प्रश्न वाढतात. शहरांना ते सोडवावे लागतात. या तर्कामधून शहराचे रुप ध्यानात येऊ लागते.
शहरांचे एक प्रमुख प्रयोजन म्हणजे नेत्यांची वस्ती. राजे, राजपुरोहित व अन्य बडी मंडळी नेहमीच शहरवासीय असत / असतात. शेतकऱ्यांकडून वसूल केलेला कर हीच त्यांची पारंपारिक संपत्ती. तिचा एक हिस्सा सैन्यावर खर्च करायचा. हे सैन्य परकी आक्रमणाविरुध्द वापरयचे आणि गरज पडल्यास आपल्याच प्रजेविरुध्द ही. संपत्ती संचय होतो. त्या जागेवर चोर – लुटारू यांची नजर असतेच. ढेप तेथे मुंगळे. म्हणून शहराच्या संरक्षणाची खास व्यवस्था आवश्यकच गावाभोवती तटबंदी, त्याबाहेर खंदक, प्रवेशासाठी भक्कम दरवाजा हे सर्व आलेच . आत राजवाडा, गढी, बालेकिल्ल अथवा तत्सम खास निवासस्थाने असणे हि स्वाभाविकच. बहुतेक वेळा राजसत्तेच्या हातात हात घालून धर्मसत्ता असते. म्हणून एखादे मोठे देऊळ वा भव्य धर्मस्थान अपेक्षित असते. धर्म बदलला तर देवळातील मुर्ती बदलेल इतकेच. रोमन साम्राज्यातील शहरांमधे देवळे असत. त्यात पारंपारिक रोमन देवांची वस्ती असे. पुढे रोमचे शासक ख्रिस्ती झाले. मग देवळांचे रुपांतर चर्च मधे झाले. मध्ययुगात मुसलमानांनी दक्षिण युरोपात पाय रोवले. मग चर्च ऎवजी मशिदी आल्या. भारतात हिंदू राजसत्ता पराभूत होवून मुस्लिम राजवटी स्थापन झाल्यानंतर सरसकट अनेक हिंदू मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्या. असो.
सत्ता / शक्ति, धर्म आणि व्यापार/ अर्थ व्यवहार हे शहरांचे तीन मुख्य पैलू होते असे सूत्ररुपाने म्हणता येईल.
मोगलांचे भुईकोट किल्ले ही शहरेच म्हणायची. लाल किल्ला वा फत्तेपूर – सिक्रि ही अशी शहरे आहेत. त्यांची निर्मिती ही सत्ता स्थिरावल्याची खूण आहे. लाल किल्ला बांधायला पंचवीस वर्षे लागली. स्थिर सत्तेविना हे शक्य नसते. हत्तींना पुरे पडतील इतके रूंद रस्ते, हत्ती घसरु नयेत म्हणून त्यांचा मुद्दाम केलेला खडबडीत पृष्ठभाग, हत्तींना योग्य दरवाजे हि इथली वैशिष्ट्ये, दीवान – ए – आम, दीवान – ए – खास ही शासनव्यवस्थेची शैली दाखवणारी चिन्हे होत. अशा गढ्यांच्या भिंती फार जाड असतात.
क्रेमलिन ही रशियाची जुनी राजधानी अशीच. इथले कांद्याच्या आकाराचे घुमट सगळ्यांच्या लक्षात रहातात. पूर्वी इथे झारचे राजवाडे, झारसाठी चर्च, सेवक/रक्षकांसाठी रहाण्याची सोय अशी रचना होती. आता ते एक मोठे प्रशासकीय केंद्र झाले आहे.सचिवालय व संसद ही दोन्ही क्रेमलिन मधेच आहेत.
चीनच्या बेजिंग शहरात ‘फरबिडन सिटी’ नावाचा भाग आहे. ही अशीच जुनी राजधानी. ‘लास्ट एम्परर’ या देखण्या सिनेमात सांगितलेली तिची कहाणी अनेकांनी पाहिली आहे.
बेजिंग मधील तिएन-आन-मेन चौक, मॉस्कोमधील रेड – स्क्वेअर या लष्करी कवायतीच्या जागा राजधान्यांमधे किंवा जवळपास आहेत. त्या जगप्रसिध्द आहेत. फत्तेपूर – सिक्रीमधे सुध्दा असा चौक आहे.
इतिहासकारांच्या मते सर्वात प्राचीन शहरे तुर्कस्थान / अरबस्तान या भागात सुमारे ८ हजार वर्षापूर्वी अस्तित्वात आली. तुर्कस्तानात शनालहुयुक येथे तर पॅलेस्टाइन मधील जेरिको येथे प्राचीन शहरांचे अवशेष सापडतात. भारतातील प्राचीन शहरे कोणती? वैदिक आर्य ही खेड्यात रहाणारी माणसे. त्यांची शहरे नव्हती. रामायण / महाभारत यांच्यात इंद्रप्रस्थ, हस्तिनापुर, अयोध्या अशी नावे येतात. पाटलीपुत्र हे आणखी एक जुने संशोधित ऎतिहासिक शहर. पण भारतवर्षातील सर्वात प्राचीन शहरे म्हणजे मोहेंजोदारो व हडप्पा.
या शहरांच्या अस्तित्वाचा शोध विसाव्या शतकाच्या सुरवातीला अपघाताने लागला. ब्रिटिशांच्य बांधकामावरचा एक देशी कंत्राटदार वापरत असलेल्या सुंदर विटा पाहून ब्रिटिश अधिकारी चकित झाला. त्याने चौकशी केली की या विटा कोठून आणल्या. त्यावर उत्तर मिळाले की अमुक ठिकाणी खणल्यास हव्या तेवढ्या विटा मिळतात. या माहितीमुळे पुरातत्व तज्ञ तेथे आले. त्यांनी पध्दतशीर उत्खनन केले आणि एक अज्ञात व भव्य संस्कृतीच्या दर्शनाने जगाचे डोळे दिपून गेले. साल होते १९२५. या संस्कृतीबद्दल लिखित माहिती कोठेही नव्हती. वैदिक लिखाणाचा नव्याने अन्वय लावण्याचे प्रयत्न यानंतर सुरु झाले.
मोहेंजोदारो आणि हडप्पा ही दोन्ही शहरे सुमारे मैलभर लांब व तितक्याच रुंद विस्ताराची होती. ती अनुक्रमे सिंधू व रावी नदीच्या काठी वसली होती. शहरात अनेक मजली इमारती होत्या. त्यांची बांधणी भाजलेल्या उत्तम विटांची आणि भक्कम होती. येथील न्हाणीघरे व संडास सर्वांनाच लक्षणीय वाटले. २०० मीटर X ४०० मीटर अशा क्षेत्रफळाच्या पेठांमधे शहराची विभागणी होती. प्रशस्त, रुंद हमरस्ते काटकोनात काढलेले होते. पूर्व – पश्चिमेचे ऊन आणि उत्तर – दक्षिण वारा यांचा वस्तीला पुरेपुर लाभ मिळे. मुख्य रस्त्यांच्या बाजूने इमारतींना सलग भिंती असत. दरवाजे वगैरे सर्व बोळांमधे. हे सुरक्षेसाठी असावे. शिवाय यामुळे हमरस्ते फक्त वाहतुकीसाठीच वापरले जातात. या शहरांचा काळ अंदाजे इसवी पूर्व ३२०० ते १७००. जगाच्या ज्ञात इतिहासात इतकी जुनी आणि सुनियोजित शहरे अन्य कोठेहि सापडलेली नाहीत. इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीमधे सगळी संपत्ती ओतली जाई ती थडगी नटवण्यात. त्या मानाने शहरे किरकोळ असत. बाबिलोन व सुमेर या प्राचीन अरबी संस्कृतींमधील शहरांचे नियोजन मोहेंजोदारोच्या दर्जाचे नाही. रोमन शहरांमधे रस्ते सरळ व आखीव असत. त्यामुळे लष्कराची हालचाल सुलभ होई. मध्ययुगीन युरोपात शहरांमधील रस्ते म्हणजे मूळ ग्रामीण पायवाटांची सुधारित आवृत्ती.
सार्वजनिक स्वच्छतेची मोहेंजोदारो – हडप्पा येथील व्यवस्था अद्वितीय होती. सांडपाणी व मैला यांच्या निचऱ्यासाठी उत्तम बांधकामाची बंद गटारे होती. यांचा उतार अचूक असावा लागतो. नाहीतर प्रवाह तुंबतो.अशी उत्तम व्यवस्था विसाव्या शतकातील आधुनिक शहरे वगळता अन्यत्र सापडत नाही.
मोहेंजोदारो – हडप्पा यांच्यात मोठमोठी धान्य कोठारे होती. परदेशांशी व्यापार होता. पण राजवाडा भव्य मंदिर अशा प्रकारचे बांधकाम आढळत नाही. हा समाज बऱ्याच अंशी समताधिष्ठित असावा. यांच्याकडे वजने, मापे सर्वत्र सारखी व काटेकोर होती. म्हणजे बहुधा केंद्रिय सत्ता असावी आणि दूरदूर व्यापारी व्यवहार होत असावेत. या शहरांमधे आंघोळीसाठी मोठमोठी सार्वजनिक कुंडे सापडली. पण त्यांना चुना माहित नसावा. बांधकाम सगळे चिखलात. मग कुंडातून पाणी झिरपू नये यासाठी काय केले? बिटुमेन / टार या रसायनाचा वापर केला ही गोष्ट अरबस्तानातून आयात केली जात असावी.
या पहिल्या शोधानंतर अनेक ठिकाणी उत्खनने झाली. अक्षरशः शेकडो ठिकाणी (सुमारे ६) सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले. यापैकी अर्धी पाकिस्तानात आहेत. उदा. मोहेंजोदारो, हडप्पा, चुन्हिदारो. अफगणिस्तान, पंजाब, सिंध, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम राजस्थान, कच्छ असा सुमारे १५०० कि.मी. लांबी व रुंदीचा चौरस प्रदेश सिंधू संस्कृतीने व्यापलेला दिसतो. राजस्थानात कालिबंगन, गुजराथमधे लोथल, हरियाणात कालीगढी वगैरे उत्खनने विशेष प्रसिध्द आहेत. या विस्तीर्ण भूप्रदेशात सगळीकडे मिळणारी खापरे सारखी. प्रत्येक शहराचे नियोजन अगदी तसेच. सर्वत्र एकच लिपी. सर्वत्र भाजक्या विटांची मापे १:२:४ याच प्रमाणात. (इंग्लंड मधे हीच प्रमाणे १८ व्या शतकात रुढ झाली) घरांचे नकाशे सर्वत्र सारखे. घरोघरी विहिरी. त्यांचा व्यास सारखा (सुमारे ५ फूट). Corbelled arch म्हणतात अशा पध्दतीने बांधलेली बंद गटारे. साऱ्या मुलखातील सारखेपणा बघता ही मोठी राजवट होती असे वाटते. रोमन साम्राज्य शिखरावर असताना इतके पसरले होते. पण ते वगळता सिंधू संस्कृती इतके विस्तारित व टिकाऊ साम्राज्य इतिहासात फार क्वचितच आढळते. हडप्पा शहराची वस्ती सुमारे अर्धा लाख असावी. मोगल काळात दिल्लीची वस्ती याहून फारच कमी होती. यावरुन सिंधू संस्कृतीच्या विशालतेची कल्पना यावी.
ही प्रगत संस्कृती कशामुळे लयाला गेली? दोनतीन वेगवेगळे तर्क आहेत. पहिला तर्क म्हणजे इंद्राच्या नेतृत्वाखाली ऋग्वेदी समाजाने ही संस्कृती बुडवली. इंद्राला पुरंदर( पुरे मोडणारा) असे नाव आहे. ऋग्वेदात हरियूपिया नगरीचा उल्लेख आहे. ती हडप्पा असणे शक्य आहे. इंद्राने सिंधू संस्कृती कशी बुडविली? त्याने तिचा उत्पादक पाया तोडला. सिंधू संस्कृतीमधील शेती उत्पादक हे सिंचनावर अवलंबून होते. त्यासाठी धरणे होती. ही नदी कैदेत आहे अशी आरोळी ठोकत इंद्राने धरण फोडले. ऋग्वेदात इंद्राची वारंवार स्तुती केली आहे ती नद्यांना मुक्त करण्याबद्दल. एका ठिकाणी वर्णन आहे की वृत्रासुर एखाद्या महासर्पासारखा पसरला होता. इंद्राने त्याचा नाश केला, तेव्हां रथाच्या चाकाप्रमाणे शीळा गडगडत गेल्या. त्या असुरांच्या निश्चल शरीरावरुन पाणी वाहून गेले. वृत्राचा नाश करणारा म्हणून इंद्राला वृतृहत अशी उपाधी मिळाली.
धरणे फुटली म्हणून शेते कोरडी पडली. उत्पादन थांबले. व्यापार बसला. माणसांची फाटाफूट झाली.
दुसरा तर्क म्हणजे भूकंप. ४००० वर्षांपूर्वी मोठी भूकंप झाला मोहेंजोदारो आणि समुद्र यांच्या मधे सहवान येथे सिंधू नदीचे पात्र उंचावले आणि पाणी उलटे वाढू लागले. वर्षातून दोनदा पूर येऊ लागले. त्यात मोहेंजोदारो बुडून जाई. त्याच्यावर गाळाचे थर चढत. यामुळे वस्ती घटू लागली. म्हणजे पूर आल्याबरोबर लोकांनी गाव सोडले असा नव्हे. घरे गाळात गाडली गेली तर त्यांच्या डोक्यावर जुन्या नकाशाप्रमाणेच नवी घरे बांधण्यात आली. जुन्या रस्त्यांच्या डोक्यावर नवे रस्ते झाले.
रस्ते फार टिकाऊ असतात. आजचे भारतातील महामार्ग हे हजारो वर्षे जुने आहेत. महाभारतातील नलोपाख्यानात म्हटले आहे “एते गच्छन्ति बहवः पन्थानो दक्षिणापथम्।“ दक्षिणापथ हा एक महामार्ग. तक्षशीला ते पाटलीपुत्र हा पूर्व पश्चिम महामार्ग. त्याला मथुरेपासून एक फाटा फुटे तो पूर्वेला ताम्रलिप्ती बंदराकडे जाई. दुसरा उज्जैन वरुन भरुकच्छ ( भडोच) बंदराकडे जाई. तक्षशीला ते मथुरा हा मार्ग भद्रंकर (सियालकोट), उदुंबर(पठाणकोट), रोहितक (रोहतक) या गावांवरुन जाई. वाटेत बहुधान्यक (लुधियाना), शैरीषक (सिरसा) ही स्थाने लागत. महाराष्ट्रात सातवाहनांचे एक स्थान जुन्नर (यज्ञनगर) येथून कोकणात बंदराकडे जाणारी वाट आपण अणे – माळशेज घाट या नावाने ओळखतो. बोरघाट ही धनगरांची सह्याद्रि ओलांडण्य़ाची पारंपारिक वाट ब्रिटिशांनी पाहिली आणि तिचा विकास केला. त्यातून आज लोणावळा – खंडाळा यांच्यावरुन जाणारा पुणे – मुंबई मार्ग बनला. आजचे रेल्वेमार्ग हे साधारणपणे जुन्या मार्गांनाच अनुसरतात. असो.
सिंधू संस्कृतीच्या लयाचा तिसरा अन्वय म्हणजे हवामानाबदल. राजस्थानात मातीचे खोलवरचे नमुने पाहून त्यात सापडणारे परागकण कोणकोणत्या वनस्पतींचे आहेत याची अभ्यासकांनी जंत्री केली. पाऊसमानाप्रमाणे वृक्षवल्ली आणि वनस्पतीनुरुप परागकण. म्हणून परागकणांच्या जंत्रीवरुन तत्कालीन हवामानाचा अंदाज येतो. १००००वर्षांपूर्वी राजस्थानात वार्षिक २५-३० इंच पाऊस पडत असावा. सिंधू संस्कृतीच्या भरभराटीच्या काळातहि तेथे पाऊस बरा होता. नंतर तो घटत गेला. वाळवंट वाढले. समुद्राची पातळी घसरली. बंदरे गाळानी भरली. व्यापार बसला. त्यातून संस्कृती संपली.
सिंधू संस्कृती बाबत एक खास गोष्ट म्हणजे तेथील एकहि व्यक्ती, घटना आपणास ठाऊक नाही कारण तेथील लिपी वाचता आलेली नाही.
इ.स.पूर्व १८०० च्या आसपास सिंधू संस्कृतीप्रमाणे इजिप्त, बाबिलोन अशा विविध संस्कृती लयाला गेल्या. यावेळी विविध ‌‌‍आर्य टोळ्या चहूकडे आक्रमण करीत होत्या. कसाइटस अरबस्तानावर चालून गेले. हिटाइटसनी तुर्कस्तानवर चढाई केली. हिक्सोजनी इजिप्तवर हल्ल्ला केला. इ.सन पूर्व १३६० मधील एक शीलालेख तुर्कस्तानात सापडला आहे. त्यात हिटाइटस व स्थानिक शासक यांच्यातील तहाचा मसुदा आहे. लिखाणाची सुरवात इंद्र, वरुण वगैरे देवांना आवाहनाने केली आहे. त्यांना साक्षी ठेवून तह केला आहे. भाषा संस्कृतशी जुळती आहे. पण या सर्व देशांमधे आर्य आणि त्यांची संस्कृती हा इतिहास झाला. धर्म बदलले. आर्यांबद्दल तेवढे आगत्य उरले नाही.
भारतात मूळ सिंधू संस्कृतीच्या स्मृती संपल्या. पण वैदिकांना आजही आपण आपले मूळ पूर्वज मानतो. (सिंधू संस्कृती बद्दलची माहिती /चित्रे यासाठी Harappa.com साइट पहावी)
अथेन्स
सिंधू संस्कृतीच्या मानाने ग्रीसमधे शहरे वसली ती बरीच उशीरा, म्हणजे ख्रिस्तपूर्व ५०० च्या आसपास. अथेन्स व स्पार्टा ही त्यापैकी विशेष प्रसिध्द. अथेन्स ही आजही ग्रीसची राजधानी आहे. हे मूळचे छोटे खेडे वाढले. अक्रोपोलिस ते त्यातील गढीवजा देऊळ. गावावर सत्ता होती अरिस्टोक्रॅट या शब्दाने ओळखल्या जाणाऱ्या उच्चवर्गाची. टायरन्ट म्हणजे अथेन्समधील सत्ताधीश. जुलुमी राजा असा अर्थ नंतर आला. या व्यवस्थेविरुध्द बंड झाले. लोकांनी क्लाइस्थेनिस नामक आवडत्या पण परागंदा नेत्याला बोलावून आणले आणि त्याच्या अधिपत्याखाली नवी राज्यपध्द्ती आणली. त्याने आम जनतेला शासक बनवले. युरोपातील लोकशाहीचा हा उगम. सगळे नागरिक एकत्र येऊन सभेत चर्चेअंती निर्णय घेत. ठराव पसंत वा नापसंत हे सांगण्यासाठी पांढरे वा काळे गोटे वापरत. ते गोटे मोजून बहुमत ठरवले जाई. हात वर करुन मतमोजणी सुध्दा होती. ही व्यवस्था सुरु झाली इ.स. पूर्व ५०८ मधे. लोकशाहिचे काही निर्णय योग्य ठरत तर काही चुकीचे. इराण विरुध्द लढाईसाठी मोठे नौदल बांधणे हा योग्य निर्णय ठरला. पार्थिनॉन हे अथेना या गावदेवीचे सुंदर देऊळ अशा निर्णयातूनच साकारले. पण स्पार्टाशी लढाई करण्याचा निर्णय घातक ठरला. स्पार्टाचे सैन्य, त्यांची काटकसरीने पण युध्द सज्ज रहाण्याची पध्दत प्रसिध्द झाली. त्यांनी अथेन्स शहराला जेरीस आणले.
अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस या सुपुत्रांमुळे अथेन्सची किर्ती दीर्घकाळ दुमदुमत राहिली. मॅरेथॉन ही पळण्याची स्पर्धा अथेन्सच्या इतिहासातून आली. इराणचा राजा डारियस याची फौज अथेन्सवर चढाई करण्याच्या इराद्याने मॅरेथॉन येथे ग्रीसच्या किनाऱ्यावर उतरली ही बातमी कळवण्यासाठी एक तरुण २६ मैल पळत अथेन्सला आला. अथेन्सने इराणी सैन्याला यशस्वीपणे परतवले. वाळीत टाकणे या अर्थाचा ऑस्ट्रसाइझ हा शब्द अथेन्सच्या इतिहासातून आला. बहुमत एखाद्य्या व्यक्तिच्या विरोधात गेले तर त्या व्यक्तिला सक्तीने अथेन्स सोडून जावे लागे. आपल्यामते ज्याला गावातून तडिपार करावे त्याचे नाव खापरावर कोरुन ते खापर मतपत्रिका म्हणून द्यायचे. ज्याचे नाव सर्वात अधिक लोकांनी कोरले असेल त्याला गावाबाहेर काढायचे. मतदानात लांड्यालबाड्या तेव्हांही होत. एका फेरीत प्रसिध्द लष्करी नेत्याचे नाव बहुमताने आले. त्याने इराण बरोबरच्या लढाईत अथेन्सला विजय मिळवून दिला होता. मग लोकांनी त्याला का तडिपार करावे? त्याच्या शत्रूंनी त्याचे नाव कोरुन खापरे निरक्षर नागरिकांना दिली. त्यांनी ती आपापली मते म्हणून टाकली. या खापरांना म्हणत ऑस्ट्रिक. ऑस्ट्रिका वरुन ऑस्ट्रसाइझ हा शब्द आला.
न्यूयॉक
व्यापार व उद्योगात आघाडीवर असलेले हे शहर. याचे मूळ नाव न्यू अमस्टरडॅम. असे कसे? तर मूळ शहर डच लोकांनी वसवले. २-९-१६०९ या दिवशी हेन्री हडसन या जहाज कप्तानाल अमेरिकेच्या किनाऱ्यावर एक मोठे नैसर्गिक बंदर गवसले. येथे जहाजांचा एखादा काफिला सुध्दा सागरी वादळापासून सुरक्षित राहू शकेल असे त्याच्या लक्षात आले. १५ वर्षांनी १६२४ साली डच व्यापाऱ्यांनी येथे वस्ती केली. डच वेस्ट इंडिया कंपनी तर्फे या वस्तीचा कारभार होत असे. एका लांबलचक दक्षिणोत्तर पसरलेल्या बेटाच्या दक्षिण टोकावर ही वस्ती होती. (मुंबईशी हे विलक्षण साम्य आहे.). या बेटाला पुढे मॅनहॅटन असे नाव पडले. तेथील मूळ रहिवाशांनी पाहुण्यांचे आनंदाने स्वागत केले. या काळात अमेरिकेत अन्यत्र युरोपातील धार्मिक जुलुमापासून सुटका मिळवू बघणाऱ्या गटांनी वसाहती केल्या होत्या. पण डचांची ही वस्ती मात्र केवळ नफा मिळवण्यासाठी होती. डच वेस्ट इंडिया कंपनी याबाबतीत फार यशस्वी होती. सलग २०० वर्षे तिने आपल्या भागधारकांना भरघोस फायदा दिला. मॅनहॅटनचे पहिले रहिवासी झ्युगेनॉट पंथाचे होते. १६२६ साली येथे पहिले निग्रो गुलाम आणण्यात आले.
मॅनहॅटनचे क्षेत्रफळ १४०००एकर. डचांनी ते स्थानिक रहिवाशांकडून ६० गिल्डरना विकत घेतले. त्या आदिवासींना जमीन विकणे ही कल्पनाच अनाकलनीय होती. जमीन वापरायची असते. तिची खरेदी विक्री कशी होणार? म्हणून आदिवासींना वाटले की आपण डच लोकांना बनवले.
न्यू अमस्टरडॅम मधून प्रथम कातड्यांचा व्यापार होत असे. पण त्यावेळी डचांच्या जागतिक व्यापारात नफ्याच्या बाबतीत कातड्यांचा क्रमांक खालचा होता. मसाले (इंडोनेशिया) आणि गुलाम (दक्षिण आफ्रिका) या चीजा खऱ्या भरघोस पैसा देणाऱ्या. म्हणून अमेरिकेतील या नव्या वसाहतीत येऊन राहण्यास डच लोक फारसे उत्सुक नव्हते. मग न्यू अमस्टरडॅमचा सुभेदार पीटर स्टायव्हेसंट याने देशोदेशीच्या लोकांना येथे वसवले. जो कोणी येईल त्याचे स्वागत. पण या रहिवाशांची डच सत्तेशी काहीच बांधिलकी नव्हती.
पीटर स्टायव्हेसंटने वस्तीचा विकास व्हावा म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. आदिवासींच्या वापराने घडलेल्या पाउलवाटा मोठ्या करुन घोडागाड्यांचे रस्ते केले. आजचा प्रसिध्द ब्रॉडवे हा अशा रस्त्यांपैकी एक. भोवती एक संरक्षक भिंत बांधली. डचांची विशिष्ट शहरनियोजन पध्दत इथेहि वापरली. त्यातून इंडोनेशियातील बहाविया शहराशी काहीसे साम्य निर्माण झाले.
इंग्रजांच्या वसाहती उत्तर/ दक्षिण दोन्ही बाजूला आणि मधेच हा डच काटा. तो इंग्रजांना खूपू लागला. २७-८-१६६४ रोजी इंग्रज आरमाराच्या नौका न्यू अमस्टरडॅम समोर येऊन ठाकल्या. लढाईचा रंग दिसू लागला. पण शंभर युरोपीयन रहिवाशांनी पीटर स्टायव्हेसंटकडे लेखी अर्ज केला. लढाई वगैरे करु नका आम्ही तुमच्या पाठीशी नाही. स्टायव्हेसंटने लढाईविना शरणागती पत्करली. उर्वरित आयुष्य त्याने एका छोट्या घरात काढले. त्या भागाला आता ग्रीनिच व्हिलेज असे नाव आहे.
त्यावेळचा इंग्रज राजा होता चार्ल्स. त्याचा भाऊ ड्यूक ऑफ यॉर्क. त्याला भेट म्हणून गावाचे नाव बदलून न्यू यॉक असे ठेवण्यात आले. १६९९ साली वाढत्या वस्तीच्या सोयीसाठी गावाभोवतालची डचांनी बांधलेली भिंत पाडून एक रस्ता करण्यात आला. त्याचे नाव वॉल स्ट्रीट.
वॉल स्ट्रीटवर येऊन रहाणारांपैकी एक होता हॅमिल्टन. बँका, व्यापार आणि एकूण अर्थव्यवहार यातील तज्ञ. हा पुढे स्वतंत्र अमेरिकेचा पहिला अर्थमंत्री झाला. शहराच्या नव्हे देशाच्याच अर्थव्यवस्थेचे भविष्य उद्योग व व्यापार यांच्यावर अवलंबून आहे असे याचे मत. स्वातंत्र्य युध्दाच्या काळात न्यू यॉकचे महत्व फार वाढले. नव्या राष्ट्राची ती स्वाभाविक राजधानी झाली.
स्वतंत्र अमेरिकेच्या घटनेचा शिल्पकार होता टॉमस जेफर्सन. दक्षिणेच्या व्हर्जिनिया प्रांतातील एक जमीनदार. त्याला शेतीवर आधारित अर्थरचना अभिप्रेत होतील पण त्याचे गणित चुकले. शेतीचे महत्व घटत गेले. त्याच्या व्यक्तिगत मालमत्तेचे व्यवस्थापन चुकले. तो शेवटी कर्जबाजारी झाला.
स्वातंत्र्य युध्दाच्या वेळी अमेरिकेत तेरा वसाहती होत्या. त्या सर्वांनी इंग्रजांशी झुंज घेतली. प्रत्येक वसाहतीला लढाईसाठी कर्ज काढावे लागले. न्यू यॉकला सर्वात जास्त कर्ज झाले. अर्थमंत्री हॅमिल्टन याने प्रस्ताव मांडला की सर्व वसाहतींची युध्दकर्जे केंद्र सरकारने स्विकारावीत आणि वसाहतींना (म्हणजेच नंतरच्या राज्यांना) कर्जमुक्त करावे. उलट जेफर्सन आणि दक्षिणी नेत्यांनी भूमिका घेतली की प्रत्येक वसाहतीने आपापले कर्ज फेडावे. अखेर तडजोड म्हणून कर्ज माफीच्या बदल्यात देशाची राजधानी न्य़ूयॉकहून दक्षिणेला हलवावी असे ठरले. म्हणून आर्थिक राजधानी एकीकडे आणि राजकीय राजधानी दुसरीकडे असे चित्र कायम झाले.
केंद्राकडे जमलेल्या कर्जाच्या फेडीसाठी हॅमिल्टनने बाँड विक्री केली. या बाँड किंवा रोख्यांची देवाण- घेवाण करण्यासाठी काही मंडळी २७-५-१७९२ रोजी वॉल स्ट्रीट वर एकत्र जमली. इथेच पुढे जगप्रसिध्द न्यू यॉक स्टॉक एक्सचेंज सुरु झाले व भरभराटले.
गाव भरभराटीला आले की वस्ती झपाट्याने वाढते. १८११ मधे न्यू यॉकच्या वाढीचा महत्वकांक्षी आराखडा बनवण्यात आला. मॅनहॅटन बेटावर सपाट जमीन थोडी होती. बरीचशी डोंगराळ. ही टेकाडे भुईसपाट करावीत आणि अत्र तत्र सर्वत्र वस्ती करावी असा बेत ठरला. दक्षिणोत्तर मुख्य १२ रस्ते (अव्हेन्यू) आणि पूर्व – पश्चिम १५५ गल्ल्या (स्ट्रीट) असे जाळे करुन, मधे प्लॉट पाडून विकावेत असे ठरले. गल्ल्यांना नावे नाहीत. फक्त क्रमांक उदा. 42nd street. शहरवस्ती एक लाखावरुन वाढून दसपट होईल तरी पुरी पडेल अशी प्रचंड सोय योजण्यात आली. पण शहर दसपट नव्हे तर शतपट वाढले. म्हणून मॅनहॅटन बाहेर उपनगरे वसवावी लागली. उदा. ब्राँक्स, क्विन्स, ब्रुकलिन,लाँग आयलंड. १८४० मधे सेंट्रल पार्क हा हरित तुकडा बनवला गेला. २७ हजार वृक्ष लावण्यात आले. १६०० झोपड्या पाडाव्या लागल्या. १९१६ साली झोनिंग कायदा लागू झाला. मोठी इमारत शेजाऱ्यांचा वारा उजेड आडवते.म्हणून उंच इमारतींना सरसकट सगळीकडे परवानगी देणे थांबले. इमारत जेवढी उंच तेवढी रस्त्यापासून मागे हटवली पाहिजे. म्हणजे इतरांचे हक्क राखले जातील. १९१६ साली न्यूयॉक मधे एक ऎतिहासिक घटना घडली. Equitable Building नावाची ४७ मजली इमारत पूर्ण झाली. पण तिच्या इतक्या सगळ्या मजल्यांना परवानगी नव्हती. अखेर नगरपरिषदेने वरचे काही मजले तोडले. प्रथमच असे घडले. बिल्डर बिनधास्त बांधकाम करुन टाकतात. कायदा मोडतात. पैसे कमवतात. मग सापडतात. गयावया करतात. पाया पडतात. हे सार्वत्रिक आहे. कारण त्यातून फायदा मिळतो. फायदा व्यापाऱ्यांचा, तोटा जनतेचा. तिचा कैवारी कोण? सरकारने तिचे हितसंबंध राखले पाहिजेत पण व्यापारी आपल्या नफ्याचा वाटा चतुराईने इकडे तिकडे पसरतो. सरकारचा / कायद्याचा अंमल ढिला होतो. अधून मधून एखादा उत्साही नेता / अधिकारी उगवतो. तो बेकायदा बांधकामे पाडतो. अखेर त्याची हकालपट्टी होते. राजकीय नेते आणि प्रशासक यांच्यात सचोटीचा अभाव निर्माण झाला की कायदे निरर्थक होतात. सचोटीचा मार्ग सोडणे फायद्याचे असते. असा गैरफायदा मिळवणाऱ्यांना जनता कडक शिक्षा करु शकली नाही तर असे गैर वागणारे लोक शिरजोर होतात.
मँचेस्टर
१७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध लागला. औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. कारखाने आले. स्वयंचलित यंत्रे आली. मोठ्या प्रमाणात उत्पादन आले. राक्षसी गिरण्यांमधे कामगारांच्या फौजा रात्रंदिवस राबू लागल्या. कारखाने आणि कामगार यांच्या माध्यमातून शहरांनी नवे रुप धारण केले. या रुपामधे प्रचंड उत्पादनशक्ती आणि रोजगार यांच्या हातात हात घालून प्रदूषण, गर्दी आणि रोगट रहाणी यांचाहि जोर वाढला. या काळात कामगारांना कोठलेही हक्क नव्हते. शरीरधर्म वा पाणी पिण्याची सोय सुध्दा कारखान्यात नसे. कामगार मोठ्या प्रमाणावर रोगराईला बळी पडत. इंग्लंडमधे सर्वसाधारण आयुर्मान होते ४० वर्षे. पण मँचेस्टर, लिव्हरपूल अशा औद्योगिक शहरांमधे माणसे सरासरी २५ वर्षे जगत. म्हणजेच कारखाने पोटाला देणारे होते तसेच जीव घेणारे सुध्दा होते. कामगारांच्या वस्त्या कोठे असत? तर कारखान्यांच्या भिंतींना चिकटून. म्हणजे जाण्या येण्यात वेळ जायला नको. या वस्त्या म्हणजे झोपडपट्ट्याच होत्या. मालक मंडळी कारखान्यापासून दूर मोकळ्या ढाकळ्या जागेत बंगले / महाल बांधून रहात. दूर अंतरावरुन घोडागाड्यांमधून कारखान्यात येत. मार्क्सचा सहकारी एंगल्स याने मँचेस्टर शहरातील कामगारांच्या अवस्थेचे तपशीलवार वर्णन केले आहे.
१८५१ साली मँचेस्टरची वस्ती ३ लक्ष होती. येथे सर्वत्र कापडगिरण्यांची गर्दी. त्यांचे उत्पादन मँचेस्टर क्लॉथ हे आपल्याकडे मांजरपाट या नावाने प्रसिध्द होते. एकोणिसाव्या शतकाअखेर शहरात ट्रामगाड्या आल्या. गिरण्यांना चिकटून असलेल्या कामगार वस्त्या थोड्या दूर गेल्या. मध्यम वर्ग बराच दूर गेला. विसाव्या शतकात चांगले रस्ते आले. त्यावरुन बसगाड्या धावू लागल्या. बागबगिचे वाढले. दुसऱ्या महायुध्दानंतर मोठेच बदल झाले. कारखानदारी घटली. लोकसंख्या घटली. गलिच्छ वस्त्या घटल्या. शहराच्या केंद्रभागातील मोठे क्षेत्र मँचेस्टर विद्यापीठ व पॉलिटेक्निक यांना देण्यात आले.
शहरे कशी हवीत?
एकोणिसाव्या शतकात औद्योगिक शहरांमधे आरोग्याची फार आबाळ होती असे आपण वर म्हटलेच आहे. लंडनमधे वारंवार पटकीची साथ येई. लोक झटपट मरुन जात. १८५४ साली जॉन स्नो या अभ्यासकाने या साथीचे बारकाईने निरिक्षण केले. शेवटी त्याने लंडनचा एक नकाशा काढला. त्यावर दोन गोष्टी दाखवल्या. एक म्हणजे पंप. पिण्याचे पाणी जागोजागी पंपानी उपसून पाठवले जाई. ते पंप नकाशावर दिसले. दुसरी गोष्ट म्हणजे कॉलराग्रस्त घरे. या खूणांमुळे रुग्ण कोणत्या भागात जास्त आणि कोणत्या भागात कमी हे दिसू लागले. यातून समजले की काही पंपांच्या आसपास रुग्णांची दाटी होती. या ठीकाणचे पाणी दूषित होते. विज्ञानाची यावेळेपर्यंत रोगजंतूंशी नीटशी जानपहचान झालेली नव्हती. पण त्याविना रोगांच्या साथींचा मागोवा घेण्याचे शास्त्र (इपिडीमिऑलॉजी) जॉन स्नोने जन्माला घातले. स्नोचा लंडन नकाशा जगप्रसिध्द झाला.
शहरांच्या अशा अनवस्थेवर विचार होऊन इंग्लंडमधे अनेक कायदे करण्यात आले. सॅनिटरी अक्ट , बिल्डिंग अक्ट वगैरे. १८३५ साली म्युनिसिपॅलिटी अक्ट झाला होताच. त्यांच्या अन्वये पाणी, सांडपाणी, घरबांधणी या गोष्टी नगरपालिकेच्या अखत्यारीत आल्या. (मुंबई शहराच्या विकासाचा विचार करताना हेच कायदे डोळ्यासमोर होते.) १८५५ साली कचरा आणि मैला यांच्या व्यवस्थेचे अधिकार पालिकांना मिळाले. १८७५ साली गलिच्छ वस्ती सुधारणा कायदा झाला. या रहिवाशांना उजेड, हवा, पाणी या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, तो त्यांचा हक्क आहे अशी भूमिका मान्य झाली. (असा कायदा भारतात १९६० साली आला) प्रथम लोक म्हणत की झोपडपट्टीवासी जनता कर देत नाही. मग त्यांना सोयी मिळाव्यात यासाठी पालिकेने पैसा का खर्च करावा? हा विचार मागे पडला. कारण झोपडपट्टीवासी जनतेची मते. १९ व्या शतकात इंग्लंडमधील नगरपालिकांनी थोड्या बहुत सोयी दिल्याहि. पण त्यांनी बांधलेली संडास व्यवस्था मोहेजोदारोच्या तुलनेने मागासच ठरेल. मोहेंजोदारोमधे मैला नळांमधून वाहून जाई. इंग्लंडमधे घराच्या पिछाडीला संडास असे. मागच्या गल्लीतून मैला वाहतुक करावी लागे.
वस्तीजवळ बाग हवी ही कल्पना इंग्लंडमधे नव्हती. गावाच्या वेगवेगळ्या विभागांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी व्हावा (झोनिंग) असा आग्रह नव्हता. उलट कामगारवस्ती कारखान्याजवळ असावी म्हणजे कँटीनची गरज पडत नाही असे वाटे.
१८७५ नंतर इंग्रजी शहरांमधे प्रवासाच्या सोयी वाढल्या. प्रथम घोड्यांनी ओढलेली ट्राम, मग विजेवरची ट्राम, १९१४ पासून मोटारी व बसगाड्या. दुसऱ्या महायुध्दच्या काळात लोकल रेल्वे व ट्यूब आल्या. ज्यांना शक्य ते सगळे लोक गजबजलेल्या शहरकेंद्रापासून दूर राहू लागले. त्यातून एक नवी समस्या निर्माण झाली. रहदारी तुंबणे, ट्रॅफिक जॅम. जुनी परंपरा म्हणजे रस्त्यांवर घोड्यांची लीद साठून दुर्गंधी येणे, त्याऎवजी आता वाहनांचा धूर लोकांना त्रास देऊ लागला.
शहरे कशी असावीत / नसावीत यावर बरेच विचारमंथन झाले. रॉबर्ट ओवेन हा आठराव्या शतकातील एक इंग्रज धनिक. वृत्तीने समाजवादी. आदर्श टुमदार नगराचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. बालवयात कोणाला चाकरीचे कष्ट उपसावे लागू नयेत, शिक्षण, करमणुक यांच्या सोयी असाव्यात, लोकांनी सहकार्याने, बंधुभावाने एकत्र नांदावे या सगळ्यासाठी योग्य नगर वसवणे हे ओवेनचे स्वप्न.
एब्नेझर हॉवर्ड हा विसाव्या शतकातील चिंतक. त्याच्या कल्पनेत बगीचांना फार महत्व होते. खेड्यातील निसर्ग आणि शहरातील रोजगार संधी यांचा समन्वय साधला पाहिजे असे त्याचे प्रतिपादन होते. त्याचा बराच प्रभाव पडला.
आजच्या भारतातील नगरे
नमुन्यादाखल आपण पुणे आणि मुंबई यांचा इतिहास पाहू. शेवटी एकंदर नागरी परिस्थितीकडे संक्षेपाने दृष्टिक्षेप टाकून हे प्रकरण संपवू.
पुणे
आठव्या शतकात वेरुळचे कैलास लेणे करविणारा राष्ट्र्कूट राजा कृष्णराज याच्या एका ताम्रपटात (सन ७५८) पुण्यविषयांतर्गत (पुणे प्रांतात) बोपखळू हे गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. या गावाच्या चतुःसीमा म्हणून पूर्वेला कलस (आजचे कळस) पश्चिमेला दर्पपुडिका (आजचे दापोडी), उत्तरेला भेसउरी (भोसरी) ही गावे आणि दक्षिणेस मुइला (मुळा) नदी सांगितल्या आहेत. म्हणजेच ८ व्या शतकापासून पुणे हे शासकीय केंद्र होते.
पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही इथली यादवकालीन शिवमंदिरे. यादवांच्या पराभवानंतर महाराष्ट्रात इस्लामचा प्रसार झाला. त्या लाटेत नारायणेश्वर मंदिर तोडून त्याजागी शेख सलाउद्दीन नामक संताची कबर बांधण्यात आली. साल १३५८. पुढे सन १३९० मधे सय्यद हिसामुद्दीन झंजानी हा धर्मप्रसारक मेल्यानंतर पुण्येश्वर मंदिर पाडून त्याची कबर बांधण्यात आली. थोरला आणि धाकटा शेख सल्ला म्हणतात ते हेच. १६ व्या शतकात चैतन्यमहाप्रभू यांचे शिष्य गोविंददास यांनी पुण्यनगर स्थानाची स्तुती केल्याचा उल्लेख आहे. येथील लोक नाना विद्यांमधे निपुण आहेत, भागवताचे अध्ययन करतात, येथील पंडितांच्या शब्दाला मान आहे इत्यादि. सतराव्या शतकच्या सुरवातीला पुणे परगण्यावर शहाजी भोसले यांची सत्ता होती. १६३६ साली त्यांनी दादोजी कोंडदेव यांना कारभारी नेमले. त्यांनी परगण्यात उत्तम शासन यंत्रणा उभारली. आंबिल ओढ्यावर धरण बांधून पुण्यासाठी पाण्याची सोय केली. विनायक ठकार नामक ब्राम्हणाने जपलेल्या गणपतीचे मंदिर बांधले. हाच आजचा कसबा गणपती. ५२॥ X ८३॥ फूट येवढा मोठा लाल महाल बांधला. दादोजींकडे शिक्षण घेत शिवरायांनी स्वराज्याचा ओमाना गिरवला. औरंगजेबाने संभाजीकडून पुणे जिंकून घेतले. पुढे बाळाजी विश्वनाथ अर्थात पहिला बाजीराव पेशवा याने पुणे परत मिळवले, पुढे ते मराठ्यांकडेच राहिले.
सुरवातीला कसबा गणपती भोवतीची वस्ती येवढेच पुणे होते. निजामशाहीत पेठ मूर्तिजाबाद व पेठ शाहपूर या वसवल्या गेल्या. पुढे त्यांची नावे शनिवार व सोमवार पेठ अशी झाली. मलकापूर ही तिसरी निजामशाही पेठ म्हणजे पेशवेकालीन रविवार पेठ. शितोळे हे शिवपूर्व काळापासून पुण्याचे देशमुख. पहिल्या बाजीरावाने शितोळ्यांकडून जमीन घेऊन तीवर शनिवार वाडा बांधला. शाहिस्तेखानाने अष्टपुरा किंवा मंगळवार पेठ वसवली. औरंगजेबाने वसवली ती मोही पेठ, आजची बुधवार पेठ. कसब्यात पाटील, देशमुख असे वतनदार, व्यापारी, सावकार असे सुखवस्तू लोक रहात. शनिवारात नदीकाठी ब्राम्हण वर्गाचे प्रमाण मोठे होते. मंगळवारात माळी, दलित तर बुधवारात व्यापारी जास्त. नारायण, सदाशिव या पेठा पेशवाईत वसल्या. शुक्रवार पेठ वसली ती पेशव्यांच्या छावण्यांमुळे. गंज पेठ, वेताळ पेठ, गणेश पेठ यासुध्दा पेशवाईतीलच. पेशवाईच्या सुरवातीला पुण्याची वस्ती दहा हजार असावी. १९०० सालापर्यंत ती लाखावर गेली. १९९१ साली ती १५ लक्षहून जास्त होती. ही पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील वस्ती. पिंपरी – चिंचवड या लगतच्या औद्योगिक शहरांची वस्ती वेगळी. १९६१ साली पानशेत धरण फुटून पुण्यात प्रलय आला. नदीकाठचे पुणे वाहून गेले. पूरग्रस्त दूर जाऊन राहू लागले. यातून नवी पेठ, मुकुंदनगर, पद्मावती, लक्ष्मी नगर अशा वस्त्या वाढल्या. विसाव्या शतकाच्या सुरवातीस लोकमान्य टिळकांच्या आशीर्वादाने मुठा नदीच्या उत्तरेला डेक्कन जिमखाना ही सुनियोजित वस्ती तयार झाली. विसाव्या शतकाच्या अखेरीच्या चतुर्थकात कर्वे रस्ता आणि कोथरुड या भागाची अत्यंत झपाट्याने वाढ झाली. या वाढीच्या वेगाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे झाली आहे.
डेक्कन कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र, फर्गसन कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग इत्यादींमुळे पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणण्याचा प्रघात होता. चांगली हवा, मुबलक पाणी, शांत वातावरण वगैरे मुळे लोक सेवानिवृत्तीनंतरचा काळ पुण्यात घालवणे पसंत करत. म्हणून पुण्याला पेन्शनरांचे गाव असे ही म्हटले जाई. गेल्या अर्ध शतकात पुण्याचा औद्योगिक क्षेत्रातही जोरदार प्रवेश झाला. किर्लोस्कर, फिरोदिया ही इथलीच कारखानदार मंडळी. पण बंगाल/बिहार मधील औद्योगिक शांतता १९६० नंतर ढळली आणि टाटांनी ट्रक कारखाना पुण्याला उघडला तेव्हां येथे ओद्योगिकरणाला नव्याने तोंड फुटले. आज पुण्याभोवती कारखान्यांचे जाळे पसरले आहे.
पूर्वीच्या पुण्यात विविध भागात वातावरण कसे होते याचे म.श्री. माटे यांनी केलेले वर्णन पहा. “लक्ष्मी रोडवर गेले की सोट्या म्हसोबा मंदिराच्या मंडपात आठ दहा मंडळीं समोर पुराण सांगणारे पुराणिकबुवा. पूल ओलांडून गेले की एकमेकांशी फटकून वागणारे लाकडी जाळ्यांचे, भोवताली फुलांच्या सुदर बागा असणारे टुमदार दगडी बंगले. उलट्या दिशेने गेले की साचापीर स्ट्रीट, सोलापूर बाजार येथे काचेची रंगबेरंगी तावदाने लावलेल्या चाळवजा इमारती एकमेकींना खेटून उभ्या. कोणत्या भागात गेले की कोणत्या प्रकारच्या इमारती आणि कोणत्या प्रकारची माणसे दिसतील याचा सहज अंदाज बांधता येणे शक्य होते. सोलापूर बजारच्या बाजूला झगेवाल्या बाया, टाय/सूट/बूट करुन अर्धे कच्चे इंग्रजी / मराठी बोलणारे किरिस्ताव भेटायचे. जिमखान्याच्या दिशेने परीट घडीचे पांढरे शर्ट, तशीच हाफ पँट, हातात टेनिसची रॅकेट घेतलेले वृध्द – युवा समोर येत. सदाशिव – नारायणची वाट आली की हातात तांदळाची कोयरीची वाटी घेतलेल्या नऊवारीतील गृहिणी नाकातली नथ सावरीत एकमेकींना कोणत्या देवळात कोणत्या बुवाचे कीर्तन आहे, कोठे कशाचा सप्ताह आहे हे सांगताना दिसायच्या. थोडे वळून शनिवाराकडे गेले की लांब अंगरखा, बाराबंदी, करवतकाठी धोतर, खांद्यावर जरीकाठी उपरणे, पगडी अशा भारदस्त वेषातील सरदार मंडळींशी गाठ पडे”
पुण्यात पेशवाई स्थिरावली तेव्हां अनेक बाधकामे झाली. वाडे, इमले उठले. पुणेकर मंडळींनी माळवा, आग्रा, दिल्ली, राजस्थान इकडे मोहिमांमधे वेगवेगळ्या धाटणीच्या वास्तू पाहिल्या होत्या. त्यांचे कमी अधिक प्रमाणात अनुकरण झाले. तिकडील कारागीर आणवले गेले. शनिवार वाडा हा सगळ्यात बडा. पहिल्या बाजीरावाचा. तर विश्रामबाग वाडा बांधला दुसऱ्या बाजीरावाने. नाना वाडा, रास्ते वाडा इत्यादी इतर वाडे. पेशवाई गेल्यावर अनेकांची स्थिती खालावली. त्यांचे जतन करणे अवघड झाले. त्यांची जागा घेत आहेत अपार्टमेंटस. त्यामानाने पुण्याची देवळे टिकली. काहींचे स्थलांतर झाले उदा. उंबऱ्या गणपती. काही गुदमरली. उदा. तुळशीबाग. तिला दुकानांचा घट्ट विळखा पडला. बेलबागेची बाग गुप्त झाली. १८४३-४४ च्या गणनेनुसार पुण्यात १८८ मंदिरे होती. (महादेव ४९, मारुती ३३, राम १९, गणपती १७, विष्णू १४, देवी १४, विठोबा ११ वगैरे).
जुने पुणे हे मुठा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. तेव्हां मोटारी नव्हत्याच. रस्ते अरुंद.घरे एकमेकांना चिकटून आहेत. त्यातच छोटे उद्योगधंदे, व्यापार, गोदामे मिसळलेली. १९१५ साली मुंबई इलाख्यासाठी नगर नियोजन कायदा झाला. ते १९१७ साली पुणे नगरपालिकेत लागू झाला. उत्तरेला भांबुर्डा भागात रूंद रस्ते, मैदाने, बागा अशा सोयी होऊ लागल्या. दुकानांसाठी राखीव ठिकाणे आली. सुधारणांचा बव्हंश खर्च सुधारणाआकार या रुपात वसूल झाला. १९५० साली पुणे महनगरपालिका अस्तित्वात आली. १९५४ साली स्वतंत्र भारताचा नवा शहर नियोजन कायदा आला. प्रथम आयुक्त स. गो. बर्वे यांनी नवा विकास आराखडा तयार केला. ही प्रक्रिया आजही चालू आहे. विसाव्या शतकाअखेरिस पुण्याचा विस्तार आणखी वाढवणे, नव्या क्षेत्राचा विकास आराखडा करणे असे प्रयत्न सुरु दिसतात.
पुणे लष्कर किंवा कॅन्टोन्मेंट
लष्कर/छावणी म्हणजे एका विशिष्ट उद्देशाने वाढवलेली / जोपासलेली वस्ती. हे खेडे नव्हे कारण कोणी शेती करीत नाही. बहुतेक वेळा कॅन्टोन्मेंट हे एखाद्या शहराच्या लगत वसलेले दिसते. त्या शहरावर नियंत्रण ठेवू शकणारी शिबंदी असे छावणीचे एक रुप असते. ही वस्ती स्वयंपूर्ण / स्वायत्त असायला हवी. शहरातील गोंधळाचा छावणीच्या शिस्तबध्द जीवनावर परिणाम होता कामा नये. अशीच वस्ती नागरी / शासकीय अधिकाऱ्यांची सुध्दा असते. तिला सिव्हिल लाइन्स असे पूर्वी म्हणत. पण ही छोटी असे.
ब्रिटिशांच्या अमदानीत छावण्या सर्वत्र उभारल्या गेल्या. त्या वेगळ्या काढण्याला विविध कारणे होती. शहरात शिबंदिला पुरेशी जागा मिळणे अवघड असे. दुसरे कारण आरोग्य. शहरांमधे पटकी, हिवताप,गुप्तरोग वगैरेचा प्रादुर्भाव असे. तेथे संसर्गाची शक्यता जास्त असे. शिवाय एकंदरच ब्रिटिश शिपाई मोठ्या संख्येने रोगराईचे बळी होत. फ्लॉरेन्स नाइटिंगेल हिने प्रभावीपणे दाखवले की शत्रूच्या समशेरींपेक्षा रोगाच्या लाटा इंग्रज सैन्यांचे जास्त नुकसान करीत.त्यांच्यापासून संरक्षणासाठी स्वच्छ व निरोगी वस्त्या अत्यावश्यक होत्या.
१८१८ साली पेशवाई संपली. शनिवार वाड्यावर यूनियन जॅक फडकू लागला. त्याच वेळी पुणे लष्कर ही वस्ती रुजण्याला योग्य परिस्थिती निर्माण झाली काही काळ ब्रिटिश सैन्य शनिवार वाड्यातच तळ ठोकून होते. पण ते गैरसोईचे ठरले. सोलापूर, नगर व सातारा या बाजूला जाणारे मार्ग राखण्या / रोखण्यासाठी पुण्याच्या पूर्वेला लष्कर भाग विकसित करण्याचे ठरले. खरे तर शहराचा दूषित वारासुध्दा लष्कर वस्तीवर येणे नको म्हणून ती वस्ती शहराच्या पश्चिमेला असायला हवी पण पुण्याची स्थानिक परिस्थिती वेगळी आहे. असो.
कलेक्टर रॉबर्टसन याने लष्कर भागाच्या सीमा आखल्या. तो आणि सेनाप्रमुख कर्नल गिफर्ड यांनी दहा वर्षात जरुर त्या सर्व जमिनी जागिरदार, इनामदार, वतनदार, मिरासदार वगैरे मालकांकडून घेतल्या. १८२५ पर्यंत कँप भागाला रुप आले. या वस्तीचे तीन भाग होते. बराकी, बंगले आणि बाजार. पहिल्या भागात इंग्रज व देशी शिपायांची निवासस्थाने, पोलो व परेड मैदाने, गोळीबार मैदान, खेळ मैदान, रेस कोर्स, कोठारे, गोदामे इस्पितळे इत्यादि. दुसऱ्या भागात अधिकाऱ्यांच्या दर्जानुसार लहान मोठे भूखंड पाडून त्यावर घरे. शिवाय चर्च.
लष्करातील लोकांच्या गरजांसाठी बाजार हवाच. मेन स्ट्रिट हा मुख्य बाजार. सोलापूर रस्ता, वानवडी व घोरपडी येथे दुय्यम बाजार. प्रथम रस्ते आखून त्यावर भूखंड पाडायचे. ते व्यापाऱ्यांना द्यायचे. त्यांनी खाली दुकान, वर घर अश्या वास्तू बांधून व्यवसाय करायचा. बांधकाम कसे असावे याबद्दल नियम अगदी कडक. या नव्या संधीचा फायदा घेण्यासाठी कोण आले? पुण्यातील उच्च वर्णीय मुळीच फिरकले नाहीत. मुंबईहून पारशी, गुजराथहून बोहरा, गोव्याहून ख्रिस्ती आले. युरेशियन, मारवाडी, जैन असेहि आले. काही इंग्रजांनी सुध्दा दुकाने थाटली. काही दुकाने खास लष्करी गरजांसाठी होती. पण मिलिनरी स्टोअर हे मात्र मिलिटरी साठी नव्हे. ते हॅटस विकणारे दुकान होय. हळूहळू दुय्यम व्यवसायहि आले. शिंपी आळी, कोळसा गल्ली, मोमिनपुरा ही त्याची चिन्हे. एकूण मोठी अनवट वस्ती निर्माण झाली.
१८५० मधे लष्कर भागात पाणीपुरवठा करण्यासाठी येरवड्याजवळ मोठे धरण बांधण्यात आले. त्याला म्हणत ‘बंड’. त्याच्या आधाराने फुलली ती बंडगार्डन. प्रथम बैल रहाटाने आणि नंतर वाफेच्या पंपाने पाणी खेचून नळाने पुरवठी केला जाई. याच्या अडीच लाख रुपये खर्चापैकी पावणे दोन लाख रुपये जमशेटजी जिजीभॉय यांच्याकडून देणगी रुपाने मिळाले. १८६७ साली येरवडा गावावरुन नदीच्या दक्षिणेला येण्यासाठी पूल झाला. पूल आणि धरण यांच्या दक्षिणेला रेसकोर्स होते. त्याचा वाहतुकीस अडथळा होऊ लागला. म्हणून ते हालवून सोलापूर रस्त्याजवळ सैन्यांच्य घोडेस्वारी सरावांची जागा होती तेथे १८८३ साली नेण्यात आले. आजही तेथे अश्वशर्यती होतात.
‘ बंड ’ धरणामुळे दलदल व डास यांचा त्रास वाढला. १९३४ साली नगरपालिकेने या बंधाऱ्याची उंची ४ फुटाने कमी केली. आज बंड व गार्डन दोन्हींची रया संपली आहे.
लष्कर भागाच्या विकासाचा पुण्यावर काय परिणाम झाला? पेशव्यांच्या पराभवानंतर बरेच लोक पुणे सोडून पळाले. पुण्याची वस्ती पुन्हा १८१८ सालाइतकी होण्यासाठी १८८१ साल उजाडावे लागले. जुन्या अभिजन वर्गाला शासन, व्यापार, लष्कर कोठेच पूर्वीचे स्थान उरले नाही. अमराठी लोक येऊन कामे करु लागले. पूर्व भागातील काही पुणेकर थोडे सरकून कँपात धंदा करु लागले. पण बव्हंशी कँपात काम करणारे लोक बाहेरुनच आले. उदा. इथले न्हावी बरेच गोरखपूरचे मुसलमान आहेत. मुस्लिम व दलितांनी चाकऱ्या घेतल्या.
कँपचा पुण्याच्या दैनंदिन जीवनावर काही प्रभाव पडला नाही. पण दंगा गडबड झाल्यास शिपाई तुकड्या पुण्याकडे धाव घेत. त्यावेळच्या लिखाणात कँपचा फारसा उल्लेख नसे. असलाच तर रूंद रस्ते, मोकळ्या जागा, स्वच्छ परिसर यांचे कौतुक असे. तेथील वेगळी विलायती वळणाची बांधकामे लोकांना अचंबित करीत. कँपात वस्तू जास्त चांगल्या दर्जाच्या मिळतात असे मानले जाई. तेथील कडक शिस्त आणि कायद्याचे चोख पालन याबद्दलहि आदर असे. पुढे डेक्कन जिमखाना नामक नवे सुनियोजित उपनगर जुन्या पुण्याच्या उत्तरेला विकसित झाले तेव्हां कँपची थोडीबहुत नक्कल झाली.
आता दिवसेंदिवस कँप आणि शहर यातील फरक धूसर होत चालला आहे. नियमांचे काटेकोर पालन आता राहिले नाही. याचे एक उदाहरण म्हणजे मेन स्ट्रीट (म.गांधी मार्ग) वरील पदपथ विक्रेते. मेन स्ट्रीट वरचे पदपथ (फूटपाथ) रूंद प्रशस्त आणि सोयीचे होते. दहा पंधरा वर्षांपूर्वी त्यावर किरकोळ विक्रेते बसू लागले. ही गोष्ट नियमबाह्य होती. त्यांना फारसे कोणी हटकले नाही. यांना भाडे नाही, कर नाही. पैसे वाचले. त्यांच्या वस्तू जरा स्वस्त. गिऱ्हाइक वाढू लागले. मूळ दुकानदारांचा तितका धंदा घटला. वर्षे गेली तसे सुमार ४०० विक्रेत्यांनी पदपथावर संसार उभारले, वाढवले. त्यांची हजार बाराशे माणसे वावरू लागली. गुंडगिरी करुन दुकानदारांना दहशत दाखवू लागली. पदपथावरुन चालणे अशक्य झाले. अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डाने या बेकायदा विक्रेत्यांना हुसकावण्याचे प्रयत्न सुरू केला. विक्रेत्यांची संघटना न्यायालयात गेली.प्रकरण वर्षानुवर्षे कुजले. दरम्यान पदपथ विक्रेत्यांची मुजोरी वाढत राहिली. अखेर या बेकायदा विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्याच्या बोलीवर न्यायालयाने विक्रेत्यांची हुसकावणी करण्यास संमती दिली. अनेक वर्षांनी पदपथ चालणाऱ्यांकरता मोकळे झाले. पण बोर्डाने ते झटपट तोडून रस्ता रुंद केला.
नागरी भागातील सार्वजनिक सोयींचा आपल्या फायद्यासाठी बेकायदा वापर करणे ही गोष्ट आता सर्वत्र आढळते. या व्यवहारात गुंडगिरी, गुन्हेगारी यांचा खुला वावर असतो. तत्कालीन फायद्यासाठी शासनयंत्रणा बोटचेपेपणा करते. गरिबांच्या कळवळ्याचा मुद्दा सोयिस्करपणे मांडला जातो. त्याला खरे उत्तर असते ते हे की गरिबांच्या कल्याणाचे कार्यक्रम शासनाने जरुर मोठ्या प्रमाणात राबवावेत. किंबहुना त्याबाबतचे अपयशच बेकायदा कृतीला कारण असते. ते अपयश धुवून काढण्याचे खडतर परिश्रम टाळून बेकायदा कृतीचे समर्थन करणे ही पळवाट होय. या प्रश्नांनी आता भारतात अक्राळ विक्राळ रुप धारण केले आहे.
मुंबई
अमेरिकेत न्यूयॉक तशी भारतात मुंबई. ही खरी मूळ सात वेगवेगळी बेटे. मोठा व छोटा कुलाबा, माहीम, शीव, माजगाव, वरळी आणि डोंगरी. मुंबई परिसर तसा ऎतिहासिक आहे. शूर्पारक (नाला – सोपारा) हे दोन हजार वर्षांपूर्वी रोमबरोबर होणाऱ्या व्यापारातील महत्वाचे बंदर होते. येथे ग्रीक व रोमन लोकांची वस्ती होती. सम्राट अशोकाचा येथील अधिकारी यवन ( म्हणजे Ionia येथील) अर्थात ग्रीक होता. कान्हेरीच्या बौध्द गुंफा ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील समजल्या जातात. घारापुरीला सातवाहनांचे बंदर होते. त्यांचे चिन्ह समजले जाणारा हत्ती ही येथील सर्वात मोठी शिल्पकृती. तिच्या ह्या बेटाला एलेफंटा म्हणतात. सहाव्या शतकातील १८ फूट उंच भव्य त्रिमूर्ती हे घारापुरीचे भूषण. महिकाव ची बखर या मराठीतील सर्वात जुन्या (पंधरावे शतक) बखरीत मुंबईचा इस्लामपूर्व इतिहास आहे. आधुनिक काळात इ.स. १६६५ मधे इंग्रजांना पोर्तुगिजांकडून मुंबईचा ताबा मिळाला. त्यांनी आधीच तटबंदी वाढवली. हाच फोर्ट. फोर्टने इंग्रजांचे मराठा व फ्रेंच आक्रमणांपासून संरक्षण केले. अपोलो गेट, चर्च गेट म्हणजे त्या फोर्टच्या वेशी. किल्ल्याच्या आत रहाणे प्रतिष्ठेचे होते. आतील गुजराथी/पारशी स्वतःला भीतरकोटिया म्हणवत तर इतरांना बाहरकोटिया म्हणून हिणवत.
इंग्रजांनी १८व्या शतकात भराव घालून पूल बांधून मूळची सात बेटे जोडण्यास सुरवात केली. १९ व्या शतकात हे काम पुरे झाले. १८६२ साली फोर्ट पाडून टाकण्यात आला. पण त्याचे नाव उरले.
मुंबई हे अंशतः नैसर्गिक व अंशतः मानवनिर्मित बंदर आहे. १७३५ मधे ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्य ठाणे सुरतहून मुंबईला आले. त्यानंतर अनेक गोद्या (डॉक्स) बांधण्यात आल्या. भाऊ ल अजिंक्य यांनी बांधलेल्या एक गोदीस अजूनही भाऊचा धक्का म्हटले जाते.
अमेरिकन यादवी युध्दाच्या काळात मुंबईला कापूस व्यापारामुळे मोठीच बरकत आली. त्याच सुमारास सुएज कालव्यावर इंग्रजांचे वर्चस्व आले. लंडन – मुंबई अंतर १८ हजार कि.मी वरुन ११ हजार कि.मी. वर आले. मुंबईचे महत्व कलकत्त्यापेक्षा जास्त झाले. १८ व्या शतकात वाडिया कुटुंब गुजरात मधून मुंबईला आले होते. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसाठी सागवानची जहाजे बांधून देण्याचा धंदा उभारला. त्याची जागा माझगाव डॉक. इंग्लंडमधे ओक वृक्षापासून बनलेल्या जहाजांपेक्षा वाडियांची जहाजे स्वस्त व अधिक टिकाऊ होती. १८०० साली त्यांनी बांधलेले सर्वात मोठे (७६ तोफांचे) लॉड कॉर्नवॉलिस हे जहाज १९५७ सालापर्यंत कार्यक्षम होते.
मराठा व अन्य भू सत्तांपैकी कोणाचाहि मुंबईवर कब्जा झाला नाही. या अर्थाने म्हणतात की मुंबई कधी घोड्यांच्या टापांखाली आली नाही. ६०० वर्षे ती क्रमाने मुस्लिम, पोर्तुगीज व इंग्रज यांच्या अधिपत्याखाली राहिली.
१८१८ साली मुंबईत रस्त्यांवर मैलाचे दगड बसले. १८२३ मधे रस्त्यांच्या डाव्या बाजूने वाहने चालविण्याचा नियम आला. १८४३ मधे रस्त्यांवर खोबरेलाचे दिवे आले. १८६५ मधे गॅसचे. १८८२ साली विजेचे दिवे झळकू लागले. १८५३ मधे आशिया खंडातील पहिला ‘चाक्या म्हसोबा’ अर्थात रेलगाडी मुंबईत आला/आली.
आज मुंबई ही भारताची अनभिषिक्त आर्थिक राजधानी आहे. एका कोटीहून अधिक वस्ती असलेल्या या महानगरीत दरवर्षी सुमारे १लक्ष लोक नव्याने येतात. लोकल गाड्यांमधून रोज ५५ लक्ष प्रवासी ये – जा करतात. गर्दी अफाट. रेल्वेचा ‘सुपरक्रश लोड’ असा शब्द आहे त्याचा अर्थ दर गाडीत २००० प्रवासी. आज मुंबई लोकलच्या दर गाडीला ४००० प्रवासी बसतात. शहराचे बव्हंशी मैलापाणी विनाप्रक्रिया समुद्रात ओतले जाते. त्यामुळे किनाऱ्यावरील पाण्यात प्राणवायू शिल्लक नाही. सबब त्यातील सजीव संपत चालले आहेत. डोंगरायेवढ्या लोकसंख्येला किमान सेवा देणे शासनाला अशक्य झाले आहे. निवासाची अन्य सोय नाही म्हणून झोपडपट्ट्या वाढत आहेत. शासनयंत्रणेची क्षमता घसरली असून गुन्हेगारी, भ्रष्टाचार व बजबजपुरी यांचा अनुभव प्रत्येकाला घ्यावा लागत आहे. नजीकच्या भविष्यकाळात सुधारणेची आशा वाटावी असे आसपास काही दिसत नाही.
देशात सर्वत्रच शहरीकरण वेगाने चालू आहे. १९४७ साली साऱ्या देशाची लोकसंख्या होती तेवढे लोक आज शहरात रहातात. आणखी २० वर्षात शहराची एकूण वस्ती ५० कोटीवर जाईल. महात्मा गांधी म्हणत की खेड्यात चला.त्यांचे सांगणे फारसे कोणी मनावर घेतले नाही. काही सच्चे नेते महात्माजींच्या संदेशानुसार आचरण करण्यासाठी आयुष्यभर खेड्यात राहिले. उदा. मणि देसाई यांनी आपले जीवन पुण्याजवळील उरळीकांचन य खेड्याच्या सेवेत घालवले, तर डॉ. मोडक यांनी पुण्याजवळच खानापूर येथे कायम वास्तव्य केले. पण हे तुरळक व सन्मान्य अपवादच. शहरातून खेड्याकडे कोणी गेले नाही येवढेच नव्हे तर खेड्यातून शहराकडे जाणारा ओघ वाढत राहिला. शहरवासीयांची टक्केवारी सतत वाढत आहे. आजच महाराष्ट्रात सुमारे ४०% लोक शहरांमधे रहातात. लवकरच हे प्रमाण ५०% इतके वाढेल. भारतात १० लाखाहून अधिक वस्ती असलेली पन्नास शहरे आहेत. शहरांकडे ओघ का वाढतो? खेड्यात रोजगार नाही, विकासाची संधी नाही म्हणून. दलितांना शहरात सामाजिक जाच कमी होतो. खेड्यात जीवन समाधानी, सुखी व समृध्द असेल तर शहराकडे येणे बरेच घटेल. कारण शहरातहि गरिबांचे जगणे जिकीरीचेच आहे. दिल्लीत एक तृतियांश रहिवासी झोपड्यांमधे रहातात. घर आहे असे म्हणणारांपैकी बव्हंश कुटुंबे एका खोलीत कशीबशी रहातात. या प्रश्नातून कोणतेच शहर मुक्त नाही. चंदीगड हे भारतातील सर्वात सुनियोजित आधुनिक शहर. पण तरी ३०% रहिवासी झोपडपट्टीतच रहातात. असे कसे घडले? शहर बांधण्यासाठी आलेले हजारो , लाखो बिहारी / उत्तर प्रदेशी मजूर तेथेच राहिले. चंदीगडला खेटून पंचकुला, मोहाली, आनंदगड वगैरे शहरे वाढत व रुजत आहेत. ही वाढ नियोजित नाही.
शहरवस्तीतील तणाव सतत वाढत आहे. त्यावर उपाय करण्यासाठी काही किंमत देण्याची कोणत्याहि राजकीय पक्षाची तयारी नाही. सबब प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचे होत आहेत. उदाहरण म्हणून झोपडपट्ट्यांकडे पाहू. रोजगारासाठी आलेल्यांच्या गरजेपोटी या जन्म घेतात. राजकीय सोय, नोकरशाहीचा ढिलेपणा, भ्रष्टाचाराची संधी, दबावगटांचा अभाव यामुळे अशा वस्त्यांना निर्वेध वाढू दिले जाते. तेथे गुंड-गुन्हेगारांचे फावते. हळूहळू या वस्त्या मान्यताप्राप्त होतात. आज ग्राहक संरक्षक संस्था न्यायालयापुढे गाऱ्हाणी गात आहेत की आमचे सदस्य करदाते आहेत, कायदे पाळतात पण त्यांना सवलती मिळत नाहीत. उलट बेकायदा घुसखोरी करणाऱ्यांना सरकार सवलती देते. या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आता न्यायालयानां अवघड झाले आहे. याची टोकाची दोन उदाहरणे म्हणजे रेल्वेजमीन व राष्ट्रीय उद्याने यांच्यावर अतिक्रमण. रेल्वे रुळांच्या कडेला मोकळी जमीन असते/ ठेवावीच लागते. यांच्यावर सर्वत्र सरसकट अतिक्रमणे होतात. मुंबईत आज अशा झोपड्या इतक्या वाढल्या आहेत की त्यातून रेल्वे गाडीतील प्रवाशांशी सहज हस्तांदोलन करता यावे. या वस्त्यांमधून गाड्यांवर दगडफेक होऊन प्रवासी जायबंदी झाल्याची घटना (डोळे फुटणे, डोके फुटणे इ.) ही आता नवलाची राहिलेली नाही. असाच प्रकार मुंबईत बोरीवली भागात असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कचा. येथे कोणत्याही मानवी वस्तीला कायद्याची बंदी आहे. पण गेली कित्येक वर्षे तेथे अतिक्रमण चालू असून त्यावर सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. अलिकडेच या प्रकाराविरुध्द बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी या संस्थेने न्यायालयात दाद मागितली. ही अतिक्रमणे बेकायदा व समाजहित विरोधी आहेत म्हणून ती तातडीने हटवावीत असा आदेश उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिला. पण अशा असंख्य जागी अतिक्रमण असून त्यांच्याबद्दल कारवाई होत नाही हे कठोर वास्तव आहे. राजकीय व सामाजिक वातावरणात फारसा बदल झाला नाही तर नागरीकरण, त्यातून उदभवणारे प्रश्न, ते साचून गुंतागुंत वाढणे या प्रक्रिया अशाच चालू राहतील आणि लोकसंख्येच्या एका मोठ्या हिश्श्याचे जिणे अधिकाधिक जिकिरीचे होईल असे भाकित अपरिहार्य आहे.
मोहेंजोदारोसारखे जगाला चकित करणारे नगर वसविण्याचा दैदीप्यमान वारसा लाभलेला हा समाज आज मुंबईसारख्या बकाल महानगरीबाबत हतबल झाला आहे हे चित्र खरोखर दुर्देवी वाटते.
या प्रकरणात जाणवणारे नियम
१) मानवी वस्त्यांचा आकार, त्यांचे स्थैर्य वगैरे बाबी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेवरुन ठरत आल्या आहेत.
२) स्थिर जीवनासाठी एका जागी बाराही महिने पुरेल इतका साधनपुरवठा हवा. एरवी भटकेपणा अपरिहार्य आहे.
३) माणसाच्या इतिहासात स्थैर्य आले ते शेतीमुळे. म्हणून स्थिरवस्ती ही मुळात शेती भोवती गुंफलेली असते.
४) शेतकऱ्यांच्या वस्तीचे क्षेत्र माणसाच्या चालण्याच्या क्षमतेने मर्यादित होते. कारण सकाळी कामावर जाऊन मुक्कामाला घरी परतायचे असते.
५) भारतीय खेड्यांची रचना जाती व्यवस्थेशी घट्ट बांधलेली आहे.
६) प्राचीन शहरे ही सत्ता व व्यापार यांची केंद्रे म्हणून उदयाला आली. आधुनिक काळात कारखानदारी हा नवा पैलू शहरांन घडवत आहे.
७) शेतीवरील अवलंबन घटते तशी शहरी लोकसंख्येची टक्केवारी वाढते. तो आकडा जवळपास १००% पर्यंत जाऊ शकतो.
८) प्रत्येक वस्तीचा इतिहास हा सभोवतालच्या समाजाच्या इतिहासातून घडतो.
९) शहरे व खेडी परस्परांवर अवलंबून असत.
१०) शहरांचे नियोजन व व्यवस्थापन यातील गुणवत्तेचा ऎतिहासिक आलेख हा चढता नसून चढउताराचा आहे. मोहेंजोदारो हे या आलेखातील शिखर होय. उलट मुंबईला शिखर म्हणणे अवघड आहे.

3 comments:

  1. अतिशय अभ्यासपूर्ण लेखन.

    ReplyDelete
  2. अतिशय अभ्यासपूर्ण लेखन.

    ReplyDelete
  3. खूप आवडल मला शेती विषयी पूर्ण माहीती / फरक मिळाल तर बर होईल

    ReplyDelete