Tuesday, April 13, 2010

chapter 2 part 1

आहार संस्कृती
काही माणसांकडे बघून वाटते की ही फ़क्त खाण्याकरिता जगतात. उलट जगण्याकरिता खाण्याची गरज प्रत्येक माणसालाच नव्हे प्रत्येक सजीवाला आहे. क्षुधेने सर्वच प्राणी व्याकूळ होतात. क्षुधाशांतीने त्याना बरे वाटते. भुकेला प्राणी अन्न मिळवण्यासाठी जंग जंग पछाडतो. उत्क्रांतीमधे त्याच्या मेंदूची अपरिहार्यपणे अशी रचना झाली आहे. ज्याला भुकेची पोटतिडीक जाणवत नाही तो प्राणी खंगून मरणारच.
प्राण्यांचा आहार ठरतो दोन गोष्टीनी. गरज आणि संधी.
वनेऽपि सिंह: मृगमांस भाक्षिणो ।
बुभुक्षिता नॆव तृणं चरंति ॥
सिंह म्हटला की तो शिकारीचे मांसच खाणार. भूक लागली म्हणून तो गवत थोडाच खाणार? या संस्कृत वचनात वास्तवाचे वर्णन आहे. पण तसाच सिंहाच्या शिकारीपणाबद्दल कॊतुकाचा भाव आणि गवत चरणाऱ्या प्राण्यांबद्दल तुच्छता असे पण आहे क? असल्यास ती छटा पूर्ण अस्थानी होय. सिंह गवत खात नाही याचे कारण त्याला ते अपमानास्पद वाटते असे नसून त्याच्याजवळ गवत पचविण्याची शक्ती नाही हे होय. म्हणून मग सिंहाला गवत आवडतही नाही. कुत्रे गवत खातात. ते पचत नाही. उलटीमधून बाहेर पडते. त्याच वेळी पोटातील इतर न पचलेले पदार्थही बाहेर पडतात. तोच गवताचा उपयोग.
सर्वसाधारणपणे गवत, झाडपाला वगॆरे पचवण्यासाठी खास पचनव्यवस्था लागते. मांसासाठी नाही. खरे तर गायी म्हशी या शाकाहारी. पण मांस, हाडे व्गॆरे पदार्थ बारीक करून आंबोणात मिसळल्यास गायी म्हशी विनातक्रार खातात व पचवतात. उंट कडुनिंबाची पाने पचवू शकतो. जिराफ़ काटेरी वनस्पती रिचवतो तर सशाला मात्र कोवळे गवतच खावे लागते. वाळवी जवळ वठलेले लाकूड पचवण्याची क्षमता आहे.
मोठमॊठी हाडे फ़ोडण्याची ताकद तरसाच्या जबड्यात आहे म्हणून इतर शिकारी प्राण्याना सावजाचा खाता न आलेला भाग तरसाला उपयोगी पडतो. संधी मिळाली तर रानडुक्कर मांस खाते. तर अस्वलाला मध हवा असतो. एरवी बोरे चालतात.
अन्नाची गरज ही फ़ार ढोवळ कल्पना झाली. प्राण्यांचे शरीर व्यापार नीट चालू रहाण्यासाठी विविध अन्नघटक पुरेसे मिळावे लागतात. हालचालीसाठी ऊर्जा लागते. वाढीसाठी व झीज भरून येण्यासाठी प्रथिने लागतात. हाडांच्या बांधणीसाठी कॅल्शिअम तर रर्क्तासाठी लोह. सगळ्या तपशीलवार गरजा भागण्यासाठी प्राण्याचा आहार समतोल व चॊरस हवा. प्रथिनरहित आहार दिला (उदा. फ़क्त साबूदाणा) तर प्राणी काही दिवसानी मरून जातो. जीवनसत्वे कमी पडली तर रोगाना आमंत्रण ठरते. अशा गोष्टी शालेय विज्ञानातून आपल्याला ठाऊक असतात. यावरून असे म्हणता येईल की निसर्गात सुदृढ प्राणी दिसला की त्याला पुरेसा व चॊरस आहार मिळत असणार असे समजावे. सामान्यपणे प्राण्यांच्या नॆसर्गिक आवडी निवडी त्यांच्या सुदृढतेला अनुकूल असतात. हानीकारक पदार्थांची आवड असलेले प्राणी नष्टच होणार. उपय़ुक्त पदार्थांची नावडसुध्दा प्राण्याला अडचणीत टाकणार. अर्थात हे सर्व प्रतिपादन, तो प्राणी उत्क्रांत होत असताना आसपास असणाऱ्या नॆसर्गिक पदार्थांबद्दल आहे. नव्या अपरिचित पदार्थांबद्दल आवड निवड कशी असेल हे सांगता येणार नाही. माणसाला अफ़ू, तंबाखू, दारू, असे पदार्थ आवडतात त्याचा दोष उत्क्रांतीला नाही. असो.
मांसाहारी प्राण्याना सगळे आवश्यक अन्नघटक मांसातून मिळू शकतात. म्हणून त्यांना एकसुरी आहार चालतो. मांसाहरी प्राणी फ़ार चवीचे खाणारे नसतात. शाकाहारात असे नसते. विविध घटक मिळवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ खावे लागतात. मधमाशा शाकाहारी आहेत. त्या ऊर्जेसाठी मध खातात तर प्रथिनांसाठी परागकण. माकडाना अनेक वनस्पतींची फ़ळे, पाने, फ़ुले असा संमिश्र आहार घ्यावा लागतो. म्हणून त्याना बऱ्याच चवींची, स्वादांची आवड असते. अर्थात माकडे संधीसाधू असतात. हाती आल्यास अंडी खातात. काही माकडे मांसही खातात. चिपांझी ही माकडे क्वचित इतर माकडांवर हल्ला करून त्याना मारून त्यांचे मांस खाताना आढळली आहेत. माणूस यावावत माकडासारखाच आहे.
आहारात क्षार कमी पडले तर प्राणी मुद्दाम शोधून खारट माती चाटतात. अशा जागाना वन्य – प्राणी – अभ्यासक Salt Lick असे म्हणतात. काही आदिवासी सशासारख्याना आकर्षण म्हणून ठराविक जागी मुतून ठेवतात आणि तिथे फ़ास वा सापळा तावतात.
वेगवेगळे पदार्थ आहारात असले की त्यांच्या संतूलनाचा प्रश्न निर्माण होतो. निसर्गत: प्राण्याना योग्य समतोल आहार कोणता ते कळते. उत्क्रांतीच्या चक्रात ही जाण नसलेले प्राणी मागे पडणे स्वाभाविकच ना? कॅनडातील मूस नावाच्या आकाराने घोड्यायेवढ्या हरणाचा या संदर्भात अभ्यास झाला आहे. त्याला गवत व पाणगवत यांच्यात समतोल साधावा लागतो. गवतात ऊर्जा जास्त पण क्षार कमी. पाणगवतात सोडियमचे क्षार जास्त पण पाण्यात फ़ार वेळ घालवणे त्रासाचे. मूस हा प्राणी आपल्या आहारात नेमके जरूर तेवढेच पाणगवत ठेवतो असे आढळूनअ आले. प्रयोगशाळेत उंदराना जर पिष्ट पदार्थांची एक बशी आणि प्रथिनपदार्थांची दुसरी बशी असे अन्न समोर ठेवले तर शरीराच्या गरजेनुसार त्यांचे योग्य प्रमाण ठेवून उंदीर जेवतो.
शिकरी प्राण्याना अडचण अशी की सावज सुखासुखी हाती लागत नाही. मुळात ते एका जागी ठरतच नाही. म्हणून आधी सावज दिसले पाहिजे, मग ते तावडीत सापडले पाहिजे अशी अनिश्चिती असते. त्यामुळे काही वेळा भरपूर अन्न आणि काही वेळा उपास असे वारंवार घडते. म्हणून मोठे शिकारी प्राणी एका वेळी अनेक दिवसांचा आहार खाऊ शकतात. मग तो पचे व संपेपर्यंत विश्रांती. याचे टोकाचे उताहरण म्हणजे अजगर. त्याने एक हरणाचे पिल्लू गिळले की पुढचे कित्येक आठवडे तो काहीही खात नाही. याच्या उलट टोक म्हणजे चिचुंद्री. केवळ काही तास उपास घडला तरी ती मरायला टेकते. याचा अर्थ असा की अन्नाची भरपूर उपलब्धता असलेल्या मर्यादित भूभागातच चिचुंद्री राहू शकणार.
अन्न मिळवण्यासाठी गटाने प्रयत्न आवश्यक असतील तर सामूहिक जीवन दिसेल. रानकुत्रे, लांडगे हे प्राणी पाळीपाळीने पाठलाग करुन सावजाला दमवतात आणि मग मारतात. ते गटाने कुटुंवात रहातात. उलट वाघ एकांडा रहातो. सिंह याच्या आधेमधे आहे. जेव्हां गवत भरपूर असते आणि म्हणून हरणांसारखे प्रांणी कळपाने दिसतात तेव्हां आफ़्रिकेत सिंह गटाने रहातात. शिकार करतात. उन्हाळा येतो, गवत वाळते तसे शाकाहारी प्राणी विखुरतात आणि मागोमाग सिंहही.
प्रत्येक जीवाला पाणी लागतेच. त्यामुळे पाण्याच्या साठ्याच्या जवळपास वस्ती करावी लागते. पाणी संपले तर स्थलांतर करणे भाग. नद्या, तळी काहीच नसलेल्या वाळवंटी मुलखात रहायचे असेल तर इतर मार्गाने पाणी मिळवण्याची क्षमता हवी. काही वाळवंटी उंदीर दव पिऊन जगतात किंवा उंट संधी मिळाल्यावर कित्येक दिवसांसाठीचे पाणी पिऊन घेऊ शकतो.
अन्नपाण्याची उपलब्धता चांगली असेल तेथे दाट वस्ती बनते तर अन्नपाणी नाही ते क्षेत्र उजाड होते. उथळ तळ्यांपाशी पाणपक्षी गर्दी करतात कारण तेथे अन्न मिळते. खोल धरणांपाशी पक्षी दिसत नाहीत कारण त्याना खायला मिळत नाही.
माणूस हा जीवशास्त्रदृष्ट्या वाघ – सिंह यांच्यासारखा स्वभावत: मांसाहारी नाही की हत्ती, घोडे यांसारखा स्वभावत: शाकाहारी नाही. माकडाप्रमाणे अनेक तऱ्हेची फ़ळे, फ़ुले, पाने, बिया त्याला पचतात. संधी मिळात्यास मांस तो खाऊ शकतो. माणसाच्या जीवनात शेती ही गोष्ट सुमारे दहा हजारवर्षांपूर्वी आली. त्यापूर्वी माणसाचा आहार कसा होता? फ़्ळे, फ़ुले, पाने, सापडल्यास अंडी, मेलेला प्राणी आढळत्यास त्याचे मांस, ओढे-नाले यांच्यात दगड उलथून सापडणारे खेकडे,अडलेल्या पाण्यातले मासे वगॆरे. म्हणजे मनुष्य शिकार करत नव्हता असे नव्हे. पण शिकारीतील अनिश्चिती, धोके, कष्ट वगॆरे लक्षात घेता अन्न गोळा करण्याची सोपी आणि भरवशाची रीत अधिकांश वापरात असणार. आणखी एक रीत म्हणजे माणसानी एकत्र येऊन दगड, धोंडे, आग वापरून दुसऱ्या प्राण्यांच्या शिकारीवर दरोडा घालणे. अशा दरोडेखोर कळपाला बिबटे, ढाणे वाघ असे प्राणीसुध्दा भितात. खड्ड्यात, फ़ासात, पिंजऱ्यात सावज अडकवल्यावर मारणे हा कमी धोक्याचा व कमी कष्टाचा प्रकार. अर्थात अश्मयुगीन बाण व भाल्यानी हत्तीसारखे वा त्याहूनही मोठे प्राणी मारल्याचा पुरावा आहे.
पण मुद्दा असा की आदिमानव हा मिश्र आहार घेणारा होता.
अन्न शिजवण्याचे काय? इतर प्राण्यांप्रमाणे माणूसही प्रथम अन्न दच्चेच खात असणार. उत्तर ध्रुव प्रदेशातील आदिवासी अगदी अलीकडे पर्यंत मासळी कच्चीच खात असत. (आजही आपण फ़ळे, दाणे कच्चेच खातो. जपान मधे मांस कच्चे खाण्याचा प्रघात आहे. त्याला सूशी असे म्हणतात). मग माणूस अन्न शिजवणे शिकला कधी ? एक अंदाज असा की वणव्यात होरपळून मेलेले प्राणी हाती लागल्यावर खाताना माणसाला ते रूचकर लागले असतील किंवा हाडापासून मांस अलग करणे, त्याचे गिळण्यायोग्य छोटे तुकडे करणे या गोष्टी फ़ार सोप्या झाल्या असतील. यातून मग मारून आणलेले / मिळालेले मांस आगीवर धरण्याला सुरुवात झाली असेल.
ग्रीक पुराणामधे प्रामिथिअसची कथा आहे. त्याने अग्नी पळवून आणला आणि वापरला म्हणून देव रागावले. आगीवर नियंत्रण ही माणसाची मोठीच करामत होय. माणसाने आगीचा उपयोग प्रथम हिंस्त्र प्राण्यांपासून आपल्या वस्तीची राखण करण्यासाठी केल असावा. त्यानंतर अन्न शिजवण्यासाठी, शिकारीचे साधन म्हणून वगॆरे. शेवटी जंगल जाळून शेती करण्यासाठीही अग्नी कामास आला. एस्किमो आदिवासींमधे शिकारीच्या चरबीचा वापर दिव्यात तेल म्हणून करीत. त्याना जळण म्हणून लाकूड उपलब्ध नव्हते. असे म्हणतात की युरोपीय मंडळी एस्किमोंच्या ध्रुवप्रदेशात पोचली तेव्हां त्यांनी दगडाच्या शिळा तेल पेटवून तापवल्या व त्यावर मांस भाजले.
आहारात तृणधान्ये आणि दूध याना महत्वाचे स्थान कधी व कसे प्राप्त झाले? तांदूळ, गहू वगॆरे पिके म्हणजे गवताच्या जाती आहेत. पाणथळ भूमीत व माळावर अशा गवतांची कुरणे आपोआप तयार होतात. त्यांच्या बिया हे अन्न आहे ही गोष्ट पाखरांच्या दाणे टिपण्यातून समजू शकते. पण माणूस असे दाणे टिपू शकेल का? सर्वच प्राण्याना अन्न मिळवताना कष्टाच्या बाबतीत फ़ायद्या- तोट्याचे गणित संभाळावे लागते. करवंदापेक्षा आंबा तोडण्याचे काम परवडते कारण गर भरपूर. खेकडा लहान असला तर तो उकलून आतले चिमुटभर मांस गोळा करून खाईतोवर कंटाळा येलो. म्हणून माणूस शक्यतो मोठ्या खेकड्याच्याच मागे लागणार. छोटा खेकडा कधी परवडेल? तो मोठ्या संख्येने मिळाला पाहिजे आणि फ़ारशी सफ़ाई न करता गट्टम करता आला पाहिजे. मोठा मासा खाण्याआधी साफ़ केला जातो. डोके, शेपुट, पोट, खवले वगॆरे भाग काढून टाकतात. मग उरलेला मासा (काटे वगळून) खातात. फ़ार छोटे मासे तसेच खातात. तृणधान्याच्या बिया तर या सगळ्याहून छोट्या. त्या सोपेपणाने गोळा करता येतात क? ऒंब्या पिकल्यावर त्यांच्यावरून वारा घातल्यासारखे सूप फ़िरवून दाणे गोळा करता येतात. आजही आफ़्रिकेत काही ठिकाणी तर भारतात ओरिसामधे असा जंगली तांदूळ गोळा करून खाल्ला जातो. हे भात सडून त्याचे तूस वाऱ्यावर उडवून देऊन मागे राहिलेले तांदूळ पाण्यात शिजवण्याचे तंत्र हलके हलके विकासित झाले असणार. शेती करू लागल्यापासून माणसाने तृणधान्याला आहारात केंद्रस्थान दिले आहे.
दूध हा बाळपणीचा एकमेव अन्नपदार्थ. माणूस हा सस्तन प्राणी आहे. सर्वच सस्तन प्राणी पिलाना अंगावरचे दूध पाजतात. रोहित पक्षी पिलाना पाण्यासारखा दिसणारा रस पाजतात. काही कबुतरे आपल्या घशात झिरपणारा रस लहानग्याना भरवतात. डिस्कस फ़िश नावाच्या मासळीच्या अंगातून असाच एक रस बाहेर पडतो. तो खाण्यासाठी त्या मासळीची पिल्ले आईला चिकटून रहातात. पण किती झाले तरी आईचे दूध मिळणार फ़क्त बाळपणात. प्रॊढ माणसाला अन्नात दूध मिळू लागले ते गाय, शेळी वगॆरे प्राणी माणसाळवल्यानंतर. माणूस पशुपालक झात्यानंतर. अर्थात वरचे दूध मिळणे शक्य झाले तरी ते पचले पाहिजे. आपल्याकडे सामान्यपणे सगळ्याच प्रॊढाना दूध पचते. पण सर्वत्र असे नसते. सर्व बालकांच्या पोटात दूध पचवण्यास जरूर ते पाचक रस निर्माण होतात. पण काही आफ़्रिकन जमातीत, हे पाचक रस बनवण्याची शक्ती मूल मोठे झाल्यावर संपून जाते. अशा प्रॊढानी दुग्धपान केल्यास त्याना अतिसार होतो. दूध पिण्यावरचे हे नॆसर्गिक बंधन आहे. पण काही समाजात दूध पचणे शक्य असूनही प्रॊढानी दूध पिण्याची रीत नसते. मलेशियात मी चिनी आणि मले या दोन्ही जमातीत हे पाहिले. त्यांच्यामते दूध हा फ़क्त बालकांचा आहार होय. म्हणून त्यांच्याकडे गवळ्याचा धंदाच नाही.
प्राचीन भारतात आहार कसा होता? मोहेंजो-दारो संस्कृतीत गाय, शेळी, डुक्कर, कोंबडी, मगर, कासव, गोडे व खारे मासे असे प्राणी खाल्ले जात. त्यांची हाडे घरांजवळ सापडतात. मोठ्या संख्येने मातीच्या छोट्या वाट्या (कुल्लड?) सुध्दा आडळतात. उत्तर भारतात आजही चहा पिण्यासाठी अशा मातीच्या वाट्या देतात. कल्पना अशी की चहा पिऊन वाटी फ़ोडून टाकायची. दुसऱ्याचे उष्टे भांडे वापरून विटाळ होण्याची भीती हे काही अंशी या पध्दतीचे कारण आहे. मग मोहेंजो-दारो मधे सुध्दा विटाळाची समजूत होती काय? कोण जाणे.
वॆदिक काळात मातीचे भांडे स्वयंपाकात एकदाच वापरत. परत वापरायचे तर पुन्हा भाजून घेत. धातूची भांडी राखेने घासत, तर लाकडी भांदी खरवडून साफ़ करीत असे आपस्तंब धर्मसूत्रातील पुढील श्लोकावरून दिसते.
अनाप्रीते मृण्मये भोक्तव्यम ।
आप्रीतं चेदाभिदग्धे ।
परमृष्टं लोहं प्रयतम ।
निर्लिखितम दारुमयम ॥
या काळात यव (बार्ली) हे महत्वाचे तृणधान्य होते. त्याच्या पिठाचे अपूप (गोड गोळे) बनवीत. नंतर ते स्थान व्रीही म्हणजे तांदुळाला मिळाले. यजुर्वेदात तांदुळाचे पाच प्रकार सांगितले आहेत. सर्वोत्तम प्रकार महाव्रीहि. मग कृष्णव्रीहि, शुक्लव्रीहि वगॆरे. आशुधान्य ही एक लवकर पिकणारी हळवी जात असावी. पाणिनीने रक्तशाली नावाची वर्षभरात तयार होणारी जात उल्लेखली आहे.
‘ संवत्सर पक्वानां रक्तशालीनाम ’
आजही आपल्याकडे काळी साळ, जिरे साळ अशी नावे तांदुळाच्या जातीना आहेत. मॆत्रेयणी संहिता सांगते की तांदुळाचे पुरोडाश बनवीत.
‘ व्रीहीमय: पुरोडाशो भवति ’
सायणाचार्यानी पुरोडाश म्हणजे तांदुळाच्या पिठाचा शिजवलेला गोळा असा अर्थ दिला आहे.
‘ पकव: पिष्टपिण्ड: पुरोडाश इत्युच्यते ’
ओदन म्हणजे भातात इतर काही कालवून खाणे. होनाजी बाळाच्या अमरभूपाळीमुळे आपल्याला दध्योदन (म्हणजे दहीभात) हा शब्द परिचित असतो. त्याशिवाय घृतोदन (तूपभात), मुद गॊदन (मुगाची खिचडी?) असे प्रकार जेवणात होते.
तांदुळाच्या लाह्या बनवीत.
‘लाजा व्रीहिप्रभवा: पुष्पवत विकासिता: ’ (सायणाचार्य)
आर्य हे पशुपालक होते. तेव्हां आहारात दुधाला महत्व असणारच.
दुधाला विरजण तावण्यासाठी ताक, पूतिका ही वेल, पलाश, कुवल या वृक्षांची साल वापरत असत. दूध फ़ोडण्याची रीत होती.
ऊष्णे दुग्धे दध्नि क्षिप्ते
घनभाग आमिक्षा, शिष्टं वाजिनम ।
वेगळ्या झालेल्या पाण्याला वाजिनम म्हणत तर घट्ट भागाला आमिक्षा. कॊटिल्याच्या अर्थशास्त्रात म्हटले आहे की हा घट्ट भाग सॆनिकाना जेवणात वाढावा तर पाणी गायींच्या खाण्यात ओतावे.
प्राचीन भारतीय समाज हा सामिष भोजन आवडणारा होता. एवढेच नव्हे तर गोमांसभक्षक होता. ऋग्वेदातील काही संदर्भ पहा.
उक्षान्नाय वशान्नाय सोमपृष्टाय
वेधसे स्तोमॆर्विधेमाग्न ये ॥ (८ वे मंडल)
अग्नी हा बॆल व भाकड गायीना खातो (म्हणजे त्यांचा यज्ञात बळी देत). बॆल सरसकट पण गाय मात्र भाकड हा फ़रक लक्षात घ्या. दुभती गाय अघ्न्या असे. म्हणजे तिचा बळी देत नसत.
अघासु हन्यन्ते गावो । (१०वे मंडल)
लग्नाचे वेळी भाकड गाय कापत.
यास्मिन्नश्वास ऋषभास
उक्षणो वशा मेषा
अवसृष्टास आहुता: ॥ (१०वे मंडल)
घोडे, मेंढे, भाकड गायी यांचे मांस शिजवले जाई.
यत्ते गात्रादग्निना , पच्यमानादभिशूलं
निहतस्याव धावति ॥ (पहिले मंडल)
सळीवर मांस अडकवून भाजून खात (कबाब) .
आदरातिथ्य, यज्ञ, श्राध्द व्गॆरे साथी प्राणीहट्या ठीक आहे, एरवी नाही असे मनूने सांगितले.
मधुपर्केच यज्ञेच पितृदॆवत कर्मणी ।
अत्रेव पशवे हिंस्यान्नन्य थेन्य ब्रवीन्मनु: ॥
साहाजीकच मनुस्मृतीने असेही सांगितले की त्यांच्यासाठी मारलेले प्राणी ब्राह्मणानी जरूर खावेत.
प्रोक्षितं भक्षयेन्यांसं ब्राह्मणानां च काम्यया ।
य्थाविधि नियुक्तस्तु प्राणानामेव चात्यये ॥
याजबरोवर जेवणात संयम ठेवावा असेही मनूने सांगितले.
अनारोग्यं अनायुष्यम स्वर्ग्यं चातिभोजनम ।
अपुण्यलोक विद्बिष्टं तस्मात तत परिवर्जयेत ॥
अतिसेवनाते इह व परलोकी त्रास होतो तो टाळावा.
जेवावे कसे यावद्दल पूर्वी विशिष्ट कल्पना होत्या. महाभारताच्या अनुशासन पर्वातील ‘ नॆक वस्त्रेण भोक्तव्यं ’ (एकच कपडा नेसून जेवण नको) या आदेशाचे मला आश्चर्य वाटले. मग पुरोहितानी एक सोवळे नेसून अंगरखा, टोपी काढून ठेवून जेवण्याची रीत कधी व का आली कोण जाणे.
जेवताना भोवती चांगले वातावरण असावे ही कल्पना फ़्क्त पंचतारांकित हॉटेलांची नव्हे. काश्यप संहितेत म्हटले आहे
वीणा वेणुस्वनो न्मिश्रं गीतं नाट्य विडंबितम ।
विचित्राश्च कथा: शृण्वन भुक्त्वा वर्धयते बलम ॥
वाद्यसंगीत, गायन, नाट्य, विनोद, कथा वगॆरे ऎकत जेवण्याने गोष्टी अंगी लागतात.
जेवताना बरोबर प्यावे काय? काश्यप संहिता पुढे म्हणते
शीतोष्ण तोया सव मद्य यूष ।
फ़लाम्ल धान्याम्ल पयोरसानाम ।
यस्यानुपानं तुहिनं भवेद्यन ।
तस्मॆ प्रदेयं त्विह मात्रयातत ।।
गार, गरम पाणी, फ़ळांचे रस, मध, ज्याला जे अनुरूप ते त्याने घ्यावे.
इत्सिंग या चिनी प्रवाशाने गुप्त काळातील भारतीय जेवणाचे वर्णन केले आहे. तो म्हणतो मांडी घालून जेवणे शिष्टसंमत नव्ह्ते. पुरोहित वीतभर उंचीच्या चॊरंगावर बसत. सुरुवातीला मीठ लावून आल्याचे एक दोन तुकडे खात. मग भात व घेवडा – वाटाणा वगॆरेची आमटी. सोबत चटणीसारखे व्यंजन. नंतर तूप साखरेसह अपूप. मग फ़ळे. शेवटी पाणी आणि लाकडी दातकोरणी दिली जात. क्वचित सुवासिक गंध हाताला लावून मग हस्तप्रक्षालन करीत.
जेवणात गोड पदार्थ अनेकाना आवडतात. जगभरात पदार्थ मुद्दाम गोड करण्याचे पारंपारिक साधन म्हणजे मध. उदा. लाह्यांवर मध घालून खाणे. याला मधूलाज असा शब्द होता. यजुर्वेदात व अथर्व वेदात इक्षु (ऊस) हा शब्द आहे. पण गुड (गूळ) हा नाही. गोडीसाठी मधच वापरात होता. गूळ बनवण्याची रीत वॆदिकानी इतरांकडून उचलली असावी. गॊड (बंगाल) हा शब्द गुड वरुन आला असे पाणिनीने सांगितले. म्हणजे बंगालमधे गूळ उत्पादन दर्जेदार/ भरपूर असावे. इंग्रजीमधे Candy हा खंड (सध्या खांडसरी) वरुन तर Sugar हा शर्करा वरुन आला असावा. गूळ व साखर यांचे उगमस्थान भारत असावे. सिंधू नदीच्या पल्याडचे जंगली लोक जाड गवतापासून हवा तेवढा मध मिळवतात याचे सिकंदरला फ़ार आश्रर्य वाटले होते.
शाकाहार चांगला की मांसाहार?
आदिमानव शाकाहारी नव्हता. वॆदिक समाज सरसकट (गायीसकट) अनेक प्राण्यांचे मांस खात असे. याला विरोध सुरु झाला तो गॊतम बुध्द व महावीर यांच्या पासून. बुध्द स्वत: मांसाहारी होता. म्हणजे तो मांस खाणे निषिध्द मानत नसे. तो म्हणे की खाण्याकरता जनावर मारु देऊ नका. मेलेल्या प्राण्याचे मांस खाण्यास त्याची हरकत नव्हती. सम्राट अशोकाच्या काळात शाकाहाराचे महत्व वाढले. महावीराचा शाकाहाराबद्दल जास्त आग्रह होता.
आज महाराष्ट्रात बव्हंश जाती, गट, समूह हे संधी मिळेल, परवडेल त्या प्रमाणात मांसाहार करतात. मध्ययुगात शाकाहारी झालेले ब्राह्मण आता हलके हलके मांसाहारी होत आहेत. अशा समाजात शाकाहाराची पताका आजही मुख्यत: जॆन धर्माच्या अनुयायानी उंच धरलेली आहे. या चळवळीतील एक नाव म्हणजे पुण्याच्या सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. कल्याण गंगवाल. त्यांचे जनतेला आवाहन असे की (१) मांसाहाराचा त्याग करा. (२) शाकाहाराचा प्रसार करा. (३) मांसाहारी नेत्याना मते देऊ नका (४) नवे कत्तल्खाने, पोल्ट्री फ़ार्म, मांसाची निर्यात याना विरोध करा.
‘मांसाहारात वाईट काय आहे?’ तर डॉ. गंगवाल यांच्या मते त्याविरोधी पाच मुख्य मुद्दे आहेत.
(१) मांसनिर्मितीसाठी अनेकपट धान्य लागते.
(२) मांसाहार बंद केला तर आज उपलब्ध जमीन व पाणी अधिक लोकसंख्येला अन्नपुरवठा करु शकेल.
(३) मांसाहारामुळे ह्र्दयविकार, कॅन्सर, अलर्जी, दमा, नपुंसकत्व वगॆरे व्याधी होऊ शकतात.
(४) हिंसात्मक आहारामुळे मन हिंसात्मक बनते.
(५) माणसाला शाकाहार नॆसर्गिक आहे व अनॆसर्गिक वागणे हा अधर्म होय.
यापॆकी पहिले दोन मुद्दे वरोबर आहेत. कोंबडीला धान्य खायला घालूनमग तिचे मांस खाण्याऎवजी ते धान्यच आपण खाल्यास पुषकळ बचत होईल हे अगदी खरे. पण माणसाने खाऊ न घालता प्राणी वाढत असेल तर काय? समुद्रातली मासळी आपले धान्य खात नाही. वन्य प्राण्यांचेही तेच. तेव्हां त्याना खाण्यात गंगवाल यांचे हे मुद्दॆ आड येत नाहीत. ३ व ४ हे मुद्दे चुकीचे असावेत असा माझा अंदाज आहे. कॉलऱ्याच्या जंतूमुळे कॉलरा होतो तशा अर्थाने मांसाहारामुळे दमा वगॆरे होत नाहीत. पाश्चात्य वॆद्यकीय तज्ञांचा इशारा असा आहे की मांसाच्या अतिसेवनामुळे असे काही आजार होण्याची शक्यता वाढते. पण आपल्या देशात बहुसंख्य जनतेला असे अतिसेवन शक्यच नसते. चॊथा मुद्दाइतका निसरडा आहे की तो सिध्द होणे महाकर्म कठीण आहे. त्यासाठी एकतर मांसाहारामुळे मेंदूत अमूक बदल होतो व म्हणून स्वभाव हिंसक होतो असे दाखवावे लागेल. तसे आजवर दिसलेले नाही. आपली मेंदूबद्दलची वॆज्ञानिक समज अजूनही फ़ार प्राथमिक अवस्थेत आहे. दुसरा मार्ग म्हणजे मांसाहारी व्यक्तींमधे हिंसक स्वभावाचे प्रमाण शाकाहारी व्यक्तींपेक्षा फ़ारच जास्त आहे असे दाखवणे. तसेही झालेले नाही. जगभर कोट्यावधी मांसाहारी स्त्रीया आपल्या बाळांशी नाजुकपणे व वात्सल्यानेच वागताना दिसतात.
पाचवा मुद्दा फ़ारच चमत्कारिक आहे. एक पिढी पंचवीस वर्षाची धरल्यास अक्षरश: हजारो पिढ्या माणूस शाक व मांस असा मिश्र आहार घेत आहे. या अर्थाने माणसाला मांसाहारच नॆसर्गिक आहे. शिवाय अनॆसर्गिक वागणे म्हणजे अधर्म आणि वाईट, त्याज्य असे म्हणणे फ़ार अडचणीचे आहे. मग उन्हाळ्यात नागवे राहिले पाहिजे. दृष्टी वयोमानानुसार अधू जाली तरी चष्मा वापरता कामा नये. विज्ञान, तंत्रज्ञान, कला, तत्वज्ञान, अध्यात्म ही क्षेत्रे मूलत: अनॆसर्गिकच आहेत. या विषयात ठोस कामगिरी करणारा आणि त्याचे भान असणारा माणूस हा अपवादात्मक प्राणी आहे.
गेल्या शतकात सिफ़िलिस रोगावर ऒषध सापडले. पण रशियातील ख्रिस्ती धर्मगुरुनी सांगितले की सिफ़िलिस हा रोग म्हणजे परमेश्वराने अनॆतिक वागणाराना केलेली शिक्षा आहे. म्हणून सिफ़िलिसवर ऒषध देणे अधर्म आहे. आज आपण हे मान्य करत नाही. त्याच प्रमाणे मांसाहाराला अधर्म म्हणणे मान्य होण्यासारखे नाही.
तात्पर्य गंगवाल यांचे मुद्दे बव्हंशी ठिसूळ आहेत. त्यांच्या आधारावर बहुसंख्य स्त्री पुरुषाना आवडत असलेला मांसाहार निषिध्द ठरवणे गॆर होईल. शाकाहार खराच सार्वत्रिक झाला तर हजारो लाखो मच्छीमार, मेंढपाळ, खाटिक वगॆरेंचे संसार उध्वस्त होतील याचाही विचार करावाच लागेल. ‘अहिंसा परमो धर्म: ’ हे तत्वज्ञान फ़ारतर स्थिर शेतकरी समाजाला परवडेल. शिकारी फ़ासेपारधी, मच्छीमार अशांच्या समाजात ‘जीवो जीवस्य जीवनम ’ हेच तत्वज्ञान प्रसृत होईल. प्राणी हत्येवद्दल हळवेपणा दाखवणारास भावडा म्हणून हिणवलेच जाईल. लोक त्याला निसर्गातील व्यवहार दाखवून गप्प बसवतील.
समजा मांसाहार मान्य केला तरी कोणत्याही प्राण्याचे मांस खाल्लेले चालवून घ्यायचे की काही प्रकारचे मांस निषिध्द ठरवायचे? आपण तीन प्रकारांचा विचार करू. गाय, डुक्कर आणि माणूस!
भारतात हिंदूंपॆकी बहुतेक सवर्ण गोमांस खात नाहीत. अनुसूचित जाती जमातींमधे मात्र खाल्ले जाते. ख्रिस्ती व मुसलमान हे सरसकट गोमांस खाणारे आहेत. हिंदू बहुजनांच्या भावना लक्षात घेऊन गोमांस प्रक्रिया व विक्रीव्यवस्था थोडी आडपडद्याने केलेली असते. ते योग्यच आहे.
गायीचे मांस न खाण्याची रीत आपल्याकडे पूर्वापार आहे काय? मुळीच नाही. वॆदिक काळात गाय व बॆलाचे मांस आवडीने व समारंभपूर्वक खाल्ले जात होते. त्यानंतर हलके हलके ही प्रथा बंद झाली. हे स्थित्यंतर अपघात की अपरिहार्य?
माणूस आजूबाजूला उपलब्ध वनस्पती व प्राणी यांच्यापासूनच आहार मिळवतो. गाय आपल्या परिसरात पूर्वीही होती आणि आजही आहे. उपलध पदार्थांपॆकी जे परवडतात त्यांचाच आहारात समावेश होतो. म्हणजे वॆदिक आर्याना गाय खाणे परवडत होते व नंतर ते परवडेनासे झाले असे आहे काय?
वॆदिक आर्य पशुपालक होते. आजचे धनगर किंवा पूर्व आफ़्रिकेतील मसाई यांच्यासारखे. गायीचे दूध हे आर्यांचे महत्वाचे उत्पन्न. म्हणून गायीना किंमत. त्या वितील तेव्हांच दूध देणार. भाकड गायी निरुपयोगी. भुईला भार. खिल्लाराना चारा व पाणी पुरेनासे झाले की स्थलांतर करावे लागते. म्हणून निरुपयोगी गुरे संभाळण्याचे ओझे वाटू लागते. भाकड गायींची जागा घेणार मोठ्या होणाऱ्या कालवडी. पण जन्माला येणाऱ्या वासरांपॆकी कालवडी निम्म्याच. उरलेली निम्मी वासरे नर. नरांचा उपयोग फ़क्त प्रजोत्पत्ती साठी. पण त्याकरता कळपात निम्मे नर असण्याची गरज नसते. म्हणून गोपालक आर्यांजवळ सतत मोठ्या संख्येत, बव्हंशी निरुपयोगी बॆल असत. त्यांचा भार घटवण्यासाठी, दर पाच – दहा गायींमागे एक तरुण बॆल शिल्लक ठेवून बाकीचे वापरुन टाकणे हाच रास्त मार्ग ठरतो. तोच परवडतो. म्हणून पशुपालक आर्यांमधे भाकड गायी व बॆल कापून खाण्याची रीत असणे व्यवहाराला धरुन आहे.
पंजाबमधून गंगेच्या खोऱ्यात व पूर्वेकडे सरकत असताना आर्य स्थिरावले, शेतकरी झाले. आता त्यांच्या जीवनातले बॆलाचे स्थान फ़ार बदलून गेले. नांगरटीसारखी मेहनतीची शेतकामे करण्यासाठी बॆलाची मदत अपरिहार्य झाली. गायीच्या दुधाचे महत्व घटून तृणधान्याचे महत्व वाढले. गाय ही दूध देणारी होतीच. पण आता बॆल व शेण देणारी म्हणूनही महत्वाची झाली. म्हणून जुनी रीत बदलून गोमांसभक्षण टाळणे वा निदान घटवणे हे सुजाणपणाचे झाले.
शेतकरी जमिनीला जखडलेला असतो. चारापाणी संपले म्हणून कळप घेऊन दुसरीकडे जाणे त्याला सोपे नसते. म्हणून मोठा कळप पाळता येत नाही. समजा त्याच्याकडे १ गाअय व २ बॆल आहेत. वयाच्या चॊथ्या वर्षी गाय गाभण रहाते. ७-८ वर्षात ५-६ विते होतात. उरलेले २-४ वर्षे आयुष्य भाकड. ६ वेतांमधे ३ बॆल पॆदा होतात. त्यातला एखादा लवकर मरतो. २ मोठे होतात. म्हणजे १ कलवड पंधरा वर्षाच्या आयुष्यात दोन कर्ते बॆल व दोन गायी देते. हे दोन बॆल आधीच्या म्हाताऱ्या वॆलांची जागा घेतील. म्हणजे १५ वर्षात या शेतकऱ्याला यज्ञात बळी देण्यासाठी, भाकड गायी व म्हातारे बॆल वगळता फ़ारतर एक गाय मिळू शकेल. शेतीचे क्षेत्र वाढत असेल तर बॆलांची संख्या वाढती हवी. म्हणजे ती गाय सुध्दा बळी देऊन चालणार नाही. अथर्ववेदात तर ६ ते ८ वॆल जुंपून नांगरट केल्याचे उल्लेख आहेत. तेव्हां खरेतर २ बॆलसुध्दा पुरेसे नव्हेत. तात्पर्य, शेतीप्रधान समाजात गुरांचे सर्रास बळी देणे दोन्ही गोश्टी अव्यवहार्य आहेत.
शेतीप्रधान सांस्कृतीनंतर व्यापार वाढला. गॊतमबुध्दाच्या काळात व्यापारी हे समाजातील श्रेष्ठी (सेठ्ठी) झाले. तेव्हां मालवाहतूक वाढली. त्यासाठीसुध्दा बॆल महत्वाचे ठरले. याच काळात अहिंसेचा प्रचारही वाढला. अहिंसेच्या पुष्टयर्थ उपयुक्ततेची कारणे दिलेली बॊध्द वाड़मयात सापडतात. सुत्र निपात ग्रंथात बुध्दाच्या तोंडी पुढील निवेदन आहे. ‘गोवंश हा आपला मित्र आहे. माता – पिता व इतर नातेवाइकांप्रमाणेच. कारण शेती गोवंशावर अवलंबून आहे. गोधन म्हणजे अन्न, शक्ती, तजेला आणि सुखाचा स्त्रोत आहे. ’
माओ त्से तुंगने ७० वर्षांपूर्वी हुनान प्रांतातील शेतकऱ्यांबद्दल लिहिले की ‘शेतीची कामे करणारे बॆल म्हणजे या शेतकऱ्यांचे सर्वस्व. त्याना कधीच मारता कामा नये. जो गायी बॆलाना मारतो त्याला मृत्यू नंतर गुराचा जन्म नशिबी येतो अशी धार्मिक समजूत आहेच.’ यावरुन असे म्हणता येईल की जगभर सर्वत्रच शेतकरी समाजात शेतकाम करणाऱ्या जनावराला मारण्याबद्दल बंधने असावीत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आह भारतीय समाजाने काय करायला हवे?





भारतीय जनता पक्ष, शिवसेना, साधू – बैरागी मंडळी आणि सर्वोदयी लोक. या कायद्याचे विरोधक म्हणजे गोमांस खाणारे गट, खाटिक, बरेच शेती अर्थशास्रज्ञ परिसरवादी गट आणि ‘पुरोगामी’ राजकीय गट. सामान्य जनता व शेतकरी या प्रश्नावर आग्रही भूमिका घेताना दिसत नाही.

भगवा झेंडावाली मंडळी गोवधबंदीसाठी हिंदूधर्म भावना हे कारण देतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ठणकावून सांगितले की गाय ही माता आहे पण बैलाची. शिवाय समाजाची भावना एक असली तरी समाजहितासाठी जरुर पडल्यास तिला मुरड घालायला हवी. एरवी समाज सुधारणा म्हणजे तरी काय?

सर्वोदयी मंडळींचा गोवधबंदीचा आग्रह दोन कारणांनी आहे. एक म्हणजे ते अहिंसेचा पक्ष मानणारे आहेत. दुसरे कारण म्हणजे त्यांच्या मते गोहत्या ही देशहिताला मारक आहे. भाकड गायींच्या मलमूत्रामुळे शेतीला फायदा होतो. जमिनीचा कस वाढतो. कृत्रिम खतांची गरज घटते. त्यामुळे भाकड गायींवरील चारा – पाण्याचा खर्च परवडतो असे त्यांचे म्हणणे म्हणजे गोवधबंदी संदर्भात भावनांना फार अवसर न देता फायदा तोट्याचा हिशोब करुन निर्णय घेण्याला त्यांची तयारी दिसते.
व्यावहारिक विचार करायचा तर तज्ञ अर्थशास्त्रज्ञांचे मत विचारणे ओघाने आले. अर्थतज्ञ कै. वि. म. दांडेकर यांनी १९६५ साली ‘गोमाता की गोधन’ या मथळ्याचा निबंध लिहिला होता. ते म्हणतात की आपली जमीन मर्यादित आहे. एक एकर जमिनीवर किती गुरांचा भार ठेवायचा यावर बंधन हवे.

म्हणून कधी ना कधी गुरांची संख्या स्थिर व्हायला हवी. सध्या ती वाढते आहे. माणसांची संख्या स्थिर होण्यासाठी मार्ग म्हणजे जन्म (आणि मृत्यू) यांची संख्या घटवणे. गायीच्या बाबतीत ते चालत नाही. कारण नवा जन्म झाला तरच दूध मिळते. म्हणून जन्म वाढवायला हवेत. चांगली काळजी, औषधोपचार यामुळे मृत्यू घटतात. रोग निष्प्रभ होतात. म्हणून माणसाकडून वध अपरिहार्य आहे. आपण गायीला गोमाता म्हणतो. पण गाय आणि माय यात फरक करतो. भाकड गायीला चारा देत नाही. निदान कमी देतो. वासराला आचळापासून दूर लोटून दूध घेतो. तेव्हा अवाजवी भावनात्मकता टाळून गोवध कायदेशीर करावा. तो फायदेशीर आहेच.

गोवधबंदीवादी म्हणतात की भारतात दरडोई गाई – बैल संख्या कमी आहे. दर १००० लोकसंख्येमागे ब्राझील देशात ७२६ गुरे तर ऑस्ट्रेलियात १३६५ उलट भारतात फक्त २७८. हे खरे पण भारतात जमिनीवरचा गुरांचा भार फार आहे. दर चौरस कि. मी. जमिनीमागे ब्राझील मधे गुरांची संख्या ४०५, ऑस्ट्रेलियामधे २३६ तर भारतात ४४७३. चराऊ कुरणांचा विचार केला तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. दर चौरस कि. मी. चराऊ रानामागे ऑस्ट्रेलियात ३९० पशू आहेत तर भारतात ३८०००. म्हणजे आपल्या भूभागावर गुरांचे ओझे दसपट तर कुरणांवर शंभरपट आहे.

मध्यप्रदेशात १९९१ साली भाजप सरकारने गोवधबंदी कायदा केला. त्या अन्वये बैलाचा वध बेकायदा झाला. मे १९९६ मधे सुप्रीम कोर्टाने हा कायदा घटनाविरोधी ठरवला. आजपर्यत तीन वेगवेगळी घटनापीठे बैल हत्याबंदी कायद्यावर विचार करण्यास बसली आणि प्रत्येक पीठाने असा कायदा घटनाविरोधी ठरवला.

सर्वोदयी मंडळींच्या मतानुसार म्हातारी गायसुध्दा शेतकऱ्याला फायद्याचीच असते. प्रत्येक जनावरामागे मलमूत्राच्या रुपाने वर्षाला २० हजार रुपये फायदा होतो. हे प्रतिपादन कोर्टाने अमान्य केले. त्याला पुराव्याचा ठोस आधार नाही असे कोर्टाचे मत झाले. इतका फायदा होत असताना गाय कसायाला विकण्याला शेतकरी वेडे खुळे नसतात.

गोवधबंदी विरोधक म्हणतात की देशात चाऱ्याची टंचाई आहे. म्हणून भाकड गायींना पोसण्याऎवजी तो चारा तरुण उत्पादक गायींच्या तोंडी द्यावा. यातूनच शेणाचा पुरवठा सुध्दा वाढेल.

महाराष्ट्रात १९७६ सालीच गायींच्या हत्येला बंदी करणारा कायदा झाला आहे. शिवसेना – भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार १९९५ साली सत्तेवर आल्यानंतर गोवंशहत्याबंदी कायदा बनवण्यात आला. त्या अन्वये वळू, बैल, भाकड/रोगट गायी, म्हशी त्यांची पिले या सर्वांच्या ह्त्येवर बंदी येईल. या कायद्यान्वये कत्तलीसाठी खरेदी – विक्री, परप्रांताकडे वहातूक, यांचे मांस जवळ बाळगणे हे सर्व दखलपात्र, अजामिनपात्र गुन्हे होतील. हा कायदा विधानसभेत पास झाला. विधानपरिषदेत अजून नाही. या ठिकाणी आपण लक्षात ठेवले पाहिजे की जगातील एकमेव ‘हिंदू’ राष्ट्र नेपाळ मध्ये रेड्याचा बळी देतात व प्रसाद म्हणून मांस खातात.
घटनेतील मार्गदर्शक तत्व, कलम ४८, याला अनुसरुन हा कायदा आहे असे शासनाचे सांगणे आहे. ते मार्गदर्शक तत्व पुढील प्रमाणे :
सरकारने आधुनिक व वैज्ञानिक पायावर शेती व पशूसंवर्धन संघटित करण्याचा प्रयत्न करावा. विशेषकरुन चांगल्या जनावरांच्या पैदाशीची जपणूक व सुधारणा करण्यासाठी गायी, वासरे, दुभती व शेतकामाची जनावरे यांच्या हत्येला प्रतिबंध करण्यासाठी योग्य पावले उचलावीत
उलट हा कायदा शेतकऱ्याच्या हिताविरोधी आहे या भूमिकेतून कॉग्रेसने त्याला दुरुस्ती सुचवली की शेतकऱ्याना न परवडणारी गुरे सरकारने बाजार भावात विकत घ्यावीत व पोसावीत. युती सरकारने अर्थातच या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
महाराष्ट्रातील नियंत्रित कत्तल खान्यांमधे दरवर्षी सुमारे ३६ लाख प्राणी मारले जातात. बाबतीत दहा बारा बकऱ्याचा ऎवज असतो. या मांसाचा दर बकरीच्या मांसाच्या दराच्या तिसऱ्या ते चौथ्या हिश्शा इतका कमी असतो. म्हणून हे स्वस्त मांस गरिबांना परवडते. आदिवासी, दलित वगैरे गटांना गोमांस हा उत्तम प्रथिने स्वस्तात मिळ्ण्याचा मार्ग आहे. मुंबईच्या भेंडीबजार सारख्या मुस्लिम वस्तीच्या भागातील धाब्यांवर बीफचे पदार्थ खाणारी अधिकांश गिऱ्हाइके हिंदूच असतात.
वर्ध्याच्या सर्वोदयी गटाच्या एका प्रकाशनात म्हटले आहे की गोवंश संपत चाललेला आहे. हे मात्र खरे नव्हे. उलट स्वातंत्र्यानंतरच्या चाळीस वर्षात, गोवंश हत्याबंदी नसून सुध्दा गाई – बैलांची संख्या प्रतिवर्षी अर्ध्या-पाऊण टक्क्यानी वाढतच आहे. १९८० साली ही संख्या २० कोटीच्या आसपास होती. म्हणून हत्याबंदी कायद्याची गरज वाटत नाही.
सवर्ण हिंदूना आहारात गायीचे वावडे तर मुसलमानाना डुकराचे. इस्लामच्या सुरवातीच्या काळात अरबस्तानात उगम पावलेली ही बंदी आज जगभर मुस्लिम जगात पसरलेली आहे. मुळात तिला काही आरोग्यविषयक अर्थ असावा. तज्ञांच्या मते विशिष्ट प्रकारचे जंत डुकरांच्या स्नायूंमधे म्हणजे मांसामधे शिरकाव करतात. ते खाण्यामुळे माणसात या जंतांचा प्रादुर्भाव होतो. यावर सोपा उपाय म्हणजे डुकराचे मांस भरपूर शिजवणे. यामुळे ते निर्धोक होते. पण आता ही रीत तर्काच्या पलिकडे गेलेली आहे. बाकी समाज सूकरमांस चवीने खातॊ. **(पान ८७ वर सुरु होणारा B हा camibalism भाग घालणे) **

पाश्र्चात्त्य देशांमधे मांसाहार हाच सार्वत्रिक आहे. अशा आहाराची माणसाला अनिवार्य गरज असते असा समज या समाजात आढळतो. शाकाहारी माणसाला प्रथिने व अन्य काही गोष्टी कमी पडत असणार असा बहुतेकांचा कयास असतो. भारतात अनेक पहेलवानसुध्दा पूर्ण शाकाहारी असतात हे पाश्चात्त्य देशातील अनेकांना खरे वाटत नाही. गेल्या अर्धशतकात हलके हलके शाकाहाराची उपयुक्तता या मंडळींच्या लक्षात येऊ लागली आहे. मांसाच्या विशेषत: गोमांसाच्या अतिसेवनाने ह्रदयविकारादि त्रास होतात हे वैद्यकशास्त्राने लोकांना सांगितले आहे. त्यामुळे मांस कमी खाणे, गोमांसाऎवजी कोंबडी किंवा मासळी खाणे, शाकाहाराकडे वळणे असे प्रयोग करताना लोक आढळतात. पूर्वी त्यांना शाकाहारीपणा चमत्करिक वाटे. आता तो फॅशनेबल होऊ लागला आहे. गेल्या वर्षी अमेरिकन सरकारच्या शेती खात्याने शाकाहाराबद्दल मार्गदशक तत्वे आखून दिली आहेत. त्यांच्या मते शाकाहारातून माणसाच्या गरजेइतकी प्रथिने, लोह, जीवनसत्वे वगैरे सर्व मिळू शकतात. मात्र त्यासाटी विविध पदार्थ योग्य प्रमाणात खायला हवेत. दूधदुभते व अंडी खाऊन प्रकृती उत्तम राहू शकते.

अमेरिकेमधे सरकारी कचेऱ्यामधील भोजनगृहात आता पूर्ण शाकाहारी भोजनसुध्दा मिळू शकते. स्वत: राष्ट्राध्यक्ष अधून मधून पूर्ण शाकाहारी जेवण घेतात. त्यातून चव बदल होतो.

चव बदल म्हणून अध्यक्ष बिल क्लिंटन यांना भारतीय मांसाहारी जेवणही आवडते. दरवर्षी एकदा त्यांनी वॉशिंग्टन मधील प्रसिध्द भारतीय उपहारगृहात जेवण घेतले. गेल्या वेळी त्यांनी तिथली थाळी घेतली. त्यात मटन रोगन जोश, मसाला झिंगे, चिकन टिक्का माखनी, मलाई कोफ्ता, बैंगन भरता, आलू-पालक, भात व पोळी हे पदार्थ होते. त्यांच्या कुटुंबीयांनी मसाला खेकडा, तंदूरी चिंबोऱ्या (शिंपले), चिकन टिक्का, शेवपुरी वगैरे पदार्थ खाल्ले. एकंदरीतच अमेरिकन समाज धीटपणाने जगातील विविध देशांच्या स्वैपाकाची लज्जत घेतो . हा पैलू उचलण्याजोगा आहे. अनुभव न घेता वा पुरती माहिती नसताना परक्यांच्या जेवणाबद्दल मत कलुषित करुन घेणे सोपे असले तरी तोट्याचे आहे. चिनी मकाव – कोंबडी पकाव हे लोक ढेकणाची चटणी आणि झुरळाची आमटी जेवतात अशी माझी शाळकरी वयात पक्की समजूत होती. सुदैवाने पुढे चिनी समाजात रहाण्याची संधी मिळून ती दूर झाली.

जंक फूड व डायट हे दोन शब्द पाश्चात्त्याच्या दोन आहाराविषयीच्या संकल्पना मांडणारे आहेत. जंक फूड हा खास अमेरिकन शब्द. त्याचा वाच्यार्थ म्हणजे भंगार अन्न. खरा अर्थ तेलकट, खूप ऒशटपणा असणारे पदार्थ. केंटकी फ्राइड चिकन, बटाटा वेफर्स ही त्याची उदाहरणे. यांच्यातला भंगारपणा कोणता? सहज जाता जाता, नकळत हे बरेच खाल्ले जातात. त्यातून फार ऊष्मांक (कॅलरीज) पोटात जातात. पूर्वापार मानवी समाजात सहज आढळणाऱ्या जंतूजन्य साथीच्या वगैरे रोगांपासून पाश्चात्त्य समाज मुक्त आहे. कॉलरा, मलेरिया, देवी, क्षय असे रोग आता आढळत नाहीत. आयुर्मर्यादा खूप वाढली आहे. सध्या कॅन्सर व ह्रदयविकार हे मुख्य शत्रू आहेत. स्थूलपणा फार मोठ्या प्रमाणात आहे. तो घटण्यासाठी व ह्रदयविकार टाळण्यासाठी तेलकट खाणे घटवावे लागेल. म्हणून त्या पदार्थांना दूषण द्यायचे. ही जाणीव मुख्यत: मध्यम वर्गात आहे.

कामगार व गरीब वर्ग सर्रास व भरपूर जंक फूड खातॊ. गरीब निग्रॊ स्त्रीयांमधे लठ्ठपणाचा दॊष मोठ्य प्रमाणात आढळतो. तेव्हा आता अमेरिकेत गरीब माणसे लठ्ठ व धनिक माणसे सडपातळ असा उलटा प्रकार दिसतो.

भारतात ‘देसी घी मे बना भोजन’ ही आकर्षक जाहिरात मानली जाते. आपली मिठाई स्निग्घतेने ओतप्रोत असते. आपल्याला ८% लोणी असलेले म्हशीचे दूध ४% लोणीवाल्या गायीच्या दुधापेक्षा जास्त आवडते. आपल्या पारंपारिक सौंदर्य कल्पनेमधे लुकडेपणाला स्थान नाही. आपली हजारो स्त्री शिल्पे पाहिली तर सहजच लक्षात येते की या स्त्रीया सरसकटपणे पुष्ट पुरंध्री आहेत. रंभोरु हे आपले विशेषण म्हणजे केळीच्या खुंटासारख्या गरगरीत मांड्या असलेल्या स्त्रीची भलावण होय. धष्टपुष्ट हा शब्द निरोगीपणाच दर्शवतो ना? तेव्हा आपण गोकुळीच्या यादवांना ‘आरोग्याला हानीकारक पदार्थाचे निर्माते’ असे म्हणू का? स्निग्ध पदार्थांचे अतिसेवन हा आपला सामाजिक प्रश्न नाही. एका छोट्या गटाचा तो असेलही. त्यांना वेगळा विचार करावा लागेल.

देवेंद्रसिंग नावाच्या मानसशास्त्रज्ञाने निरनिराळ्या वयाच्या अमेरिकन पुरुषांना स्त्रीयांची अनेक चित्रे दाखवली व त्यांची आकर्षकतेनुसार प्रतवारी लावण्यास सांगितले. या पहाणीत असे आढळले की स्त्रीची कंबर आणि नितंब यांच्या मापाचे गुणोत्तर ०.७ च्या आसपास असते. तो बांधा पुरुषांना सुंदर वाटतो.

माणसांच्या मेंदूची जडण घडण हजारो नव्हे लाखो वर्षापूर्वी पासूनच्या उत्क्रांतीतून झाली. प्रजा वाढवण्याला अनुकूल अशी मेंदूरचना टिकली. प्रतिकूल रचना अंतर्धान पावली. याच प्रक्रियेत प्रजोत्पत्तीला अनुकूल अशा स्त्री शरिराबद्दल आकर्षण पुरुषाच्या मेंदूत कोरले गेले. पण अरुंद कंबर व रुंद पुष्ट नितंब हा बांधा प्रजोत्पत्तीला अनुकूल कशावरुन? स्त्री शरिरात चरबीचे प्रमाण वाढेपर्यत ते शरीर स्त्री बीजे वा अंडी निर्माण करीत नाही. खुरटलेली स्त्री (२५-३० किलोपेक्षाही कमी वजनाची) वयाने वाढली तरी वयात येत नाही. स्त्री शरिरातील चरबी ही मांड्या व नितंब येथे साठवली जाते. म्हणून मोठे नितंब हे स्त्री बीज निर्मितीची खूण होते तर त्यांचा रुंदपणा प्रसुतीला अनुकूल असतो.

डायट – कॉन्शस मुली वाढत्या वयात, अंगावर चरबी साठू लागल्यावर कावऱ्याबावऱ्या होणार असतील तर अनवस्था प्रसंग ऒढवेल. १६-१८ वर्षाच्या मुली अवाजवी डाएटिंग करु लागल्या, फार उपाशी राहू लागल्या तर त्यांना त्रास होतो. अंतर्गत इंद्रीयांची वाढ पुरेशी होत नाही. उत्साह घटतो. पचनक्षमता घटते. मासिक पाळी अनियमित होते. स्वभाव अस्थिर व लहरी होतो. आणि हर प्रयत्न करुनही शरीर सडपातळ झाले नाही तर मन खट्टू होते. आत्मविश्वास घटतो.

टेलिव्हिजन मधे लुकड्या, नव्हे अतिलुकड्या मुलींना मॉडेल म्हणून वापरुन त्यांचे कौतुक केलेले दिसले की इतर मुलींना तसे व्हावेसे वाटते. ‘व्होगा’ या ब्रिटिश मासिकात अती लुकड्या मुलींचे फोटो फार येतात म्हणून ‘ओमेगा’ या घड्याळ कंपनीने त्या मासिकात जाहिरात देणे थांबवले. ही १९९६ सालातील गोष्ट. ‘व्होग’ च्या संपादकांनी प्रतिवाद केला की आम्ही इतर मासिकांपेक्षा वेगळे नाही. या मुली निसर्गत: च कृश असतात. वय वाढते तशी त्यांना गोलाई येते. पण कोणी म्हटले नाही की अहो आमच्या ब्रिटिश तरुणी इतक्या वेड्या कशा असतील की दिसल्या मॉडेल्स आणि लागल्या त्यांच्यामागे धावायला ! तात्पर्य, लुकड्या मॉडेल्सचा प्रेक्षक तरुणींच्या मानसिकतेवर परिणाम होतो हे मान्य आहे.

आपल्या समाजातसुध्दा उपासाची पध्दत आहे. उपवास याचा शब्दश: अर्थ जवळ असणे, जवळीक करणे. जवळीक करायची ती ईश्वराशी. दैनंदिन जीवनाच्या रगाड्यातून बाजूला होऊन चिंतन मनन करायचे यासाठीचा हा अवसर. यादिवशी नेहमीचा क्रम बदलायचा तो अनेक प्रकारांनी. कमी खाणे, आवडता पदार्थ टाळणे, एकवेळ जेवणे, काहीच न खाणे, पाणी देखील न पिणे असे कमी अधिक कठोर नियम माणसे पाळतात. कोणी ठरल्या वारी उपास करतात. उदा. दर सोमवारी. कोणी या देवाचा, त्या देवाचा म्हणून उपास करतात. कोणी ग्रहण काळात जेवत नाहीत तर कोणी चतुर्थीला चंद्रोदय होईपर्यत उपाशी रहातात. ग्रहण काळात अन्न खाऊ नये ही रीत ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकात कुशाणांच्या काळी सुरु झाली असावी. या सगळ्या नियमांचा उद्देश आरोग्यवृध्दी व्हावी, संयम वाढावा असा असतो. काही मंडळी एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून व्रत या स्वरुपात उपास करतात ते वेगळॆ.

उपासाचे नियम आपणच करणार, आपणच पाळणार आणि आपणच मोडणार. नियम करतानाच ठाऊक असते की अनेक अपवाद करावे लागणार. उदा. आजारी माणूस. डॉक्टर, वैद्य सांगतील तोच त्याचा आहार. किंवा लहान मुले. त्यांना उपास झेपत नाही. ती रडारड करतात. खाण्याबद्दल संयम अंगी बाणवण्याचे त्यांचे वय नसते. म्हणून त्यांन सूट. रमझानच्या महिन्यात मुसलमान लोक सूर्योदय ते सूर्यास्त या काळात अन्न घेत नाहीत. पहाटे जेवून घ्यायचे व मग सूर्यास्तानंतर पंगत मांडायची. महिनाभर असे वागणे मुलांना कष्टाचे होते. मग वयानुसार दोन चार दिवस वा आठवडाभर हे करुन घ्यायचे आणि पुढे मुलांना नियमातून मोकळीक द्यायची असा रिवाज असतॊ.

असे क्लेशकारक नियम माणसे का पाळतात ? व्रतापोटी उपास करणाऱ्याला इच्छापूर्तीची आशा असते. बाकीच्याचे काय ? नियम मोडून जेवले तर त्यांना कोणी शिक्षा करते काय ? काही इस्लामी राष्ट्रांमधे रमझानच्य़ा काळात सार्वजनिक ठिकाणी उपासाचा नियम मोडणाऱ्यास शिक्षा असते.

मलेशियामधे निदान वीस वर्षापूर्वी पर्यत तरी रमझानच्या दिवसात धार्मिक पोलिस गस्त घालून लोकांवर नजर ठेवीत. उपासाचे नियम मोडणाऱ्यास अटक करीत. अशांची नावे रोज वृत्तपत्रात छापून येत. धार्मिक न्यायाधीश (काझी) त्यांना दंडाची शिक्षा देत. पण हा अपवाद. बहुतेक वेळा याची गरज पडत नाही.

सामान्य माणसांना सामान्यपणे समूहाचे बोट धरुन चालणे पसंत पडते. त्यात सुरक्षितता व फायदा दोन्ही असतात. सगळ्यांना हवी तीच गोष्ट तुम्हाला हवी असेल तर सहज मिळते. एकट्याला वेगळे काही हवे असेल तर अवघड जाते. आपण सगळ्यांबरोबर असलो तर इतरांच्या अनुभवाचे फायदे मिळतात. अडचणीच्यावेळी साथीदार मिळतात. गावाच्या आधी पॆरणी करणाऱ्या शेतकऱ्याला पीक तयार होते तेव्हा सगळ्या पाखरांचा हल्ला सहन करावा लागतो. बाकी काही नाही तर वेगळे वागणाऱ्याला इतरांच्या चौकश्या, काळजी (तुम्ही गाळात जाणार म्हणून किंवा तुम्ही त्यांच्या पुढे जाणार म्हणून) यांचे दडपण सोसावे लागते. म्हणून अशी अनवट वाट टाळण्याकडेच बहुतेकांचा कल असतो.

तेव्हा उपासाची रुढी रुजल्यानंतर ती पाळण्याकडेच सर्वाचा कल असणार. मग ‘उपाशी आणि दुप्पट खाशी’ असे होऊन सगळेच मुसळ केरात कसे जाते ? निदान एक मार्ग म्हणजे चलाख पुरोहिताने गरजू यजमानांच्या सोयीसाठी पळवाटा काढून देणे. उपास म्हणजे ‘न खाणे’ या ऎवजी ‘उपासाचे खाणे’ असा केला की सगळेच उलटे पालटे होते. जॉर्ज ऑरवेलच्या ‘ अनिमल फार्म’ या अजरामर कादंबरीत समाजातील शासक डुकरे अशीच चलाखी करतात. ‘सर्व प्राणी समान आहेत.’ या ठरलेल्या तत्वाला पुस्ती जोडतात की ‘काही प्राणी’ अधिक समान आहेत? मग काय वाटेल ते करता येते. साबूदाणा, बटाटा, शिंगाडे, शेंगदाणे, केळी, रताळी, वरीचे तांदूळ, लाल भोपळा असे पदार्थ ‘उपासाला चालतात’ अशी शिफारस मिळाली की उपास संपला. कोणी म्हटले असेल की अन्न खायचे नाही याचा अर्थ एतद्देशीय अन्न टाळावे. पण परदेशी चालेल. म्हणून बटाटा, मिरची उपासाला चालू लागले. दुसरा कोणी म्हणाला असेल की अन्न सेवन बंदी म्हणजे नेहमीच्या जेवणातील पदार्थ नकोत. म्हणून वरीचा प्रवेश झाला असेल. कोणी एक केळे व एक कप दूध यावर रहात असेल. त्यांचा मुलगा ‘उपासाला’ झकासपैकी फ्रूट सॅलड चापू लागला असेल. अशा उपासाचा शरीर व मनाला कोणताच फायदा नाही. लंघन व संयम या उपासाच्या प्रधान पैलूंना बगल देण्याचा अगदी कहर प्रकार मी ऐकला तो म्हणजे शिंगाड्याच्या पिठाच्या जिलब्या करणे. जिव्हालौल्य ज्यांच्या इतके मानगुटीवर बसते आहे त्यांची जरा कीवच येते. अर्थात ही आपली मक्तेदारी नाही.

चिनी लोकांच्या एका गटात वर्षातील एक पंधरवडा शाकाहाराचा असतो. त्या काळात आम्ही चिनी उपहारगृहात गेलो. पदार्थांच्या यादीत शाकाहारी चिकन, शाकाहारी पोर्क अशी नावे वाचून मी थक्क झालो. त्याबद्द्ल चौकशी करताना कळले की पिठाचे मांसखंडाच्या आकाराचे तुकडे बनवतात. त्यांना मांसासारखा रंग देतात व तळून वाढतात. देखावा अगदी हुबेहुब असतो. मला ही मनाच्या दुर्बलतेची कमाल वाटते. मांसाहाराची ऊर्मी इतकी अनावर होत असेल तर मुद्दाम प्रशिक्षण घेऊन संयमाची सवय अंगी बाणवली पाहिजे.

आहारात एक टोक उपास तर दुसरे टोक मेजवानी म्हणजे विविध आवडते, महाग पदार्थ पोटभर किंवा त्याहूनही जास्त खाणे. हे पदार्थ क्रमाने एकामागून एक खायचे ही पाश्चात्त्य आणि चिनी लोकांची पध्दत. प्रत्येक पदार्थाला एक ‘कोर्स’ म्हणायचे. प्रथम सूप, मग Hors d’oeuvre म्हणजे सलामीचा पदार्थ. मग मुख्य पक्वान्न. शेवटी स्वीट डिश आणि पूर्णविराम म्हणून कॉफी. यात मद्यपानाचाही समावेश होतो. जेवणाबरोबर वाइन, जेवणा शेवटी ब्रॅंडी असे त्यातही श्लेष. ब्रॅडी ही लहान तोंड व मोठे पोट असलेल्या काच पेल्यात घेऊन घोळवायची व तिचा स्वाद हुंगत चाखत प्यायची ही एक रीत तर चक्क कॉफीत मिसळून पिणे ही दुसरी तऱ्हा. चिनी मेजवानीतही असे ‘कोर्स’ वाढतात. जेवणाच्या शेवटी फॉर्च्युन कुकी नावाचे पोकळ शंकरपाळे देतात. ते फोडून आतला कागदाचा कपटा पहायचा आणि त्यावर लिहिलेले आपले भविष्य वाचायचे असा गमतीचा भाग काही ठिकाणी आढळतो. अशा मेजवान्यांमधे प्रत्येक पदार्थ थोडाथोडाच खायचा आणि विविध चवी चाखता चाखता तृप्त होऊन जायचे अशी कल्पना असते. एखादा पदार्थ आवडला म्हणून बराच वाढून घेतला तर मेजवानीच्या आधेमधेच पोट भरते. नंतरचे पदार्थ चाखणे सुध्दा शक्य होत नाही. यामुळे यजमान नाराज होण्याची शक्यता असते.

भारतीय मेजवानीत अनेक पदार्थ एकाच वेळी वाढले जातात. हा पदार्थ त्याला लावून, अमुक पदार्थ तमक्यात मिसळून खाण्याची पध्दत असते. भारतीय संगीतात एका वेळी एकाच मुख्य वाद्याची सुरावट असते (मेलडी) तर पाश्चात्त्य संगीतात अनेक वाद्यांचा मेळ (हार्मनी) असतो. जेवणात त्याच्या नेमके उलट असावे.

महाराष्ट्रातील शाकाहारी मेजवानीचे उदाहरण पहायचे असेल तर पेशवाईतील नाना फडणविशी बेत माहीत हवा. १० फेब्रुवारी १७८२ रोजी पुण्यनगरीत सवाई माधवरावांचे लग्न झाले. त्यावेळी पुण्याची वस्ती दीड लाख होती. बाहेरुन आलेल्या शिंदे – होळकर आदी सरदारांच्या छावण्यामधे पन्नास हजार माणसे होती. जनावरे तेवढीच. या सर्वांची व्यवस्था झाली. आठवडाभर कोणाकडे चुली पेटल्या नाहीत.

नाना फडणिसांनी दिलेली खाशांच्या मेजवानीतील पदार्थाची यादी बघा. भोजनात साधा भात दोन प्रकारचा. साखरभात – वांगी भात, वरण साधे तुरीचे, सांबारे दोन प्रकारची, लोणची तिखट व गोड असे दहा प्रकार. कढी, सार असे दोन प्रकार. भाज्या दहा बारा प्रकारच्या. त्या गरम असतानाच वाढाव्यात. दोन प्रकारच्या खिरी. पूर्ण पोळ्या सपिटाच्या. काही वेळा पुरणाच्या वेगळ्या. घीवर, फेण्या असे गोड पदार्थ तीन चार असावेत. वडे साधे व वाटल्या डाळीचे. कढी वडे. तूप साजूक. मठ्ठा. श्रीखंड, आमरस वगैरे पक्वान्न रोज वेगळे. शेवटी खिचडी ओल्या हरभऱ्याची किंवा डाळीची एक प्रकारची. पापड, सांडगे, तिरवडे, चिकवड्या, मीरगोंडे, बोंडे, कोशिंबिरी वीस प्रकारच्या. चटण्या, पंचामृत, रायती, भरीत दोन प्रकारचे असे रोज तीस प्रकार किमान पानात वाढण्यात यावेत.

वाढपातील बारकावा बघा. लोणचे, भाज्या वगैरे एकसारख्या हारीने वाटोळ्या वाढाव्या. एकास एक लावू नये. आमटी, सांबारे, वरण, खीर यांचे थेंबटे मधे पडू नयेत. हात धुवून मग दुसरा पदार्थ वाढावा. वाढप्याच्या मागे त्याचा घाम धोतराच्या ओल्या पिळ्याने टिपणारा दुसरा माणूस असे. असो.

प्राचीन भारतात जेवणानंतर उपदंश म्हणून, पचनाला मदत म्हणून आले व मुळा खात. आपस्तंब धर्मसूत्रांमधे म्हटले आहे –

‘करंज पलंडु परारीकाः’

पण त्यानंतर मात्र नियम झाला की भारतीय जेवणाचा शेवट म्हणजे तांबूल. विड्याचे पान आणि नारळ या दोन गोष्टी भारतात सुमारे २००० वर्षापूर्वी आग्नेय आशियातून आल्या असा तज्ञांचा अंदाज आहे.

रामायण, महाभारतात पान खाण्याचा उल्लेख नाही. तो प्रथम बौध्द जातक कथांमधे दिसतो. ख्रिस्तोत्तर काळात चरक, सुश्रुत यांचे लिखाण, काश्यप संहिते सारखे ग्रंथ यात तांबूलाचा उल्लेख आढळतो.

काश्यप संहितेतील भोजन कल्प पहा –

मद्यं पयस्तक्रमथोदधीनि ।
येश्नंतिवाराहमथापि मत्स्यान् ।
ताम्बूल पूगोन्मथिताश्च येस्युः।
कालोचिता यस्य भवेच्च तृष्णा ॥

सुश्रुत संहिता म्हणते
ताम्बूलपत्रं तीक्ष्णोष्णं ।
कटुपित्त प्रकोपणं।
सुगंधि विशदं तिक्तं ।
स्वर्य वात पित्त कफापहम् ॥

हर्षचरित या ग्रंथात पुरुषाचे ओठ पान खाऊन लाल झाल्याचा उल्लेख आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सुपारी आहे पण पान नाही.

चिनी प्रवासी युआन च्वांग याला बौध्द मठात सन्माननीय पाहुणा म्हणून रोजच्या शिध्यामधे १२० पाने व २० सुपाऱ्या मिळत. हा पुरवठा अर्थात त्याच्या सहकाऱ्यांसकट सर्वांना मिळून असणार.

No comments:

Post a Comment