Tuesday, April 13, 2010

Chapter 1 part 2

“ हिशोब “
हिशोब : संस्कृतीच्या अभ्यासात हिशोबीपणा ही फ़ार उपयुक्त पण जरा दुर्लक्षिलेली बाब आहे. हे विधान कोणाला चमत्कारिक वाटेल. वात्सल्य, राग, लोभ, सॊंदर्य असल्या अमूर्त गोष्टींचे हिशोब कसे मांडता येतील? पण ते येतात. नव्हे आवश्यक ठरतात. पक्षिण चारा घेऊन घरट्यात येते तेव्हां सगळी पिले ढकलाढकली करुन घास मागतात. अधू असलेले पिलू मागे पडते. त्याला उपास घडतो. ते राम म्हणते. पण ती आई या सगळ्यात हस्तक्षेप करीत नाही. सर्वाना चारा समान वाटला तर बरेचदा सगळीच अर्धपोटी रहातील व मरतील. म्हणून संगोपनाची अशी तऱ्हा रुढ होते. हे हिशोब ती पक्षिण करीत नसून उत्क्रांतीची प्रक्रियाच हिशोबीपणाने जीव घडवते.
एखाद्या भूभागात माणसे किती असतील? तर तेथील अन्नाच्या उपलब्धतेनुसार कमी वा जास्त. निदान अन्न ही एक मर्यादा ठरावी. ती ओलांडून संख्या वाढली तर अर्धपोटी रहावे लागेल. माणसे मरतील किंवा प्रदेश सोडतील. पण संख्या खाली यावीच लागेल. किंवा व्यापारातून बाहेरुन अन्न आणले जाईल.
एका स्वयंपूर्ण खेड्याची लोकसंख्या किती असणार? गावच्या शेतात पिकते ते खाण्याला पुरेल इतकी. म्हणून सुपीक प्रदेशात गावची वस्ती अधिक असेल तर नापीक प्रदेशात (उदा. वाळवंट) कमी. चांगला पाऊस असेल तेथे दाट वस्ती तर कोरडा रखरखाट असेल तेथे विरळ. मॆदानी मुलखात गावे मोठी असतील तर डोंगराळ दऱ्या खोऱ्यांच्या प्रदेशात छोटी. गावची वस्ती जास्त असेल तर तेथे सेवक (न्हावी, चांभार, लोहार) सामावले जातील. त्याना पुरेसे काम मिळेल. सोनाराचे घर मोठ्या खेड्यातच असणार. इतरत्र त्याची उपजीविका अवघड होईल. किंवा तो अंशकाळच सोनारकाम करेल व अन्यथा शेती वा इतर जोडधंदा. किंवा एका गावात राहून अनेक गावाना सेवा पुरवेल. खरा सार्वत्रिक व्यवसाय अन्नोत्पादन हाच असणार. शेत गावापसून फ़ार दूर असून चालणार नाही. वस्तीपासून फ़ारफ़ार तर अर्धा दिवस चालणाच्या अंतरावर. तेसुध्दा व्यवहार्य नाही. चालणे थोडे आणि पोचल्यवर काम करणे जास्त असे हवे. म्हणून त्रिज्या ठरते. वस्ती या केंद्राभोवती तेवढ्या त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्या वर्तुळात जेवढी शेतजमीन येईल तिच्यातील उत्पादनावर गावची वस्ती ठरेल.
हिशोबीपणा जसा गटपातळीवर तसा कुटुंब वा व्यक्तीच्या पातळीवरही असतो. अन्न मिळवण्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यात ऊर्जा खर्च होते. या खर्चापेक्षा अधिक ऊर्जा पदरात पडली तरच ते कष्ट परवडतात. व्यय कमी आणि आय जास्त असे असेल तेव्हांच तो व्यवहार चालू ठेवता येतो. दक्षिण आफ़्रिकेच्या कालाहारी वाळवंटातील कुंग आदिवासींच्या अभ्यासात एक हिशोब पुढील प्रमाणे निघाला. कुटुंबात सरासरी ७.४ माणसे काम करतात. दिवसाचे ६ तास काम. कामात ताशी १५० कॅलरी ऊर्जा खर्च होते. एकूण खर्च ७.४ x ६ x १५० = ६६५० कॅलरी. या कामातून जे अन्न गोळा होते त्यातील ऊर्जा सुमारे ६४२०० कॅलरी. म्हणजे खर्चाच्या दसपट ऊर्जा संकलनातून जमते. म्हणजेच या जीवन रीतीसाठी निसर्ग पुरेसा समृध्द आहे. हे आदिवासी भटके का? एका जागी राहल्यास बारमास पुरेसे अन्न संकलन होऊ शकणार नाही का? याला उत्तर असे की उन्हाळ्यात या वाळवंटात फ़ार थोडे पाणवठे उरतात. त्यांच्या भोवती गर्दी जमते. मग तेथे अन्नाचा तुटवडा निर्माण होतो. म्हणून पाऊस पडल्याबरोबर मंडळी पांगतात. यावरुन नियम कळतो की निसर्ग साधनांच्या सरासरी उपलब्धतेइतकीच वर्षातील किमान उपलब्धता पातळी महत्वाची आहे. मानवी व्यवहार हे त्या किमान पातळीशी जुळवून घेणारे हवेत. दुष्काळ, पूर, वादळ, रोगाची साथ अशी संकटे येतात क्वचित. पण पूर्ण टळत नाहीत. त्याना तोंड देण्याची तयारी असावी लागते.
पश्चिम आफ़्रिकेतील, अत्यंत प्राथमिक तंत्रे वापरुन केली जाणारी, जिरायत एकदल – द्विदल पीक शेती अभ्यासणाराना आढळले की खर्चाच्या अकरापट ऊर्जा निर्माण होते. म्हणजे जवळपास कुंग लोकांच्या संकलनाइतकीच.
जंगलाचा एक तुकडा पेटवून तेथे शेती केली तर खर्चाच्या वीसपट ऊर्जा मिळते. लोखंडी अवजारे असतील तर माणशी चार तास काम असे १०० दिवस केल्यास वर्षाची बेगमी होते. पण २-३ वर्षात जमीनीचा कस घटतो. मग तो तुकडा १५-२० वर्षे पडीक ठेवावा लगतो.
बागायत शेतीमधे खर्चाच्या ५५ पट ऊर्जा मिळाल्याचे एका चिनी खेड्याच्या अभ्यासात दिसले. हा वाढावा कोठे जातो? सिंचनाची सोय करण्यात वा करापोटी. शिवाय शेत मालक मजुराना कामाला लावतो व स्वत: समृध्दी उपभोगतो.
भारतीय शेतकऱ्याना बॆलजोडी लागते. ती मुख्यत: शेती हंगामात. पण ती जोडी बारमास सांभाळावी लागते. बॆल म्हातारे होतील तेव्हां त्यांची जागा घेण्यासाठी दुसरी जोडी मिळेल इतकी बॆलांची पॆदास हवी. त्यासाठी पुरेशा गायी लागतात. काहीना वाटते की भाकड गायी म्हणजे खायला कहार आणि भुईला भार. त्याना आपण खाऊन टाकत नाही. यामुळे त्यांचा खर्च अंगावर पडत रहातो. या तर्काला मर्यादा आहेत. अगदी पुराणमतवादी समजल्या जाणाऱ्या हिंदीभाषिक प्रदेशांमधे सुध्दा बॆलांची संख्या गायींच्या संख्येच्या दुप्पट असावी असा एक अंदाज आहे. जन्मत: हे प्रमाण बरोबरीचे असते. मग गायी कोठे गेल्या? दुर्लक्ष केल्यामुळे खंगून मेल्या. जसे महत्व तशी देखभाल.
शेळी, कोंबडी याना धान्य खाऊ घातले व आपण त्यांचे मांस खाल्ले तर १०० कॅलरी ऊर्जा खर्च करून फ़क्त ५ कॅलरी ऊर्जा अन्न म्हणून मिळते. म्हणून माणसाला निरुपयोगी असे पदार्थ घालून पोसता येतील तेच प्राणी परवडतात.
“ पुरातत्व “
वर्तमानातील समाज व संस्कृती यांचा अभ्यास करताना प्रत्यक्ष पाहणी, मुलाखती वगॆरे उपयोगी पडतात (व शक्य असतात). भूतकाळाचा अभ्यास करण्याची साधने अर्थातच वेगळी. तत्कालिन लिखाणाबरोबरच लेखनेतर सामग्रीही उपयोगी पडते. लिखाण हे पुस्तके, शीलालेख, ताम्रपट, नाण्यांवरील लेख, दानपत्रे, मानपत्रे, हिशोब पुस्तके अशा विविध रुपात असू शक्ते. लिखाणाचा उपयोग होण्यासाठी लिपी आणि भाषा दोन्ही ज्ञात हव्यात. लेखनेतर सामग्रीमधे घरे, वस्त्रे, भांडीकुंडी, हत्यारे, खापरे, नाणी, अलंकार, शरीर सांगाडे असे नाना प्रकार मोडतात. यातील काही गोष्टी जमिनीवर पडलेल्या उघड्या आढळतील तर काही जमिनीच्या पोटातून खणून काढाव्या लागतील. अशा अभ्यासाला archaeology अथवा पुरातत्व असे म्हणतात. महाराष्ट्रात या विषयातील तज्ञ मुख्यत: पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधे आहेत. तेथे या अभ्यासाची अर्धशतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. या विषयाची तोंड ओळख करून घेण्यासाठी म. श्री. माटे लिखित ‘सृष्टी दृष्टी आडची’ हे छोटेखानी वाचनीय पुस्तक उपयुक्त ठरेल.
जमिनीवर दिसणाऱ्या शाश्वत गोष्टी कोणत्या? दक्षिण युरोपातील काही गुहांच्या भिंतींवर हजारो वर्षां पूर्वी आदिमानवाने काढलेली चित्रे टिकून आहेत. या चित्रांमधून त्या माणसांचे अनेक व्यवहार कळतात. कोणत्या प्राण्यांची शिकार (कशी) होई, कोणते प्राणी पाळीव होते, हत्यारे कशी होती इत्यादि. पण या गुहा फ़ार खोल व अंधारलेल्या आहेत. चित्रे काढायला तेथे उजेड कोठून आला? आदिमानव तेथे दिवे लावीत असणार. कसे? कदाचित प्रथम पेटती चूड हाती धरली असेल. पुढे दगडात बारीक खळगा करुन त्यात प्राण्याची चरबी तेल म्हणून घातली व स्नायूचा धागा वात म्हणून घातला तर झाला दिवा तयार. दिव्याच्या काजळीचे रासायनिक पृथ:करण केल्यास तेल कशाचे होते याचा अंदाज येतो. फ़रशी (चुनखडी) मधे दिवा केला तर स्वत: फ़रशी तापत नाही. इतर काही दगड तापतात. म्हणून फ़रशीतील दिवे हाती धरून इकडे तिकडे नेण्यास सोयीचे. सुमारे २० हजार वर्षांपूर्वी लोक दिव्याना पकडदांड्या ठेवू लागले. आणखी ५ हजार वर्षानंतरच्या दिव्यांवर नक्षीकाम आढळते. हलके हलके सुगंधी वनस्पती (उदा.धूप) जाळण्याचा प्रघातसुध्दा आला. युरोपीय गुहांमधे प्रवेशद्वारी, चढउताराच्या जागी, पायऱ्या / सज्जे अशा ठिकाणी दिव्यांसाठी खणलेले खळगे सापडतात. भारतात आदिमानवाने गुहांमधे काढलेली चित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका या स्थळी मिळाली आहेत.
एखाद्या वस्तीच्या आसपास सापडणारी प्राण्यांची हाडे तपासून बरेच काही कळते. उदा. कोणत्या प्राण्यांचे मांस खाल्ले जाई. न दिसलेल्या हाडांवरूनही काही कळते. मोहेंजोदारो संस्कृतीच्या स्थानांवर घोड्यांची हाडे मिळत नाहीत. घोडा हा प्राणी मुळात मध्य आशिया व पूर्व युरोप येथील गवताळ मॆदानी प्रदेशातला. तो भारतात कधी आला? मोहेंजोदारो संस्कृतीच्या उत्तरकाळातील स्थानांवर घोड्यांची हाडे सापडतात. काळ अंदाजे इसवी पूर्व २००० वर्षे. या वेळेपर्यंत त्या प्राचीन संस्कृतीची भव्य शहरे, शासन यंत्रणा, सागरी व्यापार सर्व लुप्त झाले होते. समाज पुन्हा पूर्वीसारखा मागास, खेडुत जीवन जगू लागला होता. हाच काळ वॆदिकांच्या आगमनाचा. त्याना घोडे, रथ यांचे अफ़ाट वेड. अश्वत्थामा, दशरथ ही नावे तेच सुचवतात. यांचा सूर्यदेव फ़िरतो सात घोड्यांच्या रथातून. देवाना सर्वात महत्वाचा बळी म्हणजे अश्व. म्हणून अश्वमेध यज्ञाची प्रतिष्ठा सर्वात जास्त. बळी जाण्यापूर्वी या अश्वाला सर्वोच्च सन्मान मिळे. तो म्हणजे सम्राज्ञानीबरोबर समागम. सम्राज्ञीला अश्वासमवेत झोपवीत. रामायणात कॊसल्येच्या वाट्याला हे कर्मकांड आल्याचे वर्णन आहे. या वॆदिकांकडून मोहेंजोदारो – हडप्पा या संस्कृतीच्या वारसांकडे घोड्यांचे पालन व त्यांचा वापर ही तंत्रे हळूहळू हस्तान्तरित झाली असावीत.
उत्खननात मानवी हाडे, सांगाडे सापडले की त्यांच्या परीक्षणातून बरेच निष्कर्ष काढता येतात. निऍंडार्थाल या आदिमानवाबद्दल काढलेली अनुमाने पाहूया. थाल हा जर्मन भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ नदीचे खोरे. ड्युसेल्डॉर्फ़ शहराजवळ निएँडर नामक खोऱ्यात प्रथम मानवाच्या एक अनवट प्रकाराचा शोध लागला. खूपच वेगळी हाडे असणारा हा प्रकार निएँडरथाल मानव या नावाने ओळखला जातो. पुढे या मानवाची हाडे / सांगाडे युरोप ते अफ़गणिस्तान येवढ्या विस्तीर्ण भूभागात आढळल्याचे वॆज्ञानिकानी नोंदले. या सांगाड्यांच्या कवटीवरून कळते की याचा मेंदू आधुनिक मानवाच्या मेंदूपेक्षा १०% मोठा होता. (पण कंप्युटर्सबाबत तरी नक्की म्हणता येते की नव्या शतकातील छोटे कंप्युटर्स पूर्वीच्या मोठ्या कंप्यूटर्सपेक्षा अधिक सक्षम व शक्तिशाली आहेत). यांच्यातील माद्यांच्या कमरेची हाडे पाहून कळते की गर्भाशयातून मूल बाहेर येण्याची वाट मोठी होती. म्हणजे मुलाची पोटातच अधिक वाढ होत असणार. गर्भारपण एक वर्षाचे असावे. या लोकाना कला अवगत नसाव्यात. यांच्याकडे सुया, शिवणकाम नव्हते. मुद्दाम बनवलेली वस्त्रे नव्हती. चित्रकला नव्हती. होड्या नव्हत्या. यांचे अवशेष सर्वत्र सारखेच आहेत. त्यात विविधता नाही. दगडी हत्यारांसाठी दगड स्थानिकच वापरला आहे. म्हणजे दूरच्या लोकांशी देवाण घेवाण नव्हती. अर्थात या गोष्टी हाडांपासून नव्हे तर अन्य वस्तूपासून कळतात. पण ओघाओघाने आल्या म्हणून सांगितल्या.
निएँडरथाल मानवाचे आयुर्मान ३०-४० वर्षांचे असावे. मृत शरीराचे दफ़न करण्याची त्यांची पध्दत होती. दफ़नाबरोबर फ़ुले वगॆरे ठेवत. त्यांच्यात पूजा, धर्म अशा गोष्टी असाव्यात काय अशी शंका येते. लंगडे, पांगळे, अपंग सांगाडे सापडले आहेत. म्हणजे अपघात झाला, जखमा भरून आल्या पण अपंगत्व राहिले असे सांगाडे. नातेवाइकानी यांचा सांभाळ केला असणार. एरवी निसर्गात अपंग जीव जगू शकत नाहीत. कोणाच्या तरी भ्क्ष्यस्थानी पडतात वा उपासमारीचे बळी होतात. सुमारे ४० हजार वर्षांपूर्वीपासून आधुनिक (Cro-magnon) मानवाचे सांगाडे सापडण्याला सुरुवात होते. हा नवा मानव जन्माला आला तेव्हांच निएँडरथाल मानव पृथ्वीवरुन संपला.
सांगाड्यावरुन कळणाऱ्या अन्य काही गोष्टींचा उल्लेख करुया. त्या व्यक्तीचे लिंग, वजन, मृत्यूसमयी वय ही कळतात. वय कळते ते दातावरुन. वय आणि हाडांचे आकारमान यावरुन वाढ कशी होत होती ते सांगता येते. दातांमधे पोकळ्या असणे हे आहारात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण जास्त असण्याचे चिन्ह आहे. दातांचे वरचे आवरण (enamel) सदोष असेल तर ते बाळपणीच्या कुपोषणाचा परिणाम होय. रक्तक्षय, टीबी, महारोग, संधीवात इत्यादी रोगांचा सांगाड्यावर ठसा उमटतोच. ग्रीस व तुर्कस्तानात शेतीपूर्व काळात पुरुष सरासरी पावणेसहा फ़ूट उंच तर बायका साडेपाच फ़ूट उंच असत. शेती आली आणि उंची अर्ध्या फ़ुटाने घटली. ती अजून पूर्ववत झालेली नाही. शेतकरी तांदूळ, बटाटा असल्या मोजक्या पिठूळ पिकांवर विसंबतात. अन्नसंकलकांचा आहार जास्त चॊरस असतो. १८४० साली आयर्लंडमधे बटाट्याच्या पिकावर रोग पडला. पीक गेले. दुष्काळ पडला. दहा लक्ष भूकबळी पडले. संकलक समाज एका वनस्पतीवर इतका विसंबून नसतो. त्याला असा धोका पोचत नाही. आज संकलकाना शेतकऱ्यानी अनुत्पादक भूभागावर ढकलले आहे. जेव्हां ते सुपीक जमिनीवर रहात होते तेव्हां त्यांचे पोषण उत्कृष्ट असणार.
अमेरिकेत ओहायो नदीच्या खोऱ्यातील आदिवासी प्रथम संकलक होते. हजार वर्षांपूर्वी तेथे मक्याची शेती आली. आधीच्या काळातले सापडलेले सांगाडे निरोगी होते. मक्याच्या शेतीनंतर नूर पालटला. लहान मुलांच्या पहिल्या दातांच्या आवरणात दोष दिसू लागले. म्हणजेच गर्भारपणी व प्रसूतीपश्चात माता कुपोषणग्रस्त होत्या. रक्तक्षयाची लक्षणे दिसण्याचे प्रमाण चॊपट वाढले. गुप्तरोग, सिफ़िलिस, यॉज अशा रोगानी अर्धी लोकसंख्या ग्रासली. आयुर्मान घटले. आधी ५ टक्के लोक पन्नाशी ओलांडत. ते प्रमाण १% इतके घसरले. हे सर्व सांगाड्यांच्या अभ्यासातून कळले.
हाडेच काय वस्तीजवळ सापडलेल्या राखेपासूनसुध्दा संस्कृतीबद्दल अनुमाने काढता येतात. दक्षिण भारतात, विशेषत: कृष्णा – तुंगभद्रा खोऱ्यात भस्माचे डोंगर आढळतात. यांचा घेर शंभर मीटर पर्यंत तर उंची दहा मीटर पर्यंत (तीन मजले) आढळली आहेत. ही राख कसली असावी? कोणाला वाटले स्मशानाची. पण रासायनिक तपासणीत ती फ़क्त शेण जाळून मिळालेली असल्याचे ठरले. गुलबर्गा गावाजवळ चार मीटर उंचीचे राख टेकाड आहे. त्या खेड्याचे नाव बुधिहाळ. बुधि म्हणजेच राख किंवा भस्म.
शेण जाळून राखेच्या टेकड्या बनतात याचा अर्थ गुरे खूप असणार आणि शेणाचा अन्य उपयोग केला जात नसणार. आज खेडोपाडीशेणाचा तुटवडा पडलेला आढळतो. शेण हे जळण म्हणून उपयोगात येते. पण जंगल झाडोरा भरपूर असतो तेव्हां लाकूडच वापरले जाते कारण ते जळण म्हणून सोयीचे आहे. आजचा शेतकरी शेणाचा खत म्हणून वापर करतो. हे सर्वसाधारण सत्य असले तरी आजही छत्तिसगड मधील माडिया आदिवासी जमातीत वस्तीशेजारी न वापरलेल्या शेणाचे डॊंगर आढळतात. शेतात खत म्हणून शेण घालण्याची प्रथा नाही. त्यामुळे तण वाढते. असा समज आहे. माडिया आपल्या गायींचे दूधही काढत नाहीत. गुरांचा कळप हा बहुधा फ़क्त मांसाची गरज भागवण्यासाठीच असावा.
राखेचे डोंगर रचणाऱ्या आदिवासींबद्दल हेच म्हणता येईल काय? याला उत्तर होय असे आहे. या वस्त्यांजवळ गुरांची कत्तल करण्यासाठी वापरले जाणारे ओटे आढळतात. अशा ओट्यांचे क्षेत्र सुमारे २५० चॊ मीटर असते. त्याची जमीन बनवण्यासाठी राख + चिकणमाती + हाडांचा जुरा + दगडगोटे असे मिश्रण वापरले जाई. मारलेल्या गुरांच्या कवट्या व्यवस्थित पुरुन ठेवत. यांचा काळ आहे इसवीपूर्व २००० ते १५००. म्हणजे उत्तरेत ॠग्वेद संहिता आकार घेत होती तेव्हांचा.
उत्खनन करताना सर्वात जास्त प्रमाणात सापडतात ती खापरे. धातू सापडणे फ़ार कमी. ते नाश पावतात. गंजून त्यांची माती होते. माणूस प्रथम निसर्गात सहज सापडणारी नारळ, भोपळा, शहामृगाच्या अंड्यासारखी मोठी अंडी, बांबू ही ‘भांडी ’ म्हणून वापरत असणार. पाखरांची घरटी पाहून माणूस गवत, वेली यांचे विणकाम करू लागला असेल. त्यातून टोपल्या, परड्या बनल्या असतील. काही पाखरे घरटी चिखलाने सारवतात. ते पाहून माणसाने टोपल्या सारवल्या असतील. त्यातील एखादी आगीत पडून योगायोगाने चिखल भाजला जाऊन मातीचे मडके बनवण्याची कला जन्माला आली असेल. मडकी खूप लागतात, फ़ुटतात, पुन्हा पुन्हा बनवली जतात. खारट हवेचा प्रदेश वगळल्यास सामान्यत: आपली आपण नाश पावत नाहीत. खापराना पुरातत्व विद्येची धुळाक्षरे म्हणतात.
खापरे तपासली की मातीचा प्रकार कळतो. ती स्थानिक नसेल तर अन्य प्रदेशाशी संबंध असल्याचे कळते. खणखण वाजणारे लाल भांडे हे उघड्या भट्टीत भाजलेले असते. बंद भट्टीत भाजल्यास काळे भांडे मिळते. फ़िरत्या चाकावर बनवलेले मडके वेगळे दिसते तर स्थिर घडवलेले वेगळे. चाकाचा कमीजास्त वेग सुध्दा मडक्यावर आपला ठसा उमटवतो.
मॊर्य काळात चकचकीत काळी खास मडकी बनवीत. मोल जास्त म्हणून त्यांची संख्या कमी. ती समाजातील बिषमतेची निर्देशक असावीत. खापरांवर नक्षी, चित्रे काढली असतील तर त्यावरुन काही सामाजिक बाबी कळतात. उदा. पोशाख, वाहने, नृत्यरीत, शिकाररीत इत्यादि. पुण्याजवळ इनामगाव येथील उत्खाननात सापडलेल्या खापरांवर बॆलगाड्या, होड्या यांची चित्रे दिसली. त्यावरुन समाजातील तंत्रज्ञानाची कल्पना येते.
खापरांचा अभ्यास आणि ती बनवणाऱ्या समाजाचे अन्य पॆलू यांचा मेळ बसवण्यातून नवी समज येते. याचे उदाहरण म्हणून अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील आराकिरा या आदिवासी जमातीची माहिती पाहू. यांच्या वस्त्यांमधे सापडणाऱ्या खापरांचे रंग, घाट, नक्षी वगॆरेनुसार वर्गीकरण झाले. काही मडक्यांची मान सुरईसारखी सरळ उभी तर इतरांची बाहेर फ़ुलवलेली. काहींवर धारदार दगडाने खुणांची नक्षी केलेली तर इतरांवर दोरखंड बांधून नक्षी वगॆरे. जुन्या काळातील खापरे बरीचशी एकसारखी. दोन तीन ठळक प्रकारात बसणारी, तर उत्तर काळातील खापरांमधे खूप विविधता. त्यांची सोपी वर्गवारीच अशक्य. असे का व्हावे?
आधी घरांचा आकार मोठा होता. (जोत्याचे क्षेत्रफ़ळ मोजता येते). तो नंतर लहान झाला. याचा खापरांच्या विविधतेशी संबंध आहे का?
खापरांचा घाट, नक्षी वगॆरे बाबी ठरवतो कुंभार. या आदिवासींमधे कुंभारकाम बायकांकडे होते. घरजावई करुन घेण्याची सरसकट रीत होती. बायका मूळ घरात एकत्र कुटुंब पध्दतीत रहात. आईच्या शिकवणीनुसार मुली मडकी घडवीत. मोठे एकत्र कुटुंब म्हणून घर मोठे हवे. बायकांचा वावर घरातल्या घरातच. म्हणून सगळ्य़ा परंपरा (घाट, नक्षी इ. ) टिकून रहात. पुढे नेब्रास्का सोडून साउथ डाकोटा भागात वस्ती गेली. तेथे लाकूड कमी, वस्ती अस्थिर झाली. युरोपीय लोकांशी व्यापार सुरु झाला. ते काम पुरुषांकडे आले. बाईचे महत्व घटले. युरोपीय लोकांच्या संसर्गाने रोगराई आली. संख्या घटली. कुटुंबे लहान झाली. बायकांचा अपरिचिताशी संबंध वाढला. बघितलेल्या नव्या घाटांचे नक्षीचे अनुकरण सुरु झाले. म्हणून विविधता आली.
घरे व बांधकामे यांचा अभ्यास असाच उपयुक्त आहे. मोहेंजोदारो – हडप्पा येथील घरांची क्षेत्रफ़ळे मोजल्यावर अभ्यासक म्हणतात की या संस्कृतीमधील मध्यम वर्ग इजिप्त वा सुमेर संस्कृतींच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात असावा. कामगारांचे निवासी गाळे आजच्या मजुरांच्या चाळींपेक्षा जास्त चांगले वाटतात. हडप्पाच्या उत्तर काळात शहराची पश्चिम वेस बांधून बंद केली म्हणजे पश्चिमेकडून धोका होता. घोडे वापरुन फिरणाऱ्या टोळ्यांचे आक्रमण सुरु झाले होते. नंतर घरांमधे भिंती बांधून, घरांचे तुकडे पाडून वापरणे सुरु झाले. खेड्याकडून शहराकडे ओघ वाढला असणार. ग्रामीण भागात घोडेस्वार टोळ्यांचा उपद्रव वाढला असणार. कुंभारभट्ट्या शहरतच उभारल्या गेल्या. ग्रामीण भगात उद्योग धंदे करणे अशक्य झाले असावे. सुनियो जित रस्त्यांची वाट लागली. लोकानी दागिने व मॊल्यवान चीजा पुरुन टाकल्या. कायद्याचे राज्य राहिले नसणार. अखेर शहरे ओस पडली. जनता धोक्यापासून दूर निघून गेली.
“ उत्खनन कोठे ? “
उत्खनन करून इतिहास शोधण्याचा प्रकार सोळाव्या शतकात इटलीमधे सुरु झाला असे मानतात. नेपल्स शहरातील राजवाड्याच्या प्रांगणात गाडले गेलेले सुंदर पुतळे सापडले म्हणून राणीने हेतुपूर्वक उत्खनन करविले. त्यात हर्क्युलेनियम नामक लुप्त नगरीचा शोध लागला. प्राचीन कलात्मक वस्तूंचा संग्रह करणे असे सुरुवातीला मर्यादित उद्दिष्ट असलेला हा छंद होता.
पुढे भूशास्त्राच्या अभ्यासातून पृथ्वीचे वय (बायबलात सांगितल्या प्रमाणे फ़क्त काही हजार वर्षे नसून) कोट्यावधी वर्षे आहे हे लक्षात आले. चार्लस डार्विनच्या लेखनातून सिध्द झाले की जीवसृष्टी हळूहळू बदलते, उत्क्रांत होते. माणूससुध्दा उत्क्रांत झाला. त्याच्या बदलाचा आलेख काढण्यासाठी उत्खनित वस्तूंचा उपयोग आहे असे लक्षात आले. लेखनविद्या हीच फ़ार अलीकडची आहे हे समजल्यावर भूतकाळाचे दोन स्वाभाविक टप्पे पडले. ज्या काळाबद्दल लिखित पुरावे मिळतात तो इतिहास काळ. त्या आधीचा तो इतिहास पूर्वकाळ. इतिहास पूर्वकाळासाठी उत्खनित वस्तू याच मार्गदर्शक होत. पण त्यांच्या अभ्यासातून विशिष्ट व्यक्ती वा घटना यांच्याबद्दल सांगता येत नाही. समष्टीबद्दल माहिती कळते.
ऒद्योगिक क्रांतीच्या काळात युरोपात रस्ते, धरणे, कारखाने, निवासी इमारती अशी खूप बांधकामे झाली. त्यामुळे उत्खनन झाले. त्यातून अनेक चीजा सापडल्या. त्या वस्तूना संग्रहालयात जपण्याची पध्दत पडली. तेथे त्यांचे सोपे वर्गीकरण केले जाई. म्हणजे दगड, लोह, ताम्र, काच वगॆरे.
इतिहास संशोधन म्हणून खास उत्खलन करायचे झाले तर प्रथम खणण्याची जागा ठरवायला हवी. ती कशी? मोहेंजोदारो – हडप्पा या शहरांच्या जागा अपघाताने सापडल्या.
प्रथम सुंदर विटा मिळण्याचे ठिकाण म्हणून तेथे उत्खनन झाले. नंतर पध्दतशीर शोध घेतला गेला. काही वेळा दंतकथांमधून सूचना मिळते.
पश्चिम महाराष्ट्रात संगमनेर जवळ जोर्वे या गावी जमिनीत गाडलेली नगरी आहे अशी दंतकथा होती. १९४७ साली तेथे उत्खनन झाले. सुमारे ३५०० वर्षांपूर्वीच्या वस्त्यांचे अवशेष सापडले. ही एक ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती. हा कसला संस्कृतीचा प्रकार? माणूस हत्यारांच्या मदतीने जगतो. तो काय करु शकेल वा शकणार नाही हे त्याच्या हत्यारांवर ठरते. म्हणून हत्यारांनुसार संस्कृतीचे टप्पे ठरवता येतात. एकोणिसाव्या शतकात डेन्मार्कच्या राष्ट्रीय संग्रहालयाचा मुख्य ख्रिश्चन टॉम्सन याने तर्क केला की उत्खनित हत्यारांचे प्रकार आणि माणसाच्या संस्कृतीची उत्क्रांती यांचा संबंध आहे. १८३६ मधे त्याने ‘त्रियुग सिध्दान्त’ मांडला. पहिले युग दगडांच्या हत्यारांचे. पाषाणयुग अथवा अश्मयुग. मानवजातीचे बहुतांश जीवन याच युगात गेले. मग धातुचा शोध लागला. सहज मिळणारे व सहज घडवले जाणारे तांबे सापडले. त्याची हत्यारे वापरात आली. हे ताम्रयुग. नंतर लोखंडाचा शोध लागला आणि लोहयुग अवतरले.

अशी वर्गवारी मुख्यत: अभ्य़ासाच्या सोयीसाठी केलेली असते. तपशिलात गेल्यावर वर्गवारीला अवघड अशी मिश्रचिन्हे दाखवणाऱ्या जागा सापडतात. मग संधिकालाचे वेगळे युग म्हणावे हवे तर. अशा रीतीने ताम्रपाषाण युग हा प्रकार आला असावा. अश्मयुग हा वर्ग फार ढोबळ वाटू लागला. मग त्याचे पराश्म युग, नवाश्म युग वगैरे तुकडे पाडले गेले. नवाश्मयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे तेव्हा खापरे सापडू लागली. असो.

प्राचीन ग्रंथ, पुराणे यांच्या वाचनातून उत्खनन योग्य जागा सुचू शकतात. ग्रीक पुराणात ट्रॉय नगरीची राणी हेलन हिची कहाणी आहे. म्हणून त्या नगरीचा शोध सुरु झाला. असा शोध घेण्याची स्फुर्ती हैन्रिक श्लीमन या अभ्यासकाला होमरची महाकाव्ये वाचून आली. १८७१ साली त्याला तुर्कस्तानच्या पश्चिम सीमेवर ट्रॉय नगरी सापडली. महाभारतात इंद्रप्रस्थ, हस्तिनापुर अशा नगरांचे उल्लेख येतात. म्हणून तेथे खणण्याची कल्पना सुचते. आश्चर्य म्हणजे महाभारतीय स्थळांवरील उत्खनने अपयशी ठरली आहेत. आजपासून पाच हजार वर्षे मागे गेल्यास मोहेंजोदारो – हडप्पा संस्कृतीचा काळ येतो. या संस्कृतीचे वस्तुरुप पुरावे अगणित आहेत. पण तेथील लिखित पुरावा शून्य. त्यांची लिपी अजून वाचता येत नाही. या भव्य संस्कृतीमधील व्यक्ती, घटना वा तत्सम तपशील पूर्णपणे अज्ञात आहे.
वैदिक वाङमयातील ओझरत्या उल्लेखांवरुन काही तर्क करु येवढेच. वैदिक संस्कृतीचा काळ हा त्यानंतर दीड दोन हजार वर्षानी येतो. तेव्हांच्या वाङमयाची उपलब्धता भरपूर. वेद, उपनिषदे आज जगभर ठाऊक आहेत. पण या काळातील वस्तुरुप पुरावा जवळपास शून्य. अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुध्द व महावीर अवतरले. त्यानंतर अलेक्झांडरने वायव्य सरहद्दीवर स्वारी केली. तेथपासून पुढे युरोपीय व भारतीय इतिहासांचा सांधा जुळवून घेता येतो. सम्राट अशोकाचे शीलालेख हा या काळातील सर्वात महत्वाचा पुरावा. येथपासून पुढे वस्तुरुप व लिखीत दोन्ही प्रकारचे पुरावे मिळतात.

उत्खननाची जागा शोधताना पदार्थ विज्ञानाचा उपयोग करतात. उदा. Magnetic resistivity survey. दोन लोखंडी खांब जमिनीत उभे करुन तारेने जोडावेत. त्यातून वीज प्रवाह सोडावा. तो प्रवाह जमिनीतून कसा प्रवास करतो याचे मापन करावे. जमिनीत लोखंडी अवशेष आहेत का याची चाचपणी त्या मापनातून करता येते. अवशेष असतील तर प्रवाह अधिक सुलभपणे जातो. मध्य व दक्षिण अमेरिकेतील माया, इंका, अझ्टेंक या संस्कृतीच्या अभ्यासात वरील तंत्राचा बराच उपयोग झाला आहे.
आपल्याकडे शेताला म्हणतात काळी तर वस्तीला पांढरी. एखादे उनाड पांढरीचे टेकाड दिसले तर तेथे पूर्वी वस्ती असावी असा अंदाज करता येतो. तेथे खणून बघणे रास्त.
हवाई छायाचित्रण हा प्राचीन इतिहासाचे पुरावे शोधण्याचा आणखी एक मार्ग. एरवी लक्षात येणार नाहीत अशा खुणा त्याच भूभागाकडे दुरून त्रयस्थपणे बघितल्यावर दिसू लागतात. उत्तर आफ्रिकेत रोमन राजवाड्यांची स्थाने अशी सापडली आहेत. पुण्याजवळ इमानगावच्या परिसराचे हवाई छायाचित्रण झाले. त्यातून तेथील ताम्रपाषाणयुगीन कालवे लक्षात आले. तक्षशीला नगरीची रचना छायाचित्रातूनच समजली. हल्ली वैद्यकीय तपासणीसाठी शरिराच्या आत नळीची दुर्बिण सारुन अवयवांच्या कामाची दृश्ये बघता येतात. त्याच प्रमाणे जमिनीच्या पोटात नळ्या ढकलून फोटो घेता येतात. खणती टाळून आतील पुरावे बघणे शक्य होते. प्राचीन ग्रीक थडगी अशी तपासण्यात आली. मागे कोणीतरी पुण्यात कल्पना मांडली होती की ज्ञानेश्वरांची समाधी उघडून तपासावी. खरे तर ती न उघडता आत दुर्बीण सारुन फोटो घेणे शक्य आहे. त्याहूनही मुळातच मुद्दा म्हणजे अशा तपासणीने काय साधणार? वारकऱ्यांनी या कल्पनेला विरोध केला. ती बारगळली. उलट अमेरिकेत मात्र त्यांच्या घटनेचा शिल्पकार टॉमस जेफर्सन व त्याच्या मालकीचे गुलाम स्त्री पुरुष यांच्या अस्थींचे नमुने घेऊन त्यांचे रासायनिक पृथक्करण करण्यात आले होते. हेतू काय? तर त्याला आपल्या गुलाम स्त्रीयांपासून अपत्ये झाली होती काय हे तपासणे. तो संशय खरा ठरला.
त्या तुलनेने आपण फार हळवे आहोत. आपल्या श्रध्दास्थानांची चिरफाड आपल्याला सहन होत नाही. आपल्या घटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी आयुष्यात काही अनैतिक वर्तन केले होते काय असा प्रश्न उपस्थित करणे हे सुध्दा आज धोक्याचे आहे. तसे संशोधन करणे तर अशक्यच. म. गांधीनी सत्याच्या प्रयोगातून कठोर आत्मपरीक्षणाचा वसा आपल्याला दिला. पण आपण उतून मातून तो घेतला वसा टाकून दिला. व्यक्तिपूजक वृत्तीमुळे आपलाच तोटा होतो. शिवाजी, जोतिबा फुले यांच्या सारख्यांच्या जीवनाची तर्ककठोर चिकित्सा होऊ शकत नाही. त्यांच्या चुका कोणत्या, त्या का झाल्या, टाळणे शक्य होते का ? अशा प्रश्नांबाबत आपण अडाणीच रहातो. असो.

वरील सर्व चर्चेत जागोजागी आपण कालनिर्णयात्मक विधाने केली आहेत. उदा. हडप्पा संस्कृती पाच हजार वर्षांपूर्वीची. हा काळ कसा ठरवतात? त्यासाठी दोन प्रकारच्या रीती आहेत. तौलनिक (relative) आणि निश्चित (absolute) . उत्खननात वस्तू कोणत्या थरात मिळाली याची नोंद ठेवायची. वरचा थर अलीकडचा तर खालचा थर जुना. थराचा काळ आणि त्या थरात सापडलेल्या वस्तूचा काळ एकच. यातून जुने काय नवे काय याची उतरंड लावता येते. उत्खननाच्या जागी काटकोनात दोऱ्या बांधून उत्खनन क्षेत्राचे बारीक तुकडे करायचे व कोणती वस्तू कोणत्या तुकड्यात सापडली याची नोंद ठेवायची.
हडप्पा मधल्या मुद्रा (seals) मध्यपूर्वेत सापडल्या. म्हणजे या दोन ठिकाणच्या संस्कृती समकालीन ठरल्या. एकीचा काळ समजला तर दुसरीचा समजलाच. भारतात रोमन रांजण सापडतात. त्यांना अफोरे असे म्हणतात. त्याना एक पाय असतो.
समुद्रकाठच्या वाळूत तो पाय खुपसून रांजण उभा करायचा. त्यावर मालकाचे चिन्ह वा नावं असले आणि रोमन इतिहासात त्या नावाचा काळ माहीत असला तर भारतातील संबंधित स्तराचा काळ ठरतो. पंचांगांचे उल्लेख (ग्रह, तारे यांच्या स्थिती) असल्यास खगोलविद्या वापरुन काळ ठरवता येतो.
सुमारे पन्नास वर्षापूर्वी रसायनशास्त्रीय पध्दत वापरुन निश्चित कालनिर्णय करण्याची रीत उदयाला आली. या रीतीनुसार जीवाच्या अवशेषातील ९-१४ या मूलद्रव्याचे प्रमाण मोजले जाते. जिवंत प्राणी व वनस्पती यांच्यात ते ठराविक पातळीवर असते. मृत्यूनंतर ते घटू लागते. सुमारे साडेपाच हजार वर्षात ते मूळच्या निम्मे होते. ( half life ) . अशा गणिताने एखादा अवशेष केव्हा मृत झाला याचा अंदाज बांधता येतो. समजा चंद्रगुप्त मौर्य या सम्राटाच्या राजवाड्याचा लाकडी खांब सापडला. तो वृक्ष तोडला त्याला किती वर्षे झाली असा अंदाज करायचा. राजवाडा निदान तेवढा जुना असणार.
काळ मापता आला की वेग समजतो. सांस्कृतिक बदलाचा वेग पूर्वी किती होता आणि आता किती आहे हे बघणे उपयुक्त ठरते. आपण म्हटले आहे की आधुनिक मानव (cro –magnon) चाळीस हजार वर्षापूर्वी पृथ्वीतलावर अवतरला. पहिली तीस हजार वर्षे तो अन्नसंकलक होता. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला. शहरे वसवण्याला आणखी पाच हजार वर्षे लागली. त्यानंतर एक हजार वर्षानी लेखनविद्येचा शोध लागला असावा. त्याच सुमारास माणूस घोड्याला लगाम लावण्यास शिकला. बदलाचे घड्याळ हजार वर्षांचे होते. उलट विसाव्या शतकात वायुवेगाने, मनोवेगाने बदल झाले. (अर्थात इथे कालमापनास C-14 पध्दत वापरावी लागत नाही). अमेरिकेत ऑलिव्हर आणि विल्बर राईट या बंधूंचे विमान धडपडत चार पावले उडाले ते शतकाच्या सुरुवातीला. या पहिल्या उड्डाणात अंतर कापले ते बोइंग ७४७ विमानाच्या एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत इतपत होते. अशी सुरुवात होऊन शतक संपण्याच्या आत मानव चंद्रावर उतरला.
आज पश्चिम युरोप व उत्तर अमेरिकेची संपन्नता पाहून डोळे दिपतात. पण ही किती अलीकडची आहे हे समजले तर मन चकित होते. १९व्या शतकात चार पिढ्यांमधे डच पुरुषांची सरासरी उंची ८ इंचानी वाढली. याचा अर्थ १८ व्या शतकापर्यंत डच जनता कुपोषण/ अनारोग्य यांनी ग्रस्त होती व म्हणून खुरटलेली होती. हेच वास्तव सार्वत्रिक होते. १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्लंडमधे २०% जनता अर्धपोटी होती. रोजचे काबाडकष्ट न झेपणारी होती. १८व्या शतकात परिस्थिती आणखी वाईट असावी. त्या मानाने अमेरिकेत खाण्या-पिण्याची आबाळ नव्हती. म्हणून अमेरिकन लोक ब्रिटिशांपेक्षा सरासरी ४ इंच अधिक उंच होते. त्यांचे सरासरी आयुर्मान ब्रिटिशांपेक्षा २० वर्षानी जास्त होते. कारण वस्ती विरळ आणि साथीचे रोग कमी. पुढे शहरे वाढली, दाटी वाढली, रोगराई वाढली आणि आयुर्मान घटले. १८४० मधे न्यूयॉर्कच्या रहिवाशांचे आयुर्मान ( life expectancy at birth) २४ वर्षे इतके कमी होते. दक्षिणेच्या प्रांतातील ग्रामीण भागात रहाणारे गुलामसुध्दा यापेक्षा अधिक काळ जगत.
आज आपण एक दोन दिवसात प्रवासी विमानांमधून पृथ्वीप्रदक्षिणा करु शकतो. तो खर्च भारतात चांगली नोकरी असणाऱ्या माणसाच्या आवाक्यातील आहे. युरोपातील कामगाराला सुध्दा ते परवडेल. विमान प्रवास अत्यंत सुरक्षित आहे. १८व्या शतकात युरोप ते अमेरिका प्रवासाचा खर्च कामगाराच्या वर्षभराच्या पगाराइतका होता. वाटेत ५-१०% प्रवासी रोगराईचे बळी होत. तितकेच आणखी लोक प्रवासातील संसर्गामुळे नंतर मरत. या सगळ्यावर आज विश्वास बसत नाही.

“प्रयोग”

संस्कृतीच्या अभ्यासात प्रयोगांचा मर्यादित पण महत्वाचा उपयोग आहे. आधुनिक विज्ञानामधे प्रयोगप्रामाण्याला अनन्यस्थान आहे. कोणताही निष्कर्ष हा प्रयोगाने पुन्हा पुन्हा पडताळून बघता आला पाहिजे. पारंपारिक प्रयोग पध्दत अशी की बाकी सर्व बाबी त्याच ठेवून एक बाब बदलायची. निरीक्षणात बदल झाला तर ती बाब जवाबदार धरायची. सीमेंट पाणी घालून कालवल्यावर थोड्या वेळात घट्ट होते. त्यासाठी लागणारा वेळ वाढवण्यास जिप्सम हे द्रव्य उपयोगी पडते. वेळ जास्त असला म्हणजे कालवलेला माल अधिक दूर अंतरावर नेऊन वापरता येतो. ही गोष्ट प्रयोगाने सहज तपासता येईल. दोन घमेल्यात सीमेंट कालवा. एकात जिप्सम घाला. घट्ट होण्यास कोणाला किती वेळ लागतो ते पहा. संस्कृतीच्या अभ्यासात असे प्रयोग करणे अवघड जाते. अर्थात प्रयोग नाहीत म्हणजे वैज्ञानिक अभ्यासच शक्य नाही असे नव्हे. खगोल विज्ञान, भूशास्त्र यांच्यातही सरसकटपणे प्रयोग शक्य नसतात. काही वेळा विचारपूर्वक केलेली निरीक्षणेच प्रयोगाचे स्थान घेतात. अलीकडेच झालेला असा एक ‘प्रयोग’ पुढील प्रमाणे –

आपल्या आकाशगंगेतील एक तारा एका धूमकेतूच्या प्रवासात पृथ्वीपासून झाकला जाणार होता. ग्रहणकाळात त्या ताऱ्याकडून येणारा प्रकाश मोजण्याचे ठरले. अपेक्षा अशी की ग्रहण लागेल तसा तसा प्रकाश घटेल. अखेर खग्रास ग्रहण होईल. मग ग्रहण सुटू लागेल. येणारा प्रकाश वाढेल. प्रत्यक्षात निरीक्षणे वेगळी आली. त्यांचे विश्लेषण करताना लक्षात आले की हा तारा नसून ताऱ्यांची जोडी आहे. या खटाटोपातून आधी अज्ञात असलेली माहिती उजेडात आली. असे म्हणता येईल की निसर्गानेच हा प्रयोग केला. अभ्यासकांनी त्याचा फायदा घेतला.
असाच प्रकार संस्कृतीच्या अभ्यासात घडू शकतो. नव्हे घडला.
स्थळ – प्रशांत महासागरात पॉलिनेशिया या भागातील असंख्य लहान मोठी बेटे.
प्रयोगसामग्री – बेटागणिक बदलणारी नैसर्गिक परिस्थिती. काही बेटे मोठी तर काही लहान. काही सुपीक तर काही नापीक. काही थंड तर काही उबदार. काहींवर लाव्हा खडक तर काहींवर चुनखडी.
प्रयोगाची रीत – प्रत्येक बेटावर मनुष्य प्राण्याच्या टोळ्या मोकळ्या सोडा. त्यांच्या काही डझन पिढ्या उलटू द्या. त्यांची उत्पादन पद्धती, समाजरचना यात काय फरक होतो ते टिपून ठेवा.

निरीक्षण – जमीन नापीक होती तेथे शेतीचे उत्पन्न कमी आले. वस्ती विरळ राहिली. जेथे जमीन सुपीक तेथे वस्ती दाट झाली.
चॅथॅम बेटावर शेती जमलीच नाही. हवामान अतिथंड होते. तेथे वस्ती करण्यास गेलेली मंडळी मूळची शेतकरी होथी पण उबदार हवेतील. त्यांची पिके (मुख्यत: कंद) थंड हवामानात टिकू शकली नाहीत. नव्या वनस्पतींची ओळख होऊन त्यांची लागवड करण्यापर्यत प्रगती होणे अवघड जाते.
वस्ती – दर चौरस मैलास ५ माणसे. या बेटावर बिन पंखाचे पक्षी होते. नुसते हाताने पकडून मान मुरगाळून टाकता येई. हत्यारांची सुध्दा गरज नसे.
न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर सुध्दा थंडीमुळे शेती फसली. उत्तर बेटावर भटकी शेती जमली.
लोकसंख्या - दर चौरस मैलात २८ लोक.
बेट आकाराने लहान असेल तर ओढे, नाले असत नाहीत. म्हणून सिंचनशेती अशक्य. पण फळबागा शक्य. पाणी जिरण्यासाठी समपातळी शेते (terraces) केल्यास फायदा. ईस्टर, टोंगा, सामोआ अशा बेटांवर चांगली जिरायत शेती झाली.
लोकसंख्या - दर चौरस मैलात २०० माणसे.
हवाई बेटे सगळ्यात मोठी. सिंचनशेती शक्य. उत्पादन प्रचंड. त्यावर डुकरे, मासळी पोसता येई.
लोकसंख्या - दर चौरस मैलात ३०० माणसे.
वस्ती विरळ तेथे अर्थव्यवस्था साधी, सोपीच राहिली. सगळ्यानी सगळी कामे करायची. विशेषीकरण शक्य होत नाही. प्रत्येक कुटुंब बव्हंशी स्वयंपूर्ण असते. विषमता कमी. मुखियासुध्दा इतरांपेक्षा फार वेगळा असणार नाही. सगळ्यांसारखीच त्याची ही रहाणी.
मोठ्या व दाट वस्तीत वेगवेगळे व्यवसाय शक्य होतात. संपत्तीसंचय होतो. सत्तेचे केंद्रिकरण होऊ शकते. शासकवर्ग निर्माण होतो. हे सर्व हवाई बेटांवर घडले. होड्या चालवणारे, बांधणारे, पाथरवट, पारधी, गोंदवणारे असे विविध व्यवसाय निर्माण झाले. देशमुख, वतनदार म्हणावे असे लोक दिसू लागले. ते सधन होते. पोशाख, दंड, मुकुट अशी पदचिन्हे परिधान करीत. त्याना खास अधिकार प्राप्त होते. हवाई मधे ठराविक आठ घराण्यामधूनच राजेपदी व्यक्ती नियुक्त होई. (आपल्याकडच्या शहाण्णव कुळी, पंचकुळी या सारखेच) . ही आठ कुळे आपापसातच लग्नसंबंध ठेवत. इतरांशी लग्ने करणे संमत नव्हते. मग भले सावत्र वा सख्ख्या भावंडाशी लग्न करावे लागले तरी बेहत्तर. सामान्य लोक राजघराण्यातील व्यक्तींना साष्टांग दंडवत घालत. राजघराण्याची जमीन मालकी प्रचंड असे. जनतेकडून मोठमोठ्या बांधकाम, सिंचन व अन्य प्रकल्पांवर काम करुन घेतले जाई. पण महत्वाचे निर्णय राजेच घेत. त्यात जनतेचा सहभाग नसे.
छोट्या बेटांवरील घरे म्हणजे झोपड्या. वास्तुशिल्प म्हणावे अशा रचना फक्त मोठ्या बेटांवरच झाल्या. कारण तेथेच खास कौशल्यांचा विकास होता, खर्चासाठी धन होते आणि संघटनासाठी शासनयंत्रणा होत्या. मोठी देवळे फक्त हवाई बेटांवर उभी केली गेली. ईस्टर बेटावर महाकाय दगडी पुतळे बनले (वजन प्रत्येकी ३० टन).
हेंडरसन बेटावर दगड आहे तो फक्त चुनखडीचा. त्याची हत्यारे कशी बनणार? लोक वापरत मोठे मोठे शिंपले. त्यांनीच कापायचे/खरवडायचे. लाव्हा दगड असता तर चांगली हत्यारे बनू शकली असती.
हे सर्व घडले गेल्या हजार – दोन हजार वर्षात.

अनुमान – या सगळ्या बेटांवर एकाच वंशाची माणसे वास करीत आहेत. वेगवेगळ्या बेटांवरील संस्कृतींमधील फरक हे वर सांगितल्याप्रमाणे परिस्थितीमधील फरकामुळे झाले असावेत.
हा प्रयोग कोणी योजला नाही. तो आपोआपच घडला. प्रयोगातील अनुमान ज्या दिशेला बोट दाखवते तिला cultural materialism असे म्हणतात. सांस्कृतिक फरक हे बहुतांशी परिस्थितीवशात असतात असे या दृष्टिकोनाचे प्रतिपादन आहे.
सांस्कृतिक साम्य आणि अनुवंशिक गुणधर्म यांचा संबंध आपण पुढे पाहू. असो.
संस्कृती विज्ञानात योजूनही प्रयोग करता येतात. याची दोन उदाहरणे पाहू.
प्रश्न : शेतकऱ्यांना एका जागी स्थिर वस्ती करावीच लागते. पण शेतीपूर्व काळात स्थिर खेडी होती काय?

चर्चा : स्थिर वस्तीसाठी एकाच ठिकाणी वर्षभर पुरेल इतके अन्न उपलब्ध असले पाहिजे. रानोमाळ पसरलेल्या गवताचे बीज गोळा करता आले तर शेतीसम उत्पादन होऊन विनाशेती वर्षाची बेगमी होऊ शकेल. रानगहू, रानतांदूळ यांचा असा उपभोग शक्य आहे का? हे अन्न गोळा करण्यास अवाजवी कष्ट पडतील तर माणूस तो नाद सोडून देईल.
उद्देश : रानगवताचे बीज गोळा करण्यातील कष्टाचा अदमास बांधणे.
साधने : रानगव्हाचा वा रानतांदूळाचा माळ आणि गरेच्या दगडाचे पाते असलेला ‘विळा’.
रीत : विळा गव्हाच्या रोपांवरुन फिरवून ओंब्या गोळा करणे, त्यातून दाणे काढणे व या कामाचा आय – व्यय हिशोब करणे.
निरीक्षण: एक तास कामातून एक किलो गहू मिळतो.
अनुमान : एक कुशल कुटुंब महिनभर काम करेल तर वर्षभर पुरण्याइतका गहू मिळेल. त्याच्य़ा साठवणीसाठी चांगली कणगी बांधली तर वर्षभर एका जागी राहून निर्वाह करता येईल. सबब ज्या भागात रानगहू वा रानतांदुळासारखे पीक निसर्गत: मोठ्या प्रमाणावर वाढत असेल तेथे अन्न संकलनातून स्थिर जीवन शक्य आहे. या तर्कानुसार धान्याऎवजी भरपूर मासळी मिळत असेल तरी स्थिर जगता येईल.
शंका : गारेच्या कपच्यानी गव्हाची कापणी शक्य आहे हे खरे. पण आदिमानव ही रीत वापरीत होता कशावरुन?
समाधान: गवतात सिलिका हे द्रव्य असते. त्याच्याशी घासले गेल्यामुळे पीक कापणीस वापरलेल्या गारेच्या कपच्यांना एक प्रकारचा उजाळा येतो. आदिमानवाच्या वापरातील गुहात सापडलेल्या कपच्यांना असा उजाळा आलेला आढळतो. सीरियामधे सापडलेल्या काही प्राचीन वस्त्यांमधे घरात धान्य भरडण्याचे पाटे व धान्य भाजण्याचे खड्डे सापडले. गहू, बार्ली व अन्य १६ जंगली धान्ये सापडली. जंगली धान्यांच्या ओंब्यांची मळणी अवघड असते. आधी भाजल्याविना कांडून टरफल वेगळे होत नाही. म्हणून भाजण्याचे खड्डे लागतात. हे खड्डे ही जंगली धान्याचा आहार असण्याची पक्की खूण होय. ही जीवनरीत वर्षानुवर्षे चालायची असेल तर दरवर्षी जमिनीवर पुरेसे बीज पडले पाहिजे. म्हणजेच सगळ्या ओंब्या कापण्याऎवजी काही वगळल्या पाहिजेत. आदिमानव हे करीत होता काय? ते कळण्यास मार्ग नाही. पण आज आढळणाऱ्या अन्नसंकलक जमातींमधे अशी पध्दत आढळून आली आहे.
प्रश्न : अश्मयुगात एखादा महाकाय प्राणी मारला / मेलेला सापडला तर त्याचे मांस खाणे माणसाला शक्य होते काय? हत्तीची कातडी एक इंच जाड असते. ती कापून मांसापर्यत पोचावे कसे?
चर्चा : अश्मयुगात सुरी म्हणजे दगडाची कपची. एका गोट्यावर दुसरा गोटा आपटला तर कपची तुटून निघते. तिला कड असते. ही धारदार असू शकते. पण कपचीची धार चटकन जाते. एक दोन वेळा वस्तूवरुन फिरवली तरी ती बोथट होते. पण म्हणून काय झाले? दगडांन काय तोटा? पुन्हा दोन दगड एकमेकावर आपटले की पुढची सुरी तयार. हे खरे. पण वाजवी कष्टात खाटिक काम होऊ शकेल काय?
प्रयोग : या प्रयोगचे वर्णन National Geographic या मासिकाच्या नोव्हेंबर १९८५ च्या अंकात दिले आहे. अभ्यासकांना (हे स्वत:ला experimental archaeologist म्हणवतात) मृत हत्तीचे शरीर सापडले. गारेचे गोटे आपटून कपच्या पाडून त्यानी खाटिक काम आरंभले. हत्तीची कातडी कापून आतून मांसखंड तोडता आले. एक तासात चाळीस किलो मांस हाती पडले.
अनुमान: दगडी हत्यारांनी खाटिक काम शक्य आहे. त्याला अवाजवी कष्ट पडत नाहीत. (भारतात मौर्य काळात हत्तींना मोठे लष्करी महत्व आले. म्हणून जंगलातील हत्तींना मारण्यास बंदी करण्यात आली. आज भारतात बहुतेक भागात आदिवासी हत्तीचे मांस खात नाहीत याचे मूळ तेथे असावे. ईशान्य भागातील नागा, मिझो वगैरे जमाती मात्र हे मांस खातात. पण य भूभागात कोणत्याही सम्राटाची सत्ता कधी स्थापन झाली नव्हती). विज्ञानाच्या पध्दतीत पहाणी / प्रयोग हा एक टप्पा तर त्या निरीक्षणांवरुन सिध्दांत मांडणे हे दुसरा टप्पा. तिसरा टप्पा म्हणजे जोखणी वा पडताळणी. पहाणी, मांडणी, पडताळणी ही त्रिशूळ रीत वापरल्याचे एक उदाहरण पाहू .
दक्षिण अमेरिकेत अमेझॉन नदीच्या खोऱ्यात घनदाट जंगलाचा प्रचंड भूभाग आहे. त्यात अनेक आदिवसी समाज वस्ती करुन आहेत. त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मुंडुरुकू ही अशीच एक जमात. तिच्या बाबतीत उत्पादन पध्दत, आहार, वसतिस्थान, आरोग्य, सण, उत्सव, कुटुंबरीती, बालसंगोपन, कला वगैरे अंगोपांगे निरखली गेली आहेत. आपल्याला अभिप्रेत आहे तो त्यांच्या लढाऊ वृत्तीचा अभ्यास. या जमातीला head hunters म्हणतात. शत्रूचा वध करुन त्याचे शिर कापून आणण्याला या जमातीत फार मान अहे. ही पहाणी. या लढवैया परंपरेबद्दल तीन तर्क मांडण्यात आले.
१. आदिमजातींमधे जी युध्दोत्सुकतेची परंपरा निर्माण झालेली दिसते तिचा आणि डार्विन प्रणित ‘फिटनेस’ चा संबंध नाही. प्रजनन वा आयुर्मान कमी अधिक असण्याचे युध्दखोरपणाशी कार्यकारण नाते नाही.
२. शौर्य व लढवय्येपणामुळे समाजात प्रजनन / आयुर्मान वाढतात. म्हणून हा रिवाज डार्विन प्रणित ‘फिटनेस’ वाढवणारा आहे. आपला वा नातेवाइकांचा फायदा होईल या अपेक्षेनेच लोक चकमकींमधे उडी घेतात. प्रत्येक टिकाऊ परंपराही अखेर व्यक्तींचा ‘फिटनेस’ वाढवणारीच असते.
३. लढवय्येगिरी करणारांचा व्यक्तिगत फायदा होत नाही. पण त्याच्या त्यागामुळे जमातीचा फायदा होतो. संख्या वाढते. नवे तरुण लढाईला/बलीदानाला तयार होतात. (याला group selection असा तांत्रिक शब्द आहे.)
ही झाली मांडणी.
मुंडुरुकू जातीच्या अभ्यासातून अनुमान निघाले की तर्क क्र. २ हाच रास्त वा पहाणीशी सुसंगत वाटतो. योध्देगण डुकराच्या (त्याल पेक्कारी असा शब्द आहे) मांसाचा सर्वात मोठा वाटा घेतात. ती खास चीज आहे. शत्रूचे लोक मरतात तेव्हा शिकारीतील स्पर्धा घटते. या कल्पना अन्य जमातींच्या संदर्भात तपासल्या तर ती अधिक प्रभावी पडताळणी होईल. असो.
लढाईमधे सहभागी होणाऱ्या मुंडुरुकू पुरुषांना मात्र आपण मांसासाठी झगडत आहोत असे वाटत नाही. धार्मिक रिवाजाचे आपण पालन करीत आहोत अशीच त्यांची धारणा असते.
समजूत आणि वास्तव यातील असा फरक आपल्याला ठायी ठायी दिसतो. कोकीळा व्रत, तऱ्हे तऱ्हेची पत्री गोळा करुन देवाला अर्पण करण्याचे व्रत, प्राजक्ताचा लक्ष, चैत्री व संक्रांत हळदी कुंकू, मौंजीबंधन इत्यादी संस्कार – रिवाज यांचा उद्देश / परिणाम काय असे विचारल्यास बहुसंख्य हिंदू मंडळी धर्माचरण येवढेच उत्तर देतील. खरे तर अशा व्रतांमधून व्यायाम, निसर्ग सान्निध्य, परस्पर जिव्हाळ्यात वाढ, जीवनातील स्थित्त्यंतरांचा शांत मनाने स्वीकार असे परिणाम साधतत. तोच त्यांच्या मागचा हेतु असावा. नसला तरी प्रौढांनी या परिणामांवर लक्ष ठेवूनच ते रिवाज पाळावेत अशी दृष्टी इथे आपल्याला अभिप्रेत आहे. यातून मग कोकीळेला कोंडणे, पत्री विकत घेणे इत्यादी पर्याय किती निरर्थक, नव्हे हानीकारक आहेत याची जाण येईल. वनदेवतांची पूजा करण्य़ाच्या निमित्ताने देवराई प्रथेतून वनसंरक्षण, जीव विविधतेचे संगोपन ही सहज साधली जातात. हे उत्तमच. पण येथेही समजूत आणि वास्तव यातील द्वैत नजरेत भरावे.
जीवशास्त्रात अभ्यास विषय म्हणून प्राणी आणि वनस्पती यांच्या अगणित जाती उपलब्ध असतात. एखादा अभ्यासक खूप प्रयत्न करुन ही फारतर मूठभर जातींचा व्यासंग करतो. म्हणून अभ्यासाकरिता कोणत्या जीव जाती घ्याव्यात ह एक प्रश्न असतो. अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्यांना घुंगुरटी (drosophila) सोयीची वाटली. त्यांची रंगसूत्रे (chromosomes) बघणे सोपे असते. थोड्या जागेत व काळात घुंगुरटयांच्या अनेक पिढ्यांचा अभ्यास जमतो. खर्च व कष्ट कमी पडतात. मज्जासंस्थेचा अभ्यास करणाऱ्यांना स्क्विड हा सागरी जीव पसंत पडतो. कारण त्याच्या मज्जापेशी खूप मोठ्या असतात. प्राण्यांचे समाज कसे घडतात हे बघू इच्छिणाऱ्याना मधमाशी / गांधिलमाशी / कागदमाशी उपयोगी पडतात. संबंधित वागणुकी निरखणे सोपे जाते.
याच प्रमाणे संस्कृती विज्ञानाचा पाठ पुरावा करताना एखादा समाज अभ्यासविषय म्हणून कसा निवडावा? अभ्यासकाला संस्कृती विज्ञानाचे एखादे सार्वत्रिक प्रमेय सिध्द करण्याची ओढ असते/ असायला हवी. तो समाज अशा प्रमेयाच्या शोधाचे वाहन झाला पाहिजे.
अमेझॉनच्या खोऱ्यातील यानोमामो या जमातीच्या अभ्य़ासातून असे काही साधले काय ते पाहू या. या अभ्यासामुळे Napoleon chignon हा शास्त्रज्ञ व ही जमात दोन्ही जगप्रसिध्द झाली. पण तो भाग दुय्यम आहे.
या जमातीची लोकसंख्या सुमारे १५ हजार. खेड्यांची वस्ती सुमारे ५० ते २५० माणसे. दोन खेड्यात अंतर किती? एक दिवसाच्या चालीत काटण्याइतके. यांचे वेगळे पण असे की पुरुषांच्य मृत्यूंपैकी तिसरा हिस्सा लढाईमधे होतात. लढाया म्हणजे दोन गावांमधील चकमकी. त्या कशावरुन होताता? तर बायका पळवण्यावरुन. यांना खाण्यापिण्याची ददात नाही. भोवतालच्या जंगलात हवी तेवढी फळे मिळतात. पण गावची वस्ती वाढते तशी आपसातील भांडणे वाढतात. अखेर गाव फुटते. गाव फार लहान झाले तर इतर गावांनी हल्ला करुन बायका पळवण्याचा धोका वाढतो. तंटे न होता मोठे गाव टिकून राहिल यासाठी काय करावे? एक नियम असा दिसला की गावकऱ्यामधे आपसात नाते जितके जवळचे (नाते म्हणजे average inbreeding coefficient) तितके गाव टिकाऊ. एकाच गोतावळ्यातील माणसे एकत्र असतात तेव्हां वाद टळतात आणि न फुटता गाव वाढू शकते. इतर गावांना त्याचा धाक वाटतो. म्हणून नात्यात लग्न करुन एकत्र राहणे फायद्याचे ठरते.
जगभर नात्यात लग्न करण्याकडे बराच कल दिसतो. त्याचे कारण आदिमानवाचा परदारा लोभ, तद्जन्य तंटे हे असू शकेल असे यानोमामो जमातीच्या अभ्यासावरुन वाटते. (इतर काही अभ्यासकांना वाटते की लढाया खरे तर बायकांसाठी नसून शिकारीच्या वाटणी वरुन होतात. लोक वाढले की मांस कमी मिळते. वस्ती फुटली, उठली, लांब गेली की वाटेकरी घटतात. कदाचित दोनही पैलू महत्वाचे असतील.) एखाद्या जमातीच्या अभ्यासातून सूक्ष्म (त्या जमातीपुरती) आणि स्थूल (सार्वत्रिक) दोन्ही पातळ्यांवरची समज अधिक प्रगल्भ झाली तर तो अभ्यास सफळ संपूर्ण झाला असे म्हणता येते. यापैकी स्थूल पातळीवरील नियम निश्चितीच्या गरजेचे, महत्वाचे भान ठेवणे म्हणजेच संस्कृती विज्ञानाच्या विकासाला हातभार लावणे होय.


अल्प प्रमाणावर तंटे, झगडे, भांडणे, मारामाऱ्या या गोष्टी अनादिकालापासून संस्कृतीचा भाग आहेत. यामधे व्यक्तिगत भांडण व दोन गटांमधील झगडा यातील सीमारेषा फार अंधुक / धूसर असणार. दोन गटांमधील झगड्याचे पुढील वर्णन पहा.
दोन गटांमधील हेवेदावे खूप वाढले. अखेर एका गटातील मंडळी आपल्या गोतावळ्यासकट जमा झाली. त्यांनी लढाईची तयारी केली. ते साग्रसंगीत दुसऱ्या गटाकडे रवाना झाले. तेथे पोचतात तो विरोधी गट सामोरा आला. दोन्ही गटांनी एकमेकांवर शिव्याशाप व अपमानास्पद वाग्बाण सोडले. अखेर रीतसर एका प्रशस्त क्षेत्री सामना करण्याचे ठरले.
रात्री मंडळी विरोधी गटातील आपापल्या खास परिचितांशी व्यक्तीगत गाठीभेटी करुन आली. सकाळी दोन सेना समरांगणावर आमने सामने ठाकल्या. प्रथम ज्येष्टांनी विरोधी गटाकडून झालेल्या अपराधांचा पाढा वाचला. अमुक व्यक्तीने तमुक केले वगैरे. अखेर वृध्द नेत्यांनी सरसकट आक्रमण करण्यास सांगितले. तरुण मंडळी त्याला फारशी उत्सुक नव्हती. खरे तर वृध्दांचेही शत्रुत्व संपूर्ण गटाशी नसून विशिष्ट व्यक्तीशी होते. म्हणून त्या वृध्दांनीच भाले फेकण्यास पुढाकार घेतला आणि त्या त्या विशिष्ट व्यक्तींवरच भाले फेकले. फेकणारे म्हातारे. तेव्हा जोर व नेम जेमतेम. भाला लागलाच तर भलताच कोणाला. काही वृध्द स्त्रिया ओरडून आरडून पुरुषांना युध्दप्रवृत्त करीत होत्या. त्यांच्यातील एखादीला भाला लागला. थोडक्यात म्हणजे भाला चुकवण्याचे माफक चापल्यसुध्दा नसलेल्या कोणाला तरी. कोणी एक जण विध्द झाला की युध्द थांबे. सगळे जमून या बदललेल्या स्थितीचा आढावा घेत……..
हे वर्णन वाचल्यानंतर चटकन माझ्या मनात आली ती महाभारत कथा. पण ही कथा आहे उत्तर ऑस्ट्रेलियातील तिवी आदिवासींची. दोन गट आहेत बाथर्स्ट व मेलव्हिल या दोन बेटांचे रहिवासी. प्रत्येक ‘सेना’ सुमारे तीस लोकांची. वर्णनाचे लेखक आहेत W. Hart आणि Arnold Pilling हे अभ्यासक. (पहा Marvin Harris (1980) Culture, People, Nature : An Introduction to General Authropology Harper and Row. N.Y.) चकमक सुरु झाल्यावर ती फार न लांबवता एखादी दुसरी व्यक्ती घायाळ झाल्यावर थांबणे अशी आदिम टोळ्यांमधे सरसकट वहिवाट असावी. दुसऱ्या टोळीचा पूर्ण नायनाट करणे हे उद्दिष्ट सहसा नसावे. कारण ते परवडत नाही. समजा आपल्या टोळीत प्रौढ पुरुष तीस. समजा चकमक फार क्वचित म्हणजे एका पिढीत दोनदा होते. म्हणजे प्रत्येक माणूस तरुणपणी एकदा म्हाताऱ्यांच्या हट्टापायी लढतो. आणि एकदा म्हातारपणी स्वत:च्या भांडणांची तड लावण्यासाठी लढतो. समजा एका चकमकीत दोन माणसे मरतात. तर प्रत्येक पिढीत ३० पैकी ४ मृत्यू लढाईत झाले. म्हणजे १०% पेक्षा अधिक.
विसाव्या शतकात युरोप व अमेरिका हे भूभाग दोन भीषण महायुध्दांमधे होरपळले. लक्षावधी पुरुष कामी आले. पण साऱ्या शतकात मिळून पुरुषांच्या मृत्यूंपैकी १% मृत्यू लढाईत झाले. या तुलनेने वरील उदाहरणातील आकडा किती मोठा आहे याची कल्पना येईल.
लढाईत पुरुष मरतात तर मग जमातीत पुरुषांचे प्रमाण कमी होत असेल. तसे नाही. निदान ० ते १४ वर्षे या गटात तरी नाही. ज्या जमातींमधे युध्दपरंपरा जिवंत आहे त्यांच्यात वरील गटात शंभर स्त्रियांमागे सव्वाशे पुरुष आढळले आहेत. ज्याच्यात ही परंपरा अलीकडे (गेल्या २५ वर्षात) थांबली त्यांच्यात हा आकडा सव्वाशे ऎवजी ११३ होता. एक पिढीपूर्वीच लढाया बंद झालेल्या मधे १०९ असा उलटा प्रकार का? तर मुलींकडे दुर्लक्ष किंवा चक्क हत्या. लढाईसाठी भक्कम पुरुष हवेत म्हणून सगळे लक्ष त्यांच्यावरच. पुरुषांच्या प्रमाणाची पराकोटी आढळली ती न्यू गिनी बेटावरील त्सेंबागा – मारिंग या जमातीमधे. त्यांच्यात १४ वर्षे वयाखालील गटात शंभर स्त्रियांमागे १४६ पुरुष इतके विषम प्रमाण आढळले. यांच्या लढायांमधे अभ्यासकांना एक चक्रनेमिक्रम आढळला.
चक्राची सुरुवात नेहमी महापर्वणीच्या मेजवानीने होई. सगे, सोयरे, मित्र सगळे गोळा होत. असलेली सगळी डुकरे कापायची, सगळ्यांनी पुख्खा झोडायचा. पितरांना जेवू घालायचे. त्यानंतर सीमोल्लंघन. शत्रुच्या खेड्यावर हल्ले सुरु करायचे. प्रथम होते ते धर्मयुध्द, नियमांनी बद्ध, कर्मकांडात्मक. आपण शत्रुपेक्षा खूप जास्त बलवान आहोत असा अंदाज आला की मग कपटी हल्ला व शत्रुचे शिरकाण. त्यांना पळवून लावणे व त्यांच्या जमिनी जिंकणे. त्या पडीक ठेवणे. देवझाडाचे रोपण करणे. देवझाड वाढते, पडीक जमिनीचा कस वाढतो. डुकरांचा कळप वाढतो. त्यांना खाऊ घालणे सुध्दा अवघड होते. आता पितरांना जेवण देण्याची वेळ आली असे सर्वांना वाटू लागते. देवझाड पुरेसे वाढले (सुमारे १० वर्षे) की पुनश्च महापर्वणी येते.
या चक्राचा अन्वय कसा लावायचा? एक प्रयत्न पुढीलप्रमाणे. डोईजड होईपर्यत डुकरांची संख्या का वाढू द्यायची? ती हातात असते. हवी तेव्हां घटवता येते. शेतजमीन वापरामुळे निकस होते. नवीन क्षेत्र जिंकणे जरुर होते. त्यावेळी डुकरे कापायची. तो मोठाच अन्नसाठा होय. तात्पर्य हे चक्र साधन संपत्तीच्या व्यवस्थापनाचे असावे. पण असली स्थितप्रज्ञपणे केलेली कोरडी तर्कनिष्ठ, तर्ककठोर मांडणी ( तिच्यात तथ्थ असले तरी) सोयीचे नसते. लढाईत आपला जीव पणाला लावायचा तर सैनिकाच्या मनात अन्याय झाल्याची तीव्र भावना हवी. शत्रूचा प्रचंड राग यायला हवा. हे युध्द केलेच पाहिजे अशी धारणा हवी. युध्दात भाग घेणाऱ्या शिलेदारांना युध्दाची कारणे विचारली तर खून, चोऱ्या, बायका पळवणे असल्याच बाबी पुढे येतात.
“ स्थलांतरीत गट “
वर्तमानातील समाजाचा अभ्यास करायचा तर पहाणी करणे जरुर असे आपण पाहिले. अगदी अपवादात्मक प्रसंग वगळले तर पहाणी ही सँपल (नमुना) घेऊनच करतात. मुख्य प्रश्न असतो तो हा की नमुना पहाणीवर आधारित निष्कर्ष कोणाकोणाला लागू पडतात? उदा. मुंबईतील गुरखा मंडळींच्या पहाणीत दिसले की बहुतांश लोक रखवालदारीचा व्यवसाय करतात. कॅलिफोर्नियातील पटेल मंडळींच्या पहाणीत दिसले की पटेल म्हणजे मोटेल असे समीकरण व्हावे इतक्या मोठ्या प्रमाणात ही मंडळी लॉजचा धंदा करतात. पण हे निष्कर्ष नेपाळ वा गुजरातच्या लोकांना लागू करणे साफ चूक होईल. या दोन्ही ठीकाणी बहुसंख्य लोक शेतीच करतात. तेव्हां स्थलांतरित गटावरुन मूळ समाजाबद्दल अनुमान काढता येत नाही. पण तरी स्थलांतरित गटांचा अभ्यास करणे रंजक व उपयुक्त ठरते.
आधुनिक काळात बव्हंश मानव जात ही स्थिर जीवन जगणारी झाली आहे. ॠतुचक्राच्या गतीबरोबर त्यांना आपले निवासस्थान बदलावे लागत नाही. पशुपालकांना आपला कळप घेऊन पाणी व चारा शोधत फिरावे लागते. पश्चिम महाराष्ट्रात मेंढ्या पाळणाऱ्या (मेंढके) धनगरांना उन्हाळ्यात मैदानी मुलुख सोडून डोंगरात जावे लागते. कारण मैदानातला चारा संपतो. पावसाळ्य़ात डोंगर उतार होऊन पुन्हा मैदानात यावे लागते. कारण डोंगरी भागातील पाऊस, थंडी, वारा ही मेंढ्याना सहन होत नाहीत. पंढरीच्या वारीचे मूळ या चक्रात असावे. शिकारी टोळ्यांना मधून मधून वस्ती हलवावी लागते कारण एका ठिकाणी शिकार दुर्मिळ होते. भटक्या शेतीत सुध्दा मुक्काम हलवावा लागतो कारण शेत नापीक बनते. ठाणे जिल्ह्यातील कातकरी पावसाळ्यात भाताची लावणी झाल्यावर गाव सोडून ‘जगायला’ म्हणजे मोलमजुरीसाठी बाहेर पडतात. आदल्या वर्षीचे तुटपुंजे अन्नोत्पादन खाऊन संपलेले असते. खरे म्हणजे पेरणी – लावणी हा काळ सुध्दा अडचणीचाच असतो. पण पेरलेच नाही तर पुढे खाणार काय? म्हणून उसने पासने करुन, सावकाराकडून खावटी कर्ज घेऊन पावसाळ्याची सुरवात कशी तरी निभावून न्यायची. पण नंतर लगेच (हाडकीच्या महिन्यात) परगावी काम शोधायचे. मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातील गरीब शेतकरी, शेतमजुर खरीप हंगाम संपला, हिवाळा सुरु झाला की ऊस तोडणी. कामगार टोळ्याच्या रुपात साखर कारखान्यांच्या वतीने भटकी मजुरी करु लागतात. या कामाचे व्यवस्थापन व त्यातून उत्पन्न होणाऱ्या समस्या (उदा. भटक्या कुटुंबातील मुलांचे शिक्षण कसे होणार?) हा एक महत्वाचा अभ्यास विषय आहे. महाराष्ट्रात आता ऊसतोडणी यंत्रांचा प्रवेश झाला आहे. ती किफायती ठरली तर या गटाची रोजी रोटी जाणार आहे. म्हणूनही त्याचा तातडीने अभ्यास व्हायला हवा.
प्रस्तुत चर्चेमधे यापैकी कोणतेच गट मला अभिप्रेत नाहीत. स्थिर जीवन जगणारी माणसे कोणत्या तरी कारणासाठी मूळ निवासस्थान सोडून दुसरीकडे जाऊन तेथे स्थिर जीवन जगतील तर त्यांना स्थलांतरित म्हणता येईल. त्यांच्याकडे आपल्याला संक्षेपाने पहायचे आहे.
मूळ निवासस्थान सोडण्याला माणूस राजी नसतो. परिचित जागा, नातीगोती, मातृभाषा, रुळलेली जीवनसरीता हे सर्व विशेष त्याचे आयुष्य सुखाचे करीत असतात. हे टाकून कोण जाणार? अपरिचित जागा, माणसे, रिवाज, भाषा यामुळे जीव भिऊन जातो. काकुळतीला येतो. मार्ग दाखवण्यास मदत करण्यास कोणी नसते. यामुळे सुखासुखी कोणी स्थलांतर करत नाही. पण चहूबाजूनी कोंडी होते, अस्मानी – सुलतानी होते (किंवा विशेष संधीचे दरवाजे उघडतात) तेव्हां जावे लागते (जावेसे वाटते). १९४७ साली फाळणीनंतर लाखो लोक पाकिस्तानातून भारतात आले. (व इकडून तिकडे गेले) आणि कायम इथेच राहिले. गेली शंभर वर्षे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातून कामगारांचा ओघ मुंबईकडे येत आहे. आपापली खेडी सोडून ते शहरवासी झाले /होत आहेत. पिढ्यानुपिढ्या नेपाळ, गढवाल, कुमाँव अशा डोंगरी भागातून पुरुष मैदानी प्रदेशात येऊन चाकरी करीत आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस काश्मीर मधून पंडीत जमात अन्यत्र जात आहे. हे स्थलांतर दहशतवादामुळे होत आहे. ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतातून मजूर मोठ्या संख्येने जगाच्या विविध भागात गेले. तामिळनाडू मधून गरीब खेडुत मलाया मधे रबराच्या मळ्यात कामगार म्हणून गेले. उत्तर प्रदेशातील अवध भागातून लोक वेस्ट इंडीजमधे गेले. चीनमधून मोठ्या संख्येने मजूर रोजगारासाठी कॅलिफोर्नियामधे गेले. इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपाइन्स वगैरे देशातही चीनी स्थलांतरित जनता बऱ्याच प्रमाणात दिसते.
फाळणीनंतर निर्वासित म्हणून आलेल्या सिंधी लोकांपैकी अनेकांनी किरकोळ व्यापाराला सुरवात केली व उत्तम बस्तान बसवले. आग्नेय आशियामधे चिनी मंडळी व्यापारावर पकड बसवून आहेत. पण सिंधमधील मूळ जनता सरसकट व्यापार करते का? चीनमधे तेच.
स्थलांतरित गट मूळ लोकसंख्येपेक्षा वेगळा असतो / होतो का? दोन्ही थोडे थोडे. वर म्हटल्याप्रमाणे काही बिकट अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्थलांतर केले जाते. सुखासुखी नव्हे. पण ज्यांची स्थिती अवघड झाली ते सर्वच एकदम स्थलांतर करत नाहीत. धाडसी, अधीर माणसे प्रथम बाहेर पडतात. या अर्थाने स्थलांतर करणारे लोक मूळ जागेत चिकटून रहाणाऱ्यांपेक्षा वेगळे असणे शक्य आहे. पण नव्या जागी गेल्यावर ते कसे जगतील / वागतील हे काही प्रमाणात नव्या परिस्थितीवरही अवलंबून असते.
याचे एक उत्तम उदाहरण वेस्ट इंडीज भागात दिसते. एकोणिसाव्या शतकच्या उत्तरार्धात चिनी लोक तेथे आले. त्यापैकी जमेका आणि गियाना या भागातील चिनी लोकांची तुलना उदबोधक ठरते. आपापत: होऊन गेलेला हा एक प्रयोगच म्हणायचा. जमेकामधे चिनी निर्वासितांनी किरकोळ व्यापारावर पूर्ण कब्जा मिळवला आहे. उलट गियानामधे मात्र चिनी लोक पांढरपेशे नोकरदार, मध्यमवर्गीय झाले. हा फरक कशामुळे? जमेकामधे गोरे युरोपीय लोक हे जमीन मालक, श्रीमंत तर काळे आफ्रिकी लोक गरीब शेतकरी/ खंडकरी. मिश्र वंशाच्या लोकांचा ओढा गोऱ्या लोकांचे अनुकरण करुन त्यांची प्रतिष्ठा मिळवण्याच्या खटपटीकडे असे. गोरे (व मिश्र) लोक किरकोळ व्यापार या व्यवसायाला तुच्छ लेखीत. म्हणून ते क्षेत्र मोकळे होते. हुन्नरी चिनी लोकांनी या संधीचा पुरेपुर फायदा उठवला. त्याचा गट लोकसंख्येच्या १ टक्का असल्यामुळे त्यांना ही संधी पुरली. गियानामधे पोर्तुगीज लोक आधीच किरकोळ व्यापार करीत होते. म्हणून चिनी लोकांना मोकळे रान मिळाले नाही.
अडचणीतून मार्ग काढण्यासाठी धडाडी दाखवणारे लोक स्थलांतर करतात तेव्हा परिस्थितीच्या मर्यादेत हे विशेष कर्तुत्व दाखवतील असे अपेक्षित आहे. उलट सरसकट स्थलांतर घडते तेव्हा मूळ समाजापेक्षा वेगळी वागणूक अपेक्षित नसते. ब्रिटिशांनी तामिळनाडूमधून गावेच्या गावे उचलून मलेशियात नेली. रहाण्याच्या जागा, करण्याची कामे साऱ्याच गोष्टी मालकांनी ठरवल्या होत्या. वेस्ट इंडीज मधे गेलेल्या हिंदी भाषिक भारतीयांचे तेच. त्यामुळे या मंडळींनी नव्या जागी आपले जुनेच विश्व पुन्हा निर्माण केले. जुन्या चालीरीती चालू ठेवल्या.
V. S. Naipaul या लेखकाच्या A House for Mr. Biswas, Mimic Men वगैरए कादंबऱ्यांमधे अवधी संस्कृतीचा वेस्ट इंडियन अवतार दिसतो.
“संस्कृती आणि जीवशास्त्र”
पहिल्या प्रकरणाच्या या शेवटच्या भागात आपण संस्कृती विज्ञान आणि जीवशास्त्र यांच्या संबंधाबाबत चर्चा करणार आहोत. संस्कृतीचा अभ्यास सामान्यपणे समाजशास्त्र (socilolgy), मानवशास्त्र (anthropology) अशा विद्याशाखांमधे केला जातो. आज विविध विद्याशाखांचे प्रवाह एकमेकात मिसळत आहेत. विसाव्या शतकाच्या अखेरीस interdisciplinary study या कल्पनेचा प्रभाव वाढत आहे. मुळात विद्याशाखांचे वेगळेपण हे सोयीसाठी कल्पिलेले आहे. एखाद्या समस्येचे उत्तर शोधताना त्यासाठी उपयोगी पडेल ते ते साधन मिळेल तेथून उचलावे असेच कोणीही म्हणेल. म्हणूनच शाखांचे संगम होतात. पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र यांचा संगम एकोणिसाव्या शतकात झाला. त्यातून Physical Chemistry नामक नवे ‘रसायन’ सिध्द झाले. रसायनशास्त्र व जीवशास्त्र यांच्यात संबंध नाही असे आधी वाटे. पण प्रथिने (proteins), प्रेरके (enzymes) व अखेर पेशी केंद्रातील DNA नामक अणु यांच्या अभ्यासातून जीवरसायन (Biochemistry) नामक मिश्रविद्या बहराला आली. या गुंतागुंतीच्या अणूंच्या अभ्यासातून एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला Bioinformatics नामक नवा अभ्यास आकार घेत आहे. त्यात जीवरसायनाबरोबर संगणकविद्या भागीदारी करत आहे. आणखी एक नवे सेतुबंधन म्हणजे जीवशास्त्र, मानसशास्त्र आणि संगणकविद्या यांच्या सहकार्यातून उभारीला येणारा मेंदूचा अभ्यास. नोबेल पुरस्कार प्राप्त लेखक Francis Crick यांचे “The Astonishing Hypothesis : Scientific search for the soul” हे पुस्तक वरील नवख्या क्षेत्राचा आराखडा दाखवते. माणसाची सुखे, दु:खे, स्मृती, महत्वाकांक्षा, आत्मभान ही सर्व मेंदूतील कोट्यावधी पेशींच्या अथक व्यवहारांची मूर्त रुपे आहेत. त्या पेशी व्यवहारांना पदार्थविज्ञान, रसायन, गणित वगैरे विद्यांचे नियम पाळावेच लागतात. याचा अर्थ मनोव्यापाराला सुध्दा त्यांचे लगाम आहेत. करुणा या भावनेचे उदाहरण घ्या. ती उदात्त आहे. बुध्द, ख्रिस्त, म. गांधी यांच्यासारख्या व्यक्तित्वांनी या भावनेला समाज व्यवहारात महत्वाचे स्थान मिळवून दिले. पण माणसाच्या मनातील करुणा अमर्याद नव्हे. दुसऱ्याला काटा टोचला तर आपल्या डोळ्यात पाणी यावे. दुसरा भुकेला असेल तर आपल्या ताटातील एक घास त्याला काढून द्यावा. अशी भावना. पण जगातील प्रत्येक भुकेल्या माणसाच्या पोटी दोन घास गेल्याशिवाय मी जेवणार नाही असे कोणी म्हणत नाही. तसे म्हणणारा फार काळ जगणार नाही. प्रसिध्द तत्वज्ञ म. पुं. रेगे यांनी दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या कार्यक्रमातील मुलाखतीत म्हटले होते की ‘जगण्यासाठी माणसाजवळ एक किमान मुर्दाडपणा लागतो. तो माझ्याजवळ आहे.’ याला कोणी म्हणेल मूल्ये आणि व्यवहाराची सांगड घालणे. ते बरोबरच आहे. पण याचा अर्थ असा की ‘स्वजीवरक्षण प्रथम’ हा उत्क्रांतीचा नियम मनोव्यापाराला सुध्दा लागू आहे. काही वेळा उत्क्रांतीमधून निर्माण झालेली उपजत गुणांची उत्तम वीण विस्कटते. मग मनोरुग्ण तयार होतात. Lesh-Nyhan syndrome म्हणून एक आजार होतो तो एक विशिष्ठ जीन उलटल्यामुळे. असा रोगी शिव्याशाप देतो, चवताळतो, स्वतःलाच चावतो, जखमा करुन घेतो. अशा पैदाशीची अखेर काय होणार? तर निर्वंश. सामान्य माणसे बहुतेक प्रसंगी सामान्य वाटावी अशाच पध्दतीने जगतात, वागतात, वावरतात. हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. एका व्यक्तीचे मनोव्यापार समजावून घेताना जीवशास्त्राचा वापर जसा अपरिहार्य आहे तसाच समाजमानस समजण्यासाठी सुध्दा आहे.
जीवशास्त्र आणि समाजशास्त्र यांची सांगड घालण्याचे प्रयत्न गेले पाव शतक चालू आहेत. माणसांचे समाज आहेत तसे प्राण्याचेही आहेत. उदा. मुंग्या, मधमश्या, वाळवी असे कीटक, प्रवाळ बेटे (समुद्रात पॉलिप नामक सूक्ष्मजीवांचा लक्षावधीच्या संख्येने एकमेकांना चिकटून बनलेला समूह म्हणजे प्रवाळ. शेवटी त्यांचे खडक बनतात.) हत्ती, सिंह, हरणे असे सस्तन प्राणी. यांच्या सहजीवनाचा अभ्यास म्हणजे Sociobiology. या क्षेत्रातील अग्रेसर नाव म्हणजे हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ
E. O. Wilson. या शास्त्रज्ञांची Sociobiology : A new synthesis, Promithean Fire, of Human Nature, Biophilia इत्यादी पुस्तके प्रसिध्द आहेत. जीवशास्त्र व संस्कृती विज्ञान ही एकमेकांपासून फटकून असूच शकत नाहीत असे याचे प्रतिपादन आहे. अनुवंशिक / उपजत गुण हे बीज तर संधी / परिस्थिती ही मशागत या दोहोतून संस्कृतीचा वृक्ष उभा रहातो. Nature versus Nurture हा वाद तसा जुना. अशा वादांमधे टोकाची कोणतीच भूमिका योग्य नसते. दोन्हीमधे तथ्यांश असतो.
यापैकी संधी / परिस्थितीचे महत्व पूर्वीपासूनच सर्वमान्य होते. शिकारी – शेतकरी – कारखानदारी अवस्थांचे मार्क्सवादी विश्लेषण परिस्थितीवशातच आहे. शिकारी समाजात ढोबळ मानाने समता असते. कोणी कोणाचे शोषण करीत नाही. शेतीमधे मालक व कूळ/गुलाम असे दोन ध्रुव निर्माण होतात. तंत्रज्ञानात विकास होऊन कारखानदारी आली की कामगार वर्ग निर्माण होतो. त्याचे शोषण करुन भांडवलदार वर्ग पुष्ट होतो. समाजजीवनाच्या कला, धर्म वगैरे अंगांवरही या तांत्रिक बदलाचा परिणाम होतो. पोस्टमन रोजचा झाल्यावर मेघदूत कसे स्फुरणार? ट्रॅक्टरचा ओरडा ऎकावा लागला की मोटेचे गाणे कसे टिकणार? पारंपारिक कला म्हणजे बहुतांशी वास्तवाला साजिरे गोजिरे रुप देण्याचा खटाटोप. आदिम जीवनात कला, कारागिरी आणि तंत्रज्ञान यातील सीमारेषा धूसर असतात. कला आणि दैनंदिन जीवन हातात हात घालून असतात. आधी अंगण समपातळी करुन सारवून घ्यायचे. मग वरती रांगोळी काढायची. टोपल्या, चटया, मासेमारीची जाळी यांच्यातून दिसतो तो विणीची कलात्मक आणि वस्तूची उपयुक्तता यांचा घट्ट सांधा. धनुष्याची प्रत्यंचा वापरणाऱ्या समाजात तंतुवाद्ये असणारच. फुंकणी आणि बासरी, लोहाराचा भाता आणि बाजाची पेटी ही जवळची आहेत. कुंभार, लोहार, सुतार,सोनार, कोष्टी, शिंपी हे सर्व कलाकारच आहेत. वाङमयातही पदोपदी जीवनाचेच प्रतिबिंब पडते. बहिणाबाईला सहज उपमा सुचते ती ‘मन वढाय वढाय, जसं पिकातलं ढोर’ मधुसूदन कालेलकरांच्या एका नाटकातील पोस्टमनचे पात्र सर्व विनोद पोस्टासंदर्भातच करते. तर जयवंत दळवींच्या एक नाटकातील वॉचमेकरचे पात्र सर्व उपमा देते घड्याळावर आधारित. हे स्वाभाविकच आहे. मानवशास्त्र विषयात संस्कृतीची चर्चा होते ती उपजतपेक्षा शिकलेल्या बाबींवर जास्त भर देते. पण परिस्थितीच्या प्रभावाला मर्यादा आहे. माणसाला वाटेल त्या बाबतीत वाटेल तेवढे वळण लावता येत नाही. काही लोक संस्कृतीचे तीन भाग कल्पितात. अन्नोत्पादन व प्रजनन यासाठीची व्यवस्था हा पाया. शासन यंत्रणा, अर्थव्यवस्था यासारख्या रचना ही वास्तू आणि कला, क्रिडा, धर्म अशी अंगे म्हणजे कळस. उत्पादन व प्रजनन यांच्या पध्दतींवर दोन भाग विसावतात हे एक मूळ प्रमेय. पण आता आपण विचारात घेणार आहोत तो भाग या सर्वांच्याही खाली. वाटल्यास त्याला आधारखडक म्हणू या. असा असतो. तो म्हणजे उत्क्रांतीच्या प्रक्रियेत झालेली मानवी शरीर व मन यांची घडण. ती पक्की आहे. तिच्यात बदल झालेच तर अतिमंद वेगाने. म्हणून आपल्या चर्चेपुरती ती गोष्ट स्थिर समजण्यास हरकत नाही. या घडणीचे काने कोपरे कंगोरे यांच्याशी जुळवून न घेणाऱ्या बाबी संस्कृतीत टिकणार नाहीत. ज्या बाबी टिकल्या त्या शरीर व मन यांच्या घडणीशी सुसंगतच असणार असा सिध्दांन्त येथे मांडायचा आहे.
उत्क्रांतीची प्रक्रिया कोणती? जगण्याल अनुकूल गुणांचे प्रमाण प्रत्येक पिढीत वाढणे आणि प्रतिकूल गुणांचे घटणे. आपल्याला दिसतो तो ही प्रक्रिया हजारो – लाखो वर्षे चालू राहिल्या नंतरचा परिणाम. प्राण्यांमधील कुटुंब रचनेचे प्रकार पहा – हंस, धनेश, गरुड हे पक्षी एक पत्नीव्रती असतात. लंगूर (हुप्प्या) माकड, मोर, काळवीट हे जनाना बाळगतात. सिंहात अनेक नर व अनेक माद्या असे कुटुंब असते. हत्तींमधे कुटुंब फक्त माद्या व पिल्ले यांचे. मधमाशांमधे माता व तिची सहस्त्रावधी कन्यांची फौज असे कुटुंब असते. असे का? निसर्गातील प्रत्येक वास्तवाला पाहून अभ्यासक विचारतो – असे का? उत्क्रांतीच्या विश्लेषणात या प्रश्नाला दोन प्रकारची उत्तरे असू शकतात. त्याना Ultimate आणि proximate अशी विशेषण वापरतात. गरुड एक पत्निव्रती का? त्यांच्यात पिलांचे संगोपन कष्टाचे असते. नर मादी दोघे मिळून काळजी घेतील तरच पिल्ले जगतील. एरवी निर्वंश होईल. गरुड जोडप्याने मिळून घरटे बांधणे, प्रथम पाळीपाळीने व नंतर जोडीने शिकार करुन पिल्लांना भरवणे ही वागणूक वंशवृध्दीला पोषक आहे. म्हणून ती टिकली. हे झाले ultimate (दूरचे) कारण. पण पिल्लांचा सांभाळ करताना पक्षी असा डार्विनवादी विचार थोडाच करतात? त्यांच्य मेंदूची रचना अशी आहे की त्या प्रकारे वागल्याविना चैनच पडत नाही. हे proximate (जवळचे) कारण.
जशी माणसाच्या मेंदूची घडण तसा माणसाचा स्वभाव. माणसाला या घडणीशी विसंगत वागावे लागले तर तो बेचैन होईल. उपजत बुध्दीच्या विरुध्द जाणे एखाद्या वेळी ठीक पण वारंवार, दिर्घकाळ असा व्यवहार शक्य होणार नाही. माणूस शेती शिकला तो अदमासे दहा हजार वर्षापूर्वी. पण माणसाची उत्क्रांती त्या आधी हजारो लाखो वर्षे चालूच होती. तेव्हां माणसाचा उपजत स्वभाव हा शिकारी व संकलन जीवनरीतीला अनुरुप असणार. सुरक्षित जीवन व मुलाबाळांचा भरला संसार या गोष्टी माणसाला आनंददायी वाटतात. त्यासाठी उपयुक्त बाबींची आवडही मनात रुजलेली आहे. स्वतःचे व नातेवाईकांचे आयुर्मान वाढणे, प्रजनन वाढणे याला शेतीपूर्व काळात जे उपकारक होते हे व्यवहार करणे, तशा आवडी निवडी माणसाने आत्मसात केल्या आहेत. गोड पाण्याचे साठे, नद्या, तळी माणसाला आवडतात. हिरवा रंग आवडतो. हिरव्या चाऱ्याच्या आसपास ससे, हरणे अशी शिकार मिळते. गवताळ कुरणे, फळांनी लगडलेली झाडे आकर्षक वाटतात. आपण उद्याने, बागा बनवतो त्यात हिरवळ, पाणी आणि माफक झाडे असे दृश्य असते. मोगल बादशहांच्या बागा प्रसिध्द आहेत. त्यांची रचना अशीच असे. प्राचीन माणसाला असा निसर्ग आवडला कारण त्यांच्या जीवनाला ही वैशिष्ट्ये धार्जिणी ठरली. झाडे माफक का हवीत? भरपूर का नकोत? झाडांचा फळाहूनहि महत्वाचा बारमास उपयोग म्हणजे टेहेळणी. झाडावर चढून दूरवर शिकार व धोका यांच्यावर नजर ठेवता येते. पण त्यासाठी झाडे माफक प्रमाणात हवीत. माकडे, खारी यांच्यासारखा माणूस झाडावर रहाणारा प्राणी नव्हे. झाडांची भाऊगर्दी असली तर खारीला ते सोयीचेच. एकावरुन थेट दुसऱ्यावर जायचे. उलट झाडांच्या गर्दीत माणसाला शिकार दिसणे / मिळणे अवघड जाणार. म्हणून झाडे आवडतात पण माफक संख्येने. तात्पर्य विशिष्ट बागांची आवड ही उत्क्रांत मेंदूच्या रचनेशी सुसंगत असावी.
माणसाची उत्क्रांती प्रथम पूर्व आफ्रिकेत झाली. तेथून मानवजात सर्वत्र पसरली. (असे निदान आज मानले जाते.) जगभर माणूस तोच असेल तर जगभरच्या समाजांमधे विविध गोष्टींबाबत साम्य असले पाहिजे. जे उपजत आहे ते सर्वत्र सारखे असेल. नानाविध समाजांमधे जे समायिक दिसेल त्याला उपजत बुध्दीचा पाया असणार असा तर्क रास्त होईल . भाषा सर्वत्र आहे. म्हणजे भाषाक्षमता ही उपजत असेल. १९४५ साली जॉन मरडॉक या अमेरिकन अभ्यासकाने वेगवेगळ्या संस्कृतीमधील समायिक बाबींची मोठी यादी बनवली. तिची एक झलक पुढील प्रमाणे : स्वैपाक, कौटुंबिक मेजवान्या, आहार विषयक बंधने, ठरल्यावेळी जेवणे, मैदानी खेळ, चेहरा व शरीर रंगवणे, सजावट, स्वच्छ्तेचे शिक्षण, उत्सर्जन पध्दतीचे शिक्षण, केशरचना, नृत्य, पंचांग, विश्वरचनेबद्दल संकल्पना, कायदा, नीतीकल्पना, सभ्य वागणुकी बद्दल संकेत, पाहुण्यांचे आदरातिथ्य, घरात रहाणे, सहकार, प्रियाराधन, लग्न, बाळंतिणीची काळजी, लैंगिक संबंधांवर बंधने, जादूटोण्यातून रुग्णोपचार, जवळच्या नात्यात लग्नाला विरोध, अंत्यसंस्कार, वारसाहक्क विषयक नियम, नशीब – कमनशीब याबद्दल समजुती, भेटवस्तु देणे, वाकुल्या दाखवणे, विनोद करणे, नात्यांना नावे, व्यक्तिगत नावे, शल्यविद्या, विणकाम, व्यापार, ह्त्यारे बनवणे, दॆवी शक्तीची शांती करणे, धार्मिक कर्मकांडे, मुले वयात येण्याबद्दल समारंभ इत्यादि किती गोष्टी सामायिक आहेत हे पाहून आश्चर्य वाटते. जे उपजत ते सामायिक असणे अपेक्षित आहे. या प्रमेयाच व्यत्यास म्हणजे ‘जे जे सामायिक / सार्वत्रिक ते ते उपजत असेल’ हा मात्र विचारपूर्वक वापरला पाहिजे. अग्नीचा वापर सर्वत्र आहे. त्याला कोणता अनुवांशिक गुण जवाबदार असणार? वणवा, ढगातील वीज अशा स्वरुपात नैसर्गिक अग्नी सर्वत्र असतो. परिसर निरिक्षणातून शिकण्याची क्षमता सर्वत्र असते. यांच्या सहयोगातून अग्नीच्या वापराचे तंत्र सिध्द होते.
काही व्यक्तिंना विशिष्ट बाबींची अवाजवी भिती वाटते. याला म्हणतात फोबिया. घाम फुटतो, उलटी होते वगैरे. कोणत्या बाबींना असा प्रतिसाद मिळतो? खूप उंचावर जाऊन खाली बघणे, छोट्या खोलीत आपण बंद असणे, वीज कडाडणे, साप दिसणे इत्यादि. ही यादी जरा चमत्कारीक वाटते कारण बंदूक बॉम्ब, रणगाडा, क्षेपणास्त्रे अश्या खऱ्याच भीतिदायक वस्तू पाहून कोणी धास्तावत नाही. फोबिया हा उपजत मानला जातो. प्राचीन काळापासून ज्या वस्तूंपासून माणसाला धोका होता त्यांच्या संदर्भात ही प्रतिक्रिया उत्क्रांत झाली. फोबियामुळे माणूस अशा चीजा, स्थितीपासून दोन हात दूर राहू लागला व धोका टळला. अनुभव घेऊन चुका सुधारणे शक्य नाही अशा प्रसंगांना तोंड देण्याचा फोबिया ही उत्क्रांतीमधून प्राप्त झालेली देणगी आहे.
माणसाचा संगोपन काळ फार मोठा आहे. माणसाच्या पिल्लांची इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा कितीतरी जास्त काळ काळजी घ्यावी लागते तेव्हाच ते स्वतंत्र जीवन जगण्यास सक्षम होते. यावरुन लक्षात येते की वर्षानुवर्षे सांभाळ करण्यासाठी एकटी मादी पुरी पडत नाही. माणूस हा गरुड, धनेश व हंस यांच्या गटात पडतो तेव्हा आदिकालापासून जोडप्याने संगोपनाचे कष्ट वाटून घेण्याचीच वहिवाट असणार. पूर्वीच्या काही संस्कृती विषयक लिखाणात विवाहसंस्थेच्या विकासाबद्दल तर्क /कल्पना ठामपणे सांगितलेल्या आढळतात. प्रथम युगल विवाह नव्हताच. स्त्री पुरुषांच्या टोळ्या असत. कोणाचाही कोणाशीही शरीरसंबंध येत असे. मग मातृकेंद्रित कुटुंब आले. अखेर सध्याची पितृकेंद्रित व्यवस्था आली. ( उदा. राहुल सांकृत्यायन, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे) . या विकासक्रम कल्पनेला ठोस पाया नाही. जीवशास्त्र म्हणते की असा क्रम असंभव आहे. जीवशास्त्राच्या अभ्यासातून दिसते ती दिशा वेगळी. माणसाच्या पिल्लांना अंगावरचे दूध पिणे थांबवल्यावरही दीर्घकाळ अन्नसंपादन जमत नाही. माकडाची पिल्ले आईवेगळी झाली की आपापले अन्न शोधून पोटे भरतात. माणसाला अन्न मिळवण्यासाठी ह्त्यारे वापराचे कौशल्य, विविध तंत्रे शिकावी लागतात. त्यासाठी फार काळ जातो. माणूस माकडापासून वेगळा झाला, झाडावरुन जमिनीवर आला व शिकार करु लागला. पण त्याला वाघासारखे दात, नखे असे अवयव फुटले नाहीत. त्याऎवजी हत्यारांचा वापर आणि नियोजनातील चतुराई यांचा त्याने उपयोग केला. हत्यारे बनवणे व वापरणे यासाठी बोटांचा फार गुंतागुंतीचा उपयोग करावा लागतो. तो शिकणे किती अवघड आहे याची कल्पना येत नाही. बुटाच्या नाडीची गाठ मारणे किती अवघड आहे? लहान मुलांना हे शिकवण्यास किती वेळ जातो हे मोजा. म्हणजे कळेल. गाठ सोडवणे हे त्याहूनही कठीण आहे. माकडांना ते शिकवणे आजवर शक्य झालेले नाही. यावरुन माणसाने वापरात आणलेली कौशल्य किती दुष्प्राप्य आहेत याचा अंदाज येतो. सबब जोडप्याने संसार करणे हाच संगोपन यशाचा मार्ग होय. आज जे शिकारी, संकलक आदिवासी समाज आहेत हे आदिमानवाच्याच पध्दतीने रहातात असे मानले तर त्यांच्या जीवनपध्दतीवरुन आदिवासींमधे बहुतेक पुरुष एकाच स्त्री बरोबर संसार करतात. दोन वा अधिक बायका असणारे पुरुष तुरळक. त्यांच्याजवळ काही खास संपत्तीसंचय असतो म्हणून त्यांना अधिक बायका परवडतात. स्त्रीच्या दृष्टीने बघता गरीब नवऱ्याची एकमेव बायको होण्यापेक्षा श्रीमंत नवऱ्याची दुसरी बायको होणे काही वेळा अधिक फायद्याचे वाटते. पण एकूण असा प्रसंग क्वचितच. जोडप्याचा संसार हाच सार्वत्रिक रिवाज. पहिली बायको मेली तर दुसरी करणे निराळे. अशा संसारात नव्या बायकोने सावत्र मुलांचा छळ केल्याच्या कथा आपल्याकडे पारंपारिक म्हणून सांगितल्या जातात. त्या जीवशास्त्राशी सुसंगत आहेत. सावत्र मुले सख्ख्या मुलांशी स्पर्धा करीत असतील तर सख्ख्या मुलांना झुकते माप मिळणे हीच गोष्ट जीवशास्त्रानुसार अपेक्षित आहे.
निसर्गात रीत अशी की मादीच्य ठायी गर्भ निर्माण करण्यासाठी नर आपसात स्पर्धा करतात. मादी ठराविक काळातच समागमास तयार असते. त्यावेळी नर खाणे पिणे विसरुन सतत मादीच्य आसपास रहातो. अन्य नरांना हुसकावून लावतो. गोरिला या वानरजातीत मादी महिन्यातून एक दोन दिवसच संगमोत्सुक असते. तेही गर्भधारणा होईपर्यतच. म्हणून मादीच्या राखणीचा काळ थोडा असतो. म्हणून एक नर, तो पुरेसा ताकदवान असल्यास, अनेक माद्यांची राखण करु शकतो. मादी जवळपास सतत समागमास असणे हा प्रकार फक्त माणसातच आहे. तिची इतर नरांपासून राखण करणे अवघड जाते. मादील सुध्दा इमानदार नराच्या पाठबळाची सतत गरज असते म्हणून घटकेच्या सुखाकरिता तेवढ्यापुरती साथ देणारा नर तिला परवडत नाही. त्याच नराला सतत शरीर सुख देऊन ती गुंतवून ठेवते. ते अत्यंत महत्वाचे काम आहे. प्रजननाव्यतिरिक्त नियमाने घडणारे लैंगिक संबंध ही त्या युगुलाचे प्रेमपाश अधिक घट्ट करणारी कळीची बाब आहे.
प्राणी शास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे की नर- मादी यांच्या आकारातील फरक व यशस्वी नराच्या जनान्यातील माद्यांची संख्या यांच्यात संबंध आहे. गिबन या कपिजाती मधील नर व मादी एकाच आकाराचे असतात. त्यांच्यात एक पत्निव्रत असते. गोरिला नर मादीच्या दुप्पट वजनाचा असतो. त्याच्या ३ ते ६ माद्या असतात. एलेफंट सील या प्राण्यात नराचे वजन मादीच्या ४ ते ५ पट असते. या नराच्या जनान्यात ४० – ५० माद्या असतात. जनाना जेवढा मोठा तेवढी इतर नरांशी स्पर्धा तीव्र. एलिफंट सील नराला तर भीषण स्पर्धेला तोंड द्यावे लागते. माणसात नर मादी पेक्षा २०% मोठा असतो. तेव्हां जनान्यात माद्या किती असणार? अपेक्षित संख्या एक व दोन यांच्या आधेमधे येते. म्हणजेच सर्वसाधारण जीवन युगुल पध्दतीचे. तुरळक बहुपत्निक पुरुष किंवा अधून मधून लग्नबाह्य संबंध अपेक्षित. या जैविक वास्तवाचे प्रतिबिंब सांस्कृतिक रिवाजांमधे पडते. बहुतेक ज्ञात संस्कृतींमधे बहुपत्निकत्वाला मान्यता होती. हिंदू समाजात रामाच्या एकपत्नित्वाचे कौतुक होई कारण तसे बंधन नव्हते. द्विभार्या प्रतिबंधक कायदा ही अर्धशतकापूर्वीची घडामोड आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बडी माणसे बरेचदा बहुपत्निक असत. राजे महाराजे तर सरसकटच. जेथे द्विभार्या निषेध असतो तेथेही अंगवस्त्र, रखेल, ठेवलेली वगैरे स्वरुपात त्या निषेधाला वळसा घातला जातो. उलट बहुपतिकत्व अपवादात्मक आहे. एका अंदाजानुसार १% समाजांमधे त्याला मान्यता आहे.
नराचे वजन व त्याच्या (शुक्रजंतू निर्माण करणाऱ्या) वृषणग्रंथींचे वजन याचे गुणोत्तरही महत्वाचे आहे. त्या आकड्यावरुन सबंधित प्राणीजातीमधील प्रजनन व्यवस्थेबद्दल अंदाज करता येतो. ग्रंथी मोठ्या म्हणजे वीर्यनिर्मिती जास्त. त्याची गरज कधी पडणार तर नराला वारंवार समागम प्रसंग पडू लागल्यावर. चिंपांझी नराचे वजन ४०किलो तर ग्रंथींचे वजन १०० ग्रॅम. उलट गोरिला नराचे वजन २०० किलो आणि वृषणग्रंथी ४० ग्रॅम. चिंपांझी नर अनेक वेळा माद्यांशी जुगतात. त्यांच्यात युगुल पध्दत नाही. मादी अनेक नरांशी समागम करते. ज्याचे वीर्य अधिक तो नर पिता होण्याची शक्यता अधिक. म्हणून उत्क्रांती मधे मोठ्या वृषणग्रंथींची पैदास झाली. अर्थात चिंपांझी नर संगोपनातील वाटा उचलत नाही. गोरिला नर आपल्या माद्यांशी माफक ,गरजेपुरते जुगतो. गरज क्वचितच असते. त्याला छोट्या वृषणग्रंथी पुरतात. माणूस या दोघांच्या आधेमधे आहे. नराचे वजन सुमारे ६० किलो तर वृषणग्रंथी सुमारे ४० ग्रॅम. तेव्हां मानवी नर गोरिलापेक्षा जास्त पण चिंपांझीपेक्षा कमी शरीरसुख भोगतो. त्याचे जुगणे गोरिलासारखे गर्भधारणे पुरते मर्यादित नसते तर मादीशी जवळिक वाढवणारे सुध्दा असते. लैंगिक जवळीक ही सुखी व समाधानी संसारासाठी वापरणे हे मानवाचे व्यवच्छेदक लक्षण असावे.

मानवात नर आणि मादी यांच्या स्वभावात फरक आहेत. हे फरक उपजत आहेत आणि त्यांचा अन्वय उत्क्रांती तत्वाने लावता येतो. स्त्रियांचे आपापसातील संबंध एका विशिष्ट परिस्थितीतून आकारले. पुरुषांचे परस्पर नाते वेगळ्या पार्श्वभूमीवर घडले. या चर्चेतून स्वभावांमधील फरकांचे काही प्रमाणात स्पष्टीकरण मिळते. हे सर्व आदिमानवाच्या उत्क्रांतीत शेतीपूर्व काळात घडून गेले आहे. ही आठवण पुन्हा करावयास हवी.
आदिमानवाच्या आहारात शिकारीतून मिळणाऱ्या मांसाला महत्वाचे स्थान होते. मोठ्या प्राण्याची शिकार यशस्वी झाली तर संपूर्ण टोळीची कित्येक आठवड्यांची सोय होई. म्हणून हत्ती, जिराफ अशा महाकाय प्राण्याची शिकार करण्याचा मोह होणे स्वाभाविक वाटते. पण असे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता किती? हत्तीकडून सुध्दा मोठा ‘मॅमथ’ नावाचा प्राणी अश्मयुगात माणसाच्या शिकारीचा बळी होत असे हे उत्खनित पुराव्यावरुन दिसते. अमेरिकेत अरिझोना प्रांतात दगडी शराग्रे अंगात घुसलेली मॅमथ कलेवरे अश्मीभूत अवस्थेत सापडली आहेत. अर्थात मोठ्या प्राण्यांच्या शिकारीत धोका फार. योग्य संधीची वाट बघत दिवसचे दिवस त्या प्राण्याचा पाठपुरावा करणे जरुर. आजही दक्षिण आफ्रिकेत कालाहारी वाळवंटातील आदिवासी पुरुष जिराफाची शिकार करण्यासाठी धडपडतात. ते विषारी बाणांचा वापर करतात. हे विष करण्यासाठी खास जातीचे किडे ठेचून वापरले जातात. ( पण या घटना क्वचित घडत असणार. समजा वर्षातून एक दोन वेळा) असे विष अंगात भिनलेला जिराफ पक्षाघाताने लुळा पडतो पण विषाचा परिणाम होण्याला कित्येक दिवस लागतात. तेवढा काळ त्या प्राण्यावर लक्ष ठेवण्यासाठी मागे मागे फिरावे लागते. अखेर लोळागोळा होऊन तो पडला की त्याची हत्या केली जाते. मग मांस उन्हात वाळवायचे. अखेर ही लूट मुक्कामावर न्यायची. या सर्व काळात टोळीतील पुरुष एकत्र राहतात, खातात, पितात, एकमेकांवर भरवसा टाकतात, एकमेकांसाठी धोका पत्करतात, जिवाला जीव देतात. तेथे पर्याय नसतो.
एखादा माणूस कचखाऊ असला तर शिकार ऎनवेळी निसटून जाण्याची शक्यता म्हणजे सगळ्यांच्या कष्टावर पाणी. शिवाय इतरांचे जीव धोक्यात येण्याची हि शक्यता. पुरुषांची मानसिकता अशा अनुभवातून घडत असणार. उलट बायका मुक्कामावर रहात. मुले सांभाळत. अन्न, जळण, पाणी गोळा करत. या परिस्थितीत आपसातील सहकार पुरुषांसारखा खोल व भावनोत्कट होणार नाही. उरल्या – पुरल्याची काळजी वाटणे, उसने – पासने करावे लागणे, तुझे – माझे चा टकराव होणे हे अपरिहार्य. एकाच क्षेत्रात प्रत्येकीने चीजा शोधायच्या या रचनेतच विरोध अंतर्भूत आहे. पुरुष स्वभावाचे वर्णन ‘fight or flight’ तर स्त्री स्वभावाचे वर्णन ‘tend or befriend’` असेही केले जाते. पुरुषांना व्यक्तिगत संबंधात मध्यम मार्ग जमत नाही. अगदी दोस्ती तरी किंवा दोन हातच जुळवून घेणे हे बायकांना जास्त जमते. अशा प्रकारे नर – नारी यांच्या मानसिक घडणीमधे उत्क्रांत होताना फरक पडला आहे / असणार असे उपजत वळण सहजा सहजी बदलले जाणार नाही.
स्त्री पुरुषांच्या शरीर सौष्ठवातील फरक सुध्दा वरील संदर्भात अर्थपूर्ण ठरतात. पुरुषांचे वजन स्त्री पेक्षा अधिक. वजन सारखे असले तरी पुरुषांत ताकद अधिक. पळणे, भाला फेकणे अशा खेळांमधे बायका पुरुषांची बरोबरी करु शकत नाहीत. अशा व्यायामांसाठी पुरुषांचे शरीर अधिक अनुरूप आहे. ऑलंपिक खेळांच्या निकालातून वरील मुद्दा तपासता येतो. आपण असे भाकित करु शकतो की आदिमानवाला शिकारीसाठी जे गुणधर्म उपयोगी पडत त्यांच्याबाबत पुरुष स्त्रियांपेक्षा वरचढ असतील. एखाद्या खेळात बायका पुरुषांच्या बरोबरीने खेळू शकत असतील तर तेथे लागणारी कौशल्ये आदिमानवाच्या शिकारीतील यशासाठी अनावश्यक असणार.
स्वभावातील फरकाला एक स्पष्टीकरण म्हणजे ‘घरचे वळण’. हसण्याचेच पहा. हास्य हे उपजत आहे. तिसऱ्या महिन्यापासून बाळ हसू लागते. माणसे आयुष्यभर हसू शकतात व हसतात. पण कसे हसावे याबद्दलचे संकेत उपजत नाहीत. तो संस्कृतीचा भाग आहे. पुरुषांनी सात मजली गडगडाट करुन, धबधब्यासारखे हसणे चालते. पण बायकांनी जास्त संयमित, मर्यादेने हसावे असा आपल्याकडचा संकेत आहे. बायका हसताना तोंडाला पदर लावतात. पण कोणतेही वळण लावले नाही तरी फरक दिसले तर ते उपजतच म्हणावे लागतील. दक्षिण आफ्रिकेतील कालाहारी वाळवंटातील कुंग – सान जमातीमधे मुलगा – मुलगी असा भेद संगोपनात नाही. दोघांनाही पूर्ण मोकळे खेळू देतात. कोणतेही काम सांगत नाहीत. तरीसुध्दा खेळात रंगून जाऊन आईवडिलापासून दूर भरकटणे हे मुलींपेक्षा मुलांमधे जास्त घडते. अन्यही फरक दिसतात. तान्ह्या मुली तान्ह्या मुलांपेक्षा जास्त हसऱ्या असतात. सहा महिन्याच्या मुली समवयस्क मुलांच्या तुलनेने (इतर आवाजांपेक्षा) बोलण्याच्या आवाजाकडे जास्त लक्ष देतात. त्या आईला जास्त चिकटून असतात. खेळ म्हणून मस्ती, मारामारी, दांडगाई करण्यात मुलींपेक्षा मुले आघाडीवर असतात. असे फरक विविध संस्कृतींमधे आढळतात म्हणून ते उपजत असावेत असे मानले जाते.
उपजत फरक असले तरी स्त्री-पुरुष समता या कल्पनेचा मूल्य म्हणून आपण स्वीकार करु शकतो. इस्त्राएल देशात सुरुवातीच्या काळात किबुत्स नामक वस्त्यांमधे स्त्री – पुरुष समानता मुद्दाम रेटण्यात आली. राजकीय, सामाजिक, आर्थिक व अन्य क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढला. ही गोष्ट अर्धशतकापूर्वीची. पण पुढच्या पिढीतील स्त्रियांना उलटे आपापल्या कुटुंबात जास्त वेळ घालवण्याचे आकर्षण वाटू लागले.
अर्थात उपजत गुणांचे महत्व सगळ्यांना कळतेच. त्याचा येवढा बाऊ करण्याचे काय कारण? सामाजिक रुढींचा अभ्यास करताना जीवशास्त्रीय पैलुंचे महत्व कधी वाटेल? प्रचलित रिवाजांचे स्पष्टीकरण सापडले पाहिजे, विचित्र वाटणाऱ्या गोष्टींचा अन्वय लागला पाहिजे आणि अनपेक्षित भाकिते करता आली पाहिजेत. अशा काही बाबींकडे निर्देश करुया.
सख्ख्या भावंडांमधे लग्न हे जगभर निषिध्द मानले जाते. आई – मुलगा, बाप – मुलगी हे संबंध त्याज्य मानले जातात. इतर नात्यांबाबत चित्र धूसर आहे. कोणी मामा – भाची लग्न मान्य करतात तर कोणी आते – मामे भावंडांचे लग्न जुळवतात. काहींना चुलत भावंडांचे लग्न चालते. तर काहींना चुलत, आते, मामे सर्वच नात्यांचे वावडे. नाते जितके जवळचे तितका लग्नाला विरोध अधिक, ते जितके दूरचे तितकी प्रतिकूलता कमी असे एकंदर चित्र दिसते. असे का? शरीरे तीच. नाते माहित नसले तर अश संबंधामधे शारिरिक अडचण येत नाही. मग निषेध का? जीवशास्त्र सांगते की अशा संबंधातून निपजणारी संतती अपंग, मतिमंद, दोषयुक्त असण्याचा धोका असतो. बालमृत्युची शक्यता असते. ‘Inbreeding’ चे हे दुष्परिणाम संभवतात असे अनुवंशशास्त्राचे प्रतिपादन आहे. नाते जितके जवळचे तितका संततीला धोका अधिक. आईबापांच्या नात्यातील दुरावा वाढतो तसा संततीचा धोका घटतो. जगभरचे सामाजिक रिवाज हे वरील वैज्ञानिक सत्याशी सुसंगत आहेत. सर्वात जास्त धोकादायक (सख्खी भावंडे) लग्नाला विरोधही सर्वात जास्त. दूरच्या नात्याबाबत विरोध ही शिथील. कोणी चालवून घेतो तर कोणी बंदी करतो हि विविधता म्हणजे त्या शिथीलतेचाच परिपाक होय.
अनुलोम विवाह प्रशस्ती आणि प्रतिलोम विवाह निषेध या रिवाजाकडे सुध्दा जीवशास्त्रीय दृष्टीने बघता येते. महामहोपाध्याय पां. वा.अ. काणेकृत History of Dharashastra नावाचा बहुखंडीय ग्रंथ आहे. त्याचा सारग्रंथ मराठीत उपलब्ध आहे. काणे सांगतात की स्मृती वाङमयाच्या अभ्यासातून स्वच्छ दिसते की वरच्या वर्णातील पुरुषांचा विवाह कमी दर्जाच्या वर्णातील स्त्रीसह होण्याला शास्त्रांची संमति असे. या उलट वरच्या वर्णातील स्त्रीचा विवाह कमी दर्जाच्या वर्णाच्या पुरुषाशी होणे निंद्य मानले जाई. त्याला शास्त्र संमति नसे. हे वाचून अशी समजूत होते की स्मृतिकार येथे काही एक खास हिंदू नियम घालून देत आहेत. प्रत्यक्षात असे आढळते की या ना त्या स्वरुपात अशा प्रकारचे संकेत सगळ्याच समाजात आहेत. येवढेच नव्हे तर प्राणीजगात सुध्दा असा नियम दिसून येतो. म्हणजे माणूस व प्राणीजग ब्रह्म, क्षत्र, वैश्य, शूद्र अशा चार वर्णात विभागले आहे असा अर्थ नव्हे. समागमसाथी निवडताना मादीकडून चोखंदळपणा अपेक्षित असून नर हे संख्येकडे आकर्षण दाखवतील, समागमसाथीदारांची संख्या वाढेल याच्यासाठी खटपट करतील असे अपेक्षित आहे.
जीवशास्त्रीय दृष्टीनुसार नर आणि मादी यांच्या वर्तणुकीचे मूळ आहे ते नर-मादी यांच्यातील प्रजनन संबंधातील विषमतेमधे. मादी हा अधिक ओझे वाहणारा भागीदार आहे. समागमात मादी देते अंडे तर नर देतो शुक्रजंतू. अंडे हे शुक्रजंतूपेक्षा फार जास्त खर्चिक असते. आकड्यात बोलायचे तर स्त्रिचे अंडे पुरुषाच्या शुक्रजंतूच्या ८५००० ( पंच्याऎंशी हजार) पट मोठे असते. स्त्री साऱ्या आयुष्यात सुमारे ४०० अंडी बनवते, तर पुरुष एक दिवशी लक्षावधी शुक्रजंतू बनवतो. गर्भधारणा आणि प्रसूतीचे कष्ट एकट्या मादीलाच सोसावे लागतात. सस्तन प्राण्यात बाळाला दूध पाजणे हे कामही मादीचेच. म्हणून आपल्या पिल्लाला जेणेकरुन सर्वोत्तम वारसा देईल असा नर मिळवणे हे मादीचे उद्दिष्ट असते. याचा अर्थ असा की स्त्रीला पुरुषाच्या सामाजिक दर्जाबद्दल तडजोड करावी लागणार असेल तर निदान आर्थिक, शैक्षणिक वा अन्य बाबतीत काही तरी भरघोस कर्तृत्वाची अपेक्षा धरली जाईल. म्हणून भाकित असे की त्या त्या समाजात परंपरेनुसार खालच्या पायरीवर असलेल्या गटातील पुरुषाने वरच्या दर्जाच्या गटातील स्त्रीशी विवाह केलेला असेल तर तो पुरुष विशेष यशस्वी व कर्तृत्ववान असेल.
भ्रूणहत्या : सर्वसाधारणपणे आईबापांना मूल हवेहवेसे वाटते. पण गर्भ नको म्हणून पाडणे, बाळ नको म्हणून मारणे असेही अल्पप्रमाणात का होईना घडते. अशा वेळी पक्षपात असेल तर तो स्त्रीगर्भाविरुध्द असतो. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हत्या होते ती बालिकांची. असे का?
हरणांपासून मधमाशांपर्यत अनेक प्राण्यांमधे आपल्या पिल्लांचे लिंग ठरवण्याची क्षमता असतेल इच्छेनुसार नर वा मादी जन्माला घालता येतात. उत्क्रांतीच्या विज्ञानातील प्रमेय असे की अधिक नातवंडे पैदा होण्याला उपयुक्त असे लिंग निवडले जाते. अशा उपयुक्ततेच्या दृष्टीने नर आणि मादी पिल्लांमधे काय फरक आहे? तर मादी पिल्लाला प्रौढपणी नर साथीदार मिळतोच आणि पिल्ले होतातच. हा भरवसा आहे. पण एका मादीच्या प्रजनन शक्ती इतकी मर्यादा सुध्दा आहे. नर पिल्लू शक्तिमान झाले, स्वयंवर स्पर्धा जिंकू शकले तर अनेक माद्यांच्या ठायी गर्भनिर्मिती करेल. पण नर पिल्लू अशक्त ठरले तर पदरात काहीच पडत नाही. अशक्त नर पिल्लू जोपासणे म्हणजे कष्ट पाण्यात. तेव्हां पिल्लू ताकदवान होईल अशी खात्री असल्यास ते नर असावे. म्हणजेच आई भक्कम असेल तर ती नर पिल्लांना जन्म देईल. आई सुमार ताकदीची असेल तर मादी पिल्ले जन्माला घालेल. डुकरे, मेंढ्या वगैरेबाबत अशी तपशीलवार निरिक्षणे झाली आहेत. याचा अर्थ त्या माद्या विचारपूर्वक असे निर्णय घेतात हा नसून हे सर्व शरीर व्यवस्थेअंतर्गत आपोआप होते असे म्हणायचे आहे.
माणसात साधारणपणे सर्वांचीच लग्ने होतात. अडसर असलाच तर प्रतिलोम विवाह निषेधाचा आहे. याची अडचण स्त्रियांना होते. ती अडचण सामाजिक स्तर वाढतो तशी वाढते. म्हणून अपेक्षा अशी की भृणहत्या – बालहत्या यांचे जे काही अल्प प्रमाण असेल ते बालिकांकडे झुकावे आणि सामाजिक स्तर उंचावेल तसे वाढावे. हे भाकित भीषण व एकांगी वाटते. शिक्षण व प्रबोधन यांचा परिणाम उच्च वर्गावर जास्त व्हावा अशी सुध्दा अपेक्षा असते. या प्रभावामुळे बालहत्या घटावी. ते सर्व गृहित धरुन भाकित दुरुस्त करता येईल की इतर बाबतीत तुल्यबळ गट असतील तर वरिष्ठ वर्गात बालिका हत्येचे प्रमाण अधिक असेल. असे भाकित तपासणे कर्मकठीण आहे. शीख समाजात बेदी शीख हे नाव पुरोहित वर्गाचे आहे. यांचा दर्जा सर्वात वरचा. यांना परंपरेने ‘कुडी मार’ असे हिणवून म्हटले जाई. ते बालिकाहत्या करतात असे मानले जाते. तसे असल्यास वरील भाकिताशी ती गोष्ट सुसंगत होईल.
अशी नियमांचा ( ते चुकीचे ठरले तरी) फायदा असा की समाज निरिक्षणाला त्यांच्यामुळे नेमकी दिशा येते. तिच्या अभावी आपल्याकडचे बरेच समाजविषयक संशोधन पसरट व निरुद्देश वाटते.
प्राणी स्वभावात ‘सवता – सुभा’ राखणी (territoriality) नामक पैलू आहे. अशा स्वभावाचा प्राणी आपल्या बांधवांना आपल्या सुभ्यात / जहागिरीत येऊ देत नाही. कोणी येण्याची चिन्हे दिसल्यास ‘येऊ नकोस’ असे सुचवतो. तरी आल्यास हल्ला करतो. अशा स्वभावामुळेच कुत्रा मालकाच्या घराचा राखणदार म्हणून उपयोगी पडतो. दुसऱ्याच्या सुभ्यात शिरताना परका कुत्रा घाबरतो. दबून वागतो. उलट मालक कुत्रा उग्र रुप धारण करतो. धावून जातो. बव्हंशी परका कुत्रा काढता पाय घेतो. कावळ्यांचा हा स्वभाव नाही. उलट दयाळ पक्षाचा आहे. स्वामित्वाची खटपट कशासाठी? त्या सुभ्याचा उपभोग घेण्याची मक्तेदारी टिकवण्यासाठी. पण राखण करणे कष्टाचे आहे. हे कष्ट कधी परवडतील? जर तितकीच मोलाची चीज त्या सुभ्यात असेल तर. अन्न, निवारा, घरट्याची सोय असे काहीतरी तेथे उपलब्ध हवे आणि इतरत्र त्याची टंचाई हवी.
माणूस याबाबतीत उपजत कसा आहे? तर तळ्यात मळ्यात. पक्केपणाने सुभेदारी स्वभावाचा नव्हे, पण वेळ पडल्यास तसा वागू शकतो. अन्नसंकलकांना अशा वागणुकीचे प्रयोजन फारसे नसते. अन्न व शिकार ही सर्वत्र विखुरलेली आणि लोकसंख्या विरळ असेल तर अतिक्रमणाची गरज नाही आणि म्हणून राखणीची सुध्दा. पुढील नियम शक्य दिसतात. जेथे कोणतीच सोय नाही ती भूमी राखली जाणार नाही. एखादा भूखंड राखला जात असेल तर त्यापासून काहीतरी लभ्यांश असणार. जेथे उत्पादकता कमी तेथे राखण परवडणार नाही. जो तो आपापले घर राखतो. वाळवंटात लोक पाण्याचे स्त्रोत राखतात. वादी (विहिर) पाशी परका माणूस पाणी भरु पाहिल तर अरब टोळीवाला त्याची हत्या करेल. शेतकरी शेत राखतो. बांध पुढे मागे ढकलण्यावरुन हातघाईवर येतो. शहरी जीवनातील वर्तणुकीतही याचे प्रतिबिंब पडते. कुत्र्यांप्रमाणेच माणूसही परक्यांच्या सुभ्यात जरा जपून वागतो. प्रवेश करण्यापूर्वी परवानगी घेतो. घराची घंटा वाजवतो. लहान मुलाने दार उघडले तर आधी जबाबदार मोठ्या माणसाबद्दल विचारतो. आपली ओळख सांगतो. ती पटली, परवानगी मिळाली की मग भेटीच्या कारणाबद्दल बोलणे सुरु होते. या रीती आपण शिकतो
स्वामित्व रक्षणाच्या विरुध्द प्रकारची वर्तणुक म्हणजे आदरातिथ्य. ‘अतिथि देवो भव’ हा दृष्टिकोन का रुढ झाला असावा? असलेली मर्यादित साधन संपत्ती राखणे जरुर असतेच. पण देवाण घेवाण सत्र सुध्दा उपयुक्त असते व आवश्यक असते. संपर्कातून दोघांचाही फायदा होतो. त्यासाठी अनुरुप रिवाज विकसित होणे व टिकणे अपेक्षित आहे. या संबंधात पुढील नियम सुचतात.
(१) देवाण घेवाणीतून फायदा जितका अधिक तितके आदरातिथ्य जोमदार असेल.
(२) पाहुण्यांची गरज भागण्याची अन्य सोय जेथे कमी तेथे अगत्य अधिक. जेथे उपहारगृहाची सोय नसेल तेथे यजमानाने परगावाहून आलेल्या माणसाची सोय करायलाच हवी. जॉन स्टाइनबेक या कादंबरीकाराच्य लिखाणात जुन्या कॅलिफोर्नियाची वर्णने येतात. त्या अविकसित ग्रामीण भागात कसल्याच सोयी नसत. यजमान पाहुण्याला हमखास जेवू घाले. पाहुणासुध्दा यजमानाला ओझे होऊ नये म्हणून अनुरुप भेटवस्तू ( उदा. A leg of venison) नेई.
नातेवाईक भेटीला येतात तेव्हांही आदर सत्कार केला जातो. त्यात पुढील नियम लागू पडतील
(१) नाते जितके जवळचे तितके स्वागत जास्त जोरदार.
(२) भेट जितकी अवघड तितके तिचे अप्रुप जास्त.
(३) दोन भेटीं मधला कालावधी जितका जास्त तितके भेटीचे महत्व जास्त.
(४) भविष्यतील भेट जितकी दूरची, मधल्या काळात होऊ घातलेल्या घटनांचे महत्व जितके जास्त तितकी वर्तमानातील निरोपाची भेट जास्त मोलाची.
(५) यजमानांकडे पाहुणे येण्याचे प्रमाण जितके जास्त तितकी पाहुण्यांची बडदास्त कमी.

हे झाले व्यक्तींबाबत. दोन गटांच्य संबंधांविषयी काय म्हणता येईल? निसर्ग
शास्त्रात (Ecology) या संदर्भात दिन तत्वे सांगितली आहेत. त्यांचा पडताळा मानवी संस्कृतीच्या अभ्यासात घेता येतो.
पहिले तत्व म्हणजे गाउसे या शास्त्रज्ञाने सांगितले Principle of Competitive exclusion. दोन जीवजाती एकाच पध्दतीने निसर्गोपभोग घेत असतील तर त्यांना एकत्र जगता येत नाही. स्पर्धेतून एक जात टिकते व दुसरी नामशेष होते. किंवा दोघींना वेगवेगळ्या स्थळी वास्तव्य करावे लागते. पॅरामीशिअम या एकपेशीय जीवाच्या दोन जाती परीक्षानळीत एकत्र ठेवून निरिक्षण करताना गाउसेला हे तत्व उमगले. त्या गोष्टीला पाउणशे वर्षे झाली. याला समांतर व्यवहार माणसांमधे दिसला तो माधव गाडगीळ यांना. निसर्गशास्त्र आणि मानवशास्त्र या दोन्हीमधे विहार करणाऱ्या या अभ्यासकाने नंदीवाले नामक जातीचे उदाहरण दिले आहे. त्यांच्या दोन पोटजाती आहेत. तिरुमल नंदीवाले आणि फुलमाळी नंदीवाले. दोन्ही गट नंदीचे खेळ करुन पोट भरतात. या दोन गटांनी जणू महाराष्ट्र वाटून घेतला आहे. तिरुमल नंदीवाले दक्षिण व पूर्व महाराष्ट्रात फिरतात तर फुलमाळी नंदीवाले उत्तर महाराष्ट्रात ( व अंशतः विदर्भात) फिरतात.
रॉबर्ट मॅक आर्थर या निसर्ग शास्त्रज्ञाला आढळले की वॉर्बलर या गटातील विविध जातीचे पक्षी एकाच ठीकाणी (झाडावर) वास्तव्य करतात. हे गाउसेच्या तत्वाविरुध्द जाते. पण खोल निरिक्षणातून दिसले की त्यातही विभागणी आहे. एक जात जमिनीवरचे किडे खाते, दुसरी खोडावरचे तर तिसरी शेंड्यावरचे. याला म्हणायचे Niche Separation. याला समांतर व्यवहार माधव गाडगीळकृत अभ्यासात नोंदलेला आहे तो एकाच जागी रहाणाऱ्या नंदीवाले, वैदू व फासेपासधी या गटांमधे. अहमदनगर भागातील या तीनही जातींच्या आहारातील एक महत्वाचा घटक म्हणजे शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस. पण प्रत्येक गटाचे भक्ष प्राणी वेगवेगळे आहेत. जाळी वगैरे वापरुन हरणे / काळवीट धरणे हे काम फासेपारधी गटाचे. मुंगुस / मांजरे खाणे ही रीत फक्त वैदूंमधे आढळते तर कोल्हे, तरस यांना खाण्याची पध्दत फक्त नंदीवाल्यांची आहे. पाखरे पकडणे हे काम फासेपारध्यांचे तर मासळी / खेकडे पकडणे हा वैदूंचा व्यवसाय. नंदीवाल्यांच्या आहारात डुकराच्या मांसाचे स्थान फार वरचे. तर वैदूंच्या आहारात दुय्यम. अशा प्रकारे स्पर्धा टाळण्याकडे कल आढळतो.
कर्नाटकातील कारवार जिल्हात कुमटा गावाजवळ मासून नावाचे ४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे छोटे बेट आहे. त्यावर १३ वेगवेगळ्या जाती रहातात. अंबिगा हे मच्छीमार. ते होडीतून खोल पाण्यात जाऊन मासेमारी करतात. त्यासाठी खास जाळी वापरतात. हलक्की या जातीचे लोक हरणांसारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करतात. पटगार मंडळी मोठी वटवाघळे मारुन खातात. आचारी जातीचे लोक रात्री मशालीच्या उजेडात मासे धरतात. अशा प्रकारे विविध गट एकमेकांच्या हितसंबंधांना धक्का न लावता जगतात.
सहकार्य, त्याग, बलिदान, नैतिकता अशा बाबींचा सुध्दा जीवशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करता येतो. आपण नैतिकता शिकवतो. ‘चांगली वागणूक’ टप्प्याटप्प्यानी आत्मसात केली जाते. शिक्षा टळावी म्हणून नियम पाळणे हा पहिला टप्पा. सगळ्यांसारखे वागलो तर आपल्याला गटात सामावून घेतील, देवाण – घेवाण करता येईल, फायदा होईल म्हणून रीती पाळणे हा दुसरा टप्पा (स्वच्छता, चांगले कपडे घालणे वगैरेमुळे फायदा होतो). कर्तव्य भावना हा पुढचा टप्पा. आपल्यामुळे गाडा अडला असे व्हायला नको. अपयशाचे खापर आपल्या माथी फुटणे नको. याहून प्रगल्भ भान म्हणजे कायद्याची / नियमांची चौकट आवश्यक आहे (रांगेचा फायदा सर्वांना), त्यांच्याविना समाजस्वास्थ धोक्यात येते ही जाणीव आणि तिच्यापोटी नियमांचे पालन असे कायदे कानून काही प्रमाणात arbitrary म्हणजे शासकांच्या मर्जीवर अवलंबून असतात. लक्ष्मण रेषा तशी निरर्थक असते. ती थोडी पुढे मागे होण्याने काही बिघडत नाही. गरज असते ती कोणत्या तरी मर्यादेची. १८ वर्षे वयाच्या माणसाला गुन्ह्याबद्दल शिक्षा तर १८ पेक्षा कमी वयाला त्याच अपराधाबद्दल सुधारगृहाकडे रवानगी ही अशीच गोष्ट आहे. सर्वात प्रगत टप्पा म्हणजे सदसदविवेक. या टप्प्यावर चांगले / वाईट, नीती / अनीती यातील फरक आपणच ठरवायचा. कायदा वगैरे दुय्यम. तुकाराम महाराजांनी सांगितले
‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही।
मानियले नाही जन लोका॥’

ही नैतिकतेची सर्वोच्च पातळी होय. म.गांधींनी स्वातंत्र्यलढा नैतिकतेच्या पातळीवर नेला. अमुक कायदा वाईट आहे म्हणून त्याचा सविनय भंग करायचा. त्यासाठी मिळणारी शिक्षा विनातक्रार भोगायची. पकडणारे पोलिस व सजा फर्मावणारे न्यायाधीश निज कर्तव्य पार पाडीत आहेत हे मान्य करुन त्यांच्याविषयी राग द्वेष टाकून ममत्व राखायचे. असा हा अगदी अनवट युध्द प्रकार होता.
अर्थात तत्वासाठी समाजहितासाठी त्यागाची पराकोटी म्हणजे प्राणार्पण. हे अपवादात्मक आणि लोकविलक्षण कृत्य आहे. पद्मिनीचा जोहार, बाजीप्रभू देशपांडे यांचे पावनखिंडीत धारातीर्थी पतन, बाबू गेनूचा सत्याग्रहात ट्रक समोर झोपून मृत्यू ही अशी थक्क करणारी उदाहरणे. जालियनवाला बागेमधे सुध्दा अनेक लोक मृत्यूमुखी पडले. पण अनपेक्षितपणे. उघड्या डोळ्यांनी मृत्यूला सामोरे जाणे महाकर्मकठीण. माझे वडील स्वतःची एक आठवण सांगतात. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. पुण्याला सर परशुरामभाऊ कॉलेज समोर विद्यार्थ्याचा सत्याग्रह चालू होता. एक इंग्रज सोजीर तरातरा चालत आला. त्याने यांच्यावर पिस्तुल रोखले व ओरडला, पळतोस की ओढू चाप ? त्या क्षणी जणू ब्रह्मांड आठवले. काही कळण्याआधी पायांनी जणू आपण होऊनच पळण्याल सुरुवात केली. हीच सामान्य माणसाची प्रतिक्रिया होय. आणि म्हणूनच बलिदान हे असामान्य म्हणायचे.
प्राण्यांमधे सुध्दा बलिदानाचा प्रकार दिसतो. मधमाशा शत्रूवर हल्ला करतात व चावतात तेव्हां चावणाऱ्या प्रत्येक मधमाशीचे पोट फुटते व ती मरते. पण असे असूनही वेळ येताच प्रत्येक मधमाशी हल्ला करतेच. अशी वर्तणुक उत्क्रांतीमधे का विकसित व्हावी? तर तिच्यामुळे वंश वाढतो. मधमाशी आपल्या जीवाच्या मोबदल्यात नातेवाईकांचा फायदा करुन देते. कुटुंबातील घटकांशी टोकाचे सहकार्य करते.
सहकार्य व संघटनाचे आणखी एक पराकोटीचे उदाहरण म्हणजे Portugese man – of – war (पोर्तुगीज लढाऊ जहाज) या विचित्र नावाने संबोधला जाणारा Jelly Fish म्हणावा असा जीव. ही हजारो छोट्या जीवांची एक मोट बांधलेली असते. खरे महत्व समूहाला. एकेका घटकाचे मोल कमी. हे छोटे जीव शब्दशः ‘आधे अधूरे’ असतात. कोणाला पोटच नाही तर कोणाला मज्जासंस्था नाही. गटाच्या वरच्या बाजूला तरंगण्यासाठी उपयोगी असा फुगा असतो. तो एक जीव. अगदी खालती लांब पातळ शेंगा असतात. एक शेंग म्हणजे एक जीव. त्यांनी भक्ष पकडायचे. मधोमध घंटांसारखे अवयव असतात. त्यांचे काम म्हणजे पाणी ढकलून ही मोट/होडी इकडे तिकडे न्यायची. जणू इंजिनेच. तर अशी काम वाटणी असते. गटाच्या उपयोगासाठी छोट्या जीवांची बाजी लावणे, ही तर मामुली बाब. येथेही बलिदानाचे स्पष्टीकरण म्हणजे आपला वंश नातेवाईकांच्या माध्यमातून वाढविणे.
माणसांना सुध्दा काहीसे असेच स्पष्टीकरण लागू होईल. बलिदानामुळे इतरांचा मोठा फायदा होणे अपेक्षित आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडचे म्हणून सांगितले जातात ते शब्द म्हणजे ‘लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगो’ . तात्पर्य प्राणांची बाजी कशाकरता लावायची तर लाखांचे पोषण होण्यासाठी. माणसाने आपला व्यक्तिगत स्वार्थ साधणे हे नेहमीचे. त्याने आपल्या कुटुंबासाठी झटणे म्हणजे स्वार्थाचे क्षितीज रुंदावणे. आई बाळाच्या पालन पोषणासाठी झिजते याचे आपण ठायी ठायी कौतुक करतो. ‘ प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधु आई ’ अशी विशेषणे देतो. नाते जितके दूरचे तितकी त्यागाची अपेक्षा घटते. म्हणून टोळीसाठी, गावासाठी, जातीसाठी त्यागाचे महत्व फार आहे. असे लोक कमी निघतात. प्रांतासाठी, राष्ट्रासाठी प्राणार्पण करणारे वंदनीय ठरतात.
सजीव प्राणी व वनस्पती ही यंत्रे आहेत. त्यांचा ‘ बोलविता धनी’ म्हणजे पेशीकेंद्रातील जीन्स. त्या अमर आहेत. यंत्रे सतत त्या जीन्सची सेवा करतात. त्यांचा कार्यभाग साधून देतात. तो कार्यभाग म्हणजे जीन्सच्या प्रती मोठ्या संख्येने घडवणे. त्याच जीन्सची संख्या दुसऱ्या यंत्राद्वारे वाढणार असेल तर त्यासाठी पहिले यंत्र मोडीत काढणे परवडते (जीन्सना). अखेर त्या जीन्सचा स्वार्थ साधण्याशी कारण. जीवसृष्टीकडे बघण्याचा हा दृष्टीकोन आहे. ही माडणी तपशिलात वाचायची असेल तर Richard Dawkins या लेखकाचे Selfish Gene हे पुस्तक पहावे.

“पुढे काय?”
या प्रकरणात आपण संस्कृती ही संकल्पना समजावून घेऊन तिचा अभ्यास कसा केला जातो याचा धावता आढावा घेतला. अशा अभ्यासात माहिती आणि तपशील यांचे संकलन तर व्हावेच पण स्थलकालातील प्रमेये, सिध्दान्त, नियम मूर्त व्हावेत असा आपण आग्रह धरला.
या पुढच्या नऊ प्रकरणांमधे वरील उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले टाकायची आहेत. या प्रकरणांपैकी ‘ नवे महाभारत’ हे प्रकरण माहिती गोळा करण्याविषयी आहे. प्रमेयांच्या मांडणीचा प्रयत्न नाही. ‘जात नाही ती जात’ हे प्रकरण भारतीय समाजाच्या संदर्भातच मांडणी करणारे आहे. कारण जातिसंस्था हे आपले व्यवच्छेदक लक्षणच म्हणता येईल. इतर सात प्रकरणांचे विषय (आहार, भाषा, प्रजनन, कुटुंब, संस्कार, वस्ती आणि निसर्ग). मांडताना मात्र एखादी विशिष्ट मर्यादा ठेवलेली नाही. यातील कल्पना सगळ्याच समाजांना लागू ठराव्यात. अर्थात माहितीचा बराच अंश मराठी किंवा भारतीय समाजाला लागू असेल. त्यातही ख्रिस्ती, मुस्लिम, बौध्द, यहुदी या धर्मांच्या अनुयायांबद्दल फार कमी चर्चा आढळेल. बहुतेक सर्व लिखाण हिंदू समाजाबद्दल आहे. याची कारणे दोन. एक तर भारतीय लोक संख्येपैकी तीन चतुर्थांशाहून अधिक हिस्सा हिंदू आहे. दुसरे कारण म्हणजे माझा अन्य धर्मीय गटांशी फार कमी परिचय आहे.
चला. या बौध्दिक प्रवाचाची सुरवात करुया.

No comments:

Post a Comment